Monday, 28 September 2020

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 28.09.2020 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२८ सप्टेंबर २०२० सकाळी ११.०० वाजता

****

देशभरात कोविड संसर्गावर उपचारानंतर आतापर्यंत पन्नास लाखांहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. गेल्या अकरा दिवसात दहा लाख रुग्ण बरे झाले आहेत. देशात दररोज ९० हजारहून अधिक लोक कोविड मुक्त होत असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयानं ट्विटरद्वारे दिली आहे.

****

राज्यात काल १३ हजार ५६५ रुग्ण बरे होऊन रुग्णालयातून घरी गेले आहेत.राज्यातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ७१ पूर्णांक ९१ शतांश टक्के झालं आहे.

****

सातारा जिल्ह्यात काल कोरोना विषाणूबाधित नवे ४६९ रुग्ण आढळून आले. यासह जिल्ह्यातल्या रुग्णांची संख्या ३५ हजार ८८१ झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २५ हजार ५१४ जण यशस्वी उपचारानंर बरे झाले आहेत.

****

औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधित रुग्णांची एकूण संख्या ३२ हजार ९९३ झाली आहे.  यापैकी २६ हजार ११६ रुग्ण आतापर्यंत बरे होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यात आतपर्यंत ९१६ रुग्णांचा या संसर्गानं मृत्यू झाला असून, सध्या ५ हजार ९६१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

औरंगाबाद इथल्या ज्येष्ठ भावगीत गायिका मालिनी घन यांचं काल अल्पशा आजारानं निधन झालं. त्या ६३ वर्षांच्या होत्या. मूळ परभणी जिल्ह्यातल्या सेलु इथल्या असलेल्या घन यांनी आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरील विविध कार्यक्रमात सहभाग नोंदवला होता.

****

लातूर जिल्ह्याच्या निलंगा तालुक्यातल्या माकणी थोर गावातलं हनुमान मंदिर उघडल्यामुळे सरपंच श्रीनिवास अशोक यांनी मंदिर व्यवस्थापनाला नोटिस बजावली आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सध्या मंदिरं उघडण्यास मनाई आहे.

****

हुतात्मा भगत सिंग यांच्या जयंती निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली अर्पण केली आहे. भगत सिंग यांची शौर्य गाथा देशवासियांना शतकानुशतकं प्रेरित करत राहील असं पंतप्रधानांनी आपल्या ट्वीट संदेशात म्हटलं आहे.

****

प्रसिद्ध गायिका भारतरत्न लता मंगेशकर आज वयाची ९१ वर्ष पूर्ण करून ब्याण्णवाव्या वर्षात पदार्पण करत आहेत, त्यांच्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधानांनी त्यांना दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या. आपण लता दिदींच्या निरोगी दीर्घायुष्याची कामना करतो, असं पंतप्रधानांनी ट्वीट संदेशात म्हटलं आहे.

****

No comments: