Thursday, 24 September 2020

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 24.09.2020 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 24 September 2020

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २४ सप्टेंबर २०२० दुपारी १.०० वा.

****

राष्ट्रीय सेवा योजना - एनएसएसचे २०१८ - १९ या वर्षाचे पुरस्कार आज प्रदान करण्यात आले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, युवक कल्याण आणि क्रीडा मंत्री किरेन रिजिजू यांच्यासह देशभरातले राष्ट्रीय सेवा योजनेचे पुरस्कार प्राप्त ४२ स्वयंसेवक या कार्यक्रमात सहभागी झाले. कोविड महामारीविरुद्धच्या लढाईत एनएसएसच्या स्वयंसेवकांनी योग्य शारीरिक अंतर आणि मास्कचा वापर याबाबत जनजागृती केल्याबद्दल राष्ट्रपतींनी त्यांचं कौतुक केलं.

****

देशात कोविड संसर्गमुक्तीचं प्रमाण ८१ पूर्णांक ५५ शतांश टक्के एवढं झालं आहे. आतापर्यंत देशात या विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५७ लाख ३२ हजार ५१८ झाली आहे. यापैकी ४६ लाख ७४ हजारावर रुग्ण आतापर्यंत या संसर्गातून मुक्त झाले आहेत, गेल्या २४ तासात संसर्गमुक्त झालेल्या ८७ हजारावर रुग्णांचाही यात समावेश आहे. सध्या देशभरात ९ लाख ६६ हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गेल्या २४ तासात या संसर्गानं एक हजार १२९ रुग्णांचा मृत्यू झाला, त्यामुळे मृतांची एकूण संख्या ९१ हजार १४९ झाली आहे. या संसर्गामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण आता एक पूर्णांक ५९ शतांश टक्के झालं आहे.

दरम्यान, गेल्या २४ तासात देशात ११ लाख ५६ हजारापेक्षा अधिक नमुन्यांची कोविड तपासणी करण्यात आली. आतापर्यंत ६ कोटी ७४ लाखावर नमुन्यांची कोविड तपासणी करण्यात आल्याचं, भारतीय आयुर्विज्ञान संशोधन संस्थेकडून सांगण्यात आलं आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या ३१ हजार ७७२ झाली आहे. यापैकी २४ हजार ६९२ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. या संसर्गानं जिल्ह्यात आतापर्यंत ८९० जणांचा मृत्यू झाला असून, सध्या ६ हजार १९० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

भिवंडी इमारत दुर्घटना प्रकरणी गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेलं बचावकार्य आज पहाटेच्या सुमारास पूर्ण झालं. या इमारतीच्या ढिगाऱ्यातून ३८ मृतदेह बाहेर काढण्यात आले, तर २५ जणांना वाचवण्यात बचाव पथकाला यश आलं. सध्या एका अडीच वर्षाच्या बालकाचा तपास सुरू असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

संसदेनं मंजूर केलेल्या कृषी विधेयकांच्या विरोधात पंजाबमधे शेतकऱ्यांनी आजपासून तीन दिवसीय रेल्वे रोको आंदोलन सुरू केलं आहे. किसान मजदूर संघर्ष समितीने पुकारलेल्या या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाच्या फिरोजपूर विभागाने खबरदारी म्हणून आजपासून २६ सप्टेंबर पर्यंत पंजाबकडे जाणाऱ्या १४ विशेष रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत. यामध्ये नांदेड-अमृतसर सचखंड एक्स्प्रेस, अमृतसर-मुंबई गोल्डन टेंपल एक्स्प्रेस या गाड्यांचाही समावेश आहे. या गाड्या २६ सप्टेंबरपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत.

****

फॅशन डिझायनर सिमॉन खंबाटा आज मुंबईत अंमली पदार्थ नियंत्रण विभाग - एनसीबीसमोर चौकशीसाठी हजर झाली. अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या तपासातून समोर आलेल्या अंमली पदार्थ सेवन आणि व्यवहारांसंदर्भात सिमोन खंबाटाचं नाव समोर आलं होतं, त्यामुळे एनसीबीने तिला समन बजावलं. एनसीबीने अभिनेत्री दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान आणि रकुलप्रीत सिंह यांनाही समन्स बजावलं आहे. या प्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्तीसह १२ हून अधिक जण एनसीबीच्या अटकेत आहेत.

****

अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीनं उद्या २५ तारखेच्या नियोजित देशव्यापी आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटना सामील होणार आहे. संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांनी ही माहिती दिली. उद्या बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून केंद्र सरकारचा निषेध करण्यात येणार असल्याचं, करपे यांनी सांगितलं.

****

सोलापूरचे आमदार प्रशांत परिचारक यांची श्रीपूर इथल्या पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाली आहे. सुधारक परिचारक यांचं निधन झाल्यानं हे पद रिक्त झालं होतं. आज सकाळी झालेल्या निवड प्रक्रियेत प्रशांत परिचारक यांच्या नावावर एकमत झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

सांगली जिल्ह्यातल्या दुष्काळी तालुक्यात यंदा मोठ्या पावसाची नोंद झाली. खानापूर तालुक्यात ९३७ मिलीमीटर आटपाडी ७२७, जत ४९१, कवठेमहांकाळ ६६७ आणि तासगाव तालुक्यात ५९१ मिलिमीटर पाऊस झाला.

****

जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलाने केलेल्या कारवाईत एक दहशतवादी मारला गेला. सुरक्षा दलाकडून शोधमोहीम सुरू असताना, हा दशतवादी ठार झाला. या दहशतवाद्याची तसंच त्याच्या संघटनेची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे.

****

No comments: