Monday, 22 February 2021

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 22 February 2021 Time 1.00 to 1.05pm Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 22 February 2021

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २२ फेब्रुवारी २०२१ दुपारी १.०० वा.

****

खासगी क्षेत्रात संशोधन, डिझाईन आणि स्वदेशी संरक्षण उत्पादन निर्मितीत महत्वपूर्ण भुमिका निभावून, देश संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर बनू शकतो, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात संरक्षण क्षेत्रातल्या तरतुदींसंदर्भात आयोजित एका वेबिनारमध्ये ते आज बोलत होते. खासगी क्षेत्रानं सरकारसोबत काम करुन संरक्षण तंत्रज्ञान विकसित करण्याची योजना तयार करावी, असं पंतप्रधान यावेळी म्हणाले. संरक्षण उत्पादनांची आयात करण्याऐवजी त्यांची निर्यात करणारा देश बनलं पाहिजे, असं पंतप्रधानांनी नमूद केलं.

****

देशात काल १४ हजार १९९ नव्या कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर ८३ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. देशातली एकूण कोविड बाधितांची संख्या एक कोटी दहा लाख पाच हजार ८५० झाली असून, या संसर्गानं आतापर्यंत एक लाख ५६ हजार ३८५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर काल नऊ हजार ६९५ रुग्ण बरे झाले. देशात आतापर्यंत एक कोटी सहा लाख ९९ हजार ४१० रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या एक लाख ५० हजार ५५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

दरम्यान, देशात आतापर्यंत एक कोटी ११ लाख १६ हजार ८५४ नागरीकांना लसीकरण करण्यात आल्याचं आरोग्य मंत्रालयानं सांगितलं.

****

ज्या राज्यांमधे दैनंदिन कोरोना विषाणू बाधितांची संख्या वाढू लागली आहे, अशा राज्यांनी निवडक जिल्ह्यांमधे प्रतिबंधित क्षेत्रं निश्चित करण्यासह, रुग्णशोध आणि कोविड प्रतिबंधक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करण्यावर लक्ष केंद्रीत करावं, अशी सूचना केंद्र सरकारनं केली आहे. देशात महाराष्ट्र, केरळ, आंध्रप्रेदश, गोवा आणि चंदीगढ या राज्यांमधे दर आठवड्याला नव्यानं आढळत असलेल्या कोरोनाबाधितांचं प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. या राज्यांनी आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या वाढवावी, तसंच अँटीजेन चाचणी निगेटीव्ह आलेल्या लोकांची पुन्हा एकदा अनिवार्यपणे आरटीपीसीआर चाचणी होईल हे पहावं अशी सूचनाही केंद्र सरकारनं केली आहे. जास्त रुग्ण आढळत असलेले परिसर निश्चित करून त्यावर देखरेख ठेवावी, तसंच कोरोना विषाणूत जनुकीय बदल झाले आहेत की नाही याचा शोध घेण्यासाठी तपासणी करत रहावी अशा सूचनाही केंद्र सरकारनं केली आहेत.

****

राज्यसभेच्या आठ विभागांशी संबंधित संसदीय स्थायी समित्यांच्या कामगिरीत मागच्या दोन वर्षात लक्षणीय सुधारणा झाली असल्याची माहिती केंद्र सरकारनं दिली आहे. सप्टेंबर २०१९ मध्ये या समित्यांची पुनर्रचना झाली होती. तेव्हापासून उपस्थितीमधे १५ टक्क्यांची तर तर बैठकांच्या सरासरी कालावधित १६ टक्क्यांची वाढ झाली.   राज्यसभेचे सभापती एम.व्यंकय्या नायडू यांनी या सुधारणांची प्रशंसा केली आहे.

****

पंतपधान नरेंद्र मोदी येत्या २८ तारखेला आकाशवाणीवरच्या ‘मन की बात’या कार्यक्रमातून नागरिकांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेतला हा ७४ वा भाग असेल. यासाठी नागरिकांनी आपल्या सूचना आणि विचार येत्या शुक्रवारपर्यंत, माय जीओव्ही या संकेतस्थळावर, नमो अप्लिकेशनवर किंवा एक आठ शून्य शून्य एक एक सात आठ शून्य शून्य, या क्रमांकावर पाठवाव्या, असं आवाहन करण्यात आलं आहे.

****

राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. त्यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली. गेल्या दोन तीन दिवसात माझ्या संपर्कात अलेल्या सर्वांनी आपली तपासणी करून घ्यावी, आपली प्रकृती उत्तम असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, असं आवाहन भुजबळ यांनी केलं आहे.

****

राज्यात वाढत्या कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यातील माहूरगड इथलं दत्तात्रय मंदिर आजपासून पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. देवस्थान समितीनं यासंदर्भातलं पत्रक आज जारी केलं.

****

अहमदनगर -औरंगाबाद महामार्गावर नेवासा तालुक्यातल्या श्रीक्षेत्र देवगड फाटा इथं चारचाकी आणि लक्झरी बसची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात कारमधल्या पाच जणांचा मृत्यू झाला. काल मध्यरात्री हा अपघात झाला. मृत सर्वजण जालना इथले रहीवाशी होते. 

****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण इथं आज गोदावरी मातेचा प्रगट दिन कोविड प्रतिबंधाचे नियम पाळून साजरा करण्यात आला. पुजारी प्रदीप महेशपाठक यांच्या हस्ते गंगा मंदीरातल्या गंगामाता मूर्तीचा अभिषेक करण्यात आला.

****

अहमदनगर जिल्हा सहकारी बॅकेच्या चार जागांची मतमोजणी काल झाली. यामध्ये माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले, उदय शेळके, अंबादास पिसाळ आणि प्रशांत गायकवाड विजयी झाले आहेत. दरम्यान, बँकेचे १७ संचालक यापूर्वी बिनविरोध निवडून आले आहेत. थोरात गटाच्या सर्वाधिक जागा आल्या, त्यामुळे बँक पुन्हा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली आली आहे. बँकेच्या अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागते, याकडे जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे.

//*******//

 

 

No comments: