Friday, 4 September 2020

Text – आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 04.09.2020 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 04 September 2020

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०४ सप्टेंबर २०२० सकाळी ७.१० मि.

****

·      पदवी आणि पदव्युत्तर विषयाच्या अंतिम वर्षाची परीक्षा विद्यार्थ्यांना घरी बसून देण्यास राज्यपालांची मान्यता.

·      मंदीरं आणि इतर धार्मिक स्थळं उघडण्याबाबत राज्य सरकार खबरदारी बाळगत असल्याचं मुख्यमंत्र्याचं स्पष्टीकरण.

·      मराठा आरक्षण पाच सदस्यीय खंडपीठाकडे सोपवण्यासंबंधी दोन्ही बाजुंचे युक्तीवाद पूर्ण; निकाल राखीव.

·      राज्यात आणखी १८ हजार १०५ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद, ३९१ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू.

·      मराठवाड्यात २८ रुग्णांचा मृत्यू, तर नव्या एक हजार ६७८ रुग्णांची नोंद.

आणि

·      हिंगोलीत बनावट नोटा तयार करून चलनात आणणाऱ्या टोळीचा पर्दाफाश.

****

पदवी आणि पदव्युत्तर विषयाच्या अंतिम वर्षाची परीक्षा आता विद्यार्थी घरी बसून ऑनलाईन देऊ शकणार आहेत. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी यासाठी परवानगी दिली असल्याची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी काल दिली. राज्यपालांनी काल राज्यातल्या १३ अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरुंची बैठक घेतली, याबैठकीनंतर सामंत यांनी वार्ताहरांशी संवाद साधला. परीक्षा पद्धती संदर्भात विद्यापीठांनी व्यवस्थापन परिषद आणि परीक्षा मंडळामध्ये परीक्षेसंदर्भात गठित केलेल्या समितीचा अहवाल सादर करून परीक्षा पद्धती निवडावी, अशी सूचनाही राज्यपालांनी केल्याचं ते म्हणाले. परीक्षा घेण्याची सप्टेंबर महिन्याची मुदत वाढवावी, अशी विनंती विद्यापीठ अनुदान आयोगाकडे करणार असल्याचं ते म्हणाले. १५ ते ३० सप्टेंबर दरम्यान प्रात्यक्षिक परीक्षा, ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात लेखी परीक्षा आणि ३१ऑक्टोबर पर्यंत निकाल जाहीर करण्याचं सरकार नियोजन करत असल्याचं सामंत यांनी यावेळी सांगितलं.  

****

टाळेबंदी उठवण्याच्या टप्प्यात मंदीरं आणि इतर धार्मिक स्थळं उघडण्याची मागणी होत असली तरीही राज्य सरकार खबरदारी बाळगत असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. पश्चिम महाराष्ट्रातल्या कोविड १९ स्थितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. भारतीय जनता पक्षासह इतर विरोधी पक्षांकडून धार्मिक स्थळं उघडण्याची मागणी केली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी हे स्पष्टीकरण दिलं. सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असून, अधिकाऱ्यांनी आता मुंबई - ठाणे वगळता या जिल्ह्यांकडेही लक्ष द्यावं, असं मुख्यमंत्री म्हणाले. कोरोना विषाणू संसर्गा बरोबरच आपण इतर अनेक आव्हानांचा सामना करत आहोत, असं सांगून मुख्यमंत्र्यांनी, आगामी नवरात्र महोत्सव, दसरा, दिवाळी यासारख्या सणांच्या काळातही नागरिकांच्या सुरक्षेकडे प्राधान्यानं लक्ष देण्याची गरज व्यक्त केली.

****

३१ ऑगस्टपर्यंत ज्या कर्जांची खाती थकीत जाहीर केली नाही, त्यांना थकीत खातं म्हणून गृहीत धरलं जाऊ नये, असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं बँकांना दिले आहेत. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कर्जदारांना कर्जाची परतफेड करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेनं मुदतवाढ देऊन, याबाबतचं एक पत्रक जारी केलं होतं. यामधल्या व्याजाच्या संरचनेला अनेक याचिकांच्या माध्यमातून आव्हान देण्यात आलं आहे. या प्रकरणामध्ये कर्जदारांचं संरक्षण झालं पाहिजे, असं न्यायालयानं म्हटलं आहे.

****

मराठा आरक्षणाचा विषय पाच सदस्यीय खंडपीठाकडे सोपवण्यासंबंधी दोन्ही बाजुंचे युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं निकाल राखून ठेवला आहे. मुंबई उच्च न्यायालयानं मराठा आरक्षण वैध ठरवल्यानंतर यावरील आव्हान याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे.

****

राज्य मार्ग परिवहन महामंडळामध्ये सरळसेवा भरती २०१९ अंतर्गत सेवेत नेमणूक झालेल्या कर्मचाऱ्यांच्या सेवेस देण्यात आलेली तात्पुरती स्थगिती उठवण्यात आली आहे. या भरती अंतर्गत रोजंदार गटात नेमणूक देण्यात आलेल्या साडे चार हजार कर्मचाऱ्यांच्या सेवा खंडीत करण्यात आल्या होत्या.

****

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात अंमली पदार्थ नियंत्रण विभागानं आणखी एका संशयिताला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. या व्यक्तीची ओळख उघड करण्यात आलेली नाही, मात्र यापूर्वी याप्रकरणी ताब्यात घेतलेल्या बासित परिहार याच्याशी या व्यक्तीचे संबंध असल्याचा संशय आहे.

दरम्यान, या प्रकरणी अटक केलेल्या झैद विलात्रा याला काल स्थानिक न्यायालयासमोर हजर करण्यात आलं, न्यायालयानं त्याची ९ सप्टेंबरपर्यंत अंमली पदार्थ नियंत्रण विभागाच्या कोठडीत रवानगी केली. झैदनं अंमली पदार्थ व्यवसायात सहभागी असल्याची कबुली दिल्याचं, या विभागानं सांगितलं आहे. झैदकडून साडे नऊ लाख रुपयांसह परकीय चलनही हस्तगत करण्यात आलं.

दरम्यान, सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागानं काल सलग तिसऱ्या दिवशी अभिनेत्री रिया चक्रवर्तीचे वडील इंद्रजीत चक्रवर्ती यांची चौकशी केली.

****

दरम्यान, सुशांतसिंह राजपूत यांच्या निधनानंतर त्यासंबंधीच्या बातम्यांचं वार्तांकन करताना माध्यमांनी संयम बाळगावा, असे निर्देश काल मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. सुंशांतसिंग राजपूत यांच्या मृत्यूप्रकरणी मिडीया ट्रायल सुरु असल्याचा दावा करणाऱ्या दोन याचिकांवर उच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. माध्यमांनी तपासाला अडथळा येईल, अशा पद्धतीच्या बातम्या देऊ नयेत, असं सुद्धा न्यायालयानं सांगितलं आहे.

****

राज्यातली उपाहारगृहं पुन्हा सुरु करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काल मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. सरकारनं सोमवारपासून हॉटेल आणि लॉज सुरु केले आहेत. उपाहारगृहातून फक्त पार्सल सेवा सुरु असल्यामुळे या व्यवसायात असणारे इतर लोक आर्थिक अडचणीत आहेत. त्यांचा विचार करुन, सामाजिक अंतर राखून तसंच कोरोना विषाणू प्रतिबंधासंबंधीचे सर्व नियम पाळून हा व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी सुळे यांनी केली आहे.

****

हृदयविकार, रक्तदाब तसंच मधुमेहाच्या रुग्णांना, कोरोना विषाणू संसर्ग होण्याचं प्रमाण सामान्य माणसापेक्षा जास्त असल्यामुळे कोणीही आजार अंगावर काढू नये असं आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे. महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांत, तालुक्यांत, कोविड केअर सेंटरमध्ये, उत्तम पद्धतीची व्यवस्था करण्यात आलेली असून बाधित रुग्णांनी मन खंबीर ठेवून कोरोना विषाणू संसर्गावर मात करावी असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

****

राज्यात काल आणखी १८ हजार १०५ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातली एकूण रुग्ण संख्या आठ लाख ४३ हजार ८४४ झाली आहे. काल ३९१ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात या विषाणू संसर्गानं आतापर्यंत २५ हजार ५८६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर काल १३ हजार ९८८ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. राज्यात आतापर्यंत सहा लाख १२ हजार ४८४ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या दोन लाख पाच हजार ४२८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

मराठवाड्यात काल २८ रुग्णांचा मृत्यू झाला, तर नव्या एक हजार ६७८ रुग्णांची नोंद झाली.

औरंगाबाद जिल्ह्यात नऊ कोविड बाधितांचा मृत्यू झाला, तर ४६६ नवे रुग्ण आढळले. नांदेड आणि लातूर जिल्ह्यात काल प्रत्येकी आठ रुग्णांचा मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यात नव्या ४४३, तर लातूर जिल्ह्यात २७४ रुग्णांची नोंद झाली. जालना जिल्ह्यात दोन रुग्णांचा मृत्यू झाला, तर आणखी १५१ रुग्ण आढळले. परभणी जिल्ह्यात एका रुग्णाचा मृत्यू झाला, तर आणखी ९१ रुग्णांची नोंद झाली. उस्मानाबाद जिल्ह्यात ११५, बीड जिल्ह्यात ९५ आणि हिंगोली जिल्ह्यात आणखी ४३ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली. 

****

मुंबईत काल आणखी एक हजार ५२६ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, तर ३७ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नाशिक जिल्ह्यात एक हजार ३०७ रुग्ण आढळले, तर सहा जणांचा मृत्यू झाला. नागपूर जिल्ह्यात एक हजार ७२७, सातारा ८२८, सांगली ७१६, अहमदनगर ६३२, रायगड ६१५, पालघर ३७७, चंद्रपूर २२२, अमरावती २०५, गोंदिया १८९, रत्नागिरी १७३, भंडारा १६७ तर वाशिम आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रत्येकी ७६ रुग्णांची नोंद झाली.   

****

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना तसंच प्राधान्य कुटूंब लाभार्थ्यांसाठी मोफत डाळ वितरण सुरू करण्यात आलं आहे. लाभार्थी कुटुंबांना दरमहा एक किलो मोफत डाळ दिली जाते. ही योजना येत्या नोव्हेंबर महिन्यापर्यंत सुरु राहणार आहे.

****

मराठवाड्यातल्या अनेक भागात काल पाऊस झाला. औरंगाबाद शहर आणि ग्रामीण भागात काल रात्री काही वेळ जोरदार पाऊस झाला.

बीड-लातूर-उस्मानाबाद या तीनही जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या काही गावांत काल सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाल्यानं या परिसरातल्या पाच हजार हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रातल्या पिकांचं मोठं नुकसान झालं. या वादळी पावसानं देवळा परिसरातल्या ऊसाचं क्षेत्र सपाट झालं आहे. शासनानं तात्काळ याचे पंचनामे करावेत अशी मागणी शेतकरी रविंद्र देवरपाडे यांनी केली आहे.

****

शेतकऱ्यांना पिक कर्ज उपलब्ध करून देण्यासंदर्भात विधान परिषद सदस्य आमदार सुरेश धस यांनी बीड जिल्ह्यातल्या हरिनारायण आष्टा या गावात भारतीय स्टेट बँक शाखेच्या व्यवस्थापकाचे पाय धुवून आंदोलन केलं. शासनानं कर्ज प्रकरणं मंजूर करून शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्याचे यापूर्वी आदेश दिले आहेत, मात्र या शाखेत आतापर्यंत फक्त ५० कर्ज प्रकरणं मंजूर केली. आमदार धस यांनी पाठपुरावा केल्यानंतरही यात काही सुधारणा न झाल्यानं, त्यांनी हे आंदोलन केलं.

****

बीड जिल्ह्यातल्या पाटोदा तालुक्यातल्या गीतेवाडी इथल्या नागरिकांनी रस्त्याच्या मागणीसाठी काल खड्यात आंघोळ करुन, तसंच स्वत:ला गाडून घेत आंदोलन केलं. गावात जाण्यासाठी पक्का रस्ता नसून, ग्रामस्थांनी नगरपंचायतीकडे अनेक वेळा ही मागणी केली होती, मात्र याकडे प्रशासनानं दुर्लक्ष केल्यामुळे ग्रामस्थांनी हे अनोखं आंदोलन केलं.

****

बनावट नोटा तयार करून चलनात आणणाऱ्या टोळीचा हिंगोली पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी एका आरोपीस अटक करण्यात आली असून, त्याच्या ताब्यातून १७ लाख ४७ हजार ३५० रुपये दर्शनी किमतीच्या बनावट नोटा आणि स्कॅनर, प्रिंटर, झेरॉक्स असा एकूण २४ लाख ३० हजार ३२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या मुद्देमालासोबत लक्ष्मी देवीच्या पिवळ्या धातूच्या तेरा मूर्तीही पोलिसांनी जप्त केल्या. या मूर्ती सोन्याच्या आहेत असं भासवून त्या लोकांची फसवणूक करण्याकरता वापरल्या गेल्याचं पोलिसांनी सांगितलं.

****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठणच्या नाथसागर धरणाचा पाणीसाठा ९६ टक्के झाल्यानंतर काल उजव्या कालव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. काल धरणातून २०० घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी सोडण्यात आलं. हे पाणी येत्या चार दिवसांत बीडच्या माजलगाव धरणात जाईल, असं पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.

****

परभणी महानगरपालिकेच्या मालकीची दुकानं, गाळे, ओटे, मनपा शाळेच्या मोकळ्या जागा आणि इतर सर्व मालमत्ता बेकायदेशीररित्या परस्पर खरेदी आणि विक्री केल्याचं आढळून आल्यास संबंधितावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा आयुक्त देविदास पवार यांनी दिला आहे. या जागा काही कोणत्याही प्रकारचे कायदेशीर अधिकार नसताना परस्पररित्या विक्री आणि खरेदी करत असल्याच्या तक्रारी महानगरपालिका कार्यालयात प्राप्त झाल्या आहेत.

****

जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमधल्या मोसंबी बाजारामध्ये काल बाराशे क्विंटल मोसंबी विक्रीस आली होती. अंबिया बहरातल्या या मोसंबीला सध्या गुणवत्तेनुसार १५ ते १९ हजार रुपये प्रतिटनचा दर मिळत असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव रजनीकांत इंगळे यांनी दिली.

****

औरंगाबादच्या पोलीस पोलीस आयुक्तपदी डॉक्टर निखील गुप्ता यांची तर विशेष पोलिस महानिरीक्षकपदी के.एम.एम.प्रसन्ना नियुक्ती करण्यात आली आहे. सध्याचे पोलीस महानिरीक्षक रविंद्र कुमार सिंघल यांची मुंबई इथल्या वैधमापन शास्त्र विभागाच्या नियंत्रक पदी तर आयुक्त चिरंजीव प्रसाद यांची नागपूर इथं विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून बदली झाली आहे.

****

राज्य सरकारच्या सेवेमधल्या २३ अधिकाऱ्यांना भारतीय प्रशासन सेवेत पदोन्नती देण्यात आली आहे. यामध्ये औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयातले उपायुक्त विजयकुमार फड आणि वर्षा ठाकूर - घुगे यांच्यासह किशन जावळे, दिलीप स्वामी, शिवानंद टाकसाळे, डॉक्टर अनिल रामोड यांचा समावेश आहे.

****

नांदेड जिल्ह्याच्या हिमायतनगर तालुक्यातल्या मंगरूळ इथले सीमा सुरक्षा दलाचे जवान पोचिराम सुदेवाड यांच्या पार्थिवावर काल मंगरुळ इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. सुदेवाड यांचं काश्मीर मध्ये श्रीनगर इथं निधन झालं.

****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या सर्व शासनमान्य महाराष्ट्र ज्ञानमंडळ मर्यादीतचे एम.एस.सी-आयटी केंद्र आणि सर्व शासनमान्य टंकलेखन, लघुलेखन, संस्था सुरु करण्याची परवानगी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली. याबाबतचे आदेश काल त्यांनी जारी केले.

****

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी खरीप हंगामात उत्पादित केलेल्या शेतमालाची किमान आधारभूत दराने खरेदी करण्यासाठी शासनस्तरावरुन तात्काळ खरेदी केंद्र नियमित सुरु करण्याची मागणी शेतकरी कामगार पक्षानं केली आहे. या मागणीचं निवेदन काल पक्षाचे जिल्हा चिटणीस धनंजय पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलं. केंद्र शासनानं जाहीर केलेल्या किमान आधारभूत दरापेक्षा कमी दरात शेतमाल विकण्यास शेतकऱ्याला भाग पाडल्यास आर्थिक नुकसान भरपाई किंवा अनुदान देण्यात यावं, अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे.

****

औरंगाबाद इथल्या लायन्स डोळ्यांच्या रुग्णालयानं रुग्णांची तपासणीपासून ते उपचार आणि शस्त्रक्रिया करण्यासाठी एसएमएस प्रणाली विकसित केली आहे. या प्रणालीमुळे रुग्ण आणि डॉक्टरांचा कमीतकमी संपर्क येऊन कोरोना विषाणू संसर्गाचा धोका कमी होईल, असा विश्वास मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. प्रितेश सोनार यांनी व्यक्त केला.

****

बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई पंचायत समितीच्या परिसरात साडेचार गुंठे क्षेत्रावर एक हजार २५० रोपांची शास्त्रीय पध्दतीनं घनदाट वृक्ष लागवड करण्यात आली आहे.  राज्य शासनाच्या वृक्ष लागवडीच्या आवाहनाला प्रतिसाद देत गटविकास अधिकारी डॉ. संदीप घोन्सीकर यांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला.

****

लातूरच्या दयानंद कला महाविद्यालयाने वैष्णवी जाधव या ‘राष्ट्रीय खेळाडूचं पालकत्व स्विकारून तिला कला शाखेमध्ये विनाशुल्क प्रवेश दिला आहे. राष्ट्रीय मैदानी खेळाडू असलेल्या वैष्णवीने हरयाणा, कलकत्ता, पुणे, मुंबई, आदी ठिकाणी १०० मीटर तसंच २०० मीटर धावण्याच्या स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी केली आहे.

****

लातूर जिल्ह्यात सततच्या पावसानं बाधित पिकांचे ताबडतोब पंचनामे करावेत या मागणीसाठी आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी शेताच्या बांधावरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कृषी अधिकाऱ्यांच्या मार्फत काल निवेदन दिलं. या मागणीची तात्काळ दखल न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

****

पूर्णा पाटबंधारे प्रकल्पाच्या येलदरी इथल्या जलाशयातून सोडलेल्या पाण्याच्या आधारे जलविद्युत केंद्राद्वारे पाच लाख ४५ हजार युनिट वीज निर्मिती करण्यात आली. त्यातून तीन कोटी १३ लाख ६८ हजार रुपये ऊर्जा विभागाच्या तिजोरीत जमा झाले आहेत.

****

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 24.08.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 24 August 2025 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छ...