Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 28 September 2020
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २८ सप्टेंबर २०२० दुपारी १.०० वा.
****
केंद्र सरकारनं
साखरेच्या निर्धारित निर्यातीसाठी तीन महिने मुदतवाढ दिली आहे. अतिरिक्त उत्पादित होणारी
६ दशलक्ष टन साखर दरवर्षी सप्टेंबर महिन्या संपणाऱ्या विपणन वर्षापर्यंत निर्यातीला
परवानगी असते. यंदा आतापर्यंत पाच पूर्णांक सात दशलक्ष टन साखरेच्या निर्यातीचे करार
झाले असून, पाच पूर्णांक सहा दशलक्ष टन साखर कारखान्यांमधून रवाना झाल्याची माहिती
अन्न मंत्रालयाचे सहसचिव सुबोधकुमार सिंह यांनी दिली. मात्र कोविड प्रादुर्भावामुळे
काही कारखान्यांना साखरेची वाहतुक करता आलेली नाही, या कारखान्यांना साखरेची वाहतुक
शक्य व्हावी, यासाठी ही मुदत डिसेंबरपर्यंत वाढवत असल्याचं, सुबोधकुमार यांनी सांगितलं.
****
देशाचा कोविड
संसर्गातून मुक्त होण्याचा दर ८२ पूर्णांक ५८ शतांत टक्के झाला आहे. गेल्या २४ तासांत
देशात ७४ हजारापेक्षा अधिक रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. देशात बरे झालेल्या रुग्णांची
संख्या आता ५० लाख १६ हजारावर पोहोचली आहे. गेल्या २४ तासांत या संसर्गाचे ८२ हजार
१७० नवे रुग्ण आढळले, त्यामुळे देशातली एकूण रुग्णसंख्या ६० लाखावर गेली आहे. देशात
काल या संसर्गाने एक हजार ३९ रुग्णांचा मृत्यू झाला, त्यामुळे मृतांची एकूण संख्या
९५ हजार ५४२ झाली आहे. मृत्यूचं हे प्रमाण जगात सर्वात कमी एक पूर्णांक ५७ शतांश टक्के
असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. दरम्यान, गेल्या २४ तासांत देशात सात लाख
नऊ हजारांवर नमुन्यांची कोविड तपासणी करण्यात आली. देशात आतापर्यंत एकूण सात कोटी १९
लाखांवर नमुन्यांची कोविड चाचणी करण्यात आली आहे.
दरम्यान,
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं कोविड १९ संसर्गावरील लसीची माहिती देणारं पोर्टल तयार
केलं आहे, केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी आज या पोर्टलचं अनावरण केलं.
****
औरंगाबाद
जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधित रुग्णांची एकूण संख्या ३२ हजार ९९३ झाली आहे. यापैकी
२६ हजार ११६ रुग्ण आतापर्यंत बरे होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यात आतपर्यंत ९१६ रुग्णांचा
या संसर्गानं मृत्यू झाला असून, सध्या ५ हजार ९६१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
लातूर जिल्ह्याच्या
निलंगा तालुक्यातल्या माकणी थोर गावातलं हनुमान मंदिर उघडल्यामुळे सरपंच श्रीनिवास
अशोक यांनी मंदिर व्यवस्थापनाला नोटिस बजावली आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर
सध्या मंदिरं उघडण्यास मनाई आहे.
****
नवीन कृषी
सुधारणा कायद्यांबाबत काँग्रेस पक्षाकडून शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात असल्याचं, केंद्रीय
माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे. ते आज पत्रकारांशी बोलत
होते. काँग्रेस पक्षाच्या या डावपेचांना शेतकऱ्यांनी बळी पडू नये, असं जावडेकर म्हणाले.
काँग्रेस पक्षाने त्यांच्या निवडणूक जाहीरनाम्यात या सुधारणांचा उल्लेख केला होता,
याकडे जावडेकर यांनी लक्ष वेधलं.
****
कृषी सुधारणा
कायद्याला पंजाबमध्ये होत असलेला विरोध आणि आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काही रेल्वे
गाड्या अंशत: रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे अमृतसर नांदेड ही रेल्वेगाडी उद्या अमृतसर
स्थानकावरुन न निघता, दिल्लीहून नांदेडकडे परत येणार असल्याचं रेल्वे प्रशासनानं कळवलं
आहे.
****
विडी-सिगारेटच्या सुट्या
स्वरुपातल्या विक्रीवर बंदी घालण्याचा आदेश राज्याच्या आरोग्य विभागानं जारी केला आहे.
विडी-सिगारेटच्या सुट्या स्वरुपातील विक्रीमुळे त्यांच्या पाकीटांवरील आरोग्याच्या
धोक्याची कल्पना ग्राहकाला येत नाही म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचं राज्याचे आरोग्य
मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. त्यामुळे यापुढे कोणालाही त्यांची सुटी विक्री करता
येणार नसल्याचं टोपे म्हणाले.
****
गडचिरोली
जिल्ह्याच्या देसाईगंज तालुक्यात वाघाने केलेल्या हल्ल्यात एक इसम गंभीर जखमी झाला.
बंडू मुकुंदा कुथे असं या ४५ वर्षीय इसमाचं नाव असून, जुनी अरतोंडी या गावी नदीच्या
काठावर वाघानं हल्ला केल्याचं त्यानं सांगितलं. घटनास्थळी दोन वाघ असल्याचं, त्यानं
सांगितलं. या इसमावर देसाईगंज इथं ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
****
हुतात्मा
भगत सिंग यांच्या जयंती निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली अर्पण
केली आहे. भगत सिंग यांची शौर्य गाथा देशवासियांना शतकानुशतकं प्रेरित करत राहील असं
पंतप्रधानांनी आपल्या ट्वीट संदेशात म्हटलं आहे.
****
प्रसिद्ध
गायिका भारतरत्न लता मंगेशकर आज वयाची ९१ वर्ष पूर्ण करून ब्याण्णवाव्या वर्षात पदार्पण
करत आहेत, त्यांच्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधानांनी त्यांना दूरध्वनीवरून शुभेच्छा
दिल्या. आपण लता दिदींच्या निरोगी दीर्घायुष्याची कामना करतो, असं पंतप्रधानांनी ट्वीट
संदेशात म्हटलं आहे.
****
No comments:
Post a Comment