Thursday, 3 September 2020

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 03.09.2020 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 03 September 2020

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०३ सप्टेंबर २०२० सकाळी ७.१० मि.

****

·      नवीन व्यापक नागरी सेवा सुधारणा कार्यक्रमाची केंद्र सरकारकडून घोषणा; ‘मिशन कर्मयोगी’ राष्ट्रीय आराखड्याला मंजुरी.

·      पबजीसह आणखी ११८ ॲप्सवर बंदी घालण्याचा केंद्र सरकारचा निर्णय.

·      पदवी आणि पदव्युत्तर विषयाच्या अंतिम वर्षाच्या परिक्षांबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची आज राज्यातल्या १३ अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरुंसोबत बैठक.

·      राज्यातल्या पोलिस दलात मोठे फेरबदल, ४०हून अधिक वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या.

·      राज्यात आणखी १७ हजार ४३३ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद, २९२ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू.

·      मराठवाड्यात ३३ रुग्णांचा मृत्यू, तर नव्या एक हजार ७०३ रुग्णांची नोंद.

आणि

·      ताप आलेल्या रुग्णांची कोरोना विषाणू चाचणी करण बंधनकारक असल्याचे औरंगाबाद महानगरपालिकेचे आदेश.

****

जनतेला अधिक चांगल्या सेवा पुरवण्याच्या उद्देशानं केंद्र सरकारनं नवीन व्यापक नागरी सेवा सुधारणा कार्यक्रम जाहीर केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत ‘मिशन कर्मयोगी’ या नावाने नागरी सेवा क्षमता निर्मितीच्या नवीन राष्ट्रीय आराखड्याला मंजुरी देण्यात आली. केंद्र सरकारच्या वैयक्तिक, संस्थात्मक आणि प्रक्रिया स्तरावर क्षमता वाढवण्याच्या यंत्रणेत परिवर्तन घडवणं हा या अभियानाचा उद्देश असून, या माध्यमातून रचनात्मक, वैचारिक अधिष्ठान असलेले, नवोन्मेषी, तसंच व्यावसायिक दृष्टिकोन असलेले कर्मचारी घडवले जाणार आहेत. कुशल मनुष्यबळ निर्मितीच्या दृष्टीनं सरकारचं हे महत्त्वाचं पाऊल असल्याचं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं आहे. ते काल मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकारांशी बोलत होते. आर्थिक वाढीसाठी आणि लोककल्याणासाठी अनुकूल असलेल्या सेवांची निर्मिती आणि वितरणास सक्षम नागरिक केंद्री नागरी सेवा निर्माण करण्यावर या सुधारणेचा मूलभूत भर आहे.  एकात्मिक सरकारी ऑनलाईन प्रशिक्षण - आयजीओटी कर्मयोगी प्लॅटफॉर्मच्या स्थापनेद्वारे हा कार्यक्रम उपलब्ध होईल. सुमारे ४६ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यासाठी २०२० ते २५ या पाच वर्षांच्या कालावधीत ५१० कोटी ८६ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत.

****

केंद्र सरकारनं पबजी सह आणखी ११८ ॲप्सवर बंदी घातली आहे. यापूर्वी सरकारनं टीक टॉक सारख्या शंभराहून अधिक चिनी ॲप वर बंदी घातली होती. पबजीसह, पबजी मोबाईल, नार्डिक मॅप, लिविक, पबजी मोबाईल लाईट, वी चॅट वर्क, वी चॅट रिडिंग, सायबर हंटर, लाईफ आफ्टर आणि वॉरपाथ या ॲपचा यात समावेश आहे. देशाच्या सार्वभौमत्वाला आणि सुरक्षेला धोका असल्यानं बंदीची कारवाई करत असल्याचं केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयानं म्हटलं आहे. या कारवाईमुळे कोट्यवधी भारतीय मोबाईलधारक आणि इंटरनेट वापरकर्त्यांच्या हिताचं संरक्षण होईल, असं मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.

****

अभिनेता सुशांतसिंह राजपुत मृत्यू प्रकरणात अंमली पदार्थ नियंत्रण विभागानं एका अंमलीपदार्थ विक्रेत्याला अटक केली आहे. जैद नावाचा हा इसम मुंबईत होणाऱ्या मोठमोठ्या पार्ट्यांसाठी अंमलीपदार्थ पुरवत असल्याचं समोर आलं आहे. अंमली पदार्थांच्या खरेदीबाबत सुशांतसिंहची मैत्रीण अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या मोबाईलमधून मिळालेली माहिती अंमलबजावणी संचालनालय - ईडीनं, अंमली पदार्थ नियंत्रण विभागाला दिली होती. महाराष्ट्र, दिल्ली आणि गोव्यातल्या अंमली पदार्थांच्या काही व्यापाऱ्यांचाही शोध सुरू असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

पदवी आणि पदव्युत्तर विषयाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज राज्यातल्या १३ अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरुंची बैठक बोलावली आहे. या बैठकीनंतर परीक्षांच्या नेमक्या तारखांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राज्य आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक होणार असल्याचं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं. अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत सर्व अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंसोबतची चर्चा आणि विद्यार्थी संघटनांच्या भूमिकेची माहिती देण्यासाठी, सामंत यांनी काल राजभवनावर राज्यपालांची भेट घेतली, त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. पदवी आणि पदव्युत्तर विषयाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा सहज, सोप्या पद्धतीनं घेण्याबाबत राज्यपाल सकारात्मक असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्य आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकीनंतर विद्यापीठ अनुदान आयोगाकडे तारखांबाबत प्रस्ताव पाठवला जाईल. येत्या दोन ते तीन दिवसांत ही सर्व प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असं सामंत यांनी स्पष्ट केलं.

****

राज्यातल्या जवळपास ४० वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या काल बदल्या करण्यात आल्या. यामध्ये नाशिकचे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांची मुंबईच्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या सहपोलिस आयुक्त पदावर नियुक्ती झाली आहे. सिडकोचे पोलिस उपमहानिरिक्षक आणि दक्षता अधिकारी निसार तांबोळी यांची नांदेडचे विशेष पोलिस महानिरीक्षक म्हणून बदली झाली आहे. नाशिकसह, नवी मुंबई, मीरा -भाईंदर- वसई विरार, पिंपरी-चिंचवड, अमरावती आणि नागपूरच्या पोलिस आयुक्तांच्याही बदल्या झाल्या आहेत.

****

राज्यात कोविड प्रादुर्भावावर नियंत्रणाऐवजी राज्य सरकारला अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात अधिक स्वारस्य असल्याची टीका विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ते काल नागपूर इथं पूरग्रस्त भागाचा दौरा करण्यासाठी आले असता, पत्रकारांशी बोलत होते. कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर या वर्षी बदल्यांना स्थगिती देता येऊ शकते, असंही ते म्हणाले.

दरम्यान, मुंबईतल्या कोरोना विषाणू संसर्ग चाचण्यांची संख्या वाढवावी अशी मागणी फडणवीस यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून केली आहे. मुंबईत जुलैच्या तुलनेत ऑगस्टमध्ये केवळ १४ टक्के अधिक चाचण्या करण्यात आल्या. हीच संख्या राज्याच्या बाबतीत ४२ टक्के आहे, त्यामुळे मुंबईत तातडीनं चाचण्यांची संख्या वाढवावी, असं फडणवीस यांनी या पत्रात नमूद केलं आहे.

****

पारदर्शकता आणि प्रामाणिकता या दोन मुद्यांच्या आधारे सरकार कोविड नियंत्रणाचं काम करत असल्याचं, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. कोविड संसर्गाच्या चाचण्या कमी केलेल्या नाहीत, असं त्यांनी स्पष्ट केलं. ज्या रुग्णांना आवश्यकता आहे, त्यांना प्राधान्यानं अतिदक्षता कक्षात उपचार मिळायला हवेत, असं टोपे म्हणाले. कोविडच्या उपचाराबाबत जनजागृती होणं गरजेचं आहे, कोणीही आजार अंगावर काढू नयेत, लक्षणं दिसताच तत्काळ तपासणी करून उपचार घ्यावेत, असं आवाहन त्यांनी केलं. शारीरिक अंतर, मास्कचा वापर आणि हातांची वेळोवेळी स्वच्छता या तीनही बाबींवर भर देण्याची गरज टोपे यांनी व्यक्त केली.

****

राज्यात काल आणखी १७ हजार ४३३ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या आठ लाख २५ हजार ७३९ झाली आहे. काल २९२ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात या विषाणू संसर्गानं आतापर्यंत २५ हजार १९५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर काल १३ हजार ९५९ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. राज्यात आतापर्यंत पाच लाख ९८ हजार ४९६ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या दोन लाख एक हजार ७०३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

मराठवाड्यात काल ३३ रुग्णांचा मृत्यू झाला, तर नव्या एक हजार ७०३ रुग्णांची नोंद झाली.

औरंगाबाद आणि लातूर जिल्ह्यात काल प्रत्येकी नऊ रुग्णांचा मृत्यू झाला, औरंगाबाद जिल्ह्यात ३२० तर लातूर जिल्ह्यात ३१५ नव्या रुग्णांची वाढ झाली. नांदेड जिल्ह्यात सहा रुग्णांचा मृत्यू झाला, तर नव्या ३८० बाधित रुग्णांची नोंद झाली. उस्मानाबाद जिल्ह्यात चार रुग्णांचा मृत्यू झाला, तर नव्या २०४ रुग्णांची भर पडली. बीड जिल्ह्यात तीन रुग्णांचा मृत्यू झाला, आणखी २१२ रुग्णांची नोंद झाली. परभणी जिल्ह्यात दोन जणांचा मृत्यू झाला, तर आणखी १११ रुग्ण आढळले. जालना जिल्ह्यात आणखी १२९, तर हिंगोली जिल्ह्यात ३२ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली. 

****

मुंबईत काल आणखी एक हजार ६२२ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, तर ३४ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पुणे जिल्ह्यात तीन हजार ५३५ नवे रुग्ण आणि ७४ मृत्यूंची नोंद झाली. नाशिक जिल्ह्यात ९७२ रुग्ण आढळले, तर १७ जणांचा मृत्यू झाला. ठाणे जिल्ह्यात चार हजार ५५३, नागपूर एक हजार ७०३, सांगली ७३५, सातारा ७१३, अहमदनगर ६२२, पालघर ४०९, अमरावती २१८, भंडारा ७५, सिंधुदुर्ग ५०, वाशिम ४९ तर गडचिरोली जिल्ह्यात काल आणखी १७ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली. 

****

उस्मानाबाद जिल्ह्यात कोविड - 19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आरोग्य सुविधा वाढवण्याच्या उद्देशानं तेरणा सेवाभावी संस्था, भारतीय वैद्यकीय संघटना - आयएमए, सुविधा रुग्णालय आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने सर्व सोयींनीयुक्त कोविंड सुविधा केंद्र सुरू करण्यात आलं आहे. याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर –

हे कोविड केअर सेंटर अत्याधुनिक ऑक्सिजन पुरवठ्याच्या बेडसह अल्पावधीत उभारण्यात आलं आहे. २०० कोविड ग्रस्तांवर मोफत उपचार केले जाणार आहेत. सर्व भौतिक सुविधा तेरणा पब्लिक ट्रस्टच्या वतीनं उभारण्यात आल्या आहेत. तर जिल्हा प्रशासनाच्या वतीनं पीपीई कीटस्‍, औषधं आणि इतर अनुषंगिक वैद्यकीय साहित्य पुरवलं जाणार आहे. सामाजिक बांधिलकीच्या भावनेनं केलेलं हे कोविड केअर सेंटर भविष्यात डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटर म्हणून कार्यरत करण्याचा मानस इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.सचिन देशमुख यांनी व्यक्त केला आहे. हे कोविड केअर सेंटर कोविडग्रस्त रुग्णांना दिलासा देणारं ठरेल असा विश्वास प्राचार्य डॉ.विक्रम सिंह माने यांनी व्यक्त केला आहे.

देविदास पाठक, आकाशवाणी बातम्यांसाठी, उस्मानाबाद

****

ताप कोणताही असो, कोरोना विषाणू चाचणी करणं बंधनकारक असल्याचं औरंगाबाद महानगरपालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.निता पाडळकर यांनी स्पष्ट केलं आहे. शहरात तापाच्या रुग्णांचं प्रमाण वाढत असून, डॉक्टर विषाणूजन्य आजार असेल म्हणून उपचार करत आहेत. मात्र यात वेळेचा अपव्यय होतो, यादरम्यान जर रुग्ण कोरोना विषाणू बाधित असेल तर इतरांनाही त्याचा धोका पोहोचू शकतो, त्यामुळे तात्काळ कोरोना विषाणू चाचणी करणं आवश्यक असल्याचं डॉक्टर पाडळकर यांनी म्हटलं आहे.

****

जालना जिल्ह्यातल्या अंबड आणि घनसावंगी तालुक्यातल्या काही जिल्हा मार्गांच्या दर्जात वाढ करुन हे मार्ग राज्य मार्गांमध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. याबाबतचा शासन निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागानं काल जारी केला. यामध्ये सावरगाव - गुंज - नाथनगर - राजाटाकळी - अंतरवाली टेंभी - तीर्थपुरी - सुखापूरी - सोनकपिंपळगाव, तसंच डोणगाव - विहामांडवा - तुळजापूर, आणि आपेगाव - चकलंबा - आर्वी - पाडळी - रायमोहा - पाटोदा या रस्त्यांचा समावेश आहे. याशिवाय भोकरदन - जालना - रांजणी - परतूर - कुंभार पिंपळगाव - तिर्थपूरी - वडीगोद्री, तसंच आंतरवाली सराटी - नालेवाडी - भांबेरी या रस्त्यांचा दर्जा वाढवून ते आता राज्य मार्गांमध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. या रस्त्यांवरची वाहतूक, गावांची संख्या, तसंच रस्त्यांचा एकूण होणारा वापर लक्षात घेता, या रस्त्यांना राज्य मार्गांचा दर्जा देण्याचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागाच्या मुख्य अभियंत्यांनी शासनाकडे सादर केला होता.

****

जालना नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष राजेश राऊत यांनी काल नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा सुपूर्द केला. जालना शहराच्या विकासासाठी यापुढेही सकारात्मक भावनेतून काम करत राहणार असल्याचं राऊत यांनी राजीनामा दिल्यानंतर सांगितलं. जालना नगरपालिकेचे ज्येष्ठ सदस्य असलेले राऊत यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता.

****

कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर रद्द केलेल्या २०१९ -२० च्या सत्राचं परीक्षा शुल्क विद्यार्थ्यांना परत करण्यात यावं, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या परभणी शाखेनं केली आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.अशोक ढवण यांच्याकडे परिषदेच्या शिष्टमंडळानं काल मागणीचं निवेदन सादर केलं. २०२०-२१ या शैक्षणिक वर्षाच्या शुल्कात ३० टक्के कपात करण्यात यावी, महाविद्यालयं सुरू होईपर्यंत जिमखाना सारखे अन्य शुल्क आकारण्यात येऊ नये, टाळेबंदीच्या काळात जितके दिवस वसतीगृह विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध नव्हते त्या कालावधीचं शुल्क विद्यार्थ्यांना परत करण्यात यावं, आदी मागण्याही या निवेदनात करण्यात आल्या.

****

उस्मानाबाद इथले निवृत्त प्राचार्य वेदकुमार वेदालंकार यांनी पु.ल.देशपांडे यांच्या दोन पुस्तकांचा अनुवाद केला होता, त्यासाठी त्यांना केंद्रीय हिंदी निदेशालयाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. एक लाख रुपये रोख आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरुप आहे.

****

धार्मिक स्थळं उघडण्यासंदर्भात आंदोलनाच्या पवित्र्यात असलेले औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांना काल पोलिसांनी ताब्यात घेत, आंदोलन करण्यापासून रोखलं. खासदार जलील हे काही कार्यकर्त्यांसह आपल्या कार्यालयापासून शहागंज भागातल्या बडी मशिदीत दुपारची नमाज अदा करण्यासाठी जात होते. मात्र, पोलिसांनी त्यांना त्याआधीच ताब्यात घेतलं आणि काही वेळानंतर सोडून दिलं. त्यानंतर वार्ताहरांशी बोलतांना जलील यांनी, शासनाच्या सर्व निर्देशांचं पालन करुन मशिदीत नमाज अदा करण्याची मुस्लिम बांधवांना परवानगी द्यावी अशी मागणी केली. जोपर्यंत धार्मिक स्थळं उघडत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचंही ते म्हणाले.

****

औरंगाबाद शहरातल्या छावणी परिसरात बसवल्या जाणाऱ्या सार्वजनिक गणपतींचं दरवर्षी प्रमाणे यंदाही अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे काल विसर्जन करण्यात आलं. कुठलीही मिरवणूक आणि गर्दी न करता नागरिकांनी साधेपणानं गणेश मूर्तींचं विसर्जन केलं.

****

औरंगाबाद जिल्ह्याचे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खासदार रामकृष्णबाबा पाटील यांच्या पार्थिवावर काल बोर दहेगाव इथं अंत्यसंस्कार करण्यात आले. पाटील यांचं काल पहाटे अल्पशा आजारानं निधन झालं, ते ८८ वर्षांचे होते.

****

नांदेड जिल्ह्यातल्या लोहा इथले शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामभाऊ चन्नावार यांचं काल हैद्राबाद इथं कोरोना विषाणू संक्रमणामुळे निधन झालं, ते ७० वर्षांचे होते. चन्नावार हे १९९५ ते १९९९ या काळात नांदेड विभागीय कापूस पणन महामंडळाचे प्रशासकीय अध्यक्ष होते. लोहा नगर पालिकेचे उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काही काळ काम पाहिलं होतं. लोहा नगर परिषदेच्या दोन निवडणुकीत शिवसेनेकडून नगरसेवक म्हणूनही ते निवडून आले होते. रामभाऊ चन्नावार हे लोककला कलावंताचे आश्रयदाते म्हणून ओळखले जात. टाळेबंदीच्या काळात त्यांनी अनेक कलावंतांना मदत केली होती.

****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठणच्या जायकवाडी धरणातून नदीपात्रात आज पाणी सोडलं जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर गोदावरी नदीकाठच्या सर्व गावांना पुराचा इशारा औरंगाबाद जिल्हा प्रशासनानं दिला आहे. काल रात्री धरणाची पाणी पातळी ही ९५ टक्क्याहून अधिक झाली होती. धरणात सध्या पाण्याची मोठी सुरू आहे. धरणाची पाणी पातळी ९६ टक्क्यांपर्यंत पोहोचल्यानंतर धरणातून पाणी सोडलं जाणार आहे.

****

परभणी जिल्हा रुग्णालयातून फरार झालेल्या तीन कोविडबाधित कैद्यांपैकी दोघांना काल पोलिसांनी ताब्यात घेतलं. परवा सकाळी हे कैदी पळून गेले होते. 

****

No comments: