Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 24 February 2021
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक
२४ फेब्रुवारी
२०२१ सकाळी ७.१० मि.
****
· राज्यात वाढणाऱ्या कोरोना विषाणू संसर्गाचा कोविड-१९ च्या नव्या प्रकारांशी थेट
संबंध नसल्याचं, भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेचं स्पष्टीकरण.
· कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद शहरात
आणि हिंगोली जिल्ह्यात रात्रीची संचारबंदी लागू.
· मुंबईत मंत्रालयातल्या कार्यालयीन वेळा दोन पाळ्यांमध्ये तसंच घरुन काम करण्यासंदर्भात
तात्काळ नियोजन करण्याच्या मुख्यमंत्री सूचना उद्धव ठाकरे यांच्या मुख्य सचिवांना सूचना.
· राज्यात सहा हजार २१८ तर मराठवाड्यात ६०५ नव्या कोरोना विषाणू बाधित रुग्णांची
नोंद.
· शालेय शुल्कासंदर्भात राज्य तसंच विभागीय स्तरावर शुल्क नियंत्रण समित्यांची स्थापना
करण्याचा निर्णय.
· बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक पदाच्या निवडणुकीत सेवा सहकारी मतदारसंघातले
सर्व उमेदवारी अर्ज बाद; औरंगाबाद जिल्हा बँकेच्या निवडणूक आक्षेपांवर आज निर्णय होणार.
आणि
· भारत आणि इंग्लंड संघात आजपासून अहमदाबाद इथं तिसरा कसोटी क्रिकेट सामना.
****
राज्यात वाढणाऱ्या कोरोना विषाणू संसर्गाच्या रुग्ण संख्येचा आणि कोविड १९ च्या
नव्या प्रकारांचा थेट संबंध नसल्याचं, भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेचे व्यवस्थापकीय
संचालक डॉ.बलराम भार्गव यांनी सांगितलं. ते काल दिल्लीत पत्रकात परिषदेत बोलत होते.
एन ४४०के आणि ई ४८४के कोविडचे हे नवीन प्रकार इतर देशांमध्ये आढळत आहेत. महाराष्ट्रात
मार्च आणि जुलै २०२० मध्ये, तर तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि आसाम मध्ये मे ते सप्टेंबर
२०२० मध्ये हे प्रकार सौम्य स्वरुपात आढळले होते, असं त्यांनी सांगितलं. मात्र आता
जो प्रादुर्भाव वाढत आहे, तो हा नवा प्रकार नसल्याचं, डॉ. भार्गव यांनी स्पष्ट केलं.
****
राज्यात कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी
निर्बंध घातले जात आहेत. औरंगाबाद शहरात आणि हिंगोली जिल्ह्यात रात्रीची संचारबंदी
लागू करण्यात आली आहे. औरंगाबाद शहरात रात्री अकरा वाजेपासून सकाळी सहा वाजेपर्यंत
संचारबंदी असेल. कालपासून लागू झालेला हा संचारबंदी आदेश येत्या आठ मार्चपर्यंत लागू
राहणार असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. याकाळात जीवनावश्यक वस्तू व्रिकेते,
औद्योगिक क्षेत्र आणि त्यातले कर्मचारी यांना संचारबंदीतून वगळण्यात आलं आहे. मात्र
नमूद मुभा असलेल्या सर्व व्यक्तींना त्यांचे विहित ओळखपत्र सोबत बाळगणं अनिवार्य राहील.
या काळात वैद्यकीय सुविधा, मालवाहतुक, पेट्रोल पंप सुरु राहतील.
****
हिंगोली जिल्ह्यातही आजपासून पुढील आदेशापर्यंत सायंकाळी सात ते सकाळी सात वाजेपर्यंत
संचारबंदी लागू करण्यात येणार आहे. लग्नसमारंभासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातून पूर्व
परवानगी घेणं बंधनकारक करण्यात आलं आहे. तसंच सर्व आस्थापना, दुकानदार आणि दुकानात
काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करणं बंधनकारक करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी
रुचेश जयवंशी यांनी काल हे आदेश जारी केले.
****
मुंबई, पुणे, नागपूर, अमरावती आणि ठाणे या पाच जिल्ह्यांमध्ये रुग्ण मोठ्या प्रमाणात
वाढत आहेत.
दरम्यान, राज्यातला वाढता संसर्ग हा दुसरी लाट नाही, तर नियमांच्या शिथिलतेमुळे
रुग्ण वाढत असल्याचं, आरोग्य विभागाचे सचिव प्रदीप व्यास यांनी सांगितलं. त्यामुळे
पुन्हा एकदा नियमात कठोरता आणण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
कोविडच्या पार्श्वभूमीवर मुंबईत मंत्रालयातल्या कार्यालयीन वेळा दोन पाळ्यांमध्ये
करण्यासंदर्भात तसंच घरुन काम-वर्क फ्रॉम होमच्या माध्यमातून किती विभागांना पूर्ण
क्षमतेनं काम करता येईल, याचं तात्काळ नियोजन करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
यांनी मुख्य सचिवांना दिल्या आहेत. राजपत्रित अधिकारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत
झालेल्या बैठकीत ते काल बोलत होते. कार्यालयीन वेळांची दहा ते पाच ही मानसिकता बदलण्याची
गरज असून, महाराष्ट्रानं पुढाकार घेऊन नवीन कार्यसंस्कृतीची सुरुवात करावी, असंही मुख्यमंत्री
म्हणाले. मंत्रालयातल्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं लसीकरण करावं, अभ्यागतांना
मर्यादित प्रवेश द्यावा, असंही त्यांनी सांगितलं.
****
जालना जिल्ह्यात येत्या ३१ मार्चपर्यंत शाळा, महाविद्यालयं तसंच तालुका आणि गाव
पातळीवरचे आठवडी बाजार बंद ठेवण्यात येणार आहेत. जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी
काल याबाबत माहिती दिली. दहावी आणि १२ वीचे वर्ग मात्र सुरू राहणार आहेत. विनामास्क
फिरणाऱ्या नागरिकांवर महसूल आणि पोलीस प्रशासनाकडून दंडात्मक कारवाईची मोहीम सुरू असल्याचं,
जिल्हाधिकारी बिनवडे यांनी सांगितलं.
****
लातूर इथं विद्यार्थ्यांच्या एका वसतीगृहात ४५ विद्यार्थ्यांना कोविडची लागण झाली
असल्याची माहिती, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.लक्ष्मण देशमुख यांनी दिली. औद्योगिक वसाहतीत
असलेल्या या वसतीगृहाल्या बाधित विद्यार्थ्यांना बार्शी रस्त्यावरील कोविड केंद्रात
ठेवण्यात आलं आहे. पालिकेनं या वसतीगृहाचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषीत केला
आहे. वसतीगृहाला लागून असलेल्या इमारतीत इंग्रजी शाळा भरवली जाते, ही शाळा सुध्दा पुढचे
दहा दिवस बंद ठेवण्याची सूचना देण्यात आली आहे.
****
यवतमाळ जिल्ह्यातून नांदेड जिल्ह्यात येणाऱ्या सर्व प्रवाशांची कोविड तपासणी करण्यासाठी
यवतमाळ सीमेवर छावणी सुरू करण्यात येत आहे. नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ विपिन ईटनकर यांनी
ही माहिती दिली. वैद्यकीय पथकामार्फत सर्व प्रवाशांची अॅंटीजेन चाचणी केली जाणार आहे.
कोविड बाधित आढळणाऱ्या रुग्णांना परत पाठवून विलगीकरणात ठेवण्यात येईल, असं जिल्हाधिकारी
ईटनकर यांनी स्पष्ट केलं आहे.
****
परभणी इथं जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी काल स्वतः रस्त्यावर उतरत नियमभंग करणाऱ्यांवर
दंडात्मक कारवाई सुरू केली. उपविभागीय अधिकारी संजय कुंडेटकर यांच्यासह महापालिकेचं
पथक सकाळपासून बाजारपेठांमधून नियंत्रण ठेवत होतं. जिल्हाधिकाऱ्यांसह या पथकानं शहरातल्या
अनेक भागातून पायी निरीक्षण करत, काही वाहनधारकांना समज दिली तर काहींना दंडही ठोठावला.
व्यापाऱ्यांनाही मास्क वापरणं, सॅनिटायझरची व्यवस्था करणं, सामाजिक अंतर राखणं आदी
सूचना करण्यात आल्या. शहरात काल विनामास्क असलेल्या १०२ जणांविरूध्द कारवाई करण्यात
आली.
****
राज्यात काल सहा हजार २१८ नव्या कोविड रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे राज्यभरातल्या
कोविडबाधितांची एकूण संख्या २१ लाख १२ हजार ३१२ झाली आहे. काल ५१ रुग्णांचा उपचारादरम्यान
मृत्यू झाला. राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या ५१ हजार ८५७ झाली
असून, मृत्यूदर दोन पूर्णांक ४५ शतांश टक्के झाला आहे. काल पाच हजार ८६९ रुग्ण या संसर्गातून
मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत २० लाख ५ हजार ८५१ रुग्ण, कोरोना विषाणू मुक्त झाले
असून, कोविडमुक्तीचा दर ९४ पूर्णांक ९६ टक्के इतका झाला आहे. सध्या राज्यभरात ५३ हजार
४०९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
मराठवाड्यात काल नव्या ६०५ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर तीन रुग्णांचा
मृत्यू झाला. मृतांमध्ये नांदेड, उस्मानाबाद आणि हिंगोली जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका
रुग्णाचा समावेश आहे. औरंगाबाद जिल्ह्यात २४० नवे रुग्ण आढळले. जालना जिल्ह्यात ११७,
नांदेड ७६, बीड ४७, लातूर ४६, हिंगोली ३८, परभणी २९, तर उस्मानाबाद जिल्ह्यात काल नवे
१२ रुग्ण आढळले.
****
शालेय शुल्कासंदर्भात राज्यस्तरीय तसंच विभागीय शुल्क नियंत्रण समित्यांची स्थापना
करण्यात येणार आहे. पालकांनी या समित्यांकडे शुल्क वाढीबाबतच्या तक्रारी पाठवाव्या,
असं शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे. शालेय शुल्कासंबंधी प्राप्त
तक्रारींसंदर्भात झालेल्या एका बैठकीत त्या काल बोलत होत्या. कोविड कालावधीमध्ये शाळा
बंद असताना काही शाळांकडून शुल्कासाठी तगादा लावणं, शुल्क न भरलेल्या विद्यार्थ्यांना
ऑनलाईन शिक्षणासाठीच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमधून बाहेर काढणं, सत्र परीक्षेची गुणपत्रिका
न देणं, उशिरा शुल्क भरल्यास दंड वसूल करणं अशा स्वरुपाच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या
आहेत. संबंधित शाळांची संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत त्वरित चौकशी करून कारवाई करण्याचे,
तसंच अनधिकृतपणे चालवल्या जाणाऱ्या शाळांवर शिक्षण हक्क कायद्यानुसार कारवाई करण्याचे
निर्देशही गायकवाड यांनी यावेळी दिले.
****
बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक पदाच्या निवडणुकीत सेवा सहकारी मतदारसंघाच्या
११ जागांसाठी दाखल सर्व ८७ उमेदवारी अर्ज अवैध ठरले आहेत. सेवा संस्था मतदारसंघातून
निवडणूक लढवण्यासाठी संबंधित उमेदवार हा ज्या संस्थेमध्ये सदस्य आहे, त्या संस्थेचा
लेखा आणि परिक्षण मधला दर्जा हा अ किंवा ब असायला हवा. परंतू बीड जिल्ह्यातल्या ७३५
सेवा संस्थांपैकी अवघ्या १३ संस्थांचे लेखापरिक्षण हे अ किंवा ब आहे, बाकी सर्व संस्था
या ‘क’ वर्गात येतात. त्यामुळे निवडणुकीच्या उपविधी नियमानुसार सेवा संस्था निवडणुकीत
दाखल करण्यात आलेले ८७ अर्ज बाद केले असल्याचं निवडणूक निर्णय अधिकारी विश्वास देशमुख
आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी गोपालसिंह परदेशी यांनी सांगितलं.
****
औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत विमुक्त जाती - भटक्या जमाती
तसंच महिला राखीव मतदारसंघातून प्रत्येकी आठ ते नऊ उमेदवारांचे अर्ज विविध कारणांनी
बाद झाले. तर बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख कृष्णा डोणगावकर,
जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रंगनाथ काळे, संचालक नंदकुमार गांधीले, मनसेचे संतोष
जाधव या प्रमुख उमेदावारंच्या अर्जांवर प्रतिस्पर्ध्यांनी आक्षेप घेतले. या अर्जांवर
रात्री उशीरापर्यंत सुनावणी सुरु होती. या आक्षेपांवर आज निर्णय घेण्यात येणार आहे.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात दोन बालविवाह रोखण्यात जिल्हा प्रशासनाला यश आलं आहे. उस्मानाबाद
शहरात १४ फेब्रुवारीला तर लोहारा तालुक्यात मार्डी इथं १५ फेब्रुवारीला हे विवाह होणार
होते. जिल्हा बाल संरक्षण अधिकारी ए.बी. कोवे यांच्या मार्गदर्शनात शेवटच्या क्षणी
विवाहस्थळी पोहोचून हे विवाह थांबवण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
शेतकऱ्यांना रात्री ऐवजी दिवसाची वीज मिळावी या संदर्भात तताडीनं ऊर्जा मंत्र्यांची
भेट घेणार असल्याचं, लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी सांगितलं आहे.
विलास सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा वैशाली देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली
काल झाली, त्यावेळी ते बोलत होते. वीज देयक भरण्यासाठी सवलत मिळावी, तसंच देयक न भरल्यास
वीज पुरवठा खंडीत केला जाऊ नये, अशी विनंतीही शेतकरी बांधवाकडून होत आहे. या तीनही
विषयातून मार्ग काढून योग्य तो दिलासा देण्याचा प्रयत्न केला जाईल असंही देशमुख यांनी
सांगितलं.
साखर कारखान्यांनी साखर उत्पादनासोबतच इथेनॉल, वीज, सीएनजी, कॉम्प्रेस बायोगॅस
तसंच इतर उत्पादनांकडे लक्ष द्यावं, शेतकरी आणि इतर घटकांना अधिकचे आर्थिक लाभ देऊन
विकासप्रक्रिया गतिमान करावी, असं आवाहनही पालकमंत्री देशमुख केलं आहे.
****
बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विविध पदांवर कायमस्वरुपी भर्तीसाठी काल बँकेच्या सुमारे
एक हजार ९०० शाखांमधल्या कर्मचाऱ्यांनी निदर्शनं केली. गेल्या सुमारे पाच वर्षांपासून
बँकेत रिक्त पदांवर भर्ती झालेली नाही. आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्यात २६ फेब्रुवारीला
बँकेच्या सर्व ३२ प्रादेशिक कार्यालयांसमोर, सहा मार्च रोजी बँकेच्या पुण्यातल्या मुख्यालयासमोर
निदर्शनं केली जाणार आहेत. तर १२ मार्च रोजी देशव्यापी संपाचा इशारा ऑल इंडिया बँक
ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज फेडरेशननं दिला आहे.
****
परभणी पोलिसांनी काल तीन आरोपींना ताब्यात घेत, त्यांच्याकडून दोन गावठी पिस्टल,
१३ जिवंत काडतुसं आणि अंमली पदार्थांचा साठा जप्त केला.
शेख सोनू असं मुख्य आरोपीचं नाव असून, पोलिसांनी त्याच्या अड्ड्यावरून ६० हजार
रुपये किंमतीचे १११ ग्रॅम चरस, पाच हजार रुपयांचा अर्धा किलो गांजा आणि १३ जिवंत काडतुसांसह
दोन गावठी पिस्टल, असा सुमारे साडे सहा लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
****
नांदेड जिल्हा परिषदेनं कार्यान्वित केलेला पंचतारांकित शाळा, या नावीन्यपूर्ण
कार्यक्रमाची सर्व शाळांनी प्रभावी अंमलबजावणी करून शाळांचं मानांकन निश्चित करावं,
असे निर्देश शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी दिले आहेत. शिक्षण विभागाच्या विशेष
बैठकीत ते काल बोलत होते. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी
वर्षा ठाकूर-घुगे यांच्या संकल्पनेतून पंचतारांकित शाळा हा कार्यक्रम पुढे आला आहे.
****
नांदेड इथून एप्रिल महिन्यात सहा नवीन विशेष रेल्वे सुरु होणार आहेत. यामध्ये नांदेड
ते निझामुद्दीन, नांदेड ते आदिलाबाद, नांदेड ते औरंगाबाद, औरंगाबाद ते रेनीगुंटा, नांदेड
ते सत्रागच्ची कोलकाता आणि नांदेड ते श्री गंगानगर या गाड्यांचा समावेश आहे.
****
भारत आणि इंग्लंड संघात सुरू असलेल्या चार कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला
तिसरा कसोटी सामना आजपासून अहमदाबाद इथं सुरू होणार आहे. दिवसरात्र खेळला जाणारा हा
सामना दुपारी अडीच वाजता सुरू होईल. या सामन्यात गुलाबी चेंडू वापरला जाणार आहे. मालिकेत
एक एक सामना जिंकून दोन्ही संघ बरोबरीत आहेत.
****
ट्रुजेट या विमान वाहतुक कंपनीने हैद्राबाद-नांदेड-मुंबई विमानसेवा सुरु केली आहे.
नव्याने सुरु होणाऱ्या या विमान सेवेमुळे नांदेडच्या प्रवाशांना मुंबईला दररोज विमानाने
जाता-येता येणार आहे. या सोबत नांदेड शहर हवाई मार्गाने जळगाव आणि अहमदाबाद शहराशी
जोडलं जात आहे. येत्या २ मार्चपासून ही सेवा सुरू होण्याची शक्यता आहे.
****
पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणावरून आपलं ३० वर्षांचं सामाजिक राजकीय जीवन उध्वस्त
करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप, वनमंत्री संजय राठोड यांनी केला आहे. ते
काल वाशिम जिल्ह्यात पोहरादेवी इथं पत्रकारांशी बोलत होते. पूजा चव्हाण या तरुणीच्या
मृत्यूबद्दल आपल्याला दु:ख आहे, मात्र या प्रकरणावरून घाणेरडं राजकारण केलं जात आहे,
या आरोपात काहीही तथ्य नसल्याचं राठोड यांनी सांगितलं. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे,
त्यातून सत्य बाहेर येईल, मात्र समाज माध्यमं तसंच प्रसार माध्यमातून होणारी बदनामी
थांबवा, असं आवाहनही राठोड यांनी केलं.
राठोड यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोहरादेवी परिसरात त्यांचे समर्थक मोठ्या
संख्येनं जमा झाले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या गर्दीची गंभीर दखल घेतली
असून कोविडच्या काळात अशा रीतीने आरोग्याचे नियम न पाळता गर्दी होत असेल तर संबंधितांवर
जिल्हा प्रशासन तसंच पोलीस प्रशासनाने तत्काळ कारवाई करावी असे निर्देश, मुख्यमंत्र्यांनी
दिले आहेत. वाशीमचे जिल्हाधिकारी तसंच जिल्हा पोलीस अधीक्षकांना याबाबतचा अहवाल देण्याच्या
सूचनाही देण्यात आल्या आहेत.
****
समाजाची आड घेऊन संजय राठोड हे आपण निरागस असल्याचा दावा करत असल्याचा आरोप, भाजप
नेत्या चित्रा वाघ यांनी केला आहे. समाजाला वेठीस धरून घोषणाबाजी केल्याने मुद्दा बदलत
नाही, कारण गुन्हेगाराला जात नसते, असं त्यांनी नमूद केलं. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी
नोंद घेऊन कारवाई करावी. हा प्रश्न फक्त पूजा चव्हाण आणि संजय राठोड यांच्यापुरताच
मर्यादित नाही, तर लैंगिक अत्याचार पीडित सगळ्या महिलांशी हा प्रश्न निगडित असल्याचं
मत वाघ यांनी मांडलं. हे सरकार अत्याचाऱ्यांना अभय देण्याचं काम करत असल्याची टीकाही
त्यांनी केली.
****
No comments:
Post a Comment