Friday, 25 September 2020

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 25.09.2020 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 

आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२५ सप्टेंबर २०२० सकाळी ११.०० वाजता

****

देशभरात गेल्या २४ तासांत कोविड संसर्ग झालेले नवे ८६ हजार ५२ रुग्ण आढळले, त्यामुळे देशातली कोविडबाधितांची एकूण संख्या ५८ लाख १८ हजार ५७० झाली आहे. गेल्या २४ तासांत एक हजार १४१ रुग्णांचा मृत्यू झाल्यानं, या संसर्गानं मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या ९२ हजार २९० झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधित रुग्णांची एकूण संख्या ३२ हजार ८९ झाली आहे. यापैकी २५ हजारावर रुग्ण आतापर्यंत बरे होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यात आजपर्यंत ८९३ जणांचा मृत्यू झाला असून, सध्या ६ हजार १४२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

पंजाबमध्ये सुरू असलेल्या शेतकरी संघटनाच्या आंदोलनामुळे काही रेल्वे गाड्या अंशत: रद्द करण्यात आल्या आहेत. नांदेड - अमृतसर सचखंड एक्सप्रेस रेल्वेगाडी आज दिल्लीपर्यंतच धावेल, तर उद्या दिल्लीहूनच नांदेडला परत येणार आहे.

****

जनसंघाचे सहसंस्थापक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंती निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना अभिवादन केलं आहे. त्यांचे आदर्श आम्हाला गरिबांची सेवा करण्यासाठी आणि त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी प्रेरित करतात, असं पंतप्रधानांनी त्यांच्या ट्वीट संदेशात म्हटलं आहे. गृहमंत्री अमित शहा यांनीही पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केलं.

****

पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी फेम इंडिया कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्र, गोवा, गुजरात आणि चंदीगड या राज्यांसाठी ६७० इलेक्ट्रीक बस देण्याची घोषणा केली. महाराष्ट्रासाठी २०० ई-बस मंजूर झाल्या आहेत, त्यापैकी महाराष्ट्र राज्य रस्ता परिवहन महामंडळ आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्या इंटरसिटीसाठी शंभर तर बेस्ट-मुंबईसाठी चाळीस ई-बसेस मंजूर झाल्या आहेत.

****

बीड जिल्यातील मांजरा धरणातील पाणीसाठा पन्नास टक्के इतका झाला आहे. धरणात अजुनही पाण्याची आवक होत असून पाणीसाठा वाढण्याची शक्यता धरणाचे शाखा अभियंता शाहू पाटील यांनी दिली. यापूर्वी २०१६ मध्ये हे धरण पूर्ण भरलं होतं.

****

No comments: