Thursday, 25 February 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 25.02.2021 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 25 February 2021

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक फेब्रुवारी २०२१ सकाळी ७.१० मि.

****

·      साठ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांना एक मार्चपासून कोविडची लस देणार.

·      वाढत्या कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासह सात राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात, केंद्रीय पथकं तैनात.

·      मुंबईत मंत्रालयातले कर्मचारी तसंच पोलिसांच्या कामांच्या तासांची विभागणी.

·      राज्यात आठ हजार ८०७ तर मराठवाड्यात ७०१ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण.

·      कोरोना विषाणू संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सहकारी संस्थांच्या निवडणुका ३१ मार्चपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय.

·      राज्यात वीजदर कमी करण्याचे तसंच शेतकऱ्यांना दिवसा आठ तास वीज पुरवठा करण्यासाठी नियोजन करण्याचे ऊर्जामंत्र्याचे निर्देश.

·      राज्याच्या जडणघडणीत मोठा सहभाग असलेले ज्येष्ठ माजी सनदी अधिकारी भुजंगराव कुलकर्णी यांचं निधन.

आणि

·      इंग्लंडविरुद्धच्या अहमदाबाद क्रिकेट कसोटीत सामन्यात भारताच्या पहिल्या डावात तीन बाद ९९ धावा.

****

साठ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांचं कोविड लसीकरण येत्या एक मार्चपासून सुरू होणार आहे. दहा हजार सरकारी रुग्णालयांमधून तर २० हजार खासगी रुग्णालयांमधून हे लसीकरण केलं जाईल. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ही माहिती दिली. सरकारी रुग्णालयांमधून होणारं लसीकरण पूर्णपणे मोफत असेल, तर खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरणासाठी शुल्क अदा करावं लागेल. लसीकरण शुल्काचं निर्धारण येत्या दोन ते तीन दिवसांत होणार असल्याचं, जावडेकर यांनी सांगितलं. ४५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या मधुमेह, उच्च रक्तदाब आणि इतर आजार असलेल्या नागरिकांनाही या टप्प्यात कोविडची लस दिली जाणार असल्याचं, जावडेकर यांनी यावेळी सांगितलं.

****

वाढत्या कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासह सात राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात, केंद्रीय पथकं तैनात करण्यात आले आहेत. केंद्रीय आरोग्य सचिवांनी राज्यांना पत्र लिहून प्रभावी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत.

दरम्यान, राज्यात कोविड १९ च्या प्रतिबंधासाठी लागणारी औषधं, मास्क आणि सॅनिटायझर पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत. ही सर्व साधनं जनतेसही रास्त दरात उपलब्ध असल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांनी दिली आहे. काल राज्यातल्या सर्व विभागीय औषध सहआयुक्तांसोबत बैठक घेतल्यानंतर ते बोलत होते. रेमडेसिवीर इंजेक्शन तसंच ऑक्सिजन आणि इतर साहित्याच्या विभागनिहाय उपलब्धतेचा काळे यांनी आढावा घेतला. मास्क, सॅनिटायझर तसंच इतर साहित्याचा तुटवडा किंवा काळाबाजार याबाबतची माहिती एक आठ शून्य शून्य दोन दोन दोन तीन सहा पाच या टोल फ्री क्रमांकावर कळवण्याचं आवाहन आयुक्त काळे यांनी केलं आहे.

****

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार मुंबईत मंत्रालयातल्या कर्मचाऱ्यांचे कामाचे तास विभागण्याचे निर्देश मुख्य सचिन संजय कुमार यांनी दिले आहेत. कर्मचाऱ्यांना एक दिवसआड, तीन-तीन दिवस किंवा एक-एक आठवड्याच्या पाळीनुसार कामावर बोलवा, असं त्यांनी सांगितलं.

महाराष्ट्र पोलिसांनी देखील आपल्या कार्यालयीन कामाच्या वेळेमध्ये बदल केला आहे. गट अ आणि ब संवर्गातल्या अधिकाऱ्यांना शंभर टक्के उपस्थिती अनिवार्य आहे, तर मुख्यालयात कार्यरत गट क आणि गट ड संवर्गातल्या कर्मचाऱ्यांची उपस्थिती ५० टक्के करण्यात आली आहे. त्यापैकी २५ टक्के कर्मचाऱ्यांना सकाळी नऊ ते दुपारी चार आणि उर्वरित कर्मचाऱ्यांना सकाळी ११ ते सायंकाळी पाच या वेळेत बोलावण्यात आलं आहे. महाराष्ट्र पोलिस मुख्यालयातून जारी पत्रकात ही माहिती देण्यात आली.

****

राज्यात काल आठ हजार ८०७ नव्या कोविड रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे राज्यभरातल्या कोविडबाधितांची एकूण संख्या २१ लाख २१ हजार ११९ झाली आहे. काल ८० रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या ५१ हजार ९३७ झाली असून, मृत्यूदर दोन पूर्णांक ४५ शतांश टक्के झाला आहे. काल दोन हजार ७७२ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत २० लाख ८ हजार ६२३ रुग्ण, कोरोना विषाणू मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९४ पूर्णांक ७० टक्के इतका झाला आहे. सध्या राज्यभरात ५९ हजार ३५८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

मराठवाड्यात काल नव्या ७०१ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर सात रुग्णांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या तीन, तर नांदेड, परभणी, लातूर आणि बीड जिल्ह्यात प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात २८१ रुग्ण आढळले. जालना जिल्ह्यात १११, लातूर ९८, बीड ५७, नांदेड आणि परभणी जिल्ह्यात प्रत्येकी ५५, हिंगोली २७ तर उस्मानाबाद जिल्ह्यात १७ नवे रुग्ण आढळून आले. 

****

अमरावती काल ८०२, यवतमाळ जिल्ह्यात २१५ नवे रुग्ण आढळले. पश्चिम वऱ्हाडात कोरोनाचा कहर वाढला असून, काल अकोला, बुलडाणा आणि वाशिम जिल्ह्यात एकूण एक हजार ७१ बाधित रुग्णांची नोंद झाली.

****

बीड जिल्ह्यातही कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून, जिल्ह्यात पाचवी ते नववी आणि अकरावीचे वर्ग दहा मार्चपर्यंत बंद राहणार आहेत. जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी काल याबाबतचे आदेश जारी केले.

****

लातूर जिल्ह्यात येत्या शनिवार-रविवारी नागरिकांनी जनता संचारबंदी पाळावी आणि विनाकारण घराबाहेर पडू नये, असं आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी केलं आहे. समाज माध्यमावरच्या संवादातून बोलताना त्यांनी हे आवाहन केलं. नागरिकांनी घाबरून जाण्याची परिस्थिती नाही, मात्र जनता संचारबंदी पाळली, तर कोवीड-१९ ची संसर्ग साखळी तोडता येईल, असं त्यांनी सांगितलं.

****

परभणी जिल्ह्यातील पाच हजार किंवा त्याहून अधिक लोकसंख्येच्या गावात कोविड संशयितांची आरटीपीसीआर तपासणी करण्यासाठी तसंच प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा प्रशासन विशेष पथकं तैनात करणार आहे. जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी याबाबतचे आदेश काल जारी केले. आरटीपीसीआर तपासणी, मास्कचा वापर, अवाजवी गर्दीवर नियंत्रण, तसंच अन्य नियम पालनावर ही पथकं लक्ष देतील. दरम्यान, काल परभणीत विना मास्क तसंच अंतर न राखणाऱ्या १७६ जणांकडून ३५ हजार २०० रुपये दंड वसूल करण्यात आला.

****

हिंगोली जिल्ह्यातील कोविड प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी कठोर कारवाईला सुरुवात केली आहे. हिंगोली जिल्ह्यातील समगा, सावरगाव बंगला, इंचा, काळकोंडी, जोडतळा या पाच गावात प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आला आहे. तर हिंगोली शहरातल्या बारा गल्ल्या प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. सर्व भागात काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

****

बुलडाणा जिल्ह्यात जळगाव जामोद तालुक्यातल्या झाडेगाव इथं एका धार्मिक कार्यक्रमातून, १५५ जणांना कोरोना विषाणूची लागण झाली. आता या गावातल्या प्रत्येक घरातल्या व्यक्तीचे घशातल्या स्रावाचे नमुने आरोग्य विभागाच्या वतीने संकलित केले जात आहेत.

****

वाशिम जिल्ह्याच्या रिसोड तालुक्यात देगाव इथल्या एका निवासी शाळेतले चार शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि वसतिगृहात राहणाऱ्या २२९ विद्यार्थ्यांना, कोविड संसर्ग झाला आहे. संसर्ग झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये अमरावती जिल्ह्यातल्या १५१, यवतमाळ ५५, वाशिम ११, बुलडाणा तीन, अकोला जिल्ह्यातला एक, तर हिंगोली जिल्ह्यातल्या आठ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. सदर निवासी शाळेला जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी तातडीनं भेट देवून परिस्थितीचा आढावा घेतला. या शाळेत दोन डॉक्टरांसह आरोग्य पथक तैनात करण्यात आलं आहे.

****

राज्यात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. या निवडणुका सध्या ज्या टप्प्यावर असतील त्या टप्प्यावर त्या थांबवून ३१ मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. सहकारी संस्थांच्या निवडणुकांना परवानगी देणारा यापूर्वीचा आदेश रद्द करण्यात आला आहे.

****

राज्यात वीजदर कमी करण्याचे तसंच शेतकऱ्यांना दिवसा आठ तास वीज पुरवठा करण्यासाठी नियोजन करण्याचे निर्देश ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी महावितरणला दिले आहेत. ते काल मंत्रालयात यासंदर्भातल्या बैठकीत बोलत होते. अन्य राज्यांच्या तुलनेत औद्योगिक ग्राहकांचे वीज दर जास्त असल्यानं, राज्यात उद्योगधंद्यांच्या वाढीत अडथळा निर्माण झाला आहे, त्यामुळे उद्योगांचे वीजदर किमान एक रुपया प्रति युनिटनं कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत, त्याबरोबरच घरगुती आणि वाणिज्यिक दरही कमी करण्यासाठी नियोजन करावं, असे निर्देश राऊत यांनी दिले.

****

राज्याच्या जडणघडणीत मोठा सहभाग असलेले ज्येष्ठ माजी सनदी अधिकारी भुजंगराव कुलकर्णी यांचं काल औरंगाबाद इथं निधन झालं, ते १०३ वर्षांचे होते. पाच फेब्रुवारी १९१८ रोजी बीड जिल्ह्याच्या परळी तालुक्यातल्या गाढे पिंपळगाव इथं जन्मलेले भुजंगराव यांनी, स्वातंत्र्यानंतर १९५२ मध्ये त्यांची भारतीय प्रशासकीय सेवा - आयएएस श्रेणीत निवड झाली. राज्याच्या पहिल्या जनगणनेचे प्रमुख, औरंगाबाद तसंच नांदेडचे जिल्हाधिकारी, पुणे महानगपालिकेचे आयुक्त, मुंबई विभागाचे महसूल आयुक्त, मंत्रालयात सिंचन, विद्युत आदी विभागाचे सचिव म्हणूनही त्यांनी समर्थपणे जबाबदारी पार पाडली. प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करताना, भुजंगराव यांनी, औरंगाबाद इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची उभारणी, पुणे शहरात बालगंधर्व रंगमंदिरासारखी विविध विकासकामं, भंडारदरा धरणाची दुरुस्ती, अशा अनेक कामांतून आपल्या कार्यकुशलतेची छाप सोडली.

निवृत्तीनंतरही भुजंगराव यांनी, मराठवाडा विकास महामंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु, महाराष्ट्र विकास अनुशेषासंदर्भात वि.म.दांडेकर समिती, अकृषी-विद्यापीठांची लेखासमिती, न्हावा शेवा बंदर, मराठवाडा ग्रामीण बॅंक, मराठवाडा वैधानिक मंडळ यासह विविध समित्यांवर काम करताना, आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला. मराठवाड्याच्या विकासातल्या भरीव योगदानाबद्दल भुजंगराव यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जीवन गौरव पुरस्कार, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थेचा गोविंदभाई श्रॉफ स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

त्यांच्या पार्थिव देहावर काल रात्री औरंगाबाद इथं अंत्यसंस्कार करण्यात आले.

****

बीड जिल्ह्याच्या परळी तालुक्यात रामेवाडी इथला एक किलोमीटर परिघातला परिसर बर्ड फ्ल्यू संक्रमित परिसर म्हणून जाहीर झाला असून, दहा किलोमीटरचा परिसर सतर्क क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आला आहे. पुढील आदेशापर्यंत या गावांत कोंबड्यांची खरेदी-विक्री, वाहतूक, तसंच जत्रा-प्रदर्शन करण्यास बंदी घालण्यात आली आहे. या परिसरात मृत पक्षी आढळल्यास, ग्रामपंचायत, नगरपंचायत किंवा नजिकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यांशी संपर्क साधावा, असं आवाहन करण्यात आलं आहे.

****

बीड जिल्ह्यात अंबाजोगाई इथं उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या इमारत बांधकामासाठी प्रशासकीय मान्यता मिळाली असून, यासाठी ११ कोटी ३१ लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. लोखंडी सावरगाव शिवारात दहा एकरात आरटीओ कार्यालयाची सुसज्ज आणि अद्यावत इमारत उभी राहणार आहे.

****

भारत आणि इंग्लंड यांच्यात अहमदाबाद इथं खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात काल पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा भारताच्या पहिल्या डावात तीन बाद ९९ धावा झाल्या. तत्पूर्वी अक्षर पटेलच्या भेदक माऱ्यामुळे पहिल्या डावात इंग्लंड संघ अवघ्या ११२ धावांत तंबूत परतला. पाहुण्या संघाचे तीन फलंदाज शून्यावर बाद झाले, तर चार फलंदाजांना दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही. अक्षर पटेलनं सहा, रविचंद्रन अश्विननं तीन, तर ईशांत शर्मानं एक बळी घेतला.

दरम्यान, अहमदाबाद इथल्या दीड लाख प्रेक्षक क्षमतेच्या जगातल्या सर्वात मोठ्या या मोटेरा क्रीडा संकुलाचं काल दुपारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते लोकार्पण झालं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. शहा यांनी या क्रीडा संकुलाचं ‘नरेंद्र मोदी क्रीडा संकुल’ असं नामकरण करत असल्याचं जाहीर केलं.

****

केंद्र सरकारनं येत्या २७ फेब्रुवारी ते २ मार्च दरम्यान राष्ट्रीय खेळणी प्रदर्शन महोत्सव २०२१ चं आयोजन केलं आहे. अशाप्रकारचा हा देशातला पहिलाच महोत्सव असून, तो ऑनलाईन पद्धतीनं होणार आहे. भारतीय खेळणी उद्योग क्षेत्राच्या क्षमता जगासमोर मांडणं, हा या महोत्सवाचा उद्देश आहे. देशभरातून अनेक खेळणी उद्योजक या महोत्सवात सहभागी झाले आहेत.

****

औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत १४८ अर्ज वैध ठरले आहेत, तर ६६ जणांचे अर्ज अवैध ठरले. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.मुकेश बारहाते यांनी एक पत्रक जारी करून ही माहिती दिली.

बाद ठरलेल्या अर्जांमध्ये विद्यमान संचालक नंदकुमार गांधीले, मनसेचे संतोष जाधव यांच्या अर्जांचा समावेश आहे. तर बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, संचालक रंगनाथ काळे यांच्या अर्जावरील आक्षेप निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेटाळून लावले.  

****

परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत १६ जणांचे उमेदवारी अर्ज अवैध तर ८५ अर्ज वैध ठरले आहेत. जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी ही माहिती दिली.

****

बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीत ८७ उमेदवारी अर्ज अवैध ठरल्यानंतर काल या प्रकरणी सहाय्यक निबंधक यांच्याकडे अपील करण्यात आलं. पंधरा दिवसांत या अवैध अर्जावर निर्णय घेणं बंधनकारक असून त्यानंतरच बँकेची निवडणूक ही पुढे ठरलेल्या कार्यक्रमानुसार होईल, असं सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गोपालदास परदेशी यांनी सांगितलं.

****

No comments: