Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 30 September 2020
Time 18.00 to 18.10
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३० सप्टेंबर २०२० सायंकाळी ६.००
****
**
केंद्रीय लोकसेवा आयोगाची नागरी सेवा प्रारंभिक परीक्षा स्थगित करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा
नकार
**
बाबरी मशीद विध्वंस प्रकरणी न्यायालयाच्या निर्णयावर देशभरातून संमिश्र प्रतिक्रिया
**
ब्राह्मोस या स्वनातीत क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी
**
औरंगाबाद जिल्ह्यात आज पाच कोविड बाधितांचा मृत्यू
**
शेतकऱ्यांना हमी भाव मिळण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समित्यांचं अस्तित्व कायम ठेवावं
-ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश देवी यांची मागणी
आणि
**
मोसमी पावसाच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात
****
केंद्रीय
लोकसेवा आयोगाच्या वतीनं घेण्यात येणारी नागरी सेवा प्रारंभिक परीक्षा स्थगित करण्यास
सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे. गेल्या वेळेस कोविड -१९ मुळं ज्या उमेदवारांना
ही परीक्षा देता आली नाही, त्यांच्या साठी ही आणखी एक संधी असेल असं न्यायालयानं म्हटलं
आहे. चार ऑक्टोबरपासून होणारी ही परीक्षा कोविड -19चा प्रादुर्भाव आणि देशाच्या विविध
भागातल्या पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, स्थगित करण्याची मागणी केली जात होती, या
मागणीसह येत्या न्यायालयानं २०२० आणि २०२१ची नागरी सेवा परीक्षा एकत्र घेण्यासही न्यायालयानं
नकार दिला आहे. परीक्षा सर्वांसाठी आवश्यक असून, परीक्षेसाठी खबरदारीचे सर्व उपाय करण्यात
आल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे.
****
बाबरी
मशीद विध्वंस प्रकरणी लखनौच्या विशेष सीबीआय न्यायालयानं दिलेल्या निर्णयाचं या प्रकरणातले
आरोपी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी तसंच मुरलीमनोहर जोशी यांनी स्वागत केलं
आहे. या निर्णयामुळे रामजन्मभूमी अभियानाप्रती आपली कटिबद्धता सिद्ध झाल्याचं, अडवाणी
यांनी म्हटलं आहे, तर जोशी यांनी या निर्णयामुळे आपलं अभियान कोणत्याही कटकारस्थानाचा
भाग नव्हतं हे सिद्ध झाल्याचं म्हटलं आहे.
न्यायालयानं
या प्रकरणातल्या सर्व आरोपींची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता करत, बाबरी मशीदीचा
विध्वंस हा पूर्वनियोजित कट नव्हता, असं म्हटलं आहे.
राष्ट्रीय
स्वयंसेवक संघानंही या निर्णयाचं स्वागत केलं आहे. या निर्णयानंतर समाजातल्या सर्व
घटकांनी एकत्र यावं आणि देशापुढची इतर आव्हानं सोडवण्यासाठी तसंच देशाच्या प्रगतीसाठी
कार्य करावं, असं आवाहन संघाचे महासचिव भैयाजी जोशी यांनी ट्विटरवरून केलं आहे.
शिवसेना
नेते संजय राऊत यांनी आजच्या या निकालाचं स्वागत केलं, मात्र सर्वोच्च न्यायालयानं
गेल्या वर्षी रामजन्मभूमी प्रकरणी दिलेल्या निकालानंतर बाबरी मशीद विध्वंस खटल्याची
काहीही प्रासंगिकता राहिली नव्हती, असंही राऊत यांनी नमूद केलं.
दरम्यान,
या निकालाला आव्हान देण्याबाबतचा निर्णय विधी विभागाशी चर्चेनंतर घेणार असल्याचं, सीबीआयनं
म्हटलं आहे. ६ डिसेंबर १९९२ रोजी घडलेल्या या घटनेसंदर्भात सीबीआयने न्यायालयासमोर
३५१ साक्षीदार तर सहाशे कागदपत्रं पुरावा म्हणून सादर केली होती.
न्यायालयाचा
हा निर्णय अप्रिय असल्याचं, एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी म्हटलं आहे, सीबीआयनं
या निकालाला आव्हान देण्याचा सल्ला ओवेसी यांनी दिला आहे. ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल
लॉ बोर्डाचे ज्येष्ठ सदस्य मौलाना खालिद रशीद यांनी या निर्णयाला आव्हान देण्याबाबतचा
निर्णय सर्वसहमतीनं घेतला जाईल, असं सांगितलं आहे.
****
रिपब्लीक
वृत्तवाहिनीचे कार्यकारी संपादक अर्णव गोस्वामी यांना हक्कभंग सूचना बजावल्याप्रकरणी
सर्वोच्च न्यायालयानं महाराष्ट्र विधानसभेच्या सचिवांकडून उत्तर मागवलं आहे. गोस्वामी
यांचे वकील हरीश साळवे यांनी या सूचनेला आव्हान देताना, गोस्वामी यांनी विधानसभेच्या
किंवा विधानसभेच्या कोणत्याही समितीच्या कामकाजात कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप केला
नसल्याचं, आपल्या युक्तिवादात म्हटलं आहे. या संदर्भात न्यायालयानं विधानसभा सचिवांना
सात दिवसांत उत्तर देण्यात सांगितलं आहे.
****
सैन्यदलानं
आज ब्राह्मोस या स्वनातीत क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. ध्वनीपेक्षा तिप्पट वेग
असलेलं हे क्षेपणास्त्र, चारशे किलोमीटरपर्यंतच्या लक्ष्याचा अचूक वेध घेऊ शकतं. हे
क्षेपणास्त्र जमिनीवरून, विमानातून, युद्धनौकेवरून किंवा पाणबुडीवरूनही लक्ष्यावर डागता
येऊ शकतं ओडिशात बालासोर किनाऱ्यावर ही चाचणी घेण्यात आल्याचं, संरक्षण संशोधन आणि
विकास संस्था - डीआरडीओकडून सांगण्यात आलं.
****
उपराष्ट्रपती
एम व्यंकय्या नायडू यांनी आपली प्रकृती उत्तम असल्याचं म्हटलं आहे. नायडू यांची कोविड
चाचणी झाल्यानंतर ते बाधित आढळले. त्यानंतर त्यांना घरीच विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे.
दरम्यान,
केंद्रीय परिवहन मंत्री नीतीन गडकरी कोविड संसर्गातून मुक्त झाले आहेत. गडकरी यांनी
ट्वीट करून ही माहिती दिली. गेल्या १६ तारखेला गडकरी यांना संसर्ग झाल्याचं निष्पन्न
झालं होतं.
****
औरंगाबाद
जिल्ह्यात आज पाच कोविड बाधितांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत ९३५ जणांचा या
विषाणू संसर्गानं मृत्यू झाला. औरंगाबाद जिल्ह्यातल्या कोविड बाधितांची संख्या ३३ हजार
४११ झाली असून पाच हजार ८५७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
केंद्र
शासनाने तयार केलेलं कृषी विधेयक हे शेतकरी विरोधात असून शेतकऱ्यांना हमी भाव मिळण्यासाठी
कृषी उत्पन्न बाजार समित्यांचं अस्तित्व कायम ठेवावं अशी मागणी राष्ट्र सेवा दलाचे
अध्यक्ष आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश देवी यांनी केली आहे. केंद्र शासनाने
नुकत्याच मंजुर केलेल्या तीन कृषी विधेयकांच्या विरोधात गणेश देवी यांनी गेल्या २४
सप्टेंबर पासून कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागल इथून संवाद यात्रा सुरू केली आहे. आज या संवाद यात्रेचे
नाशिकमध्ये आगमन झाल्यानंतर डॉ. देवी यांनी माध्यमांशी बोलताना ही मागणी केली. करार
पध्दतीने शेती करताना ग्रामसभेची मान्यता आवश्यक करावी अशी मागणीही त्यांनी केली. यानंतर
त्यांनी बाजार समितीतील शेतकरी आणि कामगारांशी संवाद साधला.
****
ऊसतोड
कामगारांच्या विविध मागण्यांसाठी आज दुपारपासून पासून सांगली जिल्ह्यात ऊस तोड कामगारांचं
कोयता बंद आंदोलन सुरु झालं. माजी मंत्री सुरेश धस आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या
नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू झालं आहे. राज्यातल्या ऊस तोडणी मजूर, वाहतूकदार आणि मुकादम संघटनांचा करार संपला आहे. नवीन दरवाढीचा
करार करण्याकडे राज्य सरकार आणि साखर कारखानदारांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप करत हे आंदोलन सुरू करण्यात आलं आहे.
****
धनगर
समाजाला अनुसूचीत जमातीचं आरक्षण दिले जावे, या मागणीसाठी आज धुळ्यात धनगर समाजाच्या
वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. पारंपारिक वेषात, पिवळे फेटे,
हातात पिवळे झेंडे घेत भंडारा उधळीत या मोर्चात शेकडो धनगर समाज महिला पुरुष, तरुण,
मुले सहभागी झाले होते.
****
मोसमी
पावसाच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. यंदा दिल्लीत दोन दिवस लवकर म्हणजेच
२५ जूनला पोहोचलेल्या पावसाचा मुक्काम पाच दिवस लांबला. साधारणत: २५ सप्टेंबरला दिल्लीतून
मोसमी पावसाचा परतीचा प्रवास सुरू होत असतो, असं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.
*****
उद्यापासून
सुरु होत असलेल्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षेसाठी राज्य परीवहन महामंडळाच्या वतीनं
घेण्यात येणाऱ्या परीक्षांसाठी औरंगाबाद जिल्ह्यात जादा बसेसचं नियोजन करण्यात आलं
आहे. औरंगाबाद जिल्ह्यातल्या विविध तालुक्यात तसंच बीड, जालना, परभणी, बुलडाणा आणि
इतर विभागातून औरंगाबादसाठी जादा बसेस सोडण्यात येत असल्याचं विभागनियंत्रक अरुण सिया
यांनी सांगितलं आहे.
****
नांदेड
जिल्ह्यातल्या भोकर ते रहाटी रस्त्याचं हे काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी
दिले आहेत. मंत्रालयात यासंदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते
बोलत होते. भोकर ते रहाटी रस्त्याचं काम प्रलंबित असल्याच्या अनेक तक्रारी, निवेदने
आल्याचं चव्हाण यांनी सांगितलं. दरम्यान, या कामाला पुन्हा मंजुरी देऊन निविदा काढण्यात
यावी, आणि कामास जानेवारीपर्यंत सुरुवात करावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
****
शिवसेनेच्या
औरंगाबाद शाखेच्या वतीनं माझे कुटुंब माझी
जबाबदारी अभियानांतर्गत एक ते २५ ऑक्टोबर दरम्यान विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात
आलं असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष आमदार अंबादास दानवे यांनी दिली आहे. यामध्ये दूरदृष्य
संवाद प्रणालीच्या माध्यमाद्वारे व्याख्यानं, विना मास्क असणाऱ्यांना मास्क भेट, वाफ
घेण्याचे यंत्र आणि गावनिहाय ९ कोरोनायोद्ध्या महिलांचा सन्मान करण्यात येणार असल्याचं
ते म्हणाले.
****
हिंगोली
जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील सालेगावं
-सांडस मार्गे कळमनुरीला जाणारा पूल सतत च्या पावसामुळे उखडून गेला आहे.दोन गावांना
जोडणारा पूल तुटल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं
आहे.
****
No comments:
Post a Comment