Tuesday, 29 September 2020

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 29.09.2020 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 29 September 2020

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २९ सप्टेंबर २०२० सकाळी ७.१० मि.

****

बातमीपत्राच्या सुरूवातीला गांधी वचन –

तुमच्या नम्रपणानं तुम्ही जगाला हदरवू शकता.

·      राज्यातली उपाहारगृहं सुरु करण्यासंदर्भात मार्गदर्शक तत्वं तयार.

·      परीक्षा आणखी पुढे ढकलणं शक्य नसल्याचं केंद्रीय लोकसेवा आयोगाचं सर्वोच्च न्यायालयात शपथपत्र.

·      राज्यातल्या सर्व शासकीय रुग्णालयांतल्या अवैध गर्भपातांची चौकशी आणि तपासणी करण्यासाठी, चार सदस्यीय समिती स्थापन.

·      राज्य सरकारचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार, जेष्ठ गायिका उषा मंगेशकर यांना जाहीर.

·      सुट्या मिठाईची कालमर्यादा ग्राहकांना सांगणं बंधनकारक, गुरूवारपासून अंमलबजावणी.

·      राज्यात आणखी ११ हजार ९२१ कोविड बाधितांची नोंद, १८० जणांचा उपचारादरम्यान मृत्यू.

·      मराठवाड्यात ३६ बाधितांचा मृत्यू, तर नव्या ९२५ रुग्णांची नोंद.

आणि

·      ऊसतोड कामगारांचा लवाद कारखान्यांची बाजू घेत असल्याचा आमदार विनायक मेटे यांचा आरोप.

****

राज्यातली उपाहारगृहं सुरु करण्यासंदर्भात शासनानं मार्गदर्शक तत्वं तयार केली असून, ती अंतिम झाल्यानंतर उपाहारगृहं सुरु करण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्र्यांनी औरंगाबाद, पुणे, मुंबई आणि नागपूर इथल्या उपाहारगृह व्यावसायिक संघटनांच्या प्रतिनिधींसोबत काल चर्चा केली, त्यावेळी ते बोलत होते. माझं कुटुंब, माझी जबाबदारी या मोहिमेत हॉटेल व्यावसायिकही समाविष्ट आहेतच, कर्मचारी आणि ग्राहक यांच्या प्रति हॉटेल चालकांची जबाबदारी आहे, त्यामुळे हा व्यवसाय पुन्हा सुरु करतांना अत्यंत काळजीपूर्वक पावलं उचलावी लागणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. ही कार्यप्रणाली उपाहारगृहांसाठी त्रासदायक नसेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

यासंदर्भात पुन्हा एकदा हॉटेल व्यावसायिकांसमवेत बैठक घेऊन व्यवसाय सुरु करण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी दिली.

****

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा आणखी पुढे ढकलणं शक्य नसल्याचं, केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे सर्वोच्च न्यायालयात काल नमूद करण्यात आलं. न्यायमूर्ती ए.एम. खानविलकर यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं, केंद्रीय लोकसेवा आयोगाला परीक्षेसंदर्भात केलेल्या उपाययोजनांबद्दल माहिती, सादर करण्यास सांगितलं आहे. आयोगानं ही परीक्षा चार ऑक्टोबर रोजी घेण्याचं नियोजन केलं आहे. देशभरातील कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग आणि काही भागातली गंभीर पूरस्थिती लक्षात घेता, ही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका काही परिक्षार्थ्यांनी दाखल केली होती.

****

राज्यातल्या सर्व शासकीय रुग्णालयांतल्या अवैध गर्भपातांची चौकशी आणि तपासणीसाठी, माजी पोलिस महासंचालक अजित पारसनीस यांच्या अध्यक्षतेखाली, चार सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. राज्यात ज्या ठिकाणी अवैध गर्भपाताची घटना घडली आहे त्यांची चौकशी करुन, अशा घटनांसाठी कारणीभूत त्रुटी शोधणं तसंच त्यांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी करायच्या उपायोजना या समितीला सुचवायच्या आहेत. घटना घडल्यापासून एक महिन्याच्या आत समितीला आपला अहवाल सादर करणं बंधनकारक असणार आहे. सार्वजनिक आरोग्य विभागानं याबाबतचा शासन निर्णय काल जारी केला.

****

राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे देण्यात येणारा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार, जेष्ठ गायिका उषा मंगेशकर यांना जाहीर झाला आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी काल ही घोषणा केली. पाच लाख रुपये, मानपत्र, स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरुप आहे.

****

सुट्या मिठाईची कालमर्यादा ग्राहकांना सांगणं आता बंधनकारक करण्यात आलं आहे. अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या या कायद्याची एक ऑक्टोबरपासून देशभरात अंमलबजावणी करण्यात येणार आहे. मिठाईच्या दुकानांमधून सुट्या मिठाईची मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जाते, मात्र त्यावर मिठाई कधीपर्यंत चांगली राहू शकेल, हे यापूर्वी लिहिलं जात नव्हतं, त्यामुळे खरेदी केलेला पदार्थ किती दिवस चांगला राहू शकतो, हे ग्राहकांना समजत नव्हतं. ही बाब लक्षात घेऊन हा नवा कायदा लागू करण्यात आला आहे.

****

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात अद्याप कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचलो नसल्याचं, केंद्रीय अन्वेषण विभाग - सीबीआयनं म्हटलं आहे. सुशांतच्या कुटुंबियांचे वकील विकास सिंह यांनी, सुशांतसिंह मृत्यू प्रकरणाचा तपास कोणत्या दिशेनं सुरू आहे, याबाबत काहीही स्पष्ट होत नसल्याचं म्हटलं होतं, त्या पार्श्वभूमीवर सीबीआयकडून काल नवी दिल्लीत एक प्रसिद्धी पत्रक जारी करण्यात आलं. या प्रकरणाच्या सर्व पैलूंचा तपास सुरू असून, आतापर्यंत एकही मुद्दा निकालात काढलेला नाही, असं या पत्रकात म्हटलं आहे.

****

आणि आता ऐकू या जेष्ठ पत्रकार, गांधी विचारांचे अभ्यासक अरूण खोरे यांनी सांगितलेला गांधी विचार –

गांधीजींनी एके ठिकाणी अतिशय स्पष्टपणे हिंसेचं मूळ कशात आहे याची मांडणी केली आहे. हिंसेचं मूळ आपल्या सात सामाजिक पापांच्या मधे आहे असं गांधीजी सांगतात. ही सात सामाजिक पापं कोणती? आणि ही पापं दूर केल्याशिवाय आपल्याला अहिंसेचा मार्ग सापडणार नाही असंही ते सांगतात. कामाशिवाय संपत्ती, विवेकाशिवाय समाधान, चारित्र्याशिवाय ज्ञान, नैतिकतेशिवाय व्यापार, मानवतेशिवाय विज्ञान, त्यागाशिवाय पुजा आणि तत्वाशिवाय राजकारण ही सात सामाजिक उणिवा असं म्हणू. या उणिवा दूर केल्याशिवाय आपण अहिंसेच्या मार्गाकडे जाऊ शकणार नाही असं गांधीजी आवर्जून सांगतात. आणि आपण जेव्हा विचार करायला लागतो प्रत्येक मुद्याचा तेव्हा गांधीजींनी या प्रत्येक भूमिकेमधे जो काही एक व्यापक विचार पेरलेला आहे याची आपल्याला कल्पना येते.

****

राज्यात काल दिवसभरात आणखी ११ हजार ९२१ कोविड बाधितांची नोंद झाली, त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या १३ लाख ५१ हजार १५३ झाली आहे. राज्यभरात काल १८० जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या विषाणू संसर्गामुळे आतापर्यंत ३५ हजार ७५१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर काल १९ हजार ९३२ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. राज्यात आतापर्यंत १० लाख ४९ हजार ९४७ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या दोन लाख ६५ हजार ३३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

मराठवाड्यात काल ३६ कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला, तर नव्या ९२५ रुग्णांची नोंद झाली.

लातूर जिल्ह्यात दहा रुग्णांचा मृत्यू झाला, तर आणखी १६२ रुग्ण आढळून आले. औरंगाबाद जिल्ह्यात नऊ बाधितांचा मृत्यू, तर नवे १८१ रुग्ण, जालना जिल्ह्यात पाच रुग्णांचा मृत्यू, तर नवे ७८ रुग्ण, नांदेड जिल्ह्यात चार रुग्णांचा मृत्यू, तर नवे १५४ रुग्ण, उस्मानाबाद जिल्ह्यात तीन रुग्णांचा मृत्यू, तर नवे ११०, हिंगोली आणि बीड जिल्ह्यात प्रत्येकी दोन जणांचा मृत्यू झाला, हिंगोली जिल्ह्यात नवे ४३, तर बीड जिल्ह्यात १७१ रुग्ण आढळले. परभणी जिल्ह्यात एका बाधिताचा मृत्यू झाला, तर नव्या ५६ रुग्णांची नोंद झाली.

****

मुंबईत काल आणखी दोन हजार ५५ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली आणि ४० जणांचा मृत्यू झाला. नाशिक जिल्ह्यात एक हजार ५७ रुग्ण आढळले, तर २२ जणांचा मृत्यू झाला. नागपूर जिल्ह्यात ८६२, सांगली ५५०, गोंदीया २२९, अमरावती २०४, चंद्रपूर २३०, भंडारा १५७, वर्धा ६३, वाशिक ५१, तर गडचिरोली जिल्ह्यात नव्या ४९ रुग्णांची नोंद झाली. 

****

बीड जिल्ह्यातल्या केज पंचायत समितीअंतर्गत १३ कोटी रुपयांच्या रोजगार हमी योजनेच्या अपहार प्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी, दोन कर्मचाऱ्यांना निलंबित केलं, तर सेवा समाप्त केलेल्या तीन कर्मचाऱ्यांविरूद्ध कारवाई केली आहे. रोजगार हमी योजनेच्या कामांची चौकशी करणाऱ्या समितीला आवश्यक कागदपत्रं या कर्मचाऱ्यांनी उपलब्ध करुन दिले नसल्याचं समितीनं मुख्य कार्यकारी आधिकाऱ्यांना कळवलं होतं. निलंबित कर्मचाऱ्यांमध्ये कनिष्ठ सहाय्यक ए. एस. डांगे आणि विस्तार अधिकारी एम. बी. गायकवाड यांचा समावेश आहे.

****

उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयात क्रॉम्प्टन ग्रीव्हज आणि तेरणा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानं, बंगळुरु इथं कार्यरत विशेषज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून, क्लाऊड फिजिशियन, हा टेलिमेडीसिनचा उपक्रम राबवण्यात येणार आहे. यामध्ये बंगळुरुमधल्या पथकाद्वारे अतिदक्षता विभागात उच्च दर्जाचे कॅमेरे तसंच जलदगती इंटरनेट सुविधा बसवून ‘टेली आयसीयू’ व्यवस्था उपलब्ध केली जाणार असल्याची माहिती, आमदार राणा जगजीतसिह पाटील यांनी दिली. कोविड रुग्णांचा मृत्यूदर कमी करण्यासाठी या उपक्रमाचा चांगला उपयोग होणार आहे.

****

‘माझं कुटुंब, माझी जबाबदारी’ अभियानात हिंगोली जिल्हा व्यापारी संघटनेनं सहभागी होत, मास्क नसणाऱ्या ग्राहकांना कोणतीही वस्तू विक्री न करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधीच्या भित्तीपत्रकाचं काल जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या उपस्थितीत विमोचन करण्यात आलं.

****

मराठा आरक्षणावरच्या निर्णयावरची स्थगिती उठवून, मराठा आरक्षण पूर्ववत ठेवावं यासाठी शासनानं सर्वतोपरी प्रयत्न करावेत, या मागणीसाठी हिंगोली जिल्ह्यातल्या सेनगाव तहसील कार्यालयावर, मराठा शिवसैनिक सेनेनं काल बैलगाडी मोर्चा काढला.

याच मागणीसाठी औरंगाबाद जिल्ह्यात पैठण तालुक्यातल्या लोहगाव फाटा इथंही मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी रस्ता रोको आंदोलन केलं. यामुळे औरंगाबाद-पैठण मार्गावरची वाहतूक जवळपास एक तास खोळंबली होती. तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी आंदोलन ठिकाणी येऊन आंदोलकांचं निवेदन स्वीकारलं.

****

परभणी जिल्ह्यात जिंतूर तालुक्यातल्या निवळी आणि वर्णा या गावातल्या पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या खासदार फौजिया खान यांनी काल केली. यावेळी पिक नुकसानीचे पंचनामे आणि इतर कार्यवाही करण्याचे आदेश त्यांनी कृषी आणि महसूल विभागाला दिले.

दरम्यान, परभणी जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी तालुका काँग्रेस समितीनं, काल जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे केली.

****

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या खरीप पिकांच्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करावे अशी मागणी प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीनं प्रशासनाला करण्यात आली आहे. संघटनेनं आपल्या मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकारी आणि जिल्हा उपअधीक्षक यांना दिलं.

****

लातूर लोकसभा मतदारसंघात रेल्वे सेवेचा विस्तार करावा, रखडलेले प्रकल्प आणि इतर कामं मार्गी लावावेत आदी मागण्या खासदार सुधाकर शृंगारे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे केल्या आहेत. या संदर्भात गोयल यांनी दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून घेतलेल्या बैठकीत शृंगारे यांनी, पिटलाईनसाठी मंजूर झालेले १४ कोटी रुपये लवकरात लवकर मिळावेत, लातूरहून नवीन रेल्वे गाड्या सुरु कराव्यात, तिरुपती-लातूर-तिरुपती असा रेल्वेमार्ग करावा, यासह अन्य मागण्या केल्या. 

****

औरंगाबाद इथं डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचं लेखणी बंद आंदोलन अद्याप सुरूच आहे. सातवा वेतन आयोग आणि अन्य मागण्यांसाठी हे आंदोलक मुख्य प्रशासकीय इमारतीसमोर आंदोलन करत आहेत. पदवीधर मतदार संघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी काल या आंदोलकांची भेट घेऊन संवाद साधला. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी कर्मचाऱ्यांच्या संयुक्त सेवक कृती समितीसोबत बैठक झाली. मात्र या बैठकीत कोणताही तोडगा निघू शकला नाही. दीड महिन्यांच्या कालावधीत कर्मचाऱ्यांच्या मागणीवर निर्णय घेण्याचे आश्वासन सावंत यांनी दिलं आणि आंदोलन मागे घेण्याचं संघटनांना आवाहन केलं.

****

सध्या ‘राष्ट्रीय पोषण माह’ सुरू आहे. लहान मुलांचं आरोग्य सृदृढ रहावं यासाठी त्यांना देण्यात येणारा आहार हा पोषण युक्त असणं आवश्यक आहे. या पोषण युक्त आहारामध्ये ‘मखाना खीर’ मुलांना देता येईल. या मखाना खीरची कृती सांगत आहेत आहातज्ज्ञ स्नेहा वेद –

५ ते १२ वयोगटातील मुलामुलींची हाडाची वाढ खूप झपाट्याने होत असते. त्यामुळे त्यांच्या आहारात कॅल्शियम असणे खूप गरजेचे आहे. त्यासाठी आज आपण एक रेसिपी बघणार आहोत. रेसिपीचं नाव आहे ‘मखाना खीर’. आपल्याला एक चमचा तुपात दोन चमचे मखान्याची पावडर जी आहे ती छान भाजून घ्यायची आहे. त्यानंतर त्याच्यामधे एक कप दूध घालून दोन ते तीन मिनिटं उकळून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामधे चिमूटभर विलायची पावडर आणि एक ते दोन चमचे गूळ किंवा साखर जे आहे हे टाकून उकळून घ्यायचं आहे. ही खीर ४ ते ५ मिनिटांत बनते. यामधे कॅल्शियम आयर्नचं प्रमाण खूप जास्ती आहे. त्यामुळे त्यांची हाडांची वाढ होण्यासाठी मदत होईल. धन्यवाद.

****

ऊसतोड कामगारांचा लवाद हा कामगाराची बाजू न घेता, कारखान्याची बाजू घेत असल्याचा आरोप, शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी केला आहे. बीड तालुक्यातल्या मांजरसुभा इथं ऊसतोड कामगार, मुकादम तसंच वाहतूकदार यांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात आयोजित बैठकीत ते काल बोलत होते. प्रत्येक ऊसतोड कामगारानं आता अन्यायाविरूद्ध उभं राहावं असं आवाहन करून, त्यांनी सध्याच्या लवादावर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर नाराजी व्यक्त केली.

****

लातूर इथं झालेल्या कोविड १९ संदर्भातल्या आढावा बैठकीत महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी कोरोना विषाणू संसर्गावर मात करण्यासाठीच्या उपाययोजनांसंदर्भातलं पुढील चार महिन्यांचं साडेसात कोटी रुपयांचं अंदाजपत्रक काल सादर केलं.  महापालिकेसाठी जिल्हा नियोजन समितीतून निधी देण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. लक्षणे नसलेल्या कोविड रुग्णांना गृह विलगीकरणात ठेवण्यासाठी प्रवृत्त करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी या बैठकीत केल्या. रुग्णांची संख्या जास्त आहे त्या भागात गृहभेटी देऊन रुग्ण संख्या कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

****

उस्मानाबाद जिल्ह्यातले अनेक शेतकरी पीक कर्ज मिळण्यापासून वंचित असल्यामुळे पिक कर्जाचं तात्काळ वितरण करण्यात यावं अशी मागणी भारतीय जनता पक्ष किसान मोर्चाचे पूर्व मराठवाडा संपर्क प्रमुख रामदास कोळगे यांनी केली आहे. त्यांनी काल जिल्हाधिकारी तसंच अग्रणी बँकेचे व्यवस्थापक यांना याबाबतत निवेदन दिलं.

****

पंढरपूरचे माजी नगराध्यक्ष, भागवताचार्य वासुदेव नारायण उर्फ वा. ना. उत्पात यांचं काल पुण्यात कोविड संसर्गानं निधन झालं, ते ८० वर्षांचे होते. त्यांच्यावर पुण्यातल्या खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते. संत साहित्य तसंच सावरकर साहित्यांवर त्यांचा गाढा अभ्यास होता, विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीचे ते सदस्य होते.

****

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 14.08.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 14 August 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी ...