Wednesday, 24 February 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 24.02.2021 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 24 February 2021

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २४ फेब्रुवारी २०२१ दुपारी १.०० वा.

****

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासह सात राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशात केंद्रीय दल तैनात करण्यात आले आहेत. केंद्रीय आरोग्य सचिवांनी राज्यांना पत्र लिहून प्रभावी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत.

****

दिल्ली सरकारनं कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढलेल्या महाराष्ट्रासह पाच राज्यातून येणाऱ्या प्रवाशांना कोविड चाचणी करुनच दिल्लीत प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. अहवाल नकारात्मक आला तरच दिल्लीत प्रवेश करता येणार असल्याचं, सरकारनं म्हटलं आहे. महाराष्ट्र, केरळ, छत्तीसगढ, मध्य प्रदेश आणि पंजाब या पाच राज्यांतून दिल्लीत जाणाऱ्या नागरिकांसाठी हा नियम लागू असेल. २६ फेब्रुवारीपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार असून, १५ मार्चपर्यंत हे आदेश लागू असणार आहेत.

****

दरम्यान, राज्यात कोविड प्रादुर्भावामुळे अनेक ठिकाणी निर्बंध लावण्यात आले आहेत. औरंगाबाद शहरात आणि हिंगोली जिल्ह्यात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जालना जिल्ह्यात येत्या ३१ मार्चपर्यंत शाळा, महाविद्यालयं तसंच तालुका आणि गाव पातळीवरचे आठवडी बाजार बंद ठेवण्यात येणार आहेत. यवतमाळ जिल्ह्यातून नांदेड जिल्ह्यात येणाऱ्या सर्व प्रवाशांची कोविड तपासणी करण्यासाठी यवतमाळ सीमेवर छावणी सुरू करण्यात येत आहे.

****

देशात काल १३ हजार ७४२ नव्या कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर १०४ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. देशातली एकूण कोविड बाधितांची संख्या एक कोटी दहा लाख ३० हजार १७६ झाली असून, या संसर्गानं आतापर्यंत एक लाख ५६ हजार ५६७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर काल १४ हजार ३७ रुग्ण बरे झाले. देशात आतापर्यंत एक कोटी सात लाख २६ हजार ७०३ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून देशात सध्या एक लाख ४६ हजार ९०७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

दरम्यान, देशात आतापर्यंत एक कोटी २१ लाख ६५ हजार ५९८ नागरिकांना कोविड लसीकरण करण्यात आल्याचं, आरोग्य मंत्रालयानं सांगितलं.

****

भारत-इंग्लंड दरम्यान तिसरा कसोटी क्रिकेट सामना आजपासून अहमदाबाद मधल्या मोटेरा इथल्या सरदार वल्लभभाई पटेल मैदानात सुरु होणार आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते जगातल्या सर्वात मोठ्या या मैदानाचं औपचारिक उद्घाटन झालं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, क्रिडा मंत्री किरेन रिजिजू यावेळी उपस्थित होते. 

दिवस-रात्र खेळला जाणारा हा सामना दुपारी अडीच वाजता सुरू होईल. या सामन्यात गुलाबी चेंडू वापरला जाणार आहे. मालिकेत एक-एक सामना जिंकून दोन्ही संघ बरोबरीत आहेत.

****

मराठा आरक्षण प्रकरणामध्ये इंद्रा साहनी निवाड्याचा संदर्भ असल्यानं ही सुनावणी नऊ किंवा अकरा न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे व्हावी, अशी राज्य शासनाची अपेक्षा असल्याचं, मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. मराठा आरक्षणासंदर्भात येत्या आठ मार्च पासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु होणार असून, या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीनं काल बैठक घेतली. त्यानंतर चव्हाण वार्ताहरांशी बोलत होते. मराठा आरक्षणाचे प्रकरण ईडब्ल्यूएस तसंच इतर राज्यांच्या आरक्षण प्रकरणाशी जोडावं, ही राज्य सरकारची देखील भूमिका असून, तशी विनंती सर्वोच्च न्यायालयात यापूर्वीच करण्यात आली असल्याचं ते म्हणाले. मराठा आरक्षण टिकवण्यासाठी केंद्र सरकारकडून अपेक्षित असलेल्या सहकार्यावर विचारविनिमय, तसंच राज्याची भूमिका पुन्हा एकदा केंद्राला कळवण्याचं यावेळी निश्चित करण्यात आलं. याशिवाय मराठा समाजाच्या इतरही प्रश्नांवरही या बैठकीत चर्चा झाली.

****

नांदेड जिल्ह्याच्या मुखेड तालुक्यातल्या लेंडी धरणात शेतजमिनी आणि घर गेलेल्या धरणग्रस्त लोकांनी काल जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केलं. या उपोषणकर्त्यांची बाजू नांदेड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर यांनी जिल्हाधिकारी डॉ. विपिन ईटनकर यांच्यासमोर मांडून चर्चा केली. उपोषणार्थीचे प्रश्न मार्गी लावण्याचं लेखी आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिलं.

****

नांदेड जिल्ह्यातल्या बिलोली इथं उत्पादन शुल्क विभागाचा निरीक्षक सुभाष खंडेराये यास काल एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना अटक करण्यात आली. बिअर बारचा परवाना देण्यासाठी ऊत्पादन शुल्क विभागास शिफारस अहवाल देण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती.

****

वनमंत्री संजय राठोड यांच्या वाशिम जिल्ह्यात पोहरादेवी इथल्या दौऱ्यावेळी काल मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. याप्रकरणी वाशिम पोलिसांनी आठ ते दहा हजार लोकांवर गुन्हा दाखल केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या प्रकरणाची दखल घेतली असून, कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

****

बुलडाणा जिल्ह्यातल्या मौजे पिंपळगाव इथली सैलानी यात्रा कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्शवभूमीवर रद्द करण्यात आली आहे. २५ मार्च ते पाच एप्रिल या कालावधीत ही यात्रा भरवण्यात येणार होती.

****

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 14.08.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 14 August 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी ...