Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 24 February 2021
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २४ फेब्रुवारी २०२१ सायंकाळी ६.१०
****
** साठ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांचं येत्या
१ मार्चपासून कोविड लसीकरण
** ज्येष्ठ निवृत्त सनदी अधिकारी भुजंगराव कुलकर्णी यांचं
आज औरंगाबाद इथं निधन
** बीड जिल्ह्याच्या परळी तालुक्यात रामेवाडी परिसर बर्ड फ्ल्यू संक्रमित म्हणून जाहीर
आणि
** तिसऱ्या क्रिकेट कसोटीत भारतीय गोलंदाजांच्या भेदक
माऱ्यापुढे इंग्लंडच्या फलंदाजांची वाताहत
****
साठ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांचं कोविड
लसीकरण येत्या १ मार्चपासून सुरू होणार आहे. दहा हजार सरकारी रुग्णालयांमधून तर २०
हजार खासगी रुग्णालयांमधून हे लसीकरण केलं जाईल. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री
प्रकाश जावडेकर यांनी आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ही माहिती दिली. सरकारी
रुग्णालयांमधून होणारं लसीकरण पूर्णपणे मोफत असेल, तर खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरणासाठी
शुल्क अदा करावं लागेल. लसीकरण शुल्काचं निर्धारण येत्या दोन ते तीन दिवसांत होणार
असल्याचं, जावडेकर यांनी सांगितलं. ४५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या मधुमेह, उच्च रक्तदाब
आणि इतर आजार असलेल्या नागरिकांनाही या टप्प्यात कोविडची लस दिली जाणार असल्याचं, जावडेकर
यांनी यावेळी सांगितलं.
मंत्रिमंडळानं आजच्या बैठकीत माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात
आवश्यक हार्डवेअर साहित्य उत्पादनाला प्रोत्साहन देणाऱ्या योजनेला मान्यता दिली. केंद्रीय
माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी ही माहिती दिली. याअंतर्गत लॅपटॉप,
टॅब्लेट, सर्वसमावेश संगणक तसंच सर्वर उत्पादनात गुंतवणुकीचा प्रस्ताव देण्यात आला
आहे. चार वर्ष मुदतीच्या या योजनेसाठी सात हजार ३५० कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात
आली आहे. यातून एक लाख ८०हजारावर प्रत्यक्ष तसंच अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होतील,
असं प्रसाद यांनी सांगितलं.
*****
ज्येष्ठ निवृत्त सनदी अधिकारी भुजंगराव कुलकर्णी यांचं
आज औरंगाबाद इथं निधन झालं, ते १०३ वर्षांचे होते. ५ फेब्रुवारी १९१८ रोजी तत्कालीन
हैदराबाद प्रांतात फकरुलमुल्क जहागीरीत म्हणजे आताच्या बीड जिल्ह्यात परळी तालुक्यातल्या
गाढे पिंपळगाव इथं जन्मलेले भुजंगराव यांनी, १९३९ साली हैदराबाद संस्थानात प्रशासकीय
नोकरीतून आपल्या कारकीर्दीला सुरवात केली. स्वातंत्र्यानंतर १९५२ मध्ये त्यांची भारतीय
प्रशासकीय सेवा - आयएएस श्रेणीत निवड झाली. औरंगाबाद तसंच नांदेडचे जिल्हाधिकारी, पुणे
महानगपालिकेचे आयुक्त, मुंबई विभागाचे महसूल आयुक्त, मंत्रालयात सिंचन, विद्युत आदी
विभागाचे सचिव म्हणूनही त्यांनी समर्थपणे जबाबदारी पार पाडली. प्रशासकीय अधिकारी म्हणून
काम करताना, भुजंगराव यांनी, औरंगाबाद इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठावाडा विद्यापीठाची
उभारणी, पुणे शहरात बालगंधर्व रंगमंदिरासारखी विविध विकासकामं, भंडारदरा धरणाची दुररुस्ती,
१९६१ची जनगणना, अशा अनेक कामातून आपल्या कार्यकुशलतेची छाप सोडली.
निवृत्तीनंतरही भुजंगराव यांनी, मराठवाडा विकास महामंडळ,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, महाराष्ट्र विकास अनुशेषासंदर्भात वि.म.दांडेकर
समिती, अकृषी-विद्यापीठांची लेखासमिती, न्हावा शेवा बंदर, मराठवाडा वैधानिक मंडळ, मराठवाडा
ग्रामीण बँक, यासह विविध समित्यांवर काम करताना, आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला. मराठवाड्याच्या
विकासातल्या भरीव योगदानाबद्दल भुजंगराव यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा
जीवन गौरव पुरस्कार, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थेचा गोविंदभाई श्रॉफ
स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.
प्रदीर्घ आयुष्य लाभलेल्या भुजंगरावांच्या निधनाबद्दल
समाजाच्या सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पार्थिव देहावर आज रात्री
औरंगाबाद इथं अंत्यसंस्कार होणार आहेत.
****
प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या अंमलबजावणीत लाभार्थी
भौतिक तपासणीचे १०० टक्के उद्दिष्टं पूर्ण करण्यात अहमदनगर जिल्ह्याचा देशात पहिला
क्रमांक आला. आज दिल्लीत झालेल्या समारंभात केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर
यांच्या हस्ते कृषीमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत अहमदनगर जिल्ह्याला पुरस्कार
देऊन गौरवण्यात आलं. जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी हा पुरस्कार स्वीकारला,
निवासी उपजिल्हाधिकारी संदिप निचित, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजीराव जगताप यावेळी
उपस्थित होते.
****
डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था बार्टी,
आणि औरंगाबाद जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती यांच्या संयुक्त विद्यमानं जात
प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रियेबाबत जनजागृती करण्यासाठी वेबिनारचे आयोजन करण्यात आलं
आहे. उद्या सकाळी साडे अकारा ते दीड वाजेदरम्यान वेबिनार होणार आहे. हे वेबिनार सर्वांसाठी
खुले असून अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती इतर मागासवर्ग, विशेष मागास प्रवर्ग
आणि सामाजिक शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्ग या प्रवर्गातल्या अर्जदारांना मार्गदर्शन
तसंच त्यांच्या प्रश्नांना अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. यासाठी झूम मिटींग ॲपवर
मीटींग आयडी 35 82 14 37 19 असा असून पासकोड 606584 असा असणार असल्याचं जिल्हा जात
प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या वतीनं कळवण्यात आलं आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या तीन पुरुष कोरोना विषाणू बाधित
रुग्णांचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर शासकीय वैद्यकीय रुग्णालय घाटीत दहा नवे
रुग्ण दाखल झाले. त्यामुळे जिल्ह्यातल्या एकूण रुग्णांची संख्या आता ४९ हजार वीस झाली
आहे. ४६ हजार ६५० रुग्णांनी या विषाणू संसर्गावर मात केली असून एक हजार २५८ जणांचा
मृत्यू झाला आहे.
****
बुलडाणा जिल्ह्यात जळगाव जामोद तालुक्यातल्या झाडेगाव
इथं एका धार्मिक कार्यक्रमातून १५५ जणांना कोरोना विषाणूची लागण झाली. आता या गावातल्या
प्रत्येक घरातल्या व्यक्तीचे घशातल्या स्रावाचे नमुने आरोग्य विभागाच्या वतीने संकलित
केले जात आहेत.
****
बीड जिल्ह्याच्या
परळी तालुक्यात रामेवाडी इथला एक किलोमीटर परिघातला परिसर बर्ड फ्ल्यू संक्रमित
परिसर म्हणून जाहीर झाला असून, दहा किलोमीटरचा परिसर सतर्क क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात
आला आहे. यामध्ये परळी तालुक्यातल्या जळगव्हाण पोहनेर, डिग्रस, पिंपरी, तेलसमुख, ममदापूर, कौडगांव आदी गावांसह माजलगाव तालुक्यातल्या कोथाळा
या गावांचा समावेश आहे. पुढील आदेशापर्यंत या गावांत कोंबड्यांची खरेदी-विक्री, वाहतूक, तसंच जत्रा-प्रदर्शन
करण्यास बंदी घालण्यात आली आहे. या परिसरात
मृत पक्षी आढळल्यास, ग्रामपंचायत,
नगरपंचायत किंवा नजिकच्या पशुवैद्यकीय
दवाखान्यांशी संपर्क साधावा.
****
महिला आर्थिक विकास महामंडळ आणि परभणी जिल्ह्याच्या सोनपेठ
इथल्या सर्वोदय लोकसंचलित साधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सोनपेठ तालुक्यातील
शेतकरी महिलांना खते आणि कीड व्यवस्थापन, कीटकनाशकांचा वापर, याविषयी मार्गदर्शन करण्यात
आलं. जर्मनी इथल्या जीआयझेड बायर कंपनीच्या सहकार्यानं मोफत बियाणे, खते, आणि कीटकनाशकांचं
वाटप करण्यात आलं, तसंच बचत गटातल्या अरुणा भोसले यांच्या शेतात प्रत्यक्ष जाऊन महिलांना
मिरची, टोमॅटो, टरबूज या पिकांवरील रोगाविषयी सखोल माहिती देण्यात आली.
****
बीड जिल्ह्यात अंबाजोगाई इथं उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या
इमारत बांधकामासाठी प्रशासकीय मान्यता मिळाली असून, यासाठी ११ कोटी ३१ लाख रुपये निधी
मंजूर झाला आहे. लोखंडी सावरगाव शिवारात दहा एकरात आरटीओ कार्यालयाची सुसज्ज आणि अद्यावत
इमारत उभी राहणार असल्याने, नागरिकांची गैरसोय टळणार आहे. माजी मंत्री दिवंगत डॉ. विमलताई
मुंदडा यांच्या प्रयत्नांतून १६ वर्षांपूर्वी अंबाजोगाई इथं उपप्रादेशिक परिवहन कार्यालय
मंजूर झालं होतं, आता आमदार नमिता मुंदडा यांच्या पाठपुराव्यामुळे या कार्यालयाच्या
इमारतीला मंजुरी मिळाली आहे.
****
क्रिकेट -
भारत आणि इंग्लंड यांच्यात अहमदाबाद इथं खेळवल्या जात
असलेल्या तिसऱ्या क्रिकेट कसोटीत भारतीय गोलंदाजांच्या माऱ्यापुढे इंग्लंडच्या फलंदाजांची
वाताहत झाली. इंग्लंड संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. अखेरचं
वृत्त हाती आलं तोपर्यंत इंग्लंड संघाच्या नऊ बाद ११२ धावा झाल्या होत्या. अक्षर पटेलनं
पाच, रविचंद्रन अश्विननं ३ तर ईशांत शर्मानं एक बळी घेतला.
दरम्यान आज दुपारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या
हस्ते या क्रीडासंकुलाचं लोकार्पण झालं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक
मान्यवर यावेळी उपस्थित होते.
//************//
No comments:
Post a Comment