Friday, 25 September 2020

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 25.09.2020 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 25 September 2020

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २५ सप्टेंबर २०२० दुपारी १.०० वा.

****

देशभरातल्या वैद्यकीय शिक्षण आणि व्यावसायिकांसाठी नियंत्रण संस्था म्हणून राष्ट्रीय वैद्यकीय आयोग आजपासून कार्यरत होत आहे. याआधी कार्यरत असलेल्या भारतीय वैद्यकीय परिषदेची जागा हा आयोग घेणार आहे. डॉ.सुरेशचंद्र शर्मा या आयोगाचे अध्यक्ष असतील, तीन वर्षांसाठी त्यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. हा आयोग कार्यरत झाल्यानंतर वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात मोठ्या सुधारणांना प्रारंभ होणं, अपेक्षित आहे.

****

जनसंघाचे सहसंस्थापक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंती निमित्त उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना अभिवादन केलं आहे. उपाध्याय यांचा ‘एकात्म मानववाद आणि अंत्योदय तत्व’ सर्वांसाठी प्रेरणादायक असल्याचं, नायडू यांनी म्हटलं आहे. तर उपाध्याय यांचे आदर्श आम्हाला गरिबांची सेवा करण्यासाठी आणि त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी प्रेरित करतात, असं पंतप्रधानांनी त्यांच्या ट्वीट संदेशात म्हटलं आहे. गृहमंत्री अमित शहा यांनीही पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केलं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईत मातोश्री निवासस्थानी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.

उपाध्याय यांच्या जयंती निमित्त औरंगाबाद इथं भारतीय जनता पक्षाच्या वतीनं शहरात ठिकठिकाणी अभिवादन करण्यात येत आहे.

उस्मानाबाद इथं भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी पंडित उपाध्याय यांच्या प्रतिमेला अभिवादन केलं

****

देशात कोविड रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ८१ पूर्णांक ७४ शतांश टक्के झालं आहे, गेल्या २४ तासांत ८१ हजाराहून अधिक रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले, त्यामुळे देशभरात बरे झालेल्या रुग्णांची संख्या ४७ लाख ५६ हजारापेक्षा अधिक झाली आहे. दरम्यान, देशात गेल्या २४ तासांत या संसर्गाचे नवे ८६ हजार ५२ रुग्ण आढळले, त्यामुळे देशातली कोविड बाधितांची एकूण संख्या ५८ लाख १८ हजार ५७० झाली आहे. गेल्या २४ तासांत एक हजार १४१ रुग्णांचा मृत्यू झाल्यानं, या संसर्गानं मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या ९२ हजार २९० झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

दरम्यान, देशात गेल्या २४ तासांत १५ लाख नमुन्यांची कोविड चाचणी करण्यात आली. एका दिवसांत नमुन्यांची कोविड चाचणी करण्याचा हा आतापर्यंतचा उच्चांक आहे. आतापर्यंत ६ कोटी ८९ लाख २८ हजारापेक्षा अधिक नमुन्यांची कोविड चाचणी करण्यात आली आहे.

****

परभणी जिल्ह्यात आज सकाळी १११ रुग्णांचे कोरोना विषाणू तपासणी अहवाल बाधित आले. त्यामुळे जिल्ह्यातली एकूण बाधित रुग्णांची संख्या ४ हजार ९९१ झाली आहे. त्यापैकी ४ हजार ९६ रुग्ण बरे झाले असून २१० जणांचा मृत्यू झाला. सध्या ६८५ रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु असल्याचं जिल्हा प्रशासनानं कळवलं आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधित रुग्णांची एकूण संख्या ३२ हजार ८९ झाली आहे. यापैकी २५ हजारांवर रुग्ण आतापर्यंत बरे होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यात आजपर्यंत ८९३ जणांचा मृत्यू झाला असून, सध्या ६ हजार १४२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

अंमली पदार्थ व्यवहार प्रकरणी अभिनेत्री रकुलप्रीत सिंह आज सकाळी मुंबईत अंमली पदार्थ नियंत्रण विभाग-एनसीबीच्या कार्यालयात दाखल झाली. अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या चौकशीतून पुढे आलेल्या अंमली पदार्थ सेवन आणि व्यवहार प्रकरणात सुशांतची मैत्रीण अभिनेत्री रिया चक्रवर्तीने दिलेल्या माहितीत रकुलप्रीतचं नाव आल्यानं, एनसीबीने तिला समन बजावलं होतं.

****

धनगर समाजाला आरक्षण मिळावे तसंच अनुसूचित जमातीच्या सर्व योजना धनगर समाजाला लागू कराव्यात या मागणीसाठी आज औरंगाबाद इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘ढोल बजाओ’ आंदोलन करण्यात आलं. वैजापूर इथल्या महालगांव ग्रामपंचायत कार्यालयासमोरही ‘ढोल बजाओ’ आंदोलन करण्यात आलं. नाशिक आणि सोलापूर जिल्ह्यातही धनगर समाजाला आरक्षणाच्या मागणीसाठी असंच आंदोलन करण्यात आलं. धनगर समाजाचे प्रतिक असणारे पारंपारिक ‘गजी ढोल’ वाजवत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं.

****

केंद्र सरकारच्या कृषी विधेयकाच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं नाशिक जिल्ह्यात दिंडोरी तालुक्यातल्या चिंचखेड इथं केंद्र सरकारचा प्रतिकात्मक पुतळा शेतात गाडून आंदोलन केलं. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात परिसरातील शेतकरी तसंच पदाधिकारी सहभागी झाले.

****

बीड जिल्ह्यातल्या मांजरा धरणातील पाणीसाठा पन्नास टक्के इतका झाला आहे. धरणात अजुनही पाण्याची आवक होत असून पाणीसाठा वाढण्याची शक्यता धरणाचे शाखा अभियंता शाहू पाटील यांनी दिली. यापूर्वी २०१६ मध्ये हे धरण पूर्ण भरलं होतं.

****

No comments:

Text-آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 14 اگست 2025‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 14 August-2025 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبری...