Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 03 September 2020
Time 18.00 to 18.10
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०३ सप्टेंबर २०२० सायंकाळी
६.००
****
**
आगामी दसरा-दिवाळी या सणांच्या काळात नागरिकांच्या सुरक्षेकडे प्राधान्यानं लक्ष देण्याची
गरज मुख्यमंत्र्यांकडून व्यक्त
**
हृदयविकार तसंच मधुमेही रुग्णांनी आजार अंगावर काढू नये - आरोग्यमंत्र्यांचं आवाहन
**
औरंगाबाद इथं आज सात कोविडग्रस्तांचा मृत्यू; बाधित रुग्णांची संख्या २४ हजारावर
आणि
**
विमुद्रीकरण हा देशातल्या असंघटीत क्षेत्रावरचा हल्ला - खासदार राहुल गांधी यांची टीका
****
आगामी
नवरात्र महोत्सव, दसरा, दिवाळी यासारख्या सणांच्या काळात नागरिकांच्या सुरक्षेकडे प्राधान्यानं
लक्ष देण्याची गरज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. पश्चिम महाराष्ट्रातल्या
कोविड 19 स्थितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. टाळेबंदी उठवण्याच्या टप्प्यात मंदीरं
आणि इतर धार्मिक स्थळं उघडण्याची मागणी होत असली तरीही राज्य सरकार खबरदारी बाळगत असल्याचं
मुख्यमंत्री म्हणाले. भारतीय जनता पक्षासह इतर विरोधी पक्षांकडून धार्मिक स्थळं उघडण्याची
मागणी केली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी ही बाब स्पष्ट केली. सातारा,
सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असून, अधिकाऱ्यांनी
मुंबई - ठाण्यासह या जिल्ह्यांकडेही लक्ष द्यावं, असं मुख्यमंत्री म्हणाले. कोरोना
विषाणू संसर्गाबरोबरच आपण इतर अनेक आव्हानांचा सामना करत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी
नमूद केलं.
****
हृदयविकार,
रक्तदाब तसंच मधुमेहाच्या रुग्णांना, कोरोना विषाणू संसर्ग होण्याचं प्रमाण सामान्य
माणसापेक्षा जास्त असल्यामुळे कोणीही आजार अंगावर काढू नये असं आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री
राजेश टोपे यांनी केलं आहे. महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांत, तालुक्यांत, सीसीसीच्या
सेंटरमध्ये, उत्तम पद्धतीची व्यवस्था करण्यात आलेली असून बाधित रुग्णांनी मन खंबीर
ठेवून कोरोना विषाणू संसर्गावर मात करावी असं आवाहनही त्यांनी केलं आहे.
****
चंद्रपूर
जिल्हात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असुन पोलीस अधीक्षक कार्यलयातील
एका वरिष्ठ अधिकाऱ्याला कोरोना विषाणूची लागण झाली आहे. चंद्रपूर जिल्हा कारागृहातील
तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांसह १६८ कैद्यांना आणि १४ कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचं निदर्शनास आलं आहे.
****
औरंगाबाद
इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात आज सात कोरोना विषाणू बाधितांचा
मृत्यू झाला. जिल्ह्यात या संसर्गानं मृतांची संख्या आता ७२३ झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यातल्या
कोरोना विषाणू बाधितांची संख्या आता २४ हजार १४ झाली आहे.
****
वायूदलप्रमुख
एअरचिफमार्शल आर के एस भदौरिया यांनी अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम लगत प्रत्यक्ष नियंत्रण
रेषेवर वायूदलाच्या सज्जतेचा आढावा घेतला. चीनसीमेवर वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर
ही पाहणी करण्यात आल्याचं, पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे. ३ हजार ४०० किलोमीटर लांबीच्या
प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर वायूदल तसंच पायदलानं सर्वच मोक्याच्या जागांवर दक्षतेत
वाढ केली आहे. वायूदल प्रमुखांनी एकूणच सज्जतेबाबत समाधान व्यक्त केल्याचं, वायूदलाच्या
प्रवक्त्यानं सांगितलं.
दरम्यान,
लष्कर प्रमुख मनोज नरवणे दोन दिवसांच्या लडाख भेटीवर पोहोचले आहेत. चीनकडून सीमारेषा
बदलण्याच्या आगळीकी संदर्भात ते सेनादलाच्या अधिकाऱ्यांकडून आढावा घेणार आहेत.
****
अभिनेता
सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात अंमली पदार्थ नियंत्रण विभागानं आणखी एका संशयिताला
चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. या व्यक्तीची ओळख उघड करण्यात आलेली नाही, मात्र यापूर्वी
याप्रकरणी ताब्यात घेतलेल्या बासित परिहार याच्याशी या व्यक्तीचे संबंध असल्याचा संशय
आहे. दरम्यान काल या प्रकरणी अटक केलेल्या झैद विलात्रा याला आज स्थानिक न्यायालयासमोर
हजर करण्यात आलं, न्यायालयानं त्याची ९ सप्टेंबरपर्यंत अंमली पदार्थ नियंत्रण विभागाच्या
कोठडीत रवानगी केली. झैदनं अंमली पदार्थ व्यवसायात सामील असल्याची कबुली दिल्याचं,
या विभागानं सांगितलं आहे. झैदकडून साडे नऊ लाख रुपयांसह परकीय चलनही हस्तगत करण्यात
आलं आहे.
दरम्यान,
सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभाग - सीबीआयकडून इंद्रजीत चक्रवर्ती
यांची आज सलग तिसऱ्या दिवशी चौकशी सुरू आहे. इंद्रजीत हे सुशांतची मैत्रीण अभिनेत्री
रिया चक्रवर्तीचे वडील आहेत, गेल्या दोन दिवसांत सीबीआयने इंद्रजीत यांची सुमारे अठरा
तास चौकशी केली आहे. रियाची त्यापूर्वीच्या चार दिवसांत जवळपास ३५ तास चौकशी झाली आहे.
****
विधानसभेचे
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज तालुक्यात
सावंगी, आमगाव तसंच देसाईगंज या गावांना भेट देऊन पूरग्रस्त भागाची पाहणी केली, आणि
पूरग्रस्त नागरिकांशी संवाद साधला. राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे पूर्व विदर्भात
महापुराची स्थिती उदभल्याची टीका फडणवीस यांनी यावेळी केल्याचं आमच्या वार्ताहरानं
कळवलं आहे.
****
राज्याच्या
क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी सध्याच्या क्रीडा धोरणात आवश्यक सुधारणा करण्याचा निर्णय
राज्य सरकारने घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या
बैठकीत ही माहिती देण्यात आली. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पदकविजेत्या राज्यातल्या गुणवत्ताधारक
खेळाडूंना शासकीय सेवेत थेट संधी मिळण्याचा मार्ग अधिक सोपा व्हावा, शासकीय सेवेत आल्यानंतर
खेळाडूंना खेळावर लक्ष केंद्रीत करता यावं, यासारख्या अनेक बाबी क्रीडा धोरणात समाविष्ट
करण्यात येणार असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं.
****
औरंगाबादच्या
पोलीस महानिरीक्षकपदी के. एम. एम. प्रसन्ना तर पोलीस आयुक्त पदी निखील गुप्ता यांची
नियुक्ती करण्यात आली आहे. पोलीस महानिरीक्षक रविंद्र कुमार सिंघल यांची मुंबई इथल्या
वैधमापन शास्त्र विभागाच्या नियंत्रक पदी तर आयुक्त चिरंजीव प्रसाद यांची नागपूर इथं
विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे.
****
विमुद्रीकरण
- नोटबंदी हा देशातल्या असंघटीत क्षेत्रावरचा हल्ला होता, अशी टीका काँग्रेस नेते खासदार
राहुल गांधी यांनी केली आहे. सामाजिक संपर्क माध्यमावर प्रसारित करण्यात आलेल्या चित्रफितीतून
गांधी यांनी हे आरोप केल्याचं, पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे. नोटाबंदीतून काळा पैसाही
समोर आला नाही, तसंच गरीबांना नोटाबंदीचा काहीही फायदा झाला नाही, असंही गांधी यांनी
म्हटलं आहे. रोख रकमेवर व्यवसाय अवलंबून असलेले छोटे व्यापारी, कामगार, शेतकरी, आदी
वर्गाला नोटाबंदीमुळे त्रासच झाला असल्याचं, गांधी यांनी या चित्रफितीत म्हटलं आहे.
दरम्यान
काँग्रेस पक्षानेही केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका करत, मोदी सरकार देशाला आर्थिक
आणीबाणीत लोटत असल्याचा आरोप केला आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेचं स्वातंत्र्योत्तर काळात
प्रचंड नुकसान केल्याबद्दल अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि केंद्र सरकारनेही पायउतार
व्हावं, असं काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी म्हटलं आहे. ते आज सामाजिक संपर्क
माध्यमावरून घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. राज्य सरकारांना वस्तू आणि सेवा
कराचा परतावा न दिल्याबद्दलही सुरजेवाला यांनी केंद्र सरकारवर टीका केल्याचं, पीटीआयच्या
वृत्तात म्हटलं आहे.
****
प्रधानमंत्री
गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत अंत्योदय अन्न
योजना तसंच प्राधान्य कुटूंब लाभार्थ्यांसाठी जुलै तसंच ऑगस्ट महिन्याकरता मोफत डाळ
वितरण सुरू करण्यात आलं आहे. लाभार्थी कुटुंबांना दरमहा एक किलो मोफत डाळ दिली जाते.
ही योजना येत्या नोव्हेंबर महिन्यापर्यंत सुरु राहणार आहे. याच योजनेअंतर्गत प्राधान्य
कुटुंबाला प्रतिमाणसी तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ असं पाच किलो धान्यही दरमहा
दिलं जातं. ऑगस्ट महिन्यसाठी या धान्याचं वाटप सुरू करण्यात आलं आहे. पात्र शिधापत्रिकाधारकांनी
संबंधित दुकानांतून गर्दी न करता योग्य शारीरिक अंतर राखून तसंच मास्क - मुखावरणाचा
वापर करुन हे धान्य प्राप्त करुन घ्यावं, असं आवाहन करण्यात आलं आहे.
****
लातुर
जिल्ह्यात सतत पडणारा पाऊस आणि रोगराई यामुळे मुग, उडीद व सोयाबीन या पिकांचे मोठ्या
प्रमाणात नुकसान झाल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. आघाडी सरकारनं पीक विमा
कंपन्याचे दलाल न होता बाधित पिकांचे ताबडतोब पंचनामे करावेत या मागणीसाठी आमदार संभाजी
पाटील निलंगेकर यांनी शेताच्या बांधावरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कृषी अधिकार्यांच्या
मार्फत आज निवेदन दिलं. या मागणीची तात्काळ दखल न घेतल्यास आघाडी सरकार मधील शासकीय
कामाच्या वेळी आंदोलन करण्याचा इशाराही आमदार निलंगेकरांनी यावेळी दिला.
****
नांदेड
जिल्ह्याच्या हिमायतनगर तालुक्यातल्या मंगरूळ इथले सीमा सुरक्षा दलाचे जवान पोचिराम
सुदेवाड यांचं काश्मीर मध्ये श्रीनगर इथं निधन झालं. आज शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिव
देहावर मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.
****
परभणी
इथं पोलिसांनी सुगंधी सुपारी, पान मसाला तसंच गुटख्याचा मोठा साठा जप्त केला. शहरात
मगदुमपूरा भागात काल केलेल्या कारवाईत सुमारे अडीचा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात
आला असून, आरोपी मोहम्मद इद्रिस यास अटक करण्यात आली आहे.
****
औरंगाबाद
इथल्या लायन्स डोळ्यांच्या रुग्णालयानं रुग्णांची तपासणीपासून ते उपचार आणि शस्त्रक्रिया
करण्यासाठी एसएमएस प्राणाली विकसित केली आहे. या प्रणालीमुळे रुग्ण आणि डॉक्टरांचा
कमीतकमी संपर्क येऊन कोरोना विषाणूचा धोका कमी होईल, असा विश्वास मुख्य कार्यकारी अधिकारी
डॉ. प्रितेश सोनार यांनी व्यक्त केला.
****
बीड
जिल्ह्याच्या अंबाजोगाई पंचायत समितीच्या परिसरात साडेचार गुंठे क्षेत्रावर एक हजार
२५० रोपांची शास्त्रीय पध्दतीनं घनदाट वृक्ष लागवड करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या वृक्षलागवडीच्या आवाहनाला प्रतिसाद
देत गटविकास अधिकारी डॉ.संदीप घोन्सीकर यांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला.
****
No comments:
Post a Comment