Saturday, 5 September 2020

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 05.09.2020 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 05 September 2020

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०५ सप्टेंबर २०२० दुपारी १.०० वा.

****

शिक्षक हेच खरे राष्ट्र निर्माते असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलं आहे. माजी राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती आज शिक्षक दिन म्हणून साजरी होत आहे, त्यानिमित्त आयोजित शिक्षक पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते. त्यांच्या हस्ते ४७ शिक्षकांना यावेळी राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. आपल्या परंपरेमधे गुरुचं स्थान सर्वोच्च मानलं गेलं असल्याचं राष्ट्रपती यावेळी म्हणाले. राज्यातले दोन शिक्षक, अहमदनगर जिल्ह्यातले नारायण मंगलाराम आणि मुंबईच्या संगीता सोहोनी यांचा पुरस्कार विजेत्यांमधे समावेश आहे. कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपतींनी दूरदृष्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून यंदा या पुरस्कारांचं वितरण केलं.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका संदेशाद्वारे शिक्षक दिनानिमित्त देशभरातल्या शिक्षकांना शुभेच्छा दिल्या आहेत. शिक्षकांचे कठोर परिश्रम आणि देश घडवण्यातल्या त्यांच्या योगदानाबद्दल देश कृतज्ञ असल्याची भावना पंतप्रधानांनी व्यक्त केली आहे. शिक्षकांनी केलेल्या उल्लेखनीय प्रयत्नांबद्दल त्यांचं आपण आभार मानतो, असंही त्यांनी या संदेशात म्हटलं आहे.

****

देशात कोरोना विषाणुचे आतापर्यंतचे सर्वाधिक ८६ हजार ४३२ नवे रुग्ण आढळले आहेत. एकूण रुग्ण संख्या ४० लाख २३ हजार १७९ झाली आहे. गेल्या केवळ तेरा दिवसांमधे रुग्ण संख्या तीस लाखांवरून चाळीस लाखांवर गेली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. दरम्यान, ३१ लाख सात हजार २२३ रुग्ण या संसर्गावर उपचार घेऊन बरे झाले असून रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ७७ पूर्णांक २३ शतांश टक्के पर्यंत वाढलं आहे. या संसर्गामुळे आज सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांमधे एक हजार ८९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूमुखी पडलेल्या एकूण रुग्णांची संख्या ६९ हजार ५६१ झाली आहे. मृत्यू दर एक पूर्णांक ७३ शतांश टक्क्यांपर्यंत कमी झाला असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. देशात कोरोना विषाणू संसर्गासाठी कालपर्यंत चार कोटी ७७ लाख ३८ हजार ४९१ नमुने तपासण्यात आले असून यातले दहा लाख ५९ हजार ३४६ नमुने काल तपासण्यात आले आहेत.    

****

पाकिस्तानच्या सैन्यानं शस्त्रसंधीचं पुन्हा उल्लघंन करत आज सकाळी जम्मू काश्मिरमधल्या पूंछ जिल्ह्यातल्या किर्णी, शहापूर आणि देगवार परिसरात नियंत्रण रेषेजवळ गोळीबार आणि उखळी तोफांचा मारा केला. या हल्याला भारतीय सैन्यानं चोख प्रत्यूत्तर दिलं असल्याची माहिती सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिली आहे.

****

अंमली पदार्थ नियंत्रण विभाग अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी आज त्याचा स्वयंपाकी दिपेश सावंत याची चौकशी करणार आहे. त्याची या प्रकरणामध्ये साक्षीदार म्हणून चौकशी केली जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. दरम्यान, या प्रकरणामधे अंमली पदार्थ विक्री प्रकरणी अंमली पदार्थ नियंत्रण विभागानं काल मुख्य आरोपी अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविक चक्रवर्ती आणि सुशांतसिंहचा गृह व्यवस्थापक सॅम्युअल मिरांडा यांना काल अटक केली आहे.

****

बीड जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना विषाणुचा संसर्ग झालेले तीन हजार सातशे बारा रूग्ण बरे झाले असून सध्या एक हजार ४७ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. या संसर्गामुळे आतापर्यंत १४० रूग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून कोरोना विषाणुच्या रूग्ण संख्येत वाढ होत असल्यानं प्रशासनाकडून खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

****

बीड जिल्ह्यात जमावबंदी आदेशाचं उल्लंघन केल्यानं आमदार सुरेश धस यांच्यासह सत्तर जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातल्या एका मंगल कार्यालयात उसतोड मजुरांच्या प्रश्नासंदर्भात आमदार धस यांनी काल मेळावा घेतला होता. जिल्ह्यात जमावबंदी असतानाही या मेळाव्याला नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते, त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन कायद्याअतंर्गत गुन्हे दाखल केल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे. 

****

पालघर जिल्ह्याला मध्यरात्रीच्या सुमारास भूकंपाचे दोन सौम्य धक्के बसले. डहाणू तालुक्यामधे रात्री अकरा वाजून ४१ मिनिटांच्या सुमाराला जाणवलेला पहिला धक्का चार रिश्टर स्केलचा तर दुसरा धक्का तलसारी तालुक्यामधे १२ वाजून पाच मिनिटांनी जाणवला असून रिश्टर स्केलवर त्याची नोंद तीन पूर्णांक सहा दशांश होती. तलसारी तालुक्यामधे बसलेल्या भूकंपाच्या धक्क्यानंतर लोक काही काळ रस्त्यावर आले होते आणि भीतीचं वातावरण होतं, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. नोव्हेंबर २०१८ पासून या भागात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवत आहेत.

****

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा, अशी मागणी खासदार गोपाळ शेट्टी यांनी केली आहे. त्यांनी या मागणीचं पत्र केंद्रीय सांस्कृतिक राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांना पाठवलं आहे.

****

No comments: