Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 30 September 2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३०
सप्टेंबर
२०२० सकाळी ७.१० मि.
****
बातमीपत्राच्या
सुरूवातीला गांधी वचन –
खूप सारे उपदेश ऐकण्यापेक्षा थोडासा सराव करणं कधीही चांगलं.
****
·
आगामी नवरात्रोत्सवात गरबा, दांडिया आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना
परवानगी नाही.
·
मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गाचे लाभ देण्याचा
निर्णय राज्य सरकार मागे घेणार- खासदार छत्रपती संभाजीराजे यांची माहिती.
·
कृषी सुधारणा विधेयकांच्या समर्थनात शेतकरी संघटनेचं दोन ऑक्टोबरला
राज्यव्यापी ‘संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन’.
·
आधारभूत किंमत योजनेंतर्गत हमी भावाने उडीद खरेदीला तर सोयाबीन
खरेदीच्या नोंदणीला उद्यापासून सुरुवात.
·
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा पुढे
ढकलल्या.
·
राज्यात आणखी १४ हजार ९७६ कोविड बाधितांची नोंद, ४३० जणांचा
उपचारादरम्यान मृत्यू.
आणि
·
मराठवाड्यात ३६ रुग्णांचा मृत्यू, तर नव्या एक हजार २६५ रुग्णांची
नोंद.
****
राज्यात
आगामी नवरात्रोत्सवात गरबा, दांडिया आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी असणार नाही.
कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नवरात्रोत्सव आणि दसरा सण साजरा करण्याबाबतच्या
मार्गदर्शक सूचना राज्य सरकारनं काल जारी केल्या. या मार्गदर्शक सूचनांनुसार, देवीच्या
मूर्तींची उंची, सार्वजनिक मंडळांसाठी चार फुटांपर्यंत तर घरगुती देवीच्या मूर्तीची
उंची दोन फुटांपर्यंत निश्चित करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे देवीचं आगमन आणि विसर्जन
मिरवणुका काढू नयेत, नवरात्र उत्सवात “माझं कुटुंब माझी जबाबदारी” या मोहिमेसंदर्भात
जनजागृती करण्यात यावी, देवी दर्शनाची सुविधा ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात यावी, तसंच
धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करताना गर्दी होणार नाही याची दक्षता घेण्याचं आवाहन राज्य
सरकारनं केलं आहे. सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळांना महापालिका आणि स्थानिक प्रशासनाची
परवानगी घेणं आवश्यक असल्याचं या मार्गदर्शन सूचनांमध्ये म्हटलं आहे. दसऱ्याच्या दिवशी
होणारा रावण दहनाचा कार्यक्रम मोजक्या व्यक्तींच्या उपस्थितीत करुन त्या कार्यक्रमाचं
थेट प्रक्षेपण करावं, असंही राज्य सरकारनं सांगितलं आहे.
****
मराठा
समाजाला आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गाचे लाभ देण्याचा निर्णय राज्य सरकारनं मागे घेणार
असून, याबाबत लवकरच सुधारित आदेश जारी करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी
दिल्याची माहिती खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी दिली. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर
भाजप खासदार संभाजीराजे, नरेंद्र पाटील यांच्यासह सकल मराठा समाजाच्या नेत्यांनी काल
मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेतली, त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. मराठा आरक्षण
मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यावेळी उपस्थित होते. आर्थिक मागास प्रवर्गाचा
लाभ विशिष्ट समाजाला देता येत नाही, शिवाय, अशा निर्णयाने मराठा समाजाच्या मूळ आरक्षणाचा
न्यायालयीन लढा कमकुवत होण्याची शक्यता असल्याचं ते म्हणाले.
****
‘माझं
कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम शासकीय नसून, ती लोकांची असल्याचं मुख्यमंत्री उद्धव
ठाकरे यांनी म्हटलं आहे. या मोहिमेच्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते. या मोहिमेअंतर्गत
ग्रामीण भागात आठ कोटींपेक्षा जास्त लोकांचं सर्वेक्षण पूर्ण झालं असून, यासाठी नेमलेल्या
पथकांनी २४ लाख कुटुंबांना भेट दिली असल्याचं मुख्य सचिव अरविंद कुमार यांनी यावेळी
सांगितलं. तीव्र श्वसन संक्रमण-सारी आणि शीतज्वरासारखे आजाराचे रुग्ण अधिक काटेकोरपणे
शोधावेत, तसंच सर्वेक्षण पथकांचे अहवाल दररोज विस्तार अधिकारी आणि इतर वरिष्ठ यंत्रणांनी
तपासावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
****
छत्रपती
संभाजीराजे आणि छत्रपती उदयनराजे यांची खासदार म्हणून नियुक्ती भारतीय जनता पक्षानं
केली असून, दोन्ही राजांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न भारतीय जनता पक्षाकडूनच सोडवून घ्यावा,
असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा़सदार शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते काल सोलापूर
इथं वार्ताहरांशी बोलत होते. देशाचं लक्ष इतर ठिकाणी वळवण्यासाठी केंद्र सरकारनं विविध
संस्था अभिनेता सुशांतसिंग राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास करण्यासाठी लावल्या होत्या,
मात्र त्यांचा तपास इतर दिशेने सुरू असल्याचा आरोप पवार यांनी केला. केंद्र सरकारनं
आणलेल्या कृषी विधेयकांना सर्व मिळून विरोध करणार असून, याचं नेतृत्व शेतकरीच करणार
असल्याचं पवार यावेळी म्हणाले.
****
मराठवाड्यात
अतिवृष्टीने झालेल्या पिकांच्या नुकसानीचे वेगाने पंचनामे करून शेतकऱ्यांना तत्काळ
मदत द्यावी, अशी मागणी विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे केली आहे. सरकारचे प्रमुख म्हणून जागोजागी पंचनामे होत
आहेत की नाही, प्रत्यक्ष जमिनीवर काय स्थिती आहे, याकडे अधिक कटाक्षाने लक्ष देण्याची
गरज त्यांनी व्यक्त केली.
****
आणि
आता ऐकू या जेष्ठ पत्रकार गांधी विचारांचे अभ्यासक अरूण खोरे यांनी सांगितलेला गांधी
विचार –
अलिकडेच
गांधीजींचा एक व्यापक आणि मोठा विचार मी वाचला त्यात गांधीजी म्हणतात या जगात माणसाच्या
गरजेसाठीच सारे काही आह, पण त्याच्या लालसेसाठी मात्र हे सगळं जगही पूरणार नाही. मित्रांनो
गांधीजींनी हा सांगितलेला जो विचार आहे हा विचार ऐकत असताना, माझ्या मनामधे टॉलस्टॉयच्या
एका कथेची आठवण झाली. त्या टॉलस्टॉयच्या कथेमधे एक देवदूत प्रसन्न होतो. आणि तो समोरच्या
काही इच्छा, आकांक्षा, लालसा असलेल्या माणसाला विचारतो की तुला काय हवंय? तर तो म्हणतो
मला ही जमीन हवीय. मोठी जमीन हवीय. तो देवदूत त्याला सांगतो की पळत जाऊन जेवढी जमीन
तुझ्या ताब्यात घेशील तिथपर्यंतची जमीन तुझी होईल. आणि मग तो माणूस पळत सुटतो. लालसेपोटी
पळत सुटतो. आता मला जमीन हवीय. मला आणखीन जमीन हवीय. मला आणखीन जमीन हवीय. आणि आपल्या
सर्वांना त्या कथेचा शेवट माहितीये की तो इतका पळतो की उरी धाप लागून शेवटी तो खाली
धापकीनी पडतो अन् त्याचा प्राणही जातो. गांधीजींनी अतिशय नेमक्या शब्दामधे हे सांगितलेलंय
की माणसांच्या लालसेसाठी हे सगळं जगही पूरणार नाही.
****
केंद्र
शासनाने संमत केलेल्या कृषी सुधारणा विधेयकांच्या समर्थनात शेतकरी संघटना येत्या दोन
ऑक्टोबरला राज्यव्यापी संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन करणार आहे. शेतकरी संघटनेचे अध्यक्ष
अनिल घनवट यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. शेतकरी संघटनेच्या अनेक वर्षाच्या मागणीनुसार
या कायद्यामुळे शेतकऱ्यांसाठी बाजार पेठ खुली होत आहे, मात्र आवश्यक वस्तू कायद्यातून
वगळलेल्या वस्तू, भाववाढ झाल्यास पुन्हा आवश्यक वस्तू कायद्याच्या कक्षेत घेण्याच्या
तरतुदीला शेतकरी संघटनेचा विरोध असल्याचं घनवट यांनी सांगितलं. केंद्र सरकार योग्य
दिशेने वाटचाल करत असल्याचं ते म्हणाले.
****
२०२०-२१
या हंगामात किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत हमी भावाने उडीद खरेदीला उद्या एक ऑक्टोबरपासून
सुरुवात होणार आहे. पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी काल ही माहिती दिली. खरेदी केंद्रावर
होणारी गर्दी टाळण्यासाठी १५ सप्टेंबरपासूनच नोंदणी प्रक्रिया सुरु झाली आहे.
दरम्यान,
सोयाबीन खरेदीच्या नोंदणीला उद्यापासून सुरुवात होणार असून, प्रत्यक्ष खरेदीला १५ ऑक्टोबरपासून
सुरूवात होणार आहे.
****
डॉक्टर
बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उद्या एक ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या उन्हाळी
परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या संबंधिचं एक परिपत्रक विद्यापीठानं काल जारी
केलं. विद्यापीठातल्या सर्व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी लेखणीबंद आंदोलन सुरु केल्यामुळे
या परीक्षा पुढे ढकलण्यात येत असल्याचं या पत्रकात नमूद करण्यात आलं आहे.
दरम्यान,
खासदार डॉ. भागवत कराड आणि शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी काल आंदोलनकर्त्यांची
भेट घेतली. कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासाठी मुख्यमंत्री आणि राज्यपालांची भेट घेणार असल्याचं
खासदार कराड यांनी यावेळी सांगितलं.
****
राज्यात
काल दिवसभरात आणखी १४ हजार ९७६ कोविड बाधितांची नोंद झाली, त्यामुळे राज्यातली एकूण
रुग्णसंख्या १३ लाख ६६ हजार १२९ झाली आहे. राज्यभरात काल ४३० जणांचा उपचारादरम्यान
मृत्यू झाला. या विषाणू संसर्गामुळे आतापर्यंत ३६ हजार १८१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
तर काल १९ हजार २१२ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. राज्यात आतापर्यंत
१० लाख ६९ हजार १५९ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या दोन लाख ६० हजार ३६३
रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
मराठवाड्यात
काल ३६ कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला, तर नव्या एक हजार २६५ रुग्णांची
नोंद झाली.
उस्मानाबाद
आणि बीड जिल्ह्यात प्रत्येकी आठ बाधितांचा मृत्यू झाला, उस्मानाबाद जिल्ह्यात नव्या
२१६, तर बीड जिल्ह्यात १४६ रुग्णांची भर पडली. औरंगाबाद आणि लातूर जिल्ह्यात प्रत्येकी
पाच जणांचा मृत्यू झाला, औरंगाबाद जिल्ह्यात आणखी २३७, तर लातूर जिल्ह्यात २१७ रुग्ण
आढळून आले. नांदेड जिल्ह्यात चार रुग्णांचा मृत्यू, तर नवे २१६ रुग्ण, जालना जिल्ह्यात
तीन रुग्णांचा मृत्यू, तर नवे ११५ रुग्ण, परभणी जिल्ह्यात दोन रुग्णांचा मृत्यू, तर
नवे ८२ रुग्ण, आणि हिंगोली जिल्ह्यात एका रुग्णाचा मृत्यू झाला, तर नव्या ३६ रुग्णांची
नोंद झाली.
****
पुणे
जिल्ह्यात आणखी दोन हजार ४५३ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, तर ८७ जणांचा मृत्यू
झाला. मुंबईत एक हजार ७१३ नवे रुग्ण आणि ४९ मृत्यूंची नोंद झाली. नाशिक जिल्ह्यात ७४५
रुग्ण आढळले आणि १२ रुग्णांचा मृत्यू झाला. नागपूर जिल्ह्यात एक हजार २१५, सातारा ८६३,
सांगली ५०६, यवतमाळ १९४, भंडारा १९१, अमरावती १९०, गडचिरोली १४९, वाशिम ११९, सिंधुदुर्ग
८० तर रत्नागिरी जिल्ह्यात आणखी ६४ रुग्णांची नोंद झाली.
****
अतिवृष्टीमुळे
नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदतीसाठी ठोस निर्णय घेऊन आर्थिक पॅकेज जाहीर
करण्याची मागणी औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे. खासदार जलील यांनी
महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आणि संबंधित अधिकाऱ्यांसह
काल कन्नड, गंगापूर आणि वैजापूर तालुक्यात नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली, त्यानंतर
ते बोलत होते. सरकारनं कायद्यात रुपांतर केलेली कृषी विधेयकं शेतकऱ्यांच्या विरोधी
असल्याचं ते म्हणाले.
****
औरंगाबाद
जिल्ह्यातल्या कन्नड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आणि उपसभापती पंडित वेताळ यांच्याविरुद्धचा
अविश्वास ठराव काल १२ विरुद्ध शून्य मतांनी मंजूर झाला. त्यांनी आपल्या कार्यकाळात
कामकाज करताना सदस्यांना विश्वासात न घेणं, मनमानी करत पदाचा गैरवापर करणं, असा आरोप
करुन १३ संचालकांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता.
****
औरंगाबाद
जिल्ह्यातली दुकानं सकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात
आली आहे. जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी काल याबाबतचे आदेश जारी केले.
****
बालिका
योजनेच्या नावाखाली गरीब कुटुंबातल्या मुलींच्या लग्नासाठी केंद्र शासनातर्फे पन्नास
हजार रूपये देण्याची योजना असल्याचं वृत्त एका संकेतस्थळावर प्रसिद्ध झालं होतं, ही
बातमी चुकीची असून अशी कोणतीही योजना आणली नसल्याचं पत्र सूचना कार्यालयाकडून सांगण्यात
आलं आहे.
****
उस्मानाबाद
जिल्ह्यात परंडा तालुक्यातल्या टाकळी इथले सैनिक वामन पवार हे काल लडाख इथं कर्तव्य
बजावत असताना शहीद झाले. त्यांचा पार्थिव देह काल रात्री उशीरा गावात आणला असून, आज
शासकीत इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.
****
मराठा
समाजाचं आरक्षण कायम ठेवावं या मागणीसाठी हिंगोली जिल्ह्यात काल सकल मराठा समाजाच्या
वतीनं जिल्हाधिकारी आणि तहसिल कार्यालयांवर ढोल बजाओ आंदोलन करण्यात आलं. आंदोलनकर्त्यांनी
जिल्हाधिकारी आणि तहसिलदारांना निवेदन दिलं.
****
कोविड
प्रतिबंधाचा नियम मोडल्याप्रकरणी परभणीचे मुख्य न्याय दंडाधिकारी महेश तिवारी यांनी
तीन जणांना प्रत्येकी पाचशे रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. मोटारसायकलद्वारे पुण्याहून
परभणी इथं परतलेल्या आणि कोरोना विषाणू बाधित निघालेल्या परभणी जिल्ह्यातल्या पहिल्या
कोविड बाधित युवकासह तिघांचा यात समावेश आहे. साथ रोग पसरेल अशी जाणीवपूर्वक कृती करून
जिल्हा बंदीचा आदेश मोडल्याप्रकरणी ही शिक्षा ठोठावण्यात आली आहे. १६ एप्रिल रोजी टाळेबंदी
असताना हा युवक परभणीत आला होता.
****
सध्या
‘राष्ट्रीय पोषण माह’ सुरू आहे. लहान मुलांचं आरोग्य सृदृढ रहावं यासाठी त्यांना देण्यात
येणारा आहार हा पोषण युक्त असणं आवश्यक आहे. या पोषण युक्त आहारामध्ये मुलांना एनर्जी
ड्रिंक देता येईल. या पेयाची कृती सांगत आहेत आयुर्वेदिय बालरोग तज्ज्ञ कविता फडणवीस
-
आयुर्वेदीय
ऐनर्जी ड्रिंक याची रेसिपी मी तुम्हाला आज सांगणार आहे. त्याचं नाव आहे ‘खर्जुरादी
मंथ’ म्हणजे डेट्स एनर्जी ड्रिंक. ६ चमचे स्वच्छ धुतलेल्या सीडलेस मनुका, २० ग्रॅम
सीडलेस खजूर, ३ चमचे भाजलेल्या साळीच्या लाह्या, २ चमचे गूळ हे सर्व एकत्र मिक्सरमधून
बारीक करा. आणि दीड पेला पाणी टाकून नीट मिक्स करा. झाले ‘खर्जुरादी मंथ’ तयार. हे
खर्जुरादी मंथ खूप छान एनर्जी बुस्टर म्हणून काम करतं. पचायला हलकं असून थकवा दूर करतं.
यात पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं. शिवाय व्हिटॅमिन बी-6 सुध्दा
मोठ्या प्रमाणात असतं.
****
औरंगाबाद
महापालिकेतल्या १८५ अस्थायी कर्मचाऱ्यांना कायम करण्याचे आदेश शासनानं दिले असल्याची
माहिती आमदार संजय शिरसाट यांनी दिली आहे. त्यांनी काल औरंगाबाद महापालिकेत या कर्मचाऱ्यांशी
संवाद साधला. त्यानंतर माध्यमांशी ते बोलत होते. येत्या आठ ऑक्टोबरला पालकमंत्री सुभाष
देसाई यांच्या हस्ते या कर्मचाऱ्यांना कायमस्वरुपी पदाचे नियुक्तीपत्र देण्यात येणार
असल्याची माहिती त्यांनी दिली.
****
जीपमध्ये अंमली पदार्थ बाळगणाऱ्या दोघांना काल औरंगाबादमध्ये
अटक करण्यात आली. मुंबईहून औरंगाबादला येणाऱ्या एका गाडीत अंमली पदार्थ असल्याची माहिती
पोलिसांना मिळाल्यानंतर केलेल्या या कारवाईत, ५२
हजार रुपये किंमतीचे मेफेडीन आणि ११ हजार रुपयांचे चरस हे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
****
परभणी
तालुक्यातल्या साटला, धारणगाव आणि समसापूर या गावांना भारतीय स्टेट बँक दत्तक म्हणून
द्यावी, अशी मागणी आमदार डॉ.राहुल पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. सध्या
गावांना आयडीबीआय बँक दत्तक म्हणून देण्यात आली आहे, मात्र या बँकेचा पीक कर्जाचा व्याज
दर अधिक असल्यामुळे हा बदल करण्यात यावा असं आमदार पाटील यांनी निवेदनात म्हटलं आहे.
****
No comments:
Post a Comment