Friday, 25 September 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 25 SEPTEMBER 2020 TIME – 18.00

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 25 September 2020

Time 18.00 to 18.10

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक –  २५ सप्टेंबर २०२० सायंकाळी ६.००

****

** वैद्यकीय उपचारांसाठी वाढीव शुल्क घेणाऱ्या दवाखान्यांकडून पाच पट दंड वसूल करण्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचे आदेश

** प्रसिद्ध पार्श्वगायक एस पी बालसुब्रह्मण्यम यांचं निधन

** औरंगाबाद जिल्ह्यात आज सहा कोविड बाधितांचा मृत्यू

** परभणी जिल्ह्यात `जनता संचारबंदी`साठी प्रशासकीय सक्ती नाही

आणि

** धनगर तसंच मराठा आरक्षणासाठी अनेक ठिकाणी आंदोलन; कृषी विधेयकांनाही विरोध

****

वैद्यकीय उपचारांसाठी वाढीव शुल्क घेणाऱ्या दवाखान्यांकडून पाच पट दंड वसूल करण्याचे आदेश आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. टोपे यांनी आज नागपूर इथं कोविड उपचारासंदर्भातील आढावा घेतला आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट दिली त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. नागपूरच्या शासकीय रुग्णालयांमध्ये कोविड रुग्णांसाठी असलेल्या सहाशे खाटांची संख्या एक हजार पर्यंत वाढवण्यात यावी अशी सूचना आरोग्य मंत्र्यांनी यावेळी केली. प्लाझ्मा उपचाराला प्रोत्साहन देण्यासाठी प्रति २०० मिलीलिटर प्लाझ्मासाठी ५ हजार ५०० रुपये असे दर निश्चित करण्यात आले असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. प्लाझ्मा उपचारासाठी केल्या जाणाऱ्या न्युक्लिक ॲसीड तसंच केमिलोमिनेसेन्स या दोन चाचण्यांसाठी बाराशे आणि पाचशे रुपये शुल्क घेता येईल, असंही टोपे यांनी स्पष्ट केलं.

****

बिहार विधानसभा निवडणुकीसाठीचा कार्यक्रम निवडणूक आयोगानं आज जाहीर केला. विधानसभेच्या २४३ जागांसाठी २८ ऑक्टोबर, ३ नोव्हेंबर आणि ७ नोव्हेंबर अशी तीन टप्प्यात ही निवडणूक होणार आहे. नक्षलग्रस्त भाग वगळता इतरत्र सकाळी सात वाजेपासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे, कोविडग्रस्तांना शेवटच्या तासाभरात मतदान करता येणार आहे.

****

प्रसिद्ध पार्श्वगायक एस पी बालसुब्रह्मण्यम यांचं आज चेन्नईत निधन झालं, ते ७४ वर्षांचे होते. कोविड संसर्ग झाल्यानं, त्यांना पाच तारखेपासून चेन्नईतल्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. महत्त्वाचे अनेक अंतर्गत अवयव निकामी झाल्यानं, त्यांना कृत्रीम श्वसन यंत्रणेसह जीवरक्षक प्रणालीवर ठेवण्यात आलं होतं. उपचारादरम्यान त्यांचं आज निधन झालं. १६ भारतीय भाषांमधून ४० हजारावर गाणी गायलेल्या बालसुब्रह्मण्यम यांना सहा वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्यासह चित्रपटसृष्टीतल्या अनेक मान्यवरांनी एस पी बालसुब्रह्मण्यम यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या शोकसंदेशात संगीत हे भाषा-प्रांत यांच्या पलिकडे असतं हे सिद्ध करणारे गायक या शब्दांत एस. पी. बालसुब्रमण्यम यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्यात आज सहा कोविड बाधितांचा मृत्यू झाला. या विषाणू संसर्गानं मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या आता ८९९ झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यातल्या कोविड बाधितांची संख्या ३२ हजार ८९ झाली असून सहा हजार १४२ जणांवर उपचार सुरु आहेत.

****

परभणी जिल्ह्यात उद्या शनिवारपासून ३० सप्टेंबरपर्यंत `जनता संचारबंदी`साठी आवाहन करण्यात आलं आहे. मात्र, त्याबाबत कोणताही आदेश पारित करण्यात आला नसल्याचं जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी स्पष्ट केलं आहे. जनता संचारबंदी` साठी प्रशासनाच्या स्तरावर कोणतीही सक्ती करण्यात आलेली नसून, कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावास प्रतिबंध लागावा म्हणून नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने योग्य त्या उपाययोजना करणं अभिप्रेत असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. प्रवासी वाहतुकीवरही प्रशासनाने कोणतेही निर्बंध घातलेले नाहीत, असंही याबाबतच्या एका प्रसिध्दी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

****

उस्मानाबाद जिल्ह्यात शून्य ते चौदा वर्षे वयोगटातल्या ज्या बालकांचे आई-वडील कोविड बाधित आहेत त्यांच्या संगोपनाची जबाबदारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीकडून घेतली जात आहे. यासाठी सुरू करण्यात आलेल्या बालसंगोपन कक्षाचं उद्घाटन नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर आणि भाजपचे विधी आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश संयोजक मिलिंद पाटील यांच्या हस्ते आज करण्यात आलं. या बालसंगोपन कक्षात उस्मानाबाद जिल्ह्यातल्या कोरोना विषाणू बाधित कुटुंबीयांच्या बाधित नसलेल्या ० ते १४ वर्षे वयोगटातल्या बालकांचा आहार, खेळणी आणि समुपदेशनाची काळजी घेतली जाणार आहे.

****

केंद्र सरकारनं शेतकऱ्यांसह कोणत्याच घटकांशी चर्चा न करता कृषी सुधारणा विधेयकं आणली. संसदेत संमत झालेली तीनही शेतकी विधेयकं देशाच्या संघराज्य व्यवस्थेला धक्का देणारी आहेत. केंद्र सरकारची ही विधेयक राज्यांच्या अधिकारांवर अतिक्रमण करणारी असल्याचा आरोप काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच.के.पाटील यांनी आज केला. ते मुंबई दौऱ्यावर आले असताना पत्रकारांशी बोलत होते. शेतकरी विरोधी कायद्यांना काँग्रेस सर्वच पातळ्यांवर तीव्र विरोध करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. केंद्राच्या विधेयकांविरोधात काँग्रेस नेत्यांचं शिष्टमंडळ येत्या सोमवारी राज्यपालांची भेट घेऊन त्यांच्याकडे निवेदन सादर करणार असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं.

****

मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत राज्यात कोणतीही नोकरभरती होऊ दिली जाणार नाही, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे सांगली जिल्हा अध्यक्ष संजय पाटील यांनी दिला आहे. ते आज सांगली इथं पत्रकारांशी बोलत होते. आरक्षण प्रश्न सुटेपर्यंत आंदोलनाची तीव्रता वाढवत ठेवली जाईल असं पाटील सांगितलं. या मागणीसाठी सांगली इथं आज धरणे आंदोलनही करण्यात आलं.

****

धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी जालना शहरात गांधीचमन चौकात आज धनगर समाज संघर्ष समितीच्यावतीनं ढोल बजाओ सरकार जगाओ आंदोलन करण्यात आलं. अंबड, दाभाडी इथंही आरक्षणाच्या मागणीसाठी अशाच प्रकारे आंदोलन करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

दरम्यान, कृषी सुधारणा विधेयकांच्या विरोधात जालना जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीनं आज आंदोलन करण्यात आलं. हे प्रस्तावित कायदे रद्द करण्यात यावेत, जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर फळपीक विम्याची रक्कम जमा करण्यात यावी, अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली.

****

परभणी इथंही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं कृषी सुधारणा विधेयकांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं. जिल्हाध्यक्ष किशोर ढगे यांच्या नेतृत्वात आंदोलकांनी या विधेयकांची होळी करुन निषेध नोंदवला.

कृषी विधेयकांच्या विरोधात भारतीय कम्युनिस्ट पक्षानं आज पाथरीच्या तहसीलदारांना निवेदन दिलं. या विधेयकांसह ४४ कामगार कायदे रद्द करावे अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे

****

बुलडाणा जिल्ह्यातही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात सोयाबिनच्या झाडांची तसंच शेतकरी विधेयकाची होळी करून केंद्र सरकारच्या धोरणाचा निषेध करण्यात आला.

****

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद महापालिकेनं शहरात मे महिन्यापासून ते २४ सप्टेंबरपर्यंत विना मास्क फिरणाऱ्या व्यक्तींकडून दंडात्मक कारवाई करत २३ लाख ९२ हजार रुपये दंड वसूल केला आहे. चार हजार ७८४ व्यक्तींकडून ५०० रुपये प्रमाणे हा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन कक्ष प्रमुख नंदकिशोर भोंबे यांनी दिली आहे. या सोबतच रस्त्यावर थुंकणे, रस्त्यावर कचरा टाकणे या साठी ही नागरिकांना दंड ठोठावण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

परभणी जिल्ह्यात कारेगाव शिवारात शेतातील आखाड्यात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर आज पहाटे स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी छापा टाकला. यावेळी दहा जणांविरूध्द कारवाई करण्यात आली. या कारवाईत रोख रकमेसह मोबाईल, जुगार साहित्य असा एकूण ६५ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

****

नांदेड जिल्ह्याच्या माहूर तालुक्यातल्या वाई ग्रामपंचायत कार्यालयातले ग्रामविकास अधिकारी शंकर गुंडमवार यांना लाच घेताना आज रंगेहाथ अटक करण्यात आली. सार्वजनिक वाचनालय सुरु करण्यासाठी नाहरकत प्रमाणपत्र देण्याकरता त्यांनी दहा हजार रुपयांची मागणी केली होती. यापैकी पाच हजार रुपये घेताना त्याना सापळा रचून पकडण्यात आले.

****

अहमदनगर महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी मनोज कोतकर यांची निवड झाली आहे. शिवसेनेचे उमेदवार योगिराज गाडे यांनी अर्ज मागे घेतल्यानं कोतकर यांची बिनविरोध निवड झाली.

****

 

No comments: