Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 27 February 2021
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २७ फेब्रुवारी २०२१ सायंकाळी ६.१०
****
** मराठी भाषा गौरव दिन आभासी उपक्रमांनी साजरा
** जालन्यामध्ये कोरोना विषाणू संसर्गाचे नवे १७८ रुग्ण
** औरंगाबाद शहरात पंधरा मार्चपर्यंत शाळा, शिकवण्या
बंद ठेवण्याचे आदेश
आणि
**`भारतीय खेळणी
महोत्सव` हे आत्मनिर्भर भारत निर्मितीच्या दिशेनं टाकलेलं महत्वाचं पाऊल - पंतप्रधान
नरेंद्र मोदी
****
आपल्या काव्यप्रतिभेनं मराठी
भाषेचा गौरव वाढवणारे, ज्ञानपीठ पुरस्कारविजेते वि. वा. शिरवाडकर ‘कुसुमाग्रज’ यांच्या
जयंतीनिमित्त ‘मराठी भाषा गौरव दिन` आज कोरोना विषाणू संसर्ग पार्श्र्वभूमीवर आभासी
उपक्रमांनी साजरा करण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार,
विधानसभेतले विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मराठी भाषा दिनानिमित्त शुभेच्छा
दिल्या आहेत. औरंगाबाद इथल्या डॉ बाबासाहेब
आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे प्रसिद्ध लेखक प्रसाद कुमठेकर यांचं प्रसार माध्यमातील
मराठी भाषा या विषयावर व्याख्यान होत आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ
आज १४ पुस्तकांचं प्रकाशन करत आहे. यात मलिका अमर शेख संपादित नामदेव ढसाळ यांच्या
समग्र वाङ्मयाच्या दुसऱ्या खंडाचा, तसंच `लोकशाहीर अण्णाभाऊ साठे निवडक वाङ्मय`,
`नाटक आणि रंगभूमी परिभाषासंग्रह`, `तिकडून आणलेल्या गोष्टी` आणि इतर पुस्तकांचा समावेश
आहे.
****
आज सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये देशभरात
कोरोना विषाणू संसर्गाचे सोळा हजार ४८८ नवे रुग्ण आढळले आहेत. या काळात ११३ रुग्णांचा
मृत्यू झाला असून बारा हजार ७७१ रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत. या संसर्गाच्या रुग्णांची
एकूण संख्या एक कोटी दहा लाख ७९ हजार ९७९ झाली आहे.
****
कोरोना विषाणू संसर्ग प्रादुर्भाव वाढल्यामुळे औरंगाबाद
महापालिका प्रशासनानं येत्या पंधरा मार्चपर्यंत सर्व शाळा तसंच खासगी शिकवण्या बंद
ठेवण्याचे निर्देश दिले आहे. प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी आज यासंदर्भातले आदेश
दिले आहेत. पाचवी ते नववीचे वर्ग तसंच अकरावीचे वर्ग आणि शिकवण्या या बंद ठेवण्याच्या
सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, आज सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये औरंगाबादमध्ये
कोरोना विषाणू संसर्गाचे ३४ नवे रुग्ण आढळले आहेत. या काळात दोन रुग्णांचा उपचार सुरू
असताना मृत्यू झाल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय प्रशासानं
दिली आहे. या रुग्णालयात या संसर्गामुळे मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या ९९२
झाली आहे. शासकीय रुग्णालयात सध्या २०७ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचंही प्रशासनानं
म्हटलं आहे.
****
जालना जिल्ह्यात आज दोन कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा
मृत्यू झाला. त्यामुळे या संसर्गानं दगावलेल्या एकूण रुग्णांची संख्या आता ३९२ झाली
आहे. दरम्यान, आज दिवसभरात १७८ नवीन कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्याची
एकूण रुग्णसंख्या आता १५ हजार ३२७ झाली आहे. उपचारानंतर कोरोना विषाणूमुक्त झालेल्या
९७ रुग्णांना आज सुटी देण्यात आली. आतापर्यंत जिल्ह्यातले १४ हजार २५ रुग्ण या आजारातून
बरे झाले आहेत तर बाधित असलेल्या ९१० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या प्रसाराच्या पार्श्र्वभूमीवर
परभणी जिल्ह्यातली धार्मिक स्थळं येत्या सात मार्च पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी
दीपक मुगळीकर यांनी दिले आहेत.
****
हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी इथं आज उपजिल्हा रुग्णालयात
भाजी, फळं, मांस विक्रेते तसंच अन्य व्यावसायिकांची कोरोना विषाणू संसर्गाची तात्काळ
चाचणी करण्यात आली. यावेळी सतरा जणांच्या तपासण्या करण्यात आल्या. यात एकाही व्यक्तीला
या संसर्गाची लागण झाल्याचं स्पष्ट झाल नाही.
****
राज्यात आतापर्यंत सुमारे एकोणसाठ
हजार जणांचं कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी लसीकरण करण्यात आलं आहे. आठ हजार एकशे एक आरोग्य कर्मचारी आणि २३ हजार २७५
आघाडी कर्मचाऱ्यांना लसीचा पहिला डोस देण्यात
आला आहे तर २७ हजार ४३३ आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे.
****
औरंगाबाद जिल्हा दूध उत्पादक संघानं दुधाच्या खरेदी दरात एक रुपयानं वाढ केली आहे.
आता दूध उत्पादकांना प्रतिलीटर २८ रुपये दर दिला जाईल. काल झालेल्या संघाच्या बैठकीत
दूध भुकटी प्रकल्प उभारण्यासही मान्यता देण्यात आली आहे.
****
`भारतीय खेळणी महोत्सव २०२१`
हे आत्मनिर्भर भारताची निर्मिती आणि भारताच्या पुरातन परंपरा अधिक दृढ करण्याच्या दिशेनं
टाकलेलं महत्वाचं पाऊल आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. पंतप्रधानांनी
आज पहिल्या भारतीय खेळणी महोत्सवाचं दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन केलं,
त्यावेळी ते बोलत होते. हा महोत्सव केवळ व्यावसायिक किंवा आर्थिक उपक्रम नाही तर, भारताच्या
पुरातन क्रीडा आणि खेळाच्या संस्कृतीचे बंध अधिक दृढ करायचा प्रयत्न असल्याचं ते म्हणाले.भारतात
तयार होणारी खेळणी ही परवडणाऱ्या दरात उपलब्ध होतात, तसंच ही खेळणी पर्यावरणपूरक उत्पादनांपासून
बनवली जातात, त्यामुळे ती सुरक्षितही असतात असं पंतप्रधान यावेळी म्हणाले.
****
दक्षिण मध्य रेल्वेतर्फे दोन विशेष साप्ताहिक रेल्वे सुरू करण्यात येत आहेत. उद्यापासून दर रविवारी मध्यप्रदेशमधील डॉक्टर आंबेडकर नगर ते कर्नाटकमधील यशवंतपूर ही साप्ताहिक रेल्वे सुरू
होत आहे. ही गाडी पूर्णा, नांदेड,
मार्गे धावणार असून परतीच्या प्रवासात दर मंगळवारी धावणार आहे. विजयवाडा ते शिर्डी साप्ताहिक
रेल्वे दर मंगळवारी सिकंदराबाद, विकाराबाद, परळी, परभणी, औरंगाबाद, मनमाड मार्गे शिर्डी
अशी धावणार असून परतीच्या प्रवासात दर बुधवारी धावणार असल्याचं रेल्वेतर्फे कळवण्यात आलं आहे.
****
अनेक वर्षापासून अहमद नगर-मुंबई-परळी रेल्वेचा प्रश्न प्रलंबीत आहे. या रेल्वेसाठी साकारण्यात आलेल्या
अहमदनगर-आष्टी दरम्यानचा रेल्वेमार्ग
कार्यान्वीत करण्याची मागणी अहमदनगरच्या पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद आणि `मेरे देश मे मेरा अपना घर` आंदोलनाच्या वतीनं करण्यात आली आहे. रेल्वे क्रांती आंदोलनाचा भाग
म्हणून ही मागणी करण्यात आली असून, या मागणीचं निवेदन रेल्वे
मंत्री पियुष गोयल यांना पाठवण्यात आल्याचं संघटनेनं म्हटलं आहे.
****
पुजा चव्हाण हिच्या मृत्यूची चौकशी करून दोषी व्यक्तींवर
कारवाई करावी. तसंच वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा तात्काळ घेण्यात यावा, या मागणीसाठी
परभणी शहरातल्या वसमत रस्त्यावर भारतीय जनता पक्षाच्या आमदार मेघना बोर्डीकर यांच्या
नेतृत्वाखाली आज `रस्ता बंद` आंदोलन करण्यात आलं.
****
नांदेड इथले ज्येष्ठ साहित्यिक, प्राध्यापक माधव कृष्ण
सावरगावकर यांचं काल रात्री पुण्यात निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. `अलोन` या टोपण
नावानं ते साहित्य निर्मीती करत. पिपल्स कॉलेज नांदेडचे मराठी विभाग प्रमुख म्हणून
त्यांनी काम पाहिलं होतं.
****
परभणी-पाथरी रस्त्यावर आज पहाटे चारचाकी आणि दुचाकीमधल्या
अपघातात एक जण ठार तर २ जण गंभीर जखमी झाले आहेत. पाथरी शहरा जवळ हा अपघात झाला. पोलिस
दलाच्या दरोडा प्रतिबंधक विभागाच्या गस्ती पथकानं या अपघातल्या जखमींना तातडीनं रुग्णालयात
दाखल केलं.
****
संत शिरोमणी संत रविदास महाराज यांची आज जयंती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी
मुंबईत संत रविदास महाराज यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन केलं. 'समता, स्वातंत्र्य
आणि बंधुता या मुल्यांचा पुरस्कार करणाऱ्या संत रविदास यांचा मानव धर्मच श्रेष्ठ आहे,
हा संदेश मोलाचा असल्याचं मुख्यमंत्र्यांनी अभिवादनात म्हटलं आहे. मुख्यमंत्र्यांनी
वर्षा या शासकीय निवासस्थानी संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून
अभिवादन केलं.
****
सार्वजनिक आरोग्य विभागातली रिक्त पदं भरण्यासाठी उद्या
राज्यात परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांना राज्याचे आरोग्यमंत्री
राजेश टोपे यांनी शुभेच्या दिल्या आहेत. कोरोना विषाणू संसर्गावर मात करून टोपे यांनी
पुन्हा काम सुरू केलं असून या परीक्षेतून गुणवत्तेनुसार उमेदवार निवडले जाणार असल्याचं
त्यांनी नमुद केलं आहे.
//********//
No comments:
Post a Comment