Tuesday, 22 September 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 22 SEPTEMBER 2020 TIME – 18.00

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 22 September 2020

Time 18.00 to 18.10

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक –  २२ सप्टेंबर २०२० सायंकाळी ६.००

****

** कर निर्धारण आणि बँक नियमन सुधारणा विधेयकासह सात विधेयकं राज्यसभेत मंजूर

** राज्यसभेतल्या निलंबित सदस्यांच्या समर्थनात, विरोधकांचा लोकसभेच्या कामकाजावरही बहिष्कार

** आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार, डॉ. भाऊ लोखंडे यांचं आज नागपूर इथं निधन

** धनगर आरक्षण मागणीसाठी राज्यभरात येत्या २५ सप्टेंबरला ढोल वाजवा आंदोलन

आणि

** औरंगाबाद जिल्ह्यात तीन कोविडग्रस्तांचा मृत्यू; जिल्ह्यात बाधितांची संख्या ३१ हजार १०५

****

कर निर्धारण आणि अन्य कायद्यांमध्ये सवलत तथा सुधारणा विधेयकासह एकूण सात विधेयकांना राज्यसभेनं आज मंजुरी दिली. कोविड प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या स्थितीमुळे कर निर्धारणाची मुदत वाढवून नागरिकांना दिलासा देण्यासाठी या कायद्यांमध्ये बदल करणं आवश्यक असल्याचं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं.

बँक नियंत्रण सुधारणा विधेयक आज राज्यसभेत मंजूर झालं. या विधेयकामुळे बँकांच्या कारभारावर नियंत्रण येणार असून रिजर्व्ह बँकेला अधिस्थगनाशिवाय विविध बँकांचं एकत्रीकरण, पुनर्बांधणी संदर्भात योजना आखणं शक्य होणार आहे. गेल्या काही वर्षात अनेक सहकारी बॅंकांना कठीण परिस्थितीचा सामना करावा लागत आहे, या विधेयकामुळे सामान्य खातेदाराच्या हिताचं रक्षण होणार असल्याचं मत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राज्यसभेत व्यक्त केलं.

सदनानं संमत केलेल्या अन्य विधेयकांमध्ये जीवनावश्यक वस्तू कायदा सुधारणा विधेयक, कंपनी कायदा सुधारणा विधेयक, राष्ट्रीय न्यायवैद्यक विद्यापीठ विधेयक, आदी विधेयकांचा समावेश आहे. लोकसभेनं यापूर्वीच मंजूर केलेली ही विधेयकं, आता राष्ट्रपतींकडे संमतीसाठी पाठवली जाणार आहेत.

****

राज्यसभेतल्या निलंबित सदस्यांच्या समर्थनात, विरोधी पक्षांनी आता लोकसभेच्या कामकाजावरही बहिष्कार टाकला आहे. काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी पक्षाची ही भूमिका जाहीर केली. त्यापूर्वी रबी पिकांच्या किमान हमीभावाच्या मुद्यावरून लोकसभेचं काम आज तासाभरासाठी स्थगित झालं. सरकारनं हमीभावात जाहीर केलेली वाढ अत्यंत तुटपुंजी असल्याचं, अधीर रंजन चौधरी यांनी म्हटलं. द्रमुक तसंच तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांनी त्यांना पाठिंबा देत, अध्यक्षांसमोरच्या हौद्यात येऊन घोषणाबाजी सुरू केली. त्यावर अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सदनाचं कामकाज तत्काळ तासाभरासाठी तहकूब करत, सदस्यांना स्वत:ची काळजी घेण्याचं आवाहन केलं.

****

राज्यसभेच्या आठ सदस्यांचं निलंबन मागे घेतल्याशिवाय कामकाजावरचा बहिष्कार मागे घेणार नसल्याचं विरोधी पक्षांनी सांगितलं आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, समाजवादी पार्टी, राष्ट्रीय जनता दल, आम आदमी पार्टी,  द्रविड मुनेत्र कळघम, तेलंगण राष्ट्र समिती आणि शिवसेना या पक्षांनी कामकाजावर बहिष्कार टाकला आहे. राज्यसभेतले विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी बहिष्काराबाबतची भूमिका स्पष्ट करतानाच, शेतकऱ्यांचा शेतमाल कोणीही किमान हमीभावापेक्षा कमी किमतीने घेऊ नये, यासाठी एका विधेयकाची मागणी केली.

दरम्यान, विरोधी पक्षांना या बहिष्काराबाबत पुनर्विचार करून कामकाजात सहभागी व्हावं असं आवाहन सभापती एम व्यंकय्या नायडू यांनी केलं. निलंबित सदस्यांनी एका मुलाखतीत झाल्या प्रकाराबाबत काहीही पश्चात्ताप न दाखवता, आपल्या कृत्याचं समर्थन केलं, याकडेही सभापतींनी लक्ष वेधलं.

संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी यासंदर्भात बोलताना, सरकारही कारवाईबाबत आग्रही नसल्याचं सांगितलं. संबंधित सदस्यांनी माफी मागितली, तर कारवाई मागे घेण्याबाबत सरकार विचार करेल, असं जोशी यांनी सांगितलं.

****

राज्यसभेच्या निलंबित सदस्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आज एका दिवसासाठी उपोषण करत असल्याचं सांगितलं. आज मुंबईत पत्रकारांशी बोलताना पवार यांनी उपसभापतींची कार्यपद्धत आणि सरकारच्या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली.

दरम्यान, पवार यांनी निवडणुकीवेळी दाखल केलेल्या शपथपत्राबाबत आयकर विभागाने त्यांना नोटीस बजावली आहे. पवार यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, खासदार सुप्रिया सुळे, यांनाही अशाच प्रकारची नोटीस आयकर विभागानं बजावल्याचं, पवार यांनी सांगितल्याचं, पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे. राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारला विधासभेत पूर्ण बहुमत असल्याचा पवार यांनी पुनरुच्चार केला.

****

प्रसिद्ध लेखक, आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार, डॉ. भाऊ लोखंडे यांचं आज नागपूर इथं निधन झालं. ते ७८ वर्षांचे होते. पाली साहित्याचे गाढे अभ्यासक असलेले लोखंडे नागपूर विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन विभागाचे प्रमुख तसचं निकाय नियतकालिकाचे संपादक म्हणून कार्यरत होते. लोखंडे यांच्या निधनामुळे राज्यातल्या सामाजिक, साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रातील चळवळींचा गाढा अभ्यासक आपण गमावला आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. डॉ. लोखंडे यांनी आंबेडकरी विचार, बौद्ध वाङमय यांच्या संशोधन-लेखनातून मोठे योगदान दिलं आहे, असं त्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे.

****

ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांच्या पार्थिव देहावर शासकीय नियमानुसार सातारा इथं  माहुलीच्या स्मशान भूमीत आज दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रसिद्ध अभिनेत्री अलका कुबल यांच्यासह अभिनय क्षेत्रातल्या मोजक्या उपस्थितांनी आशालता यांचं अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली. आशालता यांचं आज पहाटे कोरोना विषाणू संसर्गानं निधन झालं, त्या ७९ वर्षांच्या होत्या.

****

रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना अभिवादन केलं आहे. राज्यातील प्रत्येक मुलाला दर्जेदार शिक्षण देणं, विद्यार्थ्यांमध्ये समता, बंधुता, श्रमप्रतिष्ठा, सत्यशोधक विचारांची, सामाजिक मूल्यांची शिकवण रुजवणं, प्रगतशील विचारांची स्वावलंबी पिढी घडवणं, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी कर्मवीर भाऊरावांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

****

राज्यातील धनगर समाजाच्या आरक्षण मागणीसाठी राज्यभर येत्या २५ सप्टेंबर रोजी ग्रामपंचायत, नगर परिषद आणि जिल्हाधिकारी कार्यालयांवर ढोल वाजवा आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिली. ते आज सांगली इथं प्रसार माध्यमांशी बोलत होते. सरकारला जागं करण्यासाठी हे आंदोलन करण्य़ात येणार असून आपण स्वतः पंढरपूर इथं या आंदोलनात सहभागी होणार असल्याचं पडळकर यांनी सांगितलं.

****

औरंगाबाद जिल्ह्यात आज तीन कोविड बाधितांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात या विषाणू संसर्गानं मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या आाता ८८२ झाली आहे. दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी अँटीजन चाचण्यात २० नवे कोविड बाधित रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्यातल्या कोविड बाधितांची संख्या ३१ हजार १०५ झाली आहे.

****

यंदाच्या खरीप पीक कर्ज वाटपामध्ये मराठवाडा विभागात औरंगाबाद जिल्हा प्रथम तर राज्यात सहाव्या क्रमांकावर असल्याचं जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितलं आहे. ते आज औरंगाबाद इथं यासंदर्भात पत्रकार परिषदत बोलत होते. यासंदर्भात अधिक माहिती देतांना ते म्हणाले…

 

औरंगाबाद जिल्हाचं खरीप २०–२१ खरीप कर्ज वितरणाचे उद्दिष्ट दिले होते १४ चौदाशे ९६ कोटी २ लाख ३० हजार ४३३ शेतकऱ्यांना १ हजार १९६ कोटी खरिपासाठी होतं आणि बाकीचे साधारणतः २९९ कोटी म्हणजे ३०० कोटी रब्बीसाठी तर आपण खरीप कर्जचे उद्दिष्ट १०० टक्के साध्य केले आहे आणि राज्यांमध्ये खरीप पीक कर्ज वाटपामध्ये आपला नंबर राज्यात सहावा क्रमांक आहे डिवीजन मध्ये फस्ट  आहे.

 

बीड जिल्ह्याचं यावर्षीचं खरीप पीक कर्ज वाटप ९३ टक्के, हिंगोली ४०, जालना ७६, लातूर ५२, नांदेड ३९, उस्मानाबाद ५३, परभणी ४६ टक्के असल्याचं ते म्हणाले. दरम्यान, कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व  दुकाने, आस्थापना हॉटेल रात्री नऊ नंतर बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले आहेत.

****

देशातंर्गत पर्यटनाला चालना देण्यासाठी अजिंठा - वेरुळ लेणी सुरु करण्याचा प्रस्ताव द्यावा, असं आमदार अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे. राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांची आज आमदार दानवे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. औरंगाबाद जिल्ह्यातल्या पर्यटन स्थळांना जोडणाऱ्या रस्त्यांच्या दुरूस्तीचा प्रस्तावही तातडीने पाठवण्याची सूचना दानवे यांनी बैठकीत केली. जिल्ह्यातल्या पर्यटनस्थळांचा बुध्दीष्ट सर्किटमध्ये समाविष्ट होण्यासाठी ठोस प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचं दानवे म्हणाले. पर्यटन विकास महामंडळाचे उपसंचालक डॉ.श्रीमंत हारकर यांच्यासह महामंडळाचे पदाधिकार या बैठकीत उपस्थित होते.

****

No comments: