Friday, 26 February 2021

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 26 February 2021 Time 1.00 to 1.05pm Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 26 February 2021

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २६ फेब्रुवारी २०२१ दुपारी १.०० वा.

****

खेळ अर्थव्यवस्थेत महत्वाची भुमिका बजावू शकतात, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. दुसर्या खेलो इंडिया राष्ट्रीय हिवाळी खेळांचं उद्घाटन आज पंतप्रधानांच्या हस्ते दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून झालं, त्यावेळी ते बोलत होते. खेळांचं महत्व लक्षात घेता सरकारनं अभ्यासक्रमात क्रीडा विषय समाविष्ट केल्याचं ते म्हणाले. दोन मार्च पर्यंत या स्पर्धा चालणार आहेत. २७ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी या स्पर्धेत सहभाग घेतला आहे.

****

वस्तु आणि सेवा कर - जीएसटी कायद्यातल्या जाचक तरतुदी रद्द करण्याच्या मागणीसाठी कॉन्फेडरेशन ऑफ ऑल ट्रेडर्स - कॅट या संस्थेनं आज देशव्यापी बंद पुकारला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातल्या व्यापाऱ्यांनी बंद मध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला आहे. शहरातल्या मुख्य बाजारपेठा पूर्णत: बंद आहेत. जीएसटी करप्रणालीतील जाचक अटी रद्द कराव्यात, इंधन दरवाढ रोखण्यात यावी, औरंगाबाद महापालिकेनं व्यापाऱ्यांवर लादलेला परवाना शुल्क कर रद्द करण्यात यावा, या मागण्या जिल्हा व्यापारी महासंघानं केल्या आहेत. जिल्हा व्यापारी महासंघाअंतर्गत ७२ संघटना या बंदमध्ये सहभागी झाल्या असल्याचं महासचिव लक्ष्मीनारायण राठी यांनी सांगितलं आहे.

****

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं येत्या मार्च अखेरपर्यंत ११ हजार किलोमीटर महामार्ग बांधकामाचं लक्ष्य ठरवलं असून, येत्या पाच वर्षात ६० हजार किलोमीटर महामार्ग बांधकामाचं लक्ष्य असल्याचं केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं आहे. ‘इंडियन इन्फ्रास्ट्रक्चर’तर्फे आयोजित ‘हायवेज टू प्रॉस्पेरिटी’ या विषयावर ते पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत होते. देशात ५४ लाख किलोमीटर रस्त्यांचे जाळे असून, जगात एवढ्या मोठ्या प्रमाणात रस्ते असणारा भारत दुसऱ्या क्रमांकाचा देश असल्याचं त्यांनी नमूद केलं. रस्ते-महामार्ग क्षेत्रात अर्थव्यवस्थेला पुनरुज्जीवीत करण्यासाठी खूप क्षमता असून, राष्ट्रीय महामार्ग बांधकाम क्षेत्रात २५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचं उद्दीष्ट असल्याचं गडकरी यांनी यावेळी सांगितलं. 

****

राज्यात नवीन कृषी पंप वीज धोरणास शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. ऑक्टोबर २०२० मध्ये जाहीर झालेल्या या योजनेत थकबाकी भरण्यासाठी विविध सवलती जाहीर झाल्यापासून राज्यात तीन लाख ४२  हजार शेतकऱ्यांनी थकबाकीपोटी ३१२ कोटी ४१ लाख रुपये आतापर्यंत भरले आहे. थकबाकी भरणाऱ्या शेतकऱ्यांचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आभार मानले आहेत. तसंच सर्व थकबाकीदार शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन थकबाकीमुक्त होण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे.

****

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत नैसर्गिक संसाधन व्यवस्थापनामध्ये होणाऱ्या मृद आणि जलसंधारण कामांची प्रक्रिया आता पूर्णपणे ऑनलाईन होणार आहे. यासाठी एक पोर्टल तयार करण्यात आलं असून,  कृषी मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते त्याचं काल त्याचं उद्घाटन झालं. यावेळी त्यांनी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत होणाऱ्या विविध कामांचा आढावा घेतला. ज्या भागात ज्या पिकांचे चांगल्या प्रकारे उत्पादन घेतलं जातं, तिथे संबंधित प्रक्रिया उद्योग सुरू करण्यास प्रोत्साहन देणं गरजेचं असल्याचं भुसे म्हणाले.

****

आयएएस आपल्या भेटीलाया अभिनव उपक्रमाच्या माध्यमातून उद्याचे प्रशासकीय अधिकारी घडण्यास मदत होईल, असा विश्वास उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला. उच्च, तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानं, राज्यातल्या सर्व महाविद्यालयांमध्ये ‘करियर कट्टा’ या अभिनव उपक्रमाचं, सामंत यांच्या हस्ते काल उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते. दिल्ली इथं स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या आणि मुलाखतीसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची सोय करण्याबाबत, लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असंही सामंत यांनी यावेळी सांगितलं.

****

उद्योग विभागाच्यावतीनं नवं माहिती तंत्रज्ञान धोरण आखलं जात असून ते पूर्वीच्या धोरणापेक्षा अधिक गतिशील असेल, असा विश्वास उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला आहे. काल मुंबई इथं नव्या माहिती तंत्रज्ञान धोरणाची रुपरेषा ठरवण्यासाठी या क्षेत्रातल्या जाणकारांसोबत चर्चासत्रांचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यावेळी ते बोलत होते. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात ‘वर्क फ्रॉम होम’ संकल्पनेला अधिक वाव आहे. त्यामुळे नव्या माहिती तंत्रज्ञान धोरणात याचा समावेश करावा, असं देसाई म्हणाले.

****

अहमदनगर जिल्ह्यात जातेगाव इथल्या काळे वस्तीवरील अफूच्या शेतीवर पोलिसांनी छापा टाकून एक लाख ७० हजारांची ५६ किलो वजनाची झाडं जप्त केली. अफूची लागवड केलेल्या शेतकऱ्याला अटक करण्यात आली असून, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ७४वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.

//**************//

 

 

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 15.08.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 15 August 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्...