Friday, 25 September 2020

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 25.09.2020 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 25 September 2020

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २५ सप्टेंबर २०२० सकाळी ७.१० मि.

****

·      प्रत्येक व्यक्तींनी व्यायाम हा जीवनशैलीचा भाग बनवावा- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन.

·      कोविड प्रतिबंधाच्या उपाययोजनांसाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतली पन्नास टक्के रक्कम वापरण्यास राज्य सरकारांना परवानगी.

·      प्रार्थना स्थळं न उघडण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार.

·      राज्यात आणखी १९ हजार १६४ कोविड बाधितांची नोंद, ४५९ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू.

·      मराठवाड्यात ३८ कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू, तर नव्या एक हजार ५०७ रुग्णांची नोंद.

आणि

·      सातवा वेतन आयोग आणि कालबद्ध पदोन्नतीसह विविध मागण्यांसाठी अकृषी विद्यापीठांच्या कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन.

****

प्रत्येक वयोगटातल्या व्यक्तींनी व्यायाम हा जीवनशैलीचा भाग बनवावा, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. फिट इंडिया मोहिमेच्या पहिल्या वर्धापनदिनानिमित्त पंतप्रधानांनी काल व्यायामप्रेमी जनतेशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. आजच्या वातावरणात आरोग्याला अनन्यसाधारण महत्त्व असल्याचं सांगत, त्यांनी शारीरिक तंदुरुस्तीला वयाचं बंधन नसतं, याकडे लक्ष वेधलं. क्रिकेटपटू विराट कोहली, अभिनेता मिलिंद सोमण यांच्यासह सात प्रसिद्ध व्यायामप्रेमींशी संवाद साधून पंतप्रधानांनी त्यांचे अनुभव जाणून घेतले. ‘फिटनेस की डोस-आधा घंटा रोज’ हा मंत्रही पंतप्रधानांनी यावेळी दिला. आरोग्यासाठी व्यायाम, आहार इत्यादीबाबत माहिती देण्याचा प्रयत्न या मोहिमेद्वारे केला जाणार आहे.

****

राष्ट्रीय सेवा योजना-एनएसएसचे २०१८-१९ या वर्षाचे पुरस्कार काल प्रदान करण्यात आले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, युवक कल्याण आणि क्रीडा मंत्री किरेन रिजिजू यांच्यासह देशभरातले राष्ट्रीय सेवा योजनेचे पुरस्कार प्राप्त ४२ स्वयंसेवक या कार्यक्रमात दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते.

****

कोरोना विषाणू बाधित रुग्णांवर प्लाझ्मा थेरेपीद्वारे उपचारांसाठी प्लाझ्मा अफेरॅसिस पध्दतीनं संकलित केलेल्या २०० मिलीलिटरच्या प्रति डोस प्लाझ्मा बॅगसाठी साडेपाच हजार इतका कमाल दर निश्चित करण्यात आला आहे. खासगी, विश्वस्त रक्तपेढ्या, रुग्णालयांना यापेक्षा अधिक दर आकारल्यास संबंधितांचा परवाना रद्द करण्याचा इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे. प्लाझ्माचा प्रती डोसची किंमत निश्चित करण्यासाठी राज्य रक्त संक्रमण परिषदेमार्फत तज्ञ समिती गठीत करण्यात आली होती. या समितीच्या शिफारशीनुसार हे दर निश्चित करण्यात आले आहेत. नॅट चाचणीसह प्लाझ्मा बॅग उपलब्ध करुन दिल्यास या चाचणीसाठी अतिरिक्त कमाल दर बाराशे रुपये प्रति चाचणी आणि केमिल्युमीनेसन्स तपासणी करुन प्लाझ्मा बॅग दिल्यास या चाचणीसाठी अतिरिक्त कमाल दर ५०० रुपये आकारण्यास मान्यता देण्यात आल्याचं टोपे यांनी सांगितलं.

****

कोविड प्रतिबंधाच्या उपाययोजनांसाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतली पन्नास टक्के रक्कम वापरण्यास केंद्र सरकारनं राज्य सरकारांना परवानगी दिली आहे. या निधीतून विलगीकरण सुविधा, चाचणी प्रयोगशाळा, प्राणवायू कार्यान्वयन प्रकल्प, व्हेंटिलेटर्स तसंच पीपीई संच खरेदी आदी कामं करता येणार आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयानं सर्व राज्य तसंच केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून याबाबत सविस्तर निर्देश दिले आहेत. कोविड रुग्णालयं, कोविड सुश्रुषा केंद्र, तसंच सरकारी रुग्णालयांमध्ये आरोग्य सुविधा, रुग्णवाहिका सुविधा आणि प्रतिबंधित क्षेत्र उभारण्यासाठीचा खर्चही यामध्ये समाविष्ट असेल, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रार्थना स्थळं न उघडण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास मुंबई उच्च न्यायालयानं नकार दिला आहे. यासंदर्भात असोसिएशन ऑफ एडिंग जस्टीस या संस्थेनच दाखल केलेल्या याचिकेवर काल मुख्य न्यायाधीश दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती जी एस कुलकर्णी यांच्या पीठासमोर सुनावणी झाली. निर्बंधासह धार्मिक स्थळं खुली करण्याचा निर्णय घेतलाच तर जनतेकडून सामाजिक अंतर राखण्याच्या नियमाचं पालन केलं जाईल, याची शाश्वती नसल्याचं राज्य सरकारनं न्यायालयात सांगितलं. शहरी तसंच ग्रामीण भागातही कोविडग्रस्तांच्या संख्येत दररोज होणारी वाढ लक्षात घेता, न्यायालयानं राज्य सरकारच्या निर्णयात हस्तक्षेप न करण्याचा निर्णय घेऊन, संबंधित याचिका फेटाळून लावली.

****

संसदेनं मंजूर केलेल्या कृषी विधेयकांच्या विरोधात पंजाबमध्ये शेतकऱ्यांनी कालपासून तीन दिवसीय रेल्वे रोको आंदोलन सुरू केलं आहे. किसान मजदूर संघर्ष समितीने पुकारलेल्या या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाच्या फिरोजपूर विभागाने खबरदारी म्हणून कालपासून २६ सप्टेंबरपर्यंत पंजाबकडे जाणाऱ्या १४ विशेष रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत. यामध्ये नांदेड-अमृतसर सचखंड एक्स्प्रेस, अमृतसर-मुंबई गोल्डन टेंपल एक्स्प्रेस या गाड्यांचाही समावेश आहे.

****

इतर मागास वर्ग-ओबीसीच्या प्रचलित आरक्षणाला कोणताही धक्का न लावता, ओबीसी आरक्षणाचे सर्व फायदे मराठा समाजाला देण्यात यावेत, अशी भूमिका राज्याचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी मांडली आहे. ओबीसी समाजानं कायमचं मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा दिल्याचं मुंडे म्हणाले. दरम्यान, लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण मंडळाचं धोरण ठरवण्यासाठी पुढील आठवड्यात व्यापक बैठक घेतली जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

****

राज्यात काल दिवसभरात आणखी १९ हजार १६४ कोविड बाधितांची नोंद झाली, त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या १२ लाख ८२ हजार ९६३ झाली आहे. काल ४५९ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात या विषाणू संसर्गानं आतापर्यंत ३४ हजार ३४५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर काल १७ हजार १८५ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. राज्यात आतापर्यंत नऊ लाख ७३ हजार २१४ रुग्ण कोरोना विषाणूमुक्त झाले असून, सध्या दोन लाख ७४ हजार ९९३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

मराठवाड्यात काल ३८ कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला, तर नव्या एक हजार ५०७ रुग्णांची नोंद झाली.

उस्मानाबाद जिल्ह्यात आठ बाधितांचा मृत्यू झाला, तर आणखी १९३ रुग्ण आढळून आले. नांदेड जिल्ह्यात सात रुग्णांचा मृत्यू झाला, तर नव्या २३६ रुग्णांची भर पडली. बीड जिल्ह्यात सहा रुग्णांचा मृत्यू झाला, तर नव्या १९४ रुग्णांची नोंद झाली. जालना आणि परभणी जिल्ह्यात प्रत्येकी पाच रुग्णांचा मृत्यू झाला, जालना जिल्ह्यात आणखी १४२, तर परभणी जिल्ह्यात १११ रुग्ण आढळले. लातूर जिल्ह्यात चार बाधितांचा मृत्यू झाला, तर आणखी २९२ रुग्ण आढळले. औरंगाबाद जिल्ह्यात तीन रुग्णांचा मृत्यू झाला, तर नव्या ३१७ रुग्णांची नोंद झाली. हिंगोली जिल्ह्यात नव्या २२ रुग्णांची नोंद झाली.

****

पुणे जिल्ह्यात आणखी तीन हजार ५२१ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, तर ७८ जणांचा मृत्यू झाला. मुंबईत दोन हजार १६३ नवे रुग्ण आणि ५४ मृत्यूंची नोंद झाली. नाशिक जिल्ह्यात एक हजार १७६ रुग्ण आढळले, तर २४ रुग्णांचा मृत्यू झाला. ठाणे जिल्ह्यात एक हजार ७४९, नागपूर जिल्ह्यात एक हजार १२६, सातारा ९१५, अहमदनगर ७७८, सांगली ६८५, रायगड ५२८, पालघर ३०८, गोंदिया ३०५, अमरावती २७२, बुलडाणा १२४, गडचिरोली ११९, वाशिम ९९, सिंधुदुर्ग ९८, तर रत्नागिरी जिल्ह्यात आणखी ५१ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली. 

****

परभणी जिल्ह्यात कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर उद्या २६ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर दरम्यान जनता संचारबंदी पाळण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी काल याबाबतचे आदेश जारी केले. या कालावधीत अत्यावश्यक सेवा सुरू राहतील, असं त्यांनी सांगितलं. 

****

उस्मानाबाद शहरात अँटिजेन चाचणीसाठी जादा रक्कम आकारुन रुग्णाची लूट केल्याप्रकरणी सह्याद्री रुग्णालयाला दहा हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. जादा आकारण्यात आलेली रक्कम रुग्णाच्या बँक खात्यावर जमा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिले आहेत.

****

सातवा वेतन आयोग आणि कालबद्ध पदोन्नती यासह विविध मागण्यांसाठी अकृषी विद्यापीठांनी पुकारलेल्या काम बंद आंदोलनात, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि संलग्नित सर्व महाविद्यालयातले कर्मचारी कालपासून सहभागी झाले. सुमारे दोन हजार कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाल्याची माहिती कृती समितीचे समन्वयक डॉ.कैलास पाथ्रीकर यांनी दिली. राज्यातले १४ अकृषी विद्यापीठं आणि महाविद्यालयातले कर्मचारी कालपासून ३० सप्टेंबर पर्यंत हे आंदोलन करणार असल्याचं ते म्हणाले.

नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातले शिक्षकेत्तर अधिकारी आणि कर्मचारीही या आंदोलनात सहभागी झाले आहेत. या आंदोलनामुळे काल विद्यापीठाचे कामकाज बंद पडलं होतं असा दावा संघर्ष कृती समितीने केला आहे.

****

मराठा आरक्षणावरची स्थगिती उठवण्याच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी काल जालना जिल्ह्यातल्या बदनापूर तहसील कार्यालयासमोर घेराव आंदोलन केलं. मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.

****

पीकविमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळवण्यासाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी पीक नुकसानीचा अर्ज ७२ तासांच्या आत तालुका कृषी कार्यालयात किंवा पीकविमा कंपनीच्या प्रतिनिधीकडे सादर करून पीकविमा दावा दाखल करावा, असं आवाहन जालन्याचे जिल्हा कृषी अधिकारी बालासाहेब शिंदे यांनी केलं आहे. संपूर्ण जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे खरीप पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. कृषी आणि महसूल विभागाकडूनही पीक नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आले असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

पदवी आणि पदव्युत्तर विषयाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरण्यासाठी २९ सप्टेंबर पर्यंत मुदत देण्यात आली असल्याचं उच्च आणि तंत्रशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सांगितलं. उस्मानाबाद इथं काल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्रात परीक्षा व्यवस्थेचा आढावा घेतल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. ऑनलाइन परीक्षा देण्यास अडचण असणाऱ्या विद्यार्थ्यांना जवळच्या महाविद्यालयात किंवा मराठवाड्यातल्या ६१८ एमकेसीएल केंद्रावर ही परीक्षा देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली असल्याचं तनपुरे यांनी सांगितलं.

दरम्यान, भारतीय जनता पक्षाच्या वतीनं अतिवृष्टीने झालेल्या सोयाबीन पिकाच्या नुकसानीपोटी अनुदान मिळण्याबाबत काल राज्यमंत्री तनपुरे यांना निवेदन देण्यात आलं.

****

सध्या ‘पोषण माह’ सुरू आहे. लहान मुलांचं आरोग्य सृदृढ रहावं यासाठी त्यांना देण्यात येणारा आहार हा पोषण युक्त असणं आवश्यक आहे. या पोषण युक्त आहारामध्ये बालकांना ‘मल्टिव्हिटॅमिन लाडू’ देता येईल. या लाडूची कृती सांगत आहेत आहातज्ज्ञ स्नेहा वेद –

२ ते ५ वयोगटातील मुला-मुलींची वाढ खूप झपाट्याने होत असते. त्यामुळे त्यांच्या आहारात व्हिटॅमिन ए आणि प्रथिने यांचा समावेश असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे आज आपण एक रेसिपी बघणार आहोत. रेसिपीचं नाव आहे ‘मल्टिव्हिटॅमिन लाडू’. रेसिपीसाठी एक वाटी बिया काढलेले खजूर, अर्धी वाटी लाल भोपळ्याच्या बिया, म्हणजेच पंपकीन सीडस्‌, अर्धी वाटी सूर्यफुलाच्या बिया म्हणजेच सनफ्लॉवर सीडस्‌ या तीनही पदार्थांना मिक्सरच्या भांड्यामध्ये एकत्र करून वाटून घ्यायचं आहे. आणि तुपाचा हात लावून छोटे छोट लाडू बनवून घ्यायचे आहेत. दिवसातून दोन छोटे लाडू आपण मुला-मुलींना घेऊ शकतो. याने त्यांना मल्टिव्हिटॅमिन भेटेल त्यासोबतच व्हिटॅमिन ए आणि प्रथिने भेटतील.

****

कांदा निर्यात बंदीचा निर्णय तातडीनं मागे घेण्याची मागणी रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्याकडे केली आहे. केंद्र सरकारनं अचानक कांदा निर्यातबंदी लागू केल्यानं कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला असून, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत असल्याचं त्यांनी केंद्रीय कृषीमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे.

****

जालना जिल्ह्यात बदनापूर आणि भोकरदन तालुक्यातल्या काही गावांमधल्या नुकसानग्रस्त पिकांची आमदार नारायण कुचे, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी काल पाहणी केली. पिकांचे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर नुकसान भरपाईसाठी शासनाला अहवाल सादर केला जाईल, असं जिल्हाधिकारी बिनवडे यांनी यावेळी सांगितलं.

****

बीड शहरातल्या नवा मोंढा भागातल्या श्री संस्थान दक्षिण मुखी मारूती न्यासच्या बँक खात्यातून मोठ्या प्रमाणावर देणगीच्या २७ लाख रुपयांची अफरातफर केली असल्याची तक्रार बीड जिल्हा निबंधक धर्मदाय संस्थेकडे प्राप्त झाली आहे. या तक्रारीवरून संबंधित खात्याची चौकशी करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे.

****

परभणी शहरातल्या रस्त्यांच्या कामांची गुणवत्ता नियंत्रण कार्यालयामार्फत चौकशी करण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी काल महानगरपालिकेच्या प्रवेशद्वाराला कुलूप ठोकून निदर्शनं केली. दोषी कंत्राटदाराविरूद्ध गुन्हे दाखल करण्याचीही मागणी निदर्शकांनी केली आहे.

****

अबुधाबी इथं सुरु असलेल्या इंडियन प्रिमियर लीग-आयपीएल स्पर्धेत काल किंग्ज इलेव्हन पंजाब संघानं रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू संघाचा ९७ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करत किंग्ज इलेव्हन पंजाब संघानं २० षटकात तीन बाद २०६ धावा केला. प्रत्त्युतरादाखल रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघ १०९ धावात सर्वबाद झाला.

****

ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू डीन जोन्स यांचं काल मुंबईत हृदयविकारानं निधन झालं, ते ५९ वर्षांचे होते. इंडियन प्रिमीअर लीग-आयपीएलच्या समालोचनासाठी ते मुंबईत आले होते. १९८७ साली विश्वचषक स्पर्धा जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट संघात त्यांचा समावेश होता. त्यांनी आपल्या कारकिर्दित ५२ कसोटी क्रिकेट सामने आणि १६४ एकदिवसीय सामने खेळले.

****

No comments: