Saturday, 26 September 2020

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 26.09.2020 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 26 September 2020

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २६ सप्टेंबर २०२० दुपारी १.०० वा.

****

देशात कोरोना विषाणू संसर्गाचे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ८२ पूर्णांक १४ शतांश टक्के झालं असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. कोरोना विषाणुमुळे देशात होत असलेल्या मृत्यूंचा दर एक पूर्णांक ५८ शतांश टक्के पर्यंत कमी झाला आहे. या संसर्गावर उपचार घेऊन बरे झालेल्या रुग्णांची संख्या ४८ लाख ४९ हजार ५८४ झाली असल्याचंही केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. गेल्या चोवीस तासांमधे ९३ हजारांहून अधिक रुग्ण या संसर्गावर उपचार घेऊन बरे झाले आहेत. एकूण रुग्णांपैकी केवळ १६ पूर्णांक २८ शतांश टक्के रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सध्या नऊ लाख ६० हजार रुग्णांवर उपचार सुरू असून एकूण रुग्ण संख्या ५९ लाखांवर गेली आहे. देशात कोरोना विषाणू संसर्गासाठी आतापर्यंत सात कोटी दोन लाख नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून गेल्या चोवीस तासांमधे तेरा लाख ४१ हजारांहून अधिक चाचण्या करण्यात आल्या असल्याची माहिती भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेनं दिली आहे.

****

कोरोना विषाणू संसर्ग प्रादुर्भावाचा यंदाच्या खरीप पेरण्यांवर काहीही परिणाम झाला नसल्याचं, केंद्र सरकारनं म्हटलं आहे. गेल्या वर्षी एक हजार ६६ लाख हेक्टर क्षेत्रावर खरीपाची पेरणी झाली होती, या वर्षी एक हजार ११६ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. वेळेवर पेरण्या करणाऱ्या, नव्या तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या तसंच शासकीय योजनांचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना याचं श्रेय असल्याचं सरकारनं म्हटलं आहे.

****

कोरोना विषाणू संसर्गावरील उपचार पद्धतीत आडुळसा आणि गुळवेलच्या वापराच्या दृष्टीनं अभ्यासाच्या प्रस्तावाला केंद्रीय आयुष मंत्रालयानं मान्यता दिली आहे. अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेत भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या सहाय्यानं हा अभ्यास केला जाणार आहे.

****

कृषी मंत्री दादाजी भुसे औरंगाबाद जिल्ह्यात पाऊस आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीची पहाणी करत आहेत. त्यांनी नागद इथं भेट देऊन शेतात पहाणी केली आहे.

****

अंमली पदार्थ सेवन आणि व्यवहार चौकशी प्रकरणी अभिनेत्री श्रद्धा कपूर आज मुंबईत अंमली पदार्थ नियंत्रण विभाग-`एनसीबी`च्या चौकशीसाठी हजर झाली आहे. अभिनेत्री दीपिका पदुकोणची आज सकाळी दहा वाजेपासून या विभागामार्फत या संदर्भात चौकशी सुरू आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या चौकशीतून पुढे आलेल्या अंमली पदार्थ सेवन आणि व्यवहार प्रकरणात नावं आल्यानं या दोघींची चौकशी सुरू आहे.

****

कोरोना विषाणू संसर्गाचं वाढतं प्रमाण रोखण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यात व्यापारी संघटना, नगरपरिषदा, प्रशासन आणि सर्वपक्षीय नेत्यांनी कालपासून जनता संचारबंदी सुरू केली आहे. येत्या १ ऑक्टोबरपर्यंत ही संचारबंदी पाळली जाणार आहे. व्यापारी आणि नागरिक या संचारबंदीला उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत.

****

“माझं कुटुंब, माझी जबाबदारी” मोहिमेअंतर्गत रायगड जिल्ह्यात १ लाख ६४ हजार ३२९ कुटुंबांची पाहणी करण्यात आल्याची माहिती पालकमंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. पाहणी करण्यासाठी जिल्ह्यात १५०० पथकं तैनात करण्यात आली आहेत. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या मोहिमेअंतर्गत कोकण विभागातल्या सर्व जिल्ह्यांचा आढावा घेतला.

****

रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गावर उपचार घेऊन विक्रमी ३७४ रुग्ण काल बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातले पाच हजार ७१२ रुग्ण या संसर्गावर उपचार घेऊन बरे झाले असून जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचा दर आता ८०पूर्णांक ७९ शतांश टक्क्यांवर पोहोचला आहे.

****

पैठण इथल्या नाथसागर धरणाची नऊ दारं दोन फुटानं आणि १२ दारं ४ फुटानं उघडण्यात आली आहेत. धरणातून गोदावरी नदीपात्रात ९४ हजार ३२० घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरु आहे. जिल्ह्यातल्या बोरदहेगाव मध्यम प्रकल्पाची दोन दारं आणि नारंगी मध्यम प्रकल्पाचीही दोन दारं उघडण्यात आली आहेत. औरंगाबादनजीकच्या शेंदूरवादा इथं खाम नदीला पूर आला असून, नदी परिसरातलं गणपती मंदिर शेकडो वर्षांनंतर पाण्याखाली गेलं आहे.

****

भारतीय जनता पक्ष वैद्यकीय आघाडीनं कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटकाळात राज्यात केलेल्या मदतकार्याच्या अहवालाचं प्रकाशन विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांच्या हस्ते काल मुंबईत करण्यात आलं. या अहवालात डॉक्टरांनी राज्यभरात केलेल्या वैद्यकीय कामांची सचित्र माहिती देण्यात आली आहे.

****

ठाणे जिल्ह्यातल्या उल्हासनगर इथं एक प्लॅस्टीक निर्मिती कारखाना आगीमधे जळून खाक झाला आहे. न्यू सिंध कंपाऊंड इथं ही दुर्घटना झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. काल रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास ही आग लागली होती. अंबरनाथ आणि उल्हासनगर इथल्या अग्नीशमन दलाच्या पथकांनी पाच तासांच्या प्रयत्नांनंतर ही आग आटोक्यात आणल्याची माहिती अग्नीशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

****

No comments: