Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 26 September 2020
Time 18.00 to 18.10
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २६ सप्टेंबर २०२० सायंकाळी ६.००
****
**मराठवाड्यात कोरोना विषाणू
चाचण्या वाढवण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना
**पावसामुळे झालेल्या नुकसानीचे
आठवडाभरात पंचनामे करा - कृषी मंत्री दादा भुसे
**औरंगाबादमधे कोरोना विषाणू
संसर्गामुळे पाच रुग्णांचा मृत्यू
आणि
**हिंगोली जिल्ह्यात काळवीट
पकडल्या प्रकरणी सहा जणांना अटक
****
मराठवाड्यात कोरोना विषाणू संसर्गाच्या चाचण्यांचं प्रमाण वाढवणं आवश्यक असल्याचं मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्र्यांनी आज मराठवाड्यातल्या ‘माझं
कुटुंब,माझी जबाबदारी` या मोहिमेचा दूरदृश्य संवाद
प्रणालीद्वारे आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. तात्काळ
चाचणी नकारात्मक आली असली तरी या संसर्गाची
लक्षणं असतील अशांची `आरटी-पीसीआर`
चाचणी होणं आवश्यक असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी
सांगितलं. जगभर आता या विषाणू प्रादुर्भावाची दुसरी लाट येईल, असं म्हटलं जात आहे. आर्थिक चक्र फिरवण्यासाठी तरूण पिढी कामावर जाऊ लागली
आहे, पण त्यामुळे घरातल्या ज्येष्ठांपर्यंत विषाणू पोहचण्याची शक्यता निर्माण झाली
असल्यानं आता आपल्याला जनजागृतीवर मोठा भर द्यावा लागणार
असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. ज्याप्रमाणे केरळ हे देशातलं
सर्वाधिक साक्षरतेचं
राज्य म्हणून ओळखलं जातं त्याप्रमाणे आपल्याला महाराष्ट्र हे आरोग्य साक्षरतेत सर्वात पुढं राहील असे प्रयत्न करायचे
आहेत, असं त्यांनी यावेळी नमूद केलं. मराठवाड्यातले पालकमंत्री सुभाष देसाई, अशोक चव्हाण, राजेश टोपे, अमित देशमुख या बैठकीत सहभागी झाले.
****
कृषी मंत्री दादा भुसे यांनी आज औरंगाबाद जिल्ह्यात कन्नड तालुक्यातल्या
नागद, सायगव्हान इथं शेतातल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांनी यावेळी पावासामुळे
झालेल्या नुकसानीचे आठवडाभरात पंचनामे करण्याचे निर्देश आढावा बैठकीत दिले. विमा उतरवलेल्या
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी पिकांचा विमा मिळवण्यासाठी संबंधित कंपनीला लेखी कळवण्याचं
आवाहन त्यांनी केलं. ते म्हणाले...
औरंगाबाद मध्ये कन्नड तालुक्यातल्या
काही गावांमध्ये प्रत्यक्ष शेतामध्ये जाऊन पाहणी केली आहे. बऱ्याचशा ठिकाणी पिकांचं
नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे. आताही शेतांमध्ये पाणी आहे. बऱ्याच शेतांमध्ये दलदल
निर्माण झाली आहे. आणि म्हणून या संदर्भात तातडीनं पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात
आल्या आहेत. संपूर्ण महाराष्ट्राचा गोषवारा तयार केल्याच्या नंतर नुकसानीचे क्षेत्र,
पीकं, त्याचा संपूर्ण अहवाल महाराष्ट्राच्या कॅबिनेट समोर ठेवला जाईल. केंद्र शासनाला
सुद्धा हा संपूर्ण अहवाल त्याठिकाणी सादर केला जाईल.
जालना जिल्ह्यातल्या बदनापूर तालुक्यातल्या कडेगाव इथल्या नुकसानग्रस्त
पिकांचीही कृषीमंत्री दादा भुसे यांनी आज पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला.
****
लातूर
जिल्ह्यातल्या उदगीर तालुक्यात अतिवृष्टीनं झालेल्या पीकांच्या नुकसानीचे त्वरित पंचनामे
करून अहवाल सादर करण्याचे निर्देश पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिले आहेत.
तालुक्यातल्या नागलगाव, सुमठाण, धडकनाळ इथं अतिवृष्टीनं झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीची
पाहाणी बनसोडे यांनी आज केली. त्यावेळी ते बोलत होते. एकही नुकसानग्रस्त शेतकरी पंचनाम्यापासून
वंचित राहता कामा नये याची दक्षता प्रशासनानं घेण्याचे निर्देशही मंत्र्यांनी यावेळी
दिले.
****
जालना जिल्ह्यात जून ते ऑगस्ट या तीन
महिन्यात पावसामुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे महसूल आणि कृषी विभागानं
पूर्ण केले आहेत. जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालं
आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी ८१ कोटी ५२ लाख रुपयांचा निधी
अपेक्षित असून, याबाबतचा प्रस्ताव जिल्हा
प्रशासनानं तयार केला आहे. दरम्यान, जिल्ह्यात सप्टेंबर
महिन्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीनं पूर्ण करण्याचे
निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी दिले आहेत.
****
नांदेड
जिल्ह्यातल्या मुखेड तालुक्यात सप्टेंबर महिन्यात अनेक गावात अतिवृष्टी झाल्यामुळे
पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. या नुकसानीचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी आमदार हनुमंत
बेटमोगरेकर यांनी जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
****
औरंगाबाद
जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गावर उपचार घेत असलेल्या पाच रुग्णांचा आज मृत्यू झाला.
जिल्ह्यात आतापर्यंत ९०५ जणांचा या विषाणू संसर्गानं मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात या
संसर्गाच्या एकूण रुग्णांची संख्या ३२ हजार ४४० झाली असून सध्या सहा हजार १३५ रुग्णांवर
उपचार सुरु आहेत.
****
राष्ट्रीय औषधी प्राधिकरणानं उत्पादकांच्या स्तरावर
उपचारांसाठी लागणाऱ्या द्रवरुप प्राणवायूची किंमत १५ रुपये २२
पैसे प्रति घनमीटर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सध्या देशात प्राणवायूची मागणी वाढली असल्यानं
हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
****
भारतीय
जनता पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी
आज जाहीर केली. महाराष्ट्रामधून राष्ट्रीय सहसरचिटणीस म्हणून व्ही. सतिश यांची निवड
झाली आहे. माजी मंत्री विनोद तावडे, पंकजा मुंडे, विजया रहाटकर, सुनिल देवधर यांची
राष्ट्रीय सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. संजू वर्मा आणि हिना गावित यांची
राष्ट्रीय प्रवक्ते म्हणून, तर अल्पसंख्याक मोर्चासाठी जमाल सिद्दीकी यांची निवड करण्यात
आली आहे.
****
अंमली पदार्थ सेवन आणि व्यवहार प्रकरणी अभिनेत्री
दीपिका पदुकोन आणि तिची व्यवस्थापक करिश्मा प्रकाश यांची अंमली पदार्थ नियंत्रण विभागाच्या
मुंबईतल्या विश्राम गृहात आज समोरासमोर चौकशी करण्यात आली. दिपीकाची सुमारे साडे पाच
तास चौकशी करण्यात आली. अभिनेत्री श्रध्दा कपूर आणि सारा अली खान यांचीही आज स्वतंत्रपणे
चौकशी करण्यात आली. अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यू प्रकणाच्या चौकशीत अमली
पदार्थ सेवन आणि व्यवहारप्रकरणी त्यांची नावं समोर आली आहे.
****
हिंगोली जिल्ह्यात काळवीट पकडल्या प्रकरणी सहा
जणांना अटक करण्यात आली असल्याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. काळवीटाला
जाळं लावून पकडण्यात आल्याची एक चित्रफीत या आठवड्याच्या प्रारंभी सामाजिक संपर्क माध्यमांवर
प्रसारित झाली होती. त्यावरून वन्य जीव संरक्षण
अधिनियमांतर्गत ही अटक करण्यात आली आहे. किसन घंगाळे, रुस्तुम ढाकरे, विठ्ठल पाचपुते,
गजानन धनवे, मनोहर ढाकरे, सिद्धनाथ पाचपुते अशी अटक करण्यात आलेल्यांची नावं असल्याचं
या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.
****
परभणी जिल्ह्यात आजपासून येत्या ३० तारखेपर्यंत जनता
संचारबंदी पाळली जाणार आहे. मात्र या संचारबंदीला नागरिकांचा अल्प प्रतिसाद दिसून
आला. जिल्ह्यातल्या व्यापाऱ्यांनी आज दुकानं सुरुच ठेवली. या शिवाय
रस्त्यावरही मोठ्या प्रमाणात नागरिकांचा राबता दिसून आला. भाजीपाला, फळ विक्रेते जागोजागी आढळून आले, बँकांतूनही नागरिकांच्या रांगा दिसून
आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
पैठणच्या नाथसागर धरणाची सर्व, २७ वक्राकार दारं उघडून ९४ हजार
३२० घनफूट प्रतिसेकंद वेगानं गोदावरी पात्रात पाणी सोडण्यात येत आहे. धरणातून मोठ्या
प्रमाणात विसर्ग करण्यात येत असून नदी काठच्या गावांना प्रशासनानं सावधानतेचा इशारा
दिला आहे. नाथसागर धरण ९९ पूर्णांक २९ शतांश टक्के भरलं असून ५९ हजार १७८ घनफूट प्रतिसेकंद
वेगानं पाणी धरणात दाखल होत असल्याचं गोदावरी पाटबंधारे विभागानं कळवलं आहे.
****
जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातल्या वडीगोद्री महसूल मंडळात काल रात्री १७०
मिलीमीटर पाऊस झाला. मुसळधार पावसामुळे या भागातून वाहणाऱ्या मांगणी नदीला मोठा
पूर आला आहे. नदीलगतच्या ऊस, कापूस, सोयाबीनच्या शेतांमध्ये पुराचं पाणी शिरल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान
झालं आहे. दरम्यान, गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे शहागड
इथला कोल्हापुरी
बंधारा पाण्याखाली गेला आहे.
****
राज्यातल्या हॉटेल
चालकांची वीज देयकं कमी करावीत, अशी मागणी औरंगाबाद जिल्ह्यातल्या हॉटेल चालकांनी केली
आहे. अन्य उद्योगांप्रमाणेच हॉटेलची वीज देयकं असावीत, अशी मागणी यानिमित्त करण्यात
आली आहे.
****
No comments:
Post a Comment