Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 30 September 2020
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३० सप्टेंबर २०२० दुपारी १.०० वा.
****
अयोध्येतल्या
बाबरी मशीद विध्वंस प्रकरणी सर्व ३२ आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. केंद्रीय
अन्वेषण विभाग - सीबीआयच्या लखनौतल्या विशेष न्यायालयानं आज हा निर्णय सुनावला. अयोध्येत
६ डिसेंबर १९९२ रोजी झालेली ही घटना पूर्वनियोजित नव्हती, असं न्यायालयानं या निर्णयात
म्हटलं आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरलीमनोहर जोशी, उमा भारती, उत्तरप्रदेशचे
तत्कालीन मुख्यमंत्री कल्याणसिंह, साध्वी ऋतंभरा, विनय कटियार आणि अयोध्येतल्या राममंदिराचे
महंत नृत्यगोपालदास यांच्यासह एकूण ३२ आरोपी निर्दोष असल्याचं न्यायालयानं सांगितलं.
सर्वोच्च न्यायालयानं याप्रकरणी ३१ ऑगस्टपर्यंत निकाल देण्याचे निर्देश दिले होते,
ही मुदत त्यानंतर महिनाभरासाठी वाढवण्यात आली होती. खटल्याची सुनावणी जलद पूर्ण करण्यासाठी
विशेष न्यायालयानं दररोज सुनावणी घेत, आज या मुदतीच्या अखेरच्या दिवशी हा निर्णय सुनावला.
****
देशात कोविड
संसर्गमुक्तीचं प्रमाण ८३ पूर्णांक ३३ शतांश टक्के झालं आहे. देशात कोविड बाधितांच्या
संख्येनं ६२ लाखांचा आकडा पार केला असून, त्यापैकी ५१ लाख ८७ हजार ८२५ रुग्ण बरे झाले
आहेत. दरम्यान, गेल्या २४ तासांत देशात या संसर्गाचे ८० हजार ४७२ नवे रुग्ण आढळले,
१ हजार १७९ रुग्णांचा मृत्यू झाल्यानं, मृतांची एकूण संख्या ९७ हजार ४९७ झाली आहे.
या संसर्गाने मृत्यूचं प्रमाण आता एक पूर्णांक ५६ शतांश टक्के झालं आहे. देशात सध्या
९ लाख ४० हजार रुग्ण सध्या उपचार घेत आहेत.
****
औरंगाबाद
जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या ३३ हजार ४११ झाली आहे. यापैकी २६ हजार
६५२ रुग्ण आतापर्यंत बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात ९३० जणांचा या संसर्गाने
मृत्यू झाला आहे. सध्या जिल्ह्यात ५ हजार ८५७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
मुंबईत गेल्या
२४ तासांत एक हजार ७१३ नवीन कोविड ग्रस्त रुग्णांची नोंद झाली तर ४९ रुग्णांचा मृत्यू
झाला. आतापर्यंत रुग्णांची संख्या दोन लाख दोन हजार ४८८ झाली आहे. एकूण मृतांचा आकडा
आठ हजार ८८० वर पोहचला आहे.
****
मुंबईत आता
मास्क न वापरणाऱ्या लोकांना बस, टॅक्सी, आणि रिक्षा यांसारख्या सार्वजनिक वाहनांचा
उपयोग करता येणार नाही. बृहन्मुंबई महानगर पालिकाचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या
अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यासोबतच मॉल्स, कार्यालयं, तसंच
रहिवासी सोसायट्या या ठिकाणी देखील विना मास्क असलेल्या नागरिकांना प्रवेश मिळणार नाही.
कोरोना विषाणू संसंर्गापासून बचाव करण्यासाठी मास्क सारख्या प्रतिबंधित उपायाचा वापर
व्हावा यासाठी लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाची
अंमलबजावणी व्हावी यासाठी नागरिक, वॉर्ड कार्यालयं तसंच रिक्षा चालक संघटनेला या बाबत
माहिती देण्यात येणार आहे.
****
पालघर जिल्ह्यातल्या
कोव्हिड-19 च्या रुग्णांची संख्या आता ३४ हजार ७०८ वर पोहचली आहे. त्यात वसई-विरार
महानगरपालिका क्षेत्रातल्या २२ हजार २१९ इतक्या तर पालघर ग्रामीण भागातल्या १२ हजार
४१७ इतक्या रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत ३० हजार ४३१ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.
सद्यस्थितित पालघर ग्रामीण भागात ६१२ इतकी प्रतिबंधित क्षेत्रं आहेत.
****
लोकांवर
भार पडू नये यासाठी राज्य सरकारनं आरोग्य सेवांचं शुल्क कमी करण्यासाठी अनेक पावलं
उचलली असल्याचं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटल आहे. अनेक खाजगी संस्था लोकांकडून
अतिरिकत शुल्क वसूल करत असल्याच्या पार्श्वभूमीवर टोपे यांनी हे विधान केलं आहे. ते
भारतीय उद्योग महासंघाच्या एका कार्यक्रमात बोलत होते. दरम्यान कोविड -19 मुळं अनेक
जणांचा रोजगार गेला असून त्यामुळं मानसिक स्वास्थ बिघडलं आहे आणि त्यातून बाहेर पडणं
हे एक आव्हान असल्याचंही त्यांनी नमूद केलं.
****
धुळे जिल्ह्यातले
उद्योजक आणि शिरपूर नगर परिषदेचे नगरसेवक तपनभाई पटेल यांचं आज पहाटे अपघाती निधन झालं.
शिरपूर जवळच्या सावळदे शिवारातल्या निम्स कॅम्पस इथून घरी जात असतांना तपन पटेल यांची
भरधाव गाडी अनियंत्रित झाल्यानं पथकर नाक्याजवळ महामार्गावरच्या दुभाजकावर जोरात आदळली.
या अपघातात तपन पटेल हे जागीच ठार झाले. त्यांच्या पार्थिव देहावर आज सायंकाळी शिरपूर
इथं पटेल फार्मसी महाविद्यालयाच्या आवारात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
****
वाशिम जिल्ह्यात
“माझे कुटुंब - माझी जबाबदारी” या अमोहिमेला सुरूवात झाली आहे. या अंतर्गत १२ लाख नागरिकांचं
सर्वेक्षण करण्यात येणार आहे. आता पर्यंत 3 लाख लोकांचं सर्वेक्षण पूर्ण झालं आहे.
यातील उच्च रक्तदाब-मधुमेह या रोगाने आजारी असलेल्या रुग्णांची संख्या जवळ पास ८ हजार
आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांनी आकाशवाणीशी बोलतांना
दिली.
****
No comments:
Post a Comment