Tuesday, 1 September 2020

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 01.09.2020 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

 ०१ सप्टेंबर २०२० सकाळी ११.०० वाजता

****

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या पार्थिव देहावर आज दुपारी नवी दिल्लीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. आज सकाळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू, लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह अनेकांनी मुखर्जी यांच्या घरी जाऊन त्यांच्या प्रतिमेला पुष्पचक्र अर्पण करत श्रद्धांजली वाहिली. थलसेना-वायूसेना तसंच नौदल या तीनही सेना दलांच्या प्रमुखांनीही माजी राष्ट्रपतींना मानवंदना दिली. मेंदूवरील शस्त्रकियेनंतर जवळपास २१ दिवस कोमात असलेले मुखर्जी यांचं काल दिल्लीत निधन झालं, ते ८४ वर्षांचे होते.

****

विदर्भातील गडचिरोली भंडारा गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यातील पूरपरिस्थिती कायम आहे. हजारो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची पथकं अथक काम करत आहेत. गडचिरोली जिल्ह्यात १२ मार्गांवरची वाहतूक बंद आहे. 

****

दहा दिवसीय गणेशोत्सवाची आज अनंत चतुर्दशीला सांगता होत आहे. कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर गणेश मूर्तींचं विसर्जन साधेपणाने करण्याचं आवाहन शासनानं केलं आहे. औरंगाबाद शहरात २५ ठिकाणी मूर्ती संकलन करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे, तर अकरा ठिकाणी थेट विसर्जनाची व्यवस्था केली आहे.

****

जालना शहरात नगरपालिकेनं गणेश विसर्जनासाठी आवश्यक नियोजन केलं आहे. शहरातल्या प्रत्येक प्रभागातून नगरपालिकेच्या वाहनातून सार्वजनिक आणि घरगुती गणेश मूर्तींचं संकलन केलं जाणार असून मोती तलावात विसर्जन केलं जाणार आहे. मोती तलाव परिसरात नागरिकांना येण्यास मनाई असून या भागात पोलीस बंदोबस्त तैणात करण्यात आला आहे.

****

कोरोना विषाणू संसर्गाविरोधात भारताचं धोरण यशस्वी सिद्ध होत असल्याचं, केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. या संक्रमणातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जुलै महिन्याच्या तुलनेत ऑगस्ट महिन्यात चौपटीनी वाढली असल्याचं, मंत्रालयानं म्हटलं आहे.

****

No comments: