Thursday, 24 September 2020

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 24.09.2020 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 24 September 2020

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २४ सप्टेंबर २०२० सकाळी ७.१० मि.

****

·      एक किंवा दोन दिवसांच्या टाळेबंदीचं पुनर्मुल्यांकन करण्याचं, तसंच सर्व आर्थिक व्यवहार सुरळीत सुरु राहतील, याची दक्षता घेण्याचे पंतप्रधानांचे राज्यांना निर्देश.

·      केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचं कोरोना विषाणू संसर्गानं निधन.

·      कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर संसदेचं पावसाळी अधिवेशन एक आठवडा अगोदरच संस्थगित.

·      राज्यात आणखी २१ हजार २९ कोविड बाधितांची नोंद, ४७९ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू.

·      मराठवाड्यात २२ कोरोना बाधितांचा मृत्यू, तर नव्या एक हजार ५४९ रुग्णांची नोंद.

आणि

·      मराठवाड्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक पाठवण्याची परभणीचे खासदार संजय जाधव यांची केंद्रीय कृषी मंत्र्यांकडे मागणी.

****

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असलेल्या भागात लावल्या जाणाऱ्या एक किंवा दोन दिवसांच्या टाळेबंदीचं राज्यांनी पुनर्मूल्यांकन करावं, तसंच विषाणूसोबतच्या लढाईबरोबरच सर्व आर्थिक व्यवहार सुरळीत सुरु राहतील, याची दक्षता घेण्याचे निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत. पंतप्रधानांनी काल देशात कोविड-19 चा जास्त प्रादुर्भाव असलेल्या सात राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह, आंध्र प्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेश, दिल्ली, पंजाब आणि तामिळनाडू या राज्यांचे मुख्यमंत्री बैठकीत सहभागी झाले होते. विषाणूचा प्रसार रोखणं आणि सर्व व्यवहार सुरळीत सुरु राहण्याच्या दृष्टीनं यापुढील काळात सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र हा उपाय उपयुक्त ठरेल, असं पंतप्रधान म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात माझे कुटुंब, माझी जबाबदारी या मोहिमेच्या माध्यमातून कोविडची लढाई अधिक आक्रमकपणे लढत असून, त्याचा परिणाम येणाऱ्या काळात आपल्याला दिसेल, असं मुख्यमंत्री म्हणाले. राज्यात सर्वत्र टेलीआयसीयू व्यवस्था उभारून ग्रामीण भागातल्या रुग्णांना वेळीच उपचार कसे मिळतील, याकडे लक्ष देणार असून, राज्यात ठिकठिकाणी जम्बो सुविधा, चाचण्यांची व्यवस्था, प्रयोगशाळा उभारल्या असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

****

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचं काल कोरोना विषाणू संसर्गानं निधन झालं, ते ६५ वर्षांचे होते. त्यांच्यावर दिल्लीतल्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था - एम्समध्ये उपचार सुरु होते. अंगडी हे कर्नाटक मधल्या बेळगाव मतदारसंघातून सलग चार वेळा लोकसभेवर निवडून आले होते. बेळगाव जिल्ह्यात भारतीय जनता पक्ष बळकट करण्यात त्यांचा मोठा वाटा होता.

****

संसदेचं पावसाळी अधिवेशन काल संस्थगित झालं. हे अधिवेशन एक ऑक्टोबरपर्यंत चालणार होतं, मात्र कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अधिवेशन एक आठवडा अगोदरच संपवण्यात आलं.

अधिवेशन काळात राज्यसभेत सदनानं शंभर टक्क्यांपेक्षा अधिक काम केल्याचं सभापती एम. व्यंकय्या नायडू यांनी सांगितलं. तर लोकसभेत १६७ टक्के अधिक काम झाल्याचं अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सांगितलं. अधिवेशनात दोन्ही सदनात प्रत्येकी २५ विधेयकं संमत झाली. 

दरम्यान, राज्यसभेतला कार्यकाळ पूर्ण होणाऱ्या ११ सदस्यांना काल राज्यसभेत निरोप देण्यात आला.

****

संरक्षण संशोधन आणि विकास परिषद-डीआरडीओनं काल रणगाडा भेदी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. लेजर मार्गदर्शक तत्त्वानुसार कार्यरत या क्षेपणास्त्राची काल अहमदनगर इथं चाचणी घेतल्याचं, डीआरडीओनं सांगितलं. अर्जुन रणगाड्यावरून चाचणी घेतलेलं हे क्षेपणास्त्र चार किलोमीटरवरच्या लक्ष्याचा अचूक वेध घेण्यास सक्षम आहे.

****

कोविड बाधित रुग्णांच्या उपचारासाठीच्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळा बाजार करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे निर्देश आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. या इंजेक्शनचा निर्माण झालेला तुटवडा तात्पुरता असून, त्यासंदर्भात औषध उत्पादक कंपन्याशी चर्चा झाली असल्याचं टोपे यांनी सांगितलं, ते म्हणाले –

रेमडेसिवीर हे जे अँटीव्हायरल इंजेक्शन आहे, निर्मात्या कंपन्यांमध्ये तात्पुरत्या स्वरुपाचा तुटवडा आहे. दोन दिवसांच्या आत या गोष्टी सुरळीत होतील .त्या कंपन्यांच्या एमडींशी सुद्धा आमची चर्चा झालेली आहे. तुटवडा झाला म्हणून ब्लॅक मार्केटींग करावं आणि पैसे त्यात कोणीतरी कमवावं अशातला भाग होवू नये म्हणून जे अधिकारी आहेत फुड ड्रगज अथॉरिटीचे त्यांनाही सूचित केलेलं आहे आम्ही की कुठल्याही परिस्थितीत ब्लॅक मार्केटींगवर कडक कारवाई करा आणि बावीसशे रुपये प्रती इंजेक्शन याच दराने विक्री या दृष्टीनं होण्याची आवश्यकता आहे.

****

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना निवडणूक शपथपत्रावरून नोटीस बजावण्याबाबत प्रत्यक्ष कर नियंत्रण मंडळाला काहीही सूचना दिलेल्या नसल्याचं, निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. पवार यांनी परवा मुंबईत पत्रकार परिषद घेऊन, आयकर विभागानं आपल्याला यासंदर्भात नोटीस बजावून स्पष्टीकरण मागितल्याचं सांगितलं होतं. त्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून हा खुलासा करण्यात आला आहे.

****

औरंगाबाद शहराला सहा ते सात दिवसांच्या खंडानंतर करण्यात येणाऱ्या पाणी पुरवठ्या संदर्भात खासदार इम्तियाज जलील यांनी काल लोकसभेत प्रश्न उपस्थित केला. नाथसागर धरण यंदा पूर्ण क्षमतेनं भरलं असून धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु आहे. मात्र, शहराला सहा ते सात दिवसांच्या खंडानंतर पाणी मिळत असल्याचं ते म्हणाले. केंद्र सरकारच्या ‘हर घर जल’ या योजनेअंतर्गत औरंगाबाद शहराला दररोज पाणी पुरवठा करता यावा यासंदर्भात उपाय योजना करुन एक सकारात्मक प्रकल्प समोर आणण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.

****

मराठा समाजाला कायदेशीररित्या आरक्षण मिळावं यादृष्टीने केंद्र सरकारनं या विषयात लक्ष घालावं, तसंच मुस्लीम समाजासही पाच टक्के आरक्षण द्यावं, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार फौजिया खान यांनी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गेहलोत यांच्याकडे केली आहे. या मागणीचं निवेदन त्यांनी काल गेहलोत यांना सादर केलं.

****

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी परभणी जिल्ह्यातल्या मानवत इथं सकल मराठा समाजाच्या वतीनं काल तहसील कार्यालयासमोर कपडेफाड आंदोलन करण्यात आलं. यावेळी राज्य सरकारचा निषेध करण्यात आला.

****

राज्यात काल दिवसभरात आणखी २१ हजार २९ कोविड बाधितांची नोंद झाली, त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या १२ लाख ६३ हजार ७९९ झाली आहे. काल ४७९ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात या विषाणू संसर्गानं आतापर्यंत ३३ हजार ८८६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर काल १९ हजार ४७६ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. राज्यात आतापर्यंत नऊ लाख ५६ हजार ३० रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या दोन लाख ७३ हजार ४७७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

मराठवाड्यात काल २२ कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला, तर नव्या एक हजार ५४९ रुग्णांची नोंद झाली.

लातूर जिल्ह्यात सहा रुग्णांचा मृत्यू झाला, तर नव्या ३७९ रुग्णांची नोंद झाली. नांदेड जिल्ह्यात पाच रुग्णांचा मृत्यू झाला, तर आणखी २४५ रुग्ण आढळले. औरंगाबाद आणि परभणी जिल्ह्यात प्रत्येकी चार बाधितांचा मृत्यू झाला, औरंगाबाद जिल्ह्यात नव्या ३२९, तर परभणी जिल्ह्यात आणखी ५० रुग्णांची भर पडली. बीड जिल्ह्यात दोन बाधितांचा मृत्यू झाला, तर आणखी १९७ रुग्ण आढळून आले. उस्मानाबाद जिल्ह्यात एका रुग्णाचा मृत्यू झाला, तर नव्या २६३ रुग्णांची नोंद झाली. जालना जिल्ह्यात आणखी ६२ आणि हिंगोली जिल्ह्यात २४ रुग्ण आढळले.  

****

पुणे जिल्ह्यात तीन हजार ८८६ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, तर ८४ जणांचा मृत्यू झाला. मुंबईत दोन हजार ३६० नवे रुग्ण आणि ४९ मृत्यूंची नोंद झाली. नाशिक जिल्ह्यात एक हजार ४३६ रुग्णांची नोंद झाली, तर २० रुग्णांचा मृत्यू झाला. नागपूर जिल्ह्यात एक हजार २९१, सातारा ८५०, सांगली ८२१, गोंदिया ३४०, सिंधुदुर्ग १३३, धुळे १११, वर्धा ११०, गडचिरोली ८५ तर रत्नागिरी जिल्ह्यात काल आणखी ७१ रुग्णांची नोंद झाली. 

****

मराठवाड्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक पाठवावं आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी परभणीचे खासदार संजय जाधव यांनी केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्याकडे केली आहे. वेळीच आर्थिक मदत मिळाली नाही तर शेतकरी आत्महत्येसारख्या दुदैवी मार्गाकडे वळेल याची भीती निर्माण झाली असल्याचं त्यांनी तोमर यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या संबंधित विभागातल्या तज्ञ अधिकाऱ्यांचे पथक तातडीनं पाठवावं, असं ते म्हणाले.

****

परभणी शहरात विसावा फाटा इथं स्थानिक गुन्हे शाखेनं एका वाहनातून १५ लाख ४१ हजार ८०० रुपये किंमतीचा गुटखा, पानमसाला आणि तंबाखुचा अवैध साठा जप्त केला. यावेळी पोलिसांनी आयशर ट्रक, मोबाईलसह एकूण ३१ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. गुटख्याची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. 

****

राज्यात मुंबई, नवी मुंबईसह अनेक भागात काल मुसळधार पाऊस झाला.

मुंबई शहर आणि उपनगरात काल अतिवृष्टीची नोंद झाली. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी पालिका मुख्यालयातल्या आपत्ती व्यवस्थापन विभागास भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

औरंगाबाद शहर आणि परिसरातही काल दुपारनंतर जोरदार पाऊस झाला. पैठणच्या नाथसागर धरणातून सध्या ४७ हजार १६० घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. धरणात सध्या ५३ हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी दाखल होत आहे.

नांदेडच्या डॉक्टर शंकरराव चव्हाण विष्णुपूरी प्रकल्पातून ९४ हजार ४१० घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीत करण्यात येत आहे. ईसापूर धरणातून पाच हजार १३० घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग पैनगंगा नदीत करण्यात येत आहे. तर जिल्ह्यातल्या उर्ध्व मनार आणि निम्न मनार प्रकल्पही पूर्ण भरले आहेत.

नाशिक जिल्ह्यातही काल जोरदार पाऊस झाला. निफाड मधल्या नांदूर मधमेश्वर धरणातून २० हजार ६५७ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला.

****

केंद्र सरकारच्या कांदा निर्यातबंदी विरोधात काल शेतकरी संघटनेने औरंगाबाद इथं केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर निदर्शनं केली. संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष कैलास तवार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात कार्यकर्त्यांनी निर्यातबंदी तत्काळ रद्द करावी अशी मागणी करत ‘खासदारांनो बोलते व्हा आणि आमचे प्रश्न संसदेत मांडा’ अशा घोषणा दिल्या.

 

परभणी इथंही शेतकरी संघटनेच्या वतीनं कांद्यावरील निर्यातबंदी कायमस्वरूपी उठवण्यात यावी या मागणीसाठी खासदार संजय जाधव यांच्या निवासस्थानासमोर कांद्याची रांगोळी काढून त्यात निर्यातबंदी निर्णयाची होळी करण्यात आली.

धुळ्यात शेतकरी संघटनेनं खासदार डॉ.सुभाष भामरे यांच्या निवासस्थानासमोर निदर्शनं केली.

****

सध्या पोषण माह सुरू आहे. लहान मुलांचं आरोग्य सृदृढ रहावं यासाठी त्यांना देण्यात येणारा आहार हा पोषण युक्त असणं आवश्यक आहे. या पोषण युक्त आहारामध्ये बालकांना भाताची लापशी देता येईल. या भाताच्या लाप्शीबद्दल पाककृती सांगत आहेत आयुर्वेदीक बालरोग तज्ञ कविता फडणवीस –

आयुर्वेदीय पण पौष्टीक आणि चविष्ट पदार्थाची रेसिपी सांगणार आहे. जिचं नाव आहे ‘पेया’. ज्याला आपण भाताची लापशी असं म्हणू. सगळ्यात पहले वाटीभर तांदूळ नीट धूवून घ्या. एका कढईत मध्यम आचेवर अर्धा चमचा मोहरी, पाव चमचा मेथीदाणे, एक चमचा जिरे भाजून घेऊन मिक्सरमधून दळून घ्या. कुकरमधे दीड लीटर पाणी ठेवा. उकळी फुटल्यावर त्यात मीठ, धुतलेले तांदूळ, दळलेली पावडर घाला. मध्यम आचेवर ४ ते ५ शिट्ट्या होईपर्यंत शिजू द्या. आणि गरमागरम मुलांना खायला घाला. मुलांना आवडत असल्यास त्यात तुम्ही नारळाचं दूध ॲड करू शकता. पेया हे पाचक आणि भूक वाढवणारं आहे. यात झिंक, आयर्न, कॅल्शियम आणि फायबर कंटेंट्‍स पण योग्य प्रमाणात असतात.

****

लातूर जिल्ह्यात ऑक्सिजन मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याचं जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी सांगितलं आहे. ते काल लातूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. लातूर शहरातल्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत ऑक्सिजनचे दोन टॅँक पूर्ण क्षमतेने कार्यरत असून, शहराची गरज ही तेराशे किलोची असल्याचं त्यांनी सांगितलं. उदगीर आणि निलंगा या दोन्ही ठिकाणच्या ग्रामीण उपजिल्हा रुग्णालात सुध्दा ऑक्सिजन टॅंक उभारणीला मंजुरी देण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं.

अतिवृष्टीमुळे खरीप पिकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरु असून, प्राथमिक अहवालानुसार ७३ हजार हेक्टरवर झालेल्या नुकसानीची माहिती जिल्हा प्रशासनाकडे आली असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितलं.

****

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या काळात सामाजिक बांधीलकीतून खाजगी डॉक्टरांनी प्रशासनाला सहकार्य करावं, असं आवाहन औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केलं आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित सेवा अधिग्रहित केलेल्या खाजगी डॉक्टरांसोबतच्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते. आयसीयु, ऑक्सिजन खाटा यांच्या वाढीव प्रमाणात तज्ञ डॉक्टर उपलब्ध होण्याच्या दृष्टीनं प्रशासनानं खाजगी डॉक्टरांच्या सेवा शासकीय रुग्णालयांसाठी अधिग्रहित केल्या असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं.

****

जालना तहसील कार्यालयात कार्यरत एका खाजगी संगणक ऑॅपरेटरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं काल दोन हजार ४०० रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली. पवन दत्तात्रय राऊत, असं लाच स्वीकारणाऱ्या ऑपरेटरचं नाव आहे. संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत मंजूर १२ हजार ४०० रुपयांचं अनुदान बँक खात्यावर हस्तांरित करण्यासाठी त्यानं लाभार्थ्याकडे या लाचेची मागणी केली होती.

नांदेड इथल्या इम्रान कॉलनी भागातल्या मदरसे मिलिया उर्दू उच्च प्राथमिक शाळेच्या संस्थेचा पदाधिकारी आणि लिपिकास नऊ हजार ९०० रुपयांची लाच घेताना काल पकडण्यात आलं. विद्यार्थ्यांचे वार्षिक निकाल आणि शैक्षणिक पुस्तकं देण्यासाठी त्यांनी ही लाच मागितली होती.  

लातूर जिल्ह्यात चाकूर तालुक्यातल्या तिर्थवाडीच्या सरपंचांच्या पतीला पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना काल अटक करण्यात आली. राजकुमार शेट्टे असं त्याचं नाव असून, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत शेतीमध्ये सिंचन विहीर मंजूर करुन देण्याचं आश्वासन देत, त्यानं तक्रारदाराकडून ही लाच मागितली होती.

****

अबुधाबी इथं सुरु असलेल्या इंडियन प्रिमियर लीग-आयपीएल स्पर्धेत काल मुंबई इंडियन्स संघानं कोलकाता नाईट रायडर्स संघाचा ४९ धावांनी पराभव केला. मुंबई संघानं प्रथम फलंदाजी करत निर्धारित २० षटकांत १९५ धावा केल्या. प्रदत्युत्तरादाखल कोलकाताचा संघ नऊ बाद १४६ धावाच करु शकला.

****

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 14.08.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 14 August 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी ...