Sunday, 21 February 2021

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 21 February 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 21 February 2021

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २१ फेब्रुवारी २०२१ सायंकाळी ६.१०

****

** जल जीवन अभियानाअंतर्गत पेयजल पुरवठा विशेष योजनेला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ

** कोविडचा नवा उद्रेक पाहता, सर्वांनी खबरदारी बाळगणं आवश्यक - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

** मराठवाडा दक्षिण मध्य रेल्वेतून मध्य रेल्वेला जोडण्यासाठी लढा उभारणार -खासदार डॉ.भागवत कराड

आणि

** जालना जिल्ह्यात आज चार तर औरंगाबाद जिल्ह्यात आज तीन कोविड बाधितांचा मृत्यू

****

जल जीवन अभियानाअंतर्गत नळाने पेयजल पुरवठा करण्याच्या विशेष योजनेला जलशक्ती मंत्रालयाने ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे. देशातल्या शाळा, अंगणवाड्या आणि आश्रमशाळांना १०० दिवसांत नळजोडणीद्वारे पाणीपुरवठा करणाऱ्या या योजनेला राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. अनेक राज्यांमध्ये सर्व शाळा आणि अंगणवाड्यांना पाणीपुरवठ्याचं १०० टक्के उद्दीष्ट पूर्ण झालं आहे. मात्र, काही राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना हे काम पूर्ण करण्यासाठी आणखी काही वेळ हवा असल्यानं ही मुदतवाढ देण्यात आली आहे. आतापर्यंत, ५ लाख २१ हजार शाळा आणि ४ लाख ७१ हजार अंगणवाडी केंद्रांना नळाद्वारे पाणीपुरवठा सुरु करण्यात आला आहे. एक लाख ८२ हजार सांडपाणी व्यवस्थापन यंत्रणा, सुमारे दीड लाख शाळा आणि अंगणवाडी केंद्रात पर्जन्यजल पुनर्भरण प्रकल्प उभारण्यात आले आहेत.

****

कोविडचा नवा उद्रेक पाहता, सर्वांनी सार्वजनिक ठिकाणी खबरदारी बाळगणं आवश्यक असल्याचं, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटलं आहे. ठाणे जिल्ह्यात कोविड काळात विविध प्रकारे सेवा देणाऱ्या ४० कोविड योद्ध्यांचा राज्यपालांच्या हस्ते आज राजभवनात सन्मान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. केरळ तसंच महाराष्ट्रात कोविड रुग्ण वाढत आहेत, ही चिंतेची बाब असल्याचं, राज्यपाल म्हणाले. मात्र परस्परांमध्ये सुरक्षित अंतर राखणं, मास्कचा वापर करणं यासारख्या सवयी लावून घेतल्यास आणि लोकांमधला सेवा आणि समर्पण भाव टिकून राहिला कोरोनाचा पराभव निश्चित असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कोविड काळात आरोग्य तसंच स्वच्छता कर्मचारी, सामान्य नागरिक यांनी तर उत्तम काम केलेच परंतु विविध सरकारी विभागांनी उल्लेखनीय काम केल्याचं राज्यपालांनी नमूद केलं.

****

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज संध्याकाळी सात वाजता जनतेशी संवाद साधणार आहेत.राज्यात वाढत चाललेला कोरोना विषाणू संसर्ग आणि त्या दृष्टीनं घेण्याची खबरदारी याबाबत मुख्यमंत्री यावेळी संवाद साधतील अशी शक्यता आहे.

****

अहमदनगर जिल्हा सहकारी बॅकेच्या चार जागांची मतमोजणी आज झाली. यामध्ये माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले, उदय शेळके, अंबादास पिसाळ आणि प्रशांत गायकवाड विजयी झाले आहेत. दरम्यान, बँकेचे १७ संचालक यापूर्वी बिनविरोध निवडून आले आहेत. बँक पुन्हा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली आली आहे. थोरात गटाने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. बँकेच्या अध्यक्षपदासाठी आता नेमकी कोणाची वर्णी लागते, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

****

मराठवाडा विभाग दक्षिण मध्य रेल्वेतून मध्य रेल्वेला जोडण्यासाठी लढा उभारणार असल्याचं खासदार डॉ.भागवत कराड यांनी म्हटलं आहे. ते आज औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. दक्षिण मध्य रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक गजानन माल्या यांनी चिकलठाणा इथल्या पीटलाईनला मंजूरी दिली असून याबाबतचा प्रस्ताव रेल्वे मंडळाकडे पाठवला आहे. या पीटलाईनसाठीची २४ एकर जागा उपलब्ध असल्याची माहितीही कराड यांनी दिली. औरंगाबाद इथं रेल्वेमार्गावर एक उडाणपुल आणि चार भुयारी मार्गाला मंजुरी मिळाली असून शिवाजी नगर भुयारी मार्गासाठी निधी मंजूर झाला असल्याचं खासदार कराड यांनी सांगितलं.

****

जालना जिल्ह्यात आज चार कोविड बाधितांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या आता ३८४ झाली आहे. आज दिवसभरात ९५ नवीन रुग्णांची भर पडली. त्यामुळे जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता १४ हजार ५२७ झाली आहे. उपचारानंतर कोरोना विषाणूमुक्त झालेल्या ४ रुग्णांना आज सुटी देण्यात आली. आजपर्यंत जिल्ह्यातले १३ हजार ६६९ रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. सध्या बाधित असलेल्या ४७४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

औरंगाबाद इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय घाटी रुग्णालयात आज कोविड संसर्ग झालेल्या तीन रुग्णांचा मृत्यू झाला, यामध्ये एक महिला तर दोन पुरुषांचा समावेश आहे.  त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची संख्या एक हजार २५४ झाली आहे. दरम्यान घाटी रुग्णालयात आज कोविड संसर्ग झालेले नवे ९ रुग्ण दाखल झाले, त्यामुळे जिल्ह्यातली कोविड बाधितांची संख्या ४८ हजार ४४६ झाली आहे. घाटी रुग्णालयात सध्या १३४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

बीड जिल्ह्यात आज कोविड संसर्ग झालेले नवे ५३ रुग्ण आढळले, यापैकी सर्वाधिक १९ रुग्ण अंबाजोगाई तालुक्यात आढळले असून, त्याखालोखाल बीड तालुक्यात १६, शिरुर ६, परळी ५, केज ३, तर गेवराई, धारूर आणि आष्टी तालुक्यात प्रत्येकी एक रुग्ण आढळला.

दरम्यान, जिल्ह्यात कोविडबाधितांची वाढती संख्या पाहता, जिल्हाधिकारी राजेंद्र जगताप यांनी उपचार सुविधेचा आढावा घेतला. जिल्ह्यात आठ रुग्णालयात एक हजार १३८ रुग्णखाटांची सुविधा सध्या उपलब्ध करण्यात आली आहे. प्रत्येक नागरिकास मास्क वापरणं बंधनकारक केलं आहे, गर्दीच्या ठिकाणी सामाजिक अंतर ठेवण्याच्या सूचना देण्यात येत आहेत, विनाकारण घराच्या बाहेर पडू नये असं आवाहनही जिल्हा प्रशासनानं केलं आहे.

****

उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर आणि त्यांच्या पत्नी यांना कोविडचा संसर्ग झाला आहे. नागरिकांना याबाबत कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता, योग्य खबरदारी घ्यावी, असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे.

लस घेतल्यानंतरही मास्क वापरण्याच्या सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत. आपण लस घेतली असल्याने ताप आला तरी कोणतीही चाचणी करण्याची गरज नाही अस मानून दुर्लक्ष केले असत तर आपल्याकडून लोकांना संसर्ग झाला असता. आपल्यासोबत पत्नीला ही संसर्ग झाला असून त्यामुळे कुटुंबीयांची कोविड तपासणी लक्षणे दिसताच महत्वाची ठरते. कोणतीही लक्षणे अंगावर काढू नये, असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे.

देविदास पाठक,

आकाशवाणी वार्ताहर,

उस्मानाबाद.

 

दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातल्या कोविड उपचार सुविधांचा आढावा घेतला. जिल्ह्यात १ हजार १०० प्राणवायू सुविधायुक्त रुग्णखाटा तर १९६ व्हेंटिलेटर आहेत. कोविड सुश्रुषा केंद्रात ९६० रुग्णखाटांची सुविधा पुनर्स्थापित करण्याचं काम वेगात सुरू आहे. केंद्र तसंच राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचं तंतोतंत पालन करण्याचं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे.

****

लातूर जिल्ह्यात टाळेबंदी लावण्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, असं जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी स्पष्ट केलं आहे. याबाबत चुकीची माहिती सामाजिक संपर्क माध्यमांवरून फिरत आहे, नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे

****

माजी केंद्रीय गृहमंत्री दिवंगत डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ २८ फेब्रुवारी रोजी नांदेड इथं आयोजित करण्यात आलेला तिसरा राज्यस्तरीय शंकर साहित्य दरबार कार्यक्रम, कोविडचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन तूर्तास रद्द करण्यात आला आहे. कार्यक्रमाचे संयोजक तथा माजी पालकमंत्री डी. पी. सावंत आणि समिती प्रमुख प्राध्यापक जगदीश कदम यांनी ही माहिती दिली.

****

बुलडाणा जिल्ह्यातल्या सर्व शैक्षणिक संस्था, सिनेमागृहं, जलतरण तलाव, आणि आठवडी बाजार बंद ठेवण्याचे निर्देश अमरावतीचे विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी दिले आहेत. सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी ९ ते सायं ५ वाजेपर्यंतच खुली राहणार असून, शनिवार आणि रविवार कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे आज सकाळी बुलडाणा शहरात शुकशकाट दिसून आला. चिखली शहरातही उद्या बाजार बंद ठेवण्याची सूचना प्रशासनाने केली आहे

****

उजनी धरणाचे पाणी धनेगाव मार्गे लातूर शहरासाठी आणलं जाणार असून मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा विषय मांडणार असल्याची माहिती लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे. विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते आज बोलत होते. कारखान्याचे अध्यक्ष दिलीपराव देशमुख, आमदार धीरज देशमुख यावेळी उपस्थित होते. ऑक्सीजनचा प्रकल्प उभारण्यासाठी वीज अत्यंत महत्त्वाची असून मांजरा परिवार वीज उत्पादन चांगले करत आहे. त्यामुळे यापुढील काळात मांजरा परिवाराने ऑक्सीजन निर्मितीचा प्रकल्प उभारण्याबाबत विचार करावा असं आवाहन, पालकमंत्री देशमुख यांनी केलं.

****

पनवेल इथं मायलेकीची हत्या करून फरार झालेल्या तरुणाने हिंगोली तालुक्यातल्या वैजापूर शिवारामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज निदर्शनास आली. प्रकाश यशवंता मोरे असं या मयताचं नाव असून, लग्न करण्यास नकार दिल्याच्या कारणावरून त्याने सुरेखा बलखंडे आणि सुजाता बलखंडे या माय लेकीची पनवेल इथं १८ फेब्रुवारीला हत्या केली होती. या घटनेनंतर फरार असलेल्या आरोपीचा मुंबई पोलिसांचं पथक शोध घेत होतं, आज दुपारी त्याचा मृतदेह झाडावर आढळून आला.

****

नोवाक जोकोविचने ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीचं अजिंक्यपद पटकावलं आहे. आज झालेल्या अंतिम सामन्यात त्यानं डॅनियल मेदवेदेवचा ७-५, ६-२ आणि ६-२ असा सरळ तीन सेट्समध्ये पराभव केला. जोकोविचचं हे या स्पर्धेतलं नववं विजेतेपद आहे.

//********//

 

No comments: