Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 23 September 2020
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २३ सप्टेंबर २०२० दुपारी १.०० वा.
****
देशभरात
कोविड संसर्गातून मुक्तीचं प्रमाण ८१ पूर्णांक २५ शतांश टक्के झालं आहे. देशात आतापर्यंत
५६ लाख ४६ हजार दहा जणांचा कोविड संसर्ग झाला असून, त्यापैकी ४५ लाखावर रुग्ण या संसर्गातून
आतापर्यंत मुक्त झाले आहेत. सध्या देशभरात कोविडचे ९ लाख ६८ हजार ३७७ सक्रीय रुग्ण
आहेत. गेल्या २४ तासांत या संसर्गाने १ हजार ८५ रुग्णांचा मृत्यू झाल्यानं, मृतांची
एकूण संख्या ९० हजार २० वर पोहोचली असून, हे प्रमाण १ पूर्णांक ५९ शतांश टक्के झालं
आहे.
****
संसदेच्या
पावसाळी अधिवेशनाचा आज समारोप होत आहे. हे अधिवेशन १ ऑक्टोबरपर्यंत चालणार होतं, मात्र
कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अधिवेशन वेळेपूर्वी संपवण्याचा निर्णय घेतल्याचं
संसदीय कामकाज मंत्री व्ही मुरलीधरन यांनी आज राज्यसभेत सांगितलं. लोकसभेनं मंजूर केलेली
महत्त्वाची काही विधेयकं आज मंजुरीसाठी राज्यसभेसमोर ठेवली जाणार आहेत.
****
परकीय अंशदान
नियामक सुधारणा विधेयक राज्यसभेनं मंजूर केलं. या विधेयकामुळे आता परकीय वर्गणी स्वीकारण्यावर
नियंत्रण येणार आहे. कोणताही सरकारी कर्मचारी आता कोणत्याही स्वरुपात परकीय अंशदान
घेऊ शकणार नाही. इतर व्यक्ती, संस्था किंवा कंपन्यांना परकीय अंशदानाची परवानगी घेण्यासाठी
किंवा नोंदणी करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आधार क्रमांक देणं आवश्यक असेल.
तसंच हे अंशदान केंद्र सरकारनं अधिसूचित केलेल्या बँक खात्यातच जमा होईल.
****
देशातल्या
रेल्वे मार्गांचं २०२३ पर्यंत शंभर टक्के विद्युतीकरण केलं जाणार असल्याचं, रेल्वे
मंत्री पियुष गोयल यांनी सांगितलं आहे, ते आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात
बोलत होते. ६३ हजार ६३१ किलोमीटर लांबीच्या रेल्वेमार्गापैकी यावर्षी एप्रिल महिन्यापर्यंत
६३ टक्के मार्गाचं विद्युतीकरण झालं असून, आता २३ हजार ७६५ किलोमीटर लांबीच्या मार्गांचं
विद्युतीकरण बाकी असल्याची माहिती गोयल यांनी दिली.
****
राज्यसभेतला
कार्यकाळ पूर्ण होणाऱ्या ११ सदस्यांना आज राज्यसभेत निरोप देण्यात आला. यामध्ये केंद्रीय
हवाई वाहतुक मंत्री हरदीपसिंह पुरी, काँग्रेसचे राज बब्बर, समाजवादी पक्षाचे रामगोपाल
यादव, बसपाचे वीरसिंह यांचा समावेश आहे. या सर्वांचा कार्यकाळ नोव्हेंबर महिन्यात पूर्ण
होत आहे.
****
कृषी सुधारणा
विधेयकं आणि विरोधी पक्षांच्या आठ सदस्यांचं निलंबन या संदर्भात राज्यसभेतले विरोधी
पक्षनेते गुलाम नबी आझाद आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहेत. राष्ट्रपतींनी
या भेटीसाठी आज संध्याकाळी पाच वाजेची वेळ दिली असल्याचं विरोधी पक्षांकडून पत्रकारांना
सांगण्यात आलं.
****
मराठा आरक्षण
हा विषय केंद्राचा पश्न नसून तो राज्य सरकारचा प्रश्न आहे, असं भारतीय जनता पक्षाचे
प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. राज्य सरकारने घेतलेल्या चांगल्या
निर्णयाचं आपण स्वागत करतो, मात्र मुंबई महापालिकेकडे एवढा निधी असूनही प्रत्येक वर्षी
तेच ते प्रश्न भिजत ठेवण्याचं काम शिवसेनेकडून केलं जात असल्याचं ते म्हणाले. मुंबईत
तुंबणाऱ्या पावसाच्या पाण्याबद्दल विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देतांना ते बोलंत होते.
****
औरंगाबाद
जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या ३१ हजार ४४३ झाली आहे. आजपर्यंत एकूण
८८६ जणांचा या संसर्गाने मृत्यू झाला आहे, आतापर्यंत २४ हजार ५०६ रुग्ण बरे होऊन घरी
परतले आहेत. सध्या जिल्ह्यात एकूण ६ हजार ५१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
अहमदनगर
जिल्ह्यात आज ७४४ रुग्ण कोविड संसर्गातून मुक्त झाले. यामध्ये अहमदनगर महापालिका क्षेत्रातले
१५४ तर उर्वरीत रुग्ण ग्रामीण भागातले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण ३४ हजार १२५
रुग्ण संसर्गमुक्त झाले आहेत.
****
ठाणे जिल्ह्यातल्या
भिवंडी इमारत दुर्घटनेतल्या मृतांची संख्या आता ३९ झाला आहे. काल रात्री शोध आणि बचाव
पथकाने ढिगाऱ्याखालून आणखी १४ मृतदेह काढले आहेत. बचावकार्य सुरूच असून सततच्या पावसामुळे
बचाव कार्यात अडथळे येत आहेत.
****
धुळे शहर
आणि जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात काल रात्री मुसळधार पाऊस झाल्यानं कापूस, बाजरी, ज्वारी,
कांदा पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. साक्री आणि शिरपूर तालुक्यातल्या काही
गावांमध्ये रात्री जोरदार पाऊस झाल्यानं काढणीस आलेली पिकं वाया गेल्यानं शेतकऱ्यांकडून
हळहळ व्यक्त केली जात आहे. शासनाने पंचनामे करुन नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी
वर्गानं केली आहे.
****
No comments:
Post a Comment