Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 02 September 2020
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०२ सप्टेंबर २०२० दुपारी १.०० वा.
****
देशात
कोविड संसर्गातून रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ७७ टक्क्यांपर्यंत पोहोचलं आहे. गेल्या
२४ तासांत देशभरात ६२ हजारावर रुग्ण बरे झाल्यानं, त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात
आली, आता देशात या आजारातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या २९ लाखापेक्षा अधिक झाली
आहे. गेल्या २४ तासांत देशात कोविड संसर्ग झालेले ७८ हजार ३६७ नवे रुग्ण आढळले, यातले
५० टक्के रुग्ण महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू आणि उत्तर प्रदेश या पाच
राज्यातले आहेत. देशातली कोविड बाधितांची एकूण संख्या आता ३७ लाख ६९ हजार ५२४ झाली
आहे. यापैकी आतापर्यंत ६६ हजार ३३३ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, हा मृत्यूदर
आता १ पूर्णांक ७६ शतांश टक्के झाला आहे
****
पारदर्शक
आणि प्रामाणिकता या दोन मुद्यांच्या आधारे सरकार कोविड नियंत्रणाचं काम करत असल्याचं,
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. कोविड
संसर्गाच्या चाचण्या कमी केलेल्या नाहीत, असं त्यांनी स्पष्ट केलं. आर्थिकदृष्ट्या
सक्षम रुग्ण विनाकारण अतिदक्षता कक्षातल्या खाटा अडवून ठेवतात, त्यामुळे गरजू रुग्णांना
उपचार मिळू शकत नाहीत, ज्यांना आवश्यकता नाही, त्यांनी अतिदक्षता कक्षात दाखल होऊ नये,
ज्या रुग्णांना आवश्यकता आहे, त्यांना अतिदक्षता कक्षात उपचार मिळायला हवेत, असं टोपे
म्हणाले. कोविडच्या उपचाराबाबत जनजागृती होणं गरजेचं आहे, कोणीही आजार अंगावर काढू
नयेत, लक्षणं दिसताच तत्काळ तपासणी करून उपचार घ्यावेत, असं आवाहन त्यांनी केलं. शारीरिक
अंतर, मास्कचा वापर आणि हातांची वेळोवेळी स्वच्छता या तीनही बाबींवर भर देण्याची गरज
टोपे यांनी व्यक्त केली.
दरम्यान,
कोविड-19 च्या संक्रमणातून बरे होण्याचा राज्यातला दर ७२ पूर्णांक ३२ शतांश टक्के झाला
आहे. राज्यात आतापर्यंत या आजाराच्या संक्रमणातून ५ लाख ८४ हजार ५३७ जण बरे झाले आहेत.
राज्यातल्या विविध रुग्णालायत सध्या एक लाख ९८ हजार ५२३ रूग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
मुंबईतल्या
कोरोना विषाणू संसर्ग चाचण्यांची संख्या वाढवावी अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना
पत्र पाठवून केली आहे. मुंबईत जुलैच्या तुलनेत ऑगस्टमध्ये केवळ १४ टक्के अधिक चाचण्या
करण्यात आल्या. हीच संख्या राज्याच्या बाबतीत ४२ टक्के आहे. त्यामुळे मुंबईत तातडीने
चाचण्यांची संख्या वाढवावी, असं फडणवीस यांनी या पत्रात नमूद केलं आहे.
****
सांगली
जिल्ह्यातल्या इस्लामपूर इथल्या आधार रुग्णालयानं कोविड उपचारांना नकार दिल्यानं, रुग्णालयाविरुद्ध
गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत ही कारवाई करण्यात
आली. हे रुग्णालय कोरोना विषाणू बाधितांवर उपचारांसाठी अधिग्रहित केलं होतं, मात्र
या उपचारांना नकार देत, रुग्णालय सुरू केलं नाही म्हणून, वैद्यकीय अधीक्षक नरसिह देशमुख
यांनी दिलेल्या तक्रारी वरून गुन्हा दाखल करण्यात आला.
****
शासनानं
धार्मिक स्थळं उघडावीत या मागणीसाठी औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील हे आज औरंगाबाद
शहरातल्या शहागंज इथली ऐतिहासिक मशीद उघडून दुपारची दीड वाजेची नमाज अदा करुन आंदोलन
करणार आहेत. यावेळी शासनाच्या सर्व निर्देशांचं पालन करण्यात येणार असल्याचं त्यांनी
सांगितलं. या पार्श्वभूमीवर या परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला
आहे.
****
नांदेड
जिल्ह्यातल्या लोहा इथले शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामभाऊ चन्नावार यांचं आज सकाळी हैद्राबाद
इथं कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळं निधन झालं. ते ७० वर्षांचे होते. चन्नावार हे १९९५
ते १९९९ या काळात नांदेड विभागीय कापूस पणन महामंडळाचे प्रशासकीय अध्यक्ष होते. लोहा
नगर पालिकेचे उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काही काळ काम पाहिलं होतं. लोहा नगर परिषदेच्या
दोन निवडणूकीत शिवसेनेकडून नगरसेवक म्हणूनही ते निवडून आले होते. रामभाऊ चन्नावार हे
लोककला कलावंताचे आश्रयदाते म्हणून ओळखले जात. टाळेबंदीच्या काळात त्यांनी अनेक कलावंतांना
मदत केली होती.
****
सोलापूर
जिल्हा दूध उत्पादक आणि प्रक्रिया सहकारी संघाच्या अध्यक्ष निवडीसंदर्भात दोन संचालकांनी
उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका फेटाळण्यात आली आहे. त्यामुळे दूध संघाच्या नवीन
अध्यक्षांच्या निवड प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला आहे. आज दुपारी अडीच वाजता ही निवड
होणार आहे.
****
आज
जागतिक नारळ दिन आहे. नारळाचं उत्पादन वाढवण्यासाठी जागरुकता निर्माण व्हावी यासाठी
आशिया-प्रशांत नारळ समुदायाच्या वतीनं २००९ पासून या दिनाचं आयोजन केलं जातं. देशात
केरळ या राज्यात नारळाचं सर्वात जास्त उत्पादन केलं जातं. तामिळनाडू आणि कर्नाटक या
राज्यातही नारळाचं उत्पादन वाढवण्यात आलं आहे. महाराष्ट्रात कोकण भागात नारळाचं उत्पादन
अधिक होतं.
****
सोलापूर
जिल्ह्यातलं उजनी धरण १०० टक्के भरलं आहे. धरणाच्या पाण्याचं पूजन करण्यात आल्याचं
आमच्या वार्ताहरानं सांगितलं.
औरंगाबाद
जिल्ह्यातल्या जायकवाडी धरणाचा पाणी साठा ९४ पूर्णांक ५० शतांश टक्के झाला आहे. धरणात
सध्या १८ हजार ६११ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरू आहे. धरणात ९५ पूर्णांक
९९ शतांश टक्क्यांपर्यंत पाणी साठवण्याची परवानगी आहे. त्यानंतरही आवक सुरू राहिल्यास,
प्रशासनाच्या वतीनं धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात येईल. या अनुषंगानं, जिल्हाधिकारी
सुनील चव्हाण यांनी एका पत्रकाद्वारे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
****
No comments:
Post a Comment