Monday, 28 September 2020

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 28.09.2020 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 28 September 2020

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २८ सप्टेंबर २०२० सकाळी ७.१० मि.

****

·      संसदेनं पारित केलेल्या तिन्ही कृषी विधेयकांना राष्ट्रपतींची मंजुरी.

·      शेतीसाठी आधुनिक पर्याय वापरण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मन की बात कार्यक्रमातून आवाहन.

·      माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांचं दीर्घ आजारानं निधन.

·      शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी, समाजानेही मानसिक आधार देऊन साथ देण्याचं कृषीमंत्र्यांचं आवाहन.

·      राज्यात आणखी १८ हजार ५६ कोविड बाधितांची नोंद, ३८० जणांचा उपचारादरम्यान मृत्यू.

·      मराठवाड्यात ३६ रुग्णांचा मृत्यू झाला, तर नव्या एक हजार १४७ रुग्णांची नोंद.

आणि

·      राज्यातल्या ऊसतोड मजुरांना कुशल कामगारांचा दर्जा देण्याची आमदार सुरेश धस यांची मागणी.

****

केंद्र सरकारनं संसदेत पारित केलेल्या तीन कृषी विधेयकांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी काल मंजुरी दिली. त्यामुळे या विधेयकांचं आता कायद्यात रुपांतर झालं आहे. शेतकरी उत्पादनं व्यापार आणि वाणिज्य प्रोत्साहन आणि सुविधा विधेयक, शेतकरी हक्क आणि सुरक्षा दर हमी आणि कृषी सेवा करार आणि अत्यावश्यक वस्तू दुरुस्ती विधेयकं गेल्या आठवड्यात संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान लोकसभा आणि राज्यसभेत मंजूर झाली होती. मात्र, ही विधेयकं शेतकऱ्यांच्या हिताच्या विरोधात असल्याचा दावा विविध शेतकरी संघटनांनी केला आहे. त्यामुळे या संघटनांची या विधेयकांविरोधात आंदोलनं सुरु आहेत.

****

शेतीसाठी आपण जितके आधुनिक पर्याय वापरू, तितकीच शेती प्रगत होईल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीवरच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून ते काल देशवासियांशी संवाद साधत होते. या मालिकेचा ६९वा भाग काल प्रसारित झाला.

संकटाच्या काळात सुद्धा देशाच्या कृषी क्षेत्रानं पुन्हा एकदा उत्तम कामगिरी केली असल्याचं ते म्हणाले. कृषी क्षेत्र, शेतकरी, आपली गावं ही आत्मनिर्भर भारताचा आधार असून, ही मजबूत असली तरच आत्मनिर्भर भारताचा पाया मजबूत होईल, असं पंतप्रधान म्हणाले. तीन ते चार वर्षांपूर्वी महाराष्ट्रात फळं आणि भाज्यांना कृषी उत्पन्न बाजार समिती कायद्याच्या परिघातून मुक्त करण्यात आलं, या बदलामुळे महाराष्ट्रातल्या फळं आणि भाज्या उत्पादक शेतकऱ्यांच्या परिस्थितीत कसा बदल झाला, याचं ‘श्री स्वामी समर्थ फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड’ हे चांगलं उदाहरण असल्याचं ते म्हणाले. पुणे आणि मुंबईमध्ये शेतकरी स्वतः आठवडी बाजार भरवतात, या बाजारांमध्ये सुमारे सत्तर गावांमधील साडेचार हजार शेतकऱ्यांच्या उत्पादनांची थेट विक्री केली जाते, हा दाखला त्यांनी यावेळी दिला. देशातल्या गोष्ट सांगण्याच्या समृद्ध परंपरेवर पंतप्रधानांनी यावेळी प्रकाश टाकला. या परंपरेतून होणाऱ्या संस्कारांचं महत्त्व कोरोना विषाणू संसर्गाच्या या परिस्थितीमधे अधोरेखित होत असल्याचं ते म्हणाले.

****

माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांचं काल नवी दिल्लीत दीर्घ आजारानं निधन झालं, ते ८२ वर्षांचे होते. लष्कराचे माजी अधिकारी राहिलेल्या जसवंत सिंह यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमधे संरक्षण, अर्थ आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालयांचा कार्यभार पाहिला होता. गेल्या जून महिन्यापासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या पार्थीव देहावर राजस्थानमधल्या जोधपूर इथं काल अंत्यसंस्कार करण्यात आले.    

****

भारतीय जनता पक्षाची शिवसेनेसोबत कोणतीही चर्चा सुरू नसल्याची माहिती विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी काल दिली. फडणवीस आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यात परवा मुंबईत भेट झाली, त्या पार्श्वभूमीवर फडणवीस बोलत होते. राज्यातलं महाविकास आघाडी सरकार स्वतःच्या कृतीनेच कोसळेल, हे सरकार कोसळेल तेंव्हा पाहू, आम्हाला सत्ता स्थापनेची कोणतीच घाई नसल्याचा खुलासा फडणवीस यांनी केला.

दरम्यान, फडणवीस-राऊत भेटीवरून राजकीय वादळ उठलं असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस नेते महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मात्र, ही पूर्वनियोजित भेट होती, फडणवीस-राऊत भेटीशी याचा काही संबंध नसल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

****

शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं असून, समाजानेही शेतकरी बांधवांना मानसिक आधार देऊन त्यांना साथ देण्याचं आवाहन कृषी मंत्री दादा भुसे यांनी केलं आहे. हिंगोली इथं काल हिंगोली आणि परभणी जिल्ह्यातली पाऊस, पीक परिस्थिती आणि कृषी योजना अंमलबजावणीबाबतच्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे जलदगतीने पंचनामे करावे, यासाठी आवश्यकता भासल्यास ग्रामविकास आणि महसूल विभागाचे अधिकारी कर्मचारी नियुक्त करुन या सर्वांच्या मदतीने हे पंचनामे तात्काळ पूर्ण करावेत असे आदेश भुसे यांनी दिले. हिंगोली जिल्ह्यात हळदीचं शास्त्रीय पध्दतीनं संशोधन करण्यासाठी प्रक्रिया केंद्र उभारण्यासाठी खासदार हेमंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली असल्याचं भुसे यांनी सांगितलं.

दरम्यान, औंढा तालुक्यातल्या हिवरा, काठोडा या गावातल्या नुकसानग्रस्त पिकांची काल भुसे यांनी पाहणी केली.

कृषीमंत्र्यांनी काल नांदेड जिल्ह्यातल्या कासारखेडा या गावातल्या शिवारांचीही पाहणी केली. अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसान सर्वांच्या डोळ्यासमोर असून, ही सर्व परिस्थिती केंद्र सरकारच्याही निदर्शनास आणून देत असल्याचं त्यांनी सांगितलं.

लातूर आणि उस्मानाबाद या दोन्हीही जिल्ह्यांचाही कृषी मंत्र्यांनी आढावा घेतला. नुकसान झालेल्या सर्व शेतीपिकांचे पंचनामे करून नोंदी घेण्याचं त्यांनी यावेळी सूचित केलं. जळकोट तालुक्यात वांजरवाडा इथं प्रत्यक्ष शेतावर जाऊन नुकसानीची त्यांनी पाहणी केली. 

****

मराठवाड्यासह अनेक भागात अतिवृष्टी आणि सतत पडणाऱ्या पावसामुळे खरीप पिकांचं अतोनात नुकसान झालं असून, राज्यातल्या महाविकास आघाडीच्या सरकारनं आपद्‌ग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं मदत करावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस उस्मानाबादचे आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आश्वासित केल्याप्रमाणे जिरायतीस हेक्टरी २५ हजार आणि बागायतीस हेक्टरी ५० हजार रुपये मदत तातडीने देऊन संकटात सापडलेल्या शेतकर्याला आधार द्यावा अशी मागणी ठाकूर यांनी केली आहे.

****

साखर कारखान्यांनी साखरेचं अतिरिक्त उत्पादन टाळण्यासाठी उत्पादन घटवून इथेनॉल निर्मितीवर लक्ष केंद्रीत करावं, असं राज्य सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी म्हटलं आहे. साखर कारखान्यांना तोटा टाळण्यासाठीही त्याचा उपयोग होईल, असं ते म्हणाले. राज्यात दरवर्षी ९० ते १०० टन साखर निर्मिती होते, यात दरवर्षी दहा लाख टनांची कपात करण्याचं आपण ठरवत असून, इथेनॉल निर्मिती करून त्याचा पेट्रोल उत्पादक कंपन्यांना पुरवठा करण्यात येईल, अशी माहिती दांडेगावकर यांनी दिली.

****

आणि आता ऐकू या ज्येष्ठ पत्रकार, गांधी विचारांचे अभ्यासक अरूण खोरे यांनी सांगितलेला गांधी विचार –

गांधीजींच्या अंतःकरणामधे रामनाम हा विचार कायम असायचा. म्हणून गांधीजींनी एके ठिकाणी असं लिहिलयं माझ्या स्वतःच्या दृष्टीनं स्वराज्य आणि रामराज्य दोन्ही एकच आहेत. राजा आणि प्रजा हे दोघेही जेव्हा त्यागाकडे वळलेले असतात भोग भोगताना सुद्धा संकोच आणि संयम ठेवणारे असतात, दोघांमधे पिता पुत्रासारखा सलोखा नांदत असतो, तेव्हा त्या राज्याला आपण रामराज्य म्हणतो अशी भूमिका गांधीजींनी एके ठिकाणी मांडलेली आहे. मला असं वाटतं गांधीजींनी हा जो विचार मांडलाय या विचारांच्या पाठीमागे रामराज्याबद्दलची एक पूर्वपिठीका एक मोठा व्यापक असा विचार त्यांच्या मनामधे कुठेतरी रेंगाळत असावा. आणि त्यामुळेच रामराज्याचा विचार ते नेहमीच करत होते. आपल्या अनेक प्रार्थना सभेमधे गांधीजींनी रामाचं नाव घेऊन राम भजनांना राम धुनींना प्राधान्य दिलं होतं. आणि याच भूमिकेतनं मुळे याच भावनेतून त्यांनी रामराज्याचा विचार अनेक प्रार्थनेच्या प्रवचनांमधे मांडलेला आपल्याला आढळतो.

****

राज्यात काल दिवसभरात आणखी १८ हजार ५६ कोविड बाधितांची नोंद झाली, त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या १३ लाख ३९ हजार २३२ झाली आहे. राज्यभरात काल ३८० जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या विषाणू संसर्गामुळे आतापर्यंत ३५ हजार ५७१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर काल १३ हजार ५६५ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. राज्यात आतापर्यंत १० लाख ३० हजार १५ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या दोन लाख ७३ हजार २२८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

मराठवाड्यात काल ३६ कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला, तर नव्या एक हजार १४७ रुग्णांची नोंद झाली. उस्मानाबाद जिल्ह्यात नऊ रुग्णांचा मृत्यू झाला, तर आणखी २११ रुग्ण आढळले. औरंगाबाद जिल्ह्यात सात रुग्णांचा मृत्यू झाला तर २१४ नवे रुग्ण आढळले. लातूर जिल्ह्यात सहा जणांचा मृत्यू झाला तर २२३ नवे रुग्ण आढळले. बीड आणि परभणी जिल्ह्यात प्रत्येकी पाच बाधितांचा मृत्यू झाला, बीड जिल्ह्यात १४६ तर परभणी जिल्ह्यात ३५ नव्या रुग्णांची भर पडली. नांदेड जिल्ह्यात चार रुग्णांचा मृत्यू झाला, तर आणखी १८२ रुग्ण आढळून आले. जालना जिल्ह्यात ११६ तर हिंगोली जिल्ह्यात नव्या २० रुग्णांची नोंद झाली.  

****

पुण्यात ८० बाधितांचा मृत्यू झाला तर तीन हजार ३१३ नवे रुग्ण आढळले. मुंबईत ४४ रुग्णांचा मृत्यु झाला तर दोन हजार २६१ रुग्णांची नव्याने भर पडली. नाशिक जिल्ह्यात एक हजार ३८३ रुग्ण आढळले, तर १९ जणांचा मृत्यू झाला. सांगली जिल्ह्यात २८ रुग्णांचा मृत्यू झाला तर ४३० नवे रुग्ण आढळले. अहमदनगर १४१, सिंधुदुर्ग ९२, रत्नागिरी ६८, सातारा ४६९, भंडारा २७७, बुलडाणा १६७, धुळे ७३, पालघर ३४५, गडचिरोली ९५, अमरावती २०५, वाशिम १०५, नागपूर ५९०, 

****

बीड जिल्ह्यातल्या परळी तालुक्यातल्या पोहनेर इथं गोदावरी नदीला पूर आल्यानं पोहनेर, डिग्रस, तेलसमुख, बोरखेड आणि ममदापूर गावच्या नागरिकांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिला आहे.

****

औरंगाबाद इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय-घाटीत कोरोना विषाणू संसर्गावर उपचार घेत असलेल्या एका रुग्णानं काल सकाळी चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. पैठण तालुक्यातील धनगावचे रहिवाशी असलेल्या या रग्णाचं नाव काकासाहेब कणसे असे आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तो कार्यकर्ता आहे.

****

महाराष्ट्र जीवनोन्नती अभियान अर्थात, उमेदचे उस्मानाबाद जिल्हा कृती संगम समन्वयक गोरक्षनाथ भांगे यांनी लिहिलेल्या ‘मासिक पाळीवर बोलू’ या कवितेला युनिसेफ आणि एस्सार फाउंडेशन आयोजित राष्ट्रीय स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे. याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर –

भांगे यांनी ही कविता ‘उमेद’ अंतर्गत बचतगटाचं काम करणाऱ्या राज्यातील महिला आणि किशोरवयीन मुलींपर्यंत पोहोचून मासिक पाळीदरम्यान घ्यावयाची काळजी, आरोग्याची काळजी, राखावयाची स्वच्छता याविषयी जनजागृती केली आहे. यामुळे महिलांना पोषणाचं महत्व मानसिक आणि शारीरिक स्वास्थ याचं महत्व या कवितेद्वार राज्यातील महिला बचत गटांच्या महिलांपर्यंत त्यांनी पोहोचवलं आहे. केंद्र सरकारच्या निती आयोगानं उस्मानाबादसारख्या मागास म्हणजे आकांक्षित जिल्ह्यात महिला आणि किशोरवयीन मुलींमधलं रक्तक्षयाचं प्रमाण कमी होण्यासाठी या कवितेचा उपयोग होताना दिसून येत आहे.

देविदास पाठक, आकाशवाणी वार्ताहर, उस्मानाबाद

****

राज्यातल्या ऊसतोड मजुरांना कुशल कामगारांचा दर्जा द्यावा, अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी केली आहे. जालना जिल्ह्यातल्या राजूर इथं भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र राज्य श्रमिक ऊसतोडणी मजूर, मुकादम संघटनेच्या वतीनं आयोजित एका चर्चासत्रात ते काल बोलत होते. जोपर्यंत ऊसतोड मजुरांच्या सर्व मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत राज्यात कुणीही या हंगामातल्या ऊसतोडीसाठी जाऊ नये, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.

****

हिंगोली जिल्ह्यात औंढा नागनाथ तालुक्यातल्या म्हाळसगाव इथला शेतकरी काल पुरात वाहून गेला. रामेश्वर आखरे असं या शेतकऱ्याचं नाव असून, काल सकाळी गावात परत येताना मधुमती नदी ओलांडताना अचानक आलेल्या पुरात ते वाहून गेले. पोलिस आणि महसूल प्रशासन त्यांचा शोध घेत आहे. 

****

परभणी इथं प्रहार जनशक्ती पक्ष आणि प्रहार शिक्षक संघटनेच्या वतीनं काल स्वातंत्र्य सेनानी शहीद भगतसिंग यांच्या जयंतीचं औचित्य साधून रक्तदान शिबीर घेण्यात आलं. यावेळी ७६ जणांनी रक्तदान केलं.

****

सध्या ‘राष्ट्रीय पोषण माह’ सुरू आहे. लहान मुलांचं आरोग्य सृदृढ रहावं यासाठी त्यांना देण्यात येणारा आहार हा पोषणयुक्त असणं आवश्यक आहे. या पोषण युक्त आहारामध्ये बालकांना पोळीचा पिझ्झा देता येईल. याची कृती सांगत आहेत आहार तज्ज्ञ रसिका देशमुख –

आपल्याला तर पोळी खाऊ घालायची असते आणि मुलं तर पोळी, वरण असं नको म्हणतात खायला. मग काय करता येईल? सगळ्या भाज्या नीट किसून घ्यायच्या. गाजर, पत्ताकोबी, थोडीशी सिमला मिरची असं रंगीत दिसणाऱ्या सगळ्या भाज्या आणि त्याच्याबरोबर चीज आणि बटर. थोडसं बटर तव्यावर टाकून किंवा साजूक तूप घालून पोळी खमंग अशी भाजायची खरपूस होईपर्यंत. आणि त्या पोळीवर थोडासा चाट मसाला घालून या भाज्यांचा एक थर द्यायचा. वरती चीज घालायचं. म्हणजे हा पोळीचा पिझ्झा नक्कीच त्यांना आवडेल. अधूनमधून कॅल्शियम, लोह, जीवनसत्व ‘अ’, जीवनसत्व ‘क’ आणि भरपूर अँटीऑक्सिडंटस्‌ मिळतात. त्यांच्या वाढीसाठी आवश्यक असणारी सगळी पोषणद्रव्य त्यातून मिळू शकतात.

****

लातूर जिल्ह्यात उदगीर शहरातल्या विविध विकास कामांचं उद्घाटन काल राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते झालं. ही सर्व कामं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, दलित वस्ती सुधार योजना, नागरी दलितेत्तर योजना, महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान आणि स्वच्छ महाराष्ट्र प्रोत्साहन निधी अंतर्गत मंजूर करण्यात आलेली आहेत.

****

परभणी जिल्ह्यातल्या पालम तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची काल जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर आणि आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांसोबत चर्चा केली.

****

नांदेड जिल्ह्यातल्या वंचित बहूजन आघाडीचे जेष्ठ नेते मुकुंद चावरे यांच काल निधन झालं, ते ६० वर्षांचे होते. चावरे महाराष्ट्र राज्य वीज मंडळ मागासवर्गीय महासंघाचे जेष्ठ कार्यकर्ते होते. त्यांनी २०१९ मध्ये नांदेड उत्तर विधानसभा मतदार संघातून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती.

****

No comments:

Text-آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 14 اگست 2025‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 14 August-2025 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبری...