Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 29 September 2020
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २९ सप्टेंबर २०२० दुपारी १.०० वा.
****
कृषी सुधारणा
कायद्याला विरोध करणारे लोक शेतकरी विरोधी असून, त्यांना दलालांचा विकास हवा असल्याचं,
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज उत्तराखंड राज्यात ‘नमामी गंगे मोहिमे’अंतर्गत
६ मोठ्या योजनांचा दूरदृश्य संवाद पद्धतीने प्रारंभ केल्यानंतर बोलत होते. या नव्या
कायद्यांमुळे अनेकांचा काळा पैसा कमावण्याचा मार्ग बंद होणार असल्यानं, ते या कायद्यांना
विरोध करत असल्याचं, मोदी यांनी नमूद केलं. काही लोक फक्त विरोध करायचा म्हणून विरोध
करत आहेत, ते शेतकऱ्यांसोबतही नाहीत आणि सैनिक किंवा तरुणांसोबतही नाहीत, असं मोदी
म्हणाले. दरम्यान, नमामी गंगे अभियान हे देशातलं सर्वात व्यापक नदी संरक्षण अभियान
असल्याचं, ते म्हणाले. जलजीवन मिशनच्या बोधचिन्हाचं तसंच या मिशनअंतर्गत ग्रामपंचायती
तसंच पाणी समित्यांसाठीच्या मार्गदर्शिकेचंही पंतप्रधानांनी अनावरण केलं.
****
राज्यपाल
भगतसिंह कोश्यारी यांनी वनाधिकार अधिनियम २००६ मध्ये बदल करीत अनुसूचित जमाती आणि इतर
पारंपारिक वननिवासी कुटुंबांना निवासालगतच्या वनक्षेत्रात घरे बांधण्यासाठी जमीन उपलब्ध
करून देण्याबाबत अधिसूचना जारी केली आहे. सदर अधिसूचनेमुळे अनुसूचित क्षेत्रात परंपरेने
राहत असलेले वननिवासी तसेच अनुसूचित जमातीतील लोकांना दिलासा मिळणार असून त्यांचे मूळ
गावातून स्थलांतर कमी हाईल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
****
राज्याचे
उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचं स्पष्ट
झालं आहे. आपण गेले दहा दिवस विलगीकरणात असल्यामुळे इतरांना संसर्ग होण्याची शक्यता
कमी असून लवकरच जनतेच्या सेवेत हजर होऊ असं त्यांनी ट्वीटरच्या माध्यमातून सांगितलं.
****
मुंबईत गेल्या
२४ तासांत २ हजार ५५ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, ४० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आतापर्यंत मुंबईत रुग्णांची संख्या २ लाख ७७५ झाली असून एकूण मृतांचा आकडा ८ हजार ८३१
वर पोहचला आहे
****
औरंगाबाद
जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या ३३ हजार १७४ झाली आहे. यापैकी २६ हजार
३५९ रुग्ण आतापर्यंत बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात ९२५ जणांचा या संसर्गाने
मृत्यू झाला आहे. सध्या जिल्ह्यात ५ हजार ८९० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
परभणी जिल्ह्यात
कोरोना विषाणू बाधित रुग्णांची एकूण संख्या ५ हजार २३४ झाली असून त्यापैकी ४ हजार ३९५
रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत २२२ जणांचा या संसर्गाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात
सध्या ६१७ जणांवर उपचार सुरु आहेत.
****
बालिका योजनेच्या
नावाखाली गरीब कुटुंबातील मुलींच्या लग्नासाठी केंद्र शासनातर्फे पन्नास हजार रूपये
देण्याची योजना असल्याचं वृत्त एका संकेतस्थळावर प्रसिद्ध झालं होतं. ही बातमी चुकीची
असून अशी कोणतीही योजना आणली नसल्याचं पत्र सूचना कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे.
****
अभिनेत्री
रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक हे अंमली पदार्थांचे व्यवहार करणाऱ्या गटाचे सक्रीय
सदस्य असल्यानं, या प्रकरणात त्यांना जामीन देऊ नये, अशी मागणी अंमली पदार्थ नियंत्रण
विभाग - एनसीबीने मुंबई उच्च न्यायालयाकडे केली आहे. याबाबतचं एक शपथपत्र एनसीबीने
न्यायालयात सादर केलं आहे. या दोघांनी अंमली पदार्थ व्यवहारांना उत्तेजन दिलं असून,
पैसाही पुरवला असल्याचं, या शपथपत्रात म्हटलं आहे. रिया आणि शौविक या दोघांनाही या
महिन्याच्या सुरुवातीला एनसीबीने अटक केली होती, सध्या हे दोघे न्यायालयीन कोठडीत आहेत.
****
मुंबईत सचिवालयानजिकच्या
आमदार निवासात बॉम्ब असल्याचा दूरध्वनी आल्यानं, हे आमदार निवास काल रात्री तत्काळ
रिकामं करण्यात आलं. या संपूर्ण परिसराची पाहणी केल्यानंतर कोठेही बॉम्ब आढळला नाही,
त्यामुळे ही अफवा असल्याचं निष्पन्न झालं, असं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
पोषण आहार
योजने अंतर्गत सांगली जिल्ह्यात महापालिका शाळेत वितरित करण्यात येत असलेला डाळीचा
साठा अन्न आणि औषध विभागाने जप्त केला आहे. शालेय मुलांना देण्यात येणारी हरभरा आणि
मूग डाळ निकृष्ट प्रतीची असून ती अप्रमाणित असल्याचं लक्षात आल्यानंतर अन्न आणि औषध
विभागाने महापालिकेच्या शाळा क्रमांक तीन मध्ये छापा टाकून या डाळीचा साठा जप्त केला.
****
येत्या दोन
दिवसांत देशातल्या नैऋत्य मोसमी पावसाची परतीच्या प्रवासाला उत्तर भारतातून सुरुवात
होईल, अशी माहिती हवामान खात्यानं दिली आहे. या वर्षीच्या एकूण मोसमात सरासरीपेक्षा
जास्त पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे.
****
No comments:
Post a Comment