Monday, 22 February 2021

आकाशवाणी औरंगाबाद संक्षिप्त बातमीपत्र २२ फेब्रुवारी २०२० सकाळी ११.०० वाजता

 

आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२२ फेब्रुवारी २०२० सकाळी ११.०० वाजता

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आसाम मधल्या धेमाजी जिल्ह्यातल्या सिलापथार इथं उभारण्यात आलेल्या तेल आणी नैसर्गिक वायू प्रकल्पाचं लोकार्पण करणार आहेत. आसाममधल्या अभियांत्रिकी महाविद्यालयांचं उद्घाटन आणि पायाभरणी समारंभही त्यांच्या हस्ते होणार आहे. दुपारच्या सुमारास पंतप्रधान पश्चिम बंगालमधल्या हुगली इथं विविध रेल्वे प्रकल्पांचं लोकार्पण आणि उद्घाटन करतील.

****

पनवेल इथं मायलेकीची हत्या करून फरार झालेल्या तरुणानं हिंगोली तालुक्यातल्या वैजापूर शिवारामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल निदर्शनास आली. प्रकाश यशवंत मोरे असं या मयताचं नाव असून, लग्न करण्यास नकार दिल्याच्या कारणावरून त्याने सुरेखा बलखंडे आणि सुजाता बलखंडे या माय लेकीची पनवेल इथं १८ फेब्रुवारीला हत्या केली होती. या घटनेनंतर फरार असलेल्या आरोपीचा मुंबई पोलिसांचं पथक शोध घेत होतं, काल दुपारी त्याचा मृतदेह झाडावर आढळून आला.

****

नाशिक इथं नियोजित ९४ वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोविडच्या संबंधी सर्व आरोग्य नियमांची दक्षता घेऊन यशस्वी केलं जाईल, असा विश्वास साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला आहे. ते काल नाशिक इथं याबाबतच्या बैठकीनंतर बोलत होते. संमेलन स्थळाचं सॅनिटायझेशन करणं, आलेल्या पाहुण्यांची तपासणी करणं, मास्कचा वापर, तापमापन या गोष्टींची विशेष काळजी घेतली जाईल, असंही त्यांनी सांगितलं. महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी यावेळी बोलताना, संमेलनात शेतकरी आणि कोरोना या विषयावर परिसंवाद होणार असल्याचं सांगितलं. येत्या २६ ते २८ मार्च दरम्यान हे संमेलन होणार आहे.

****

नोवाक जोकोविचने ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीचं अजिंक्यपद पटकावलं आहे. काल झालेल्या अंतिम सामन्यात त्यानं डॅनियल मेदवेदेवचा सात - पाच, सहा - दोन आणि सहा - दोन असा सरळ तीन सेट्समध्ये पराभव केला. जोकोविचचं हे या स्पर्धेतलं नववं विजेतेपद आहे.

दरम्यान, पुरुष दुहेरीचं विजेतेपद क्रोएशिया आणि स्लोवाक जोडी इव्हॉन डोडीग आणि फिलीप पोलासेक यांनी पटकावलं आहे.

****

इंग्लंडविरुद्धच्या पाच टीट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. ईशान किशन, सूर्यकुमार यादव आणि राहुल टेवटिया यांना या संघात स्थान मिळालं आहे.

//********//

 

 

No comments: