Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 28 February 2021
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक
२८ फेब्रुवारी
२०२१ सकाळी ७.१० मि.
****
· कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कोविड १९च्या नियमावलीची कडक अंमलबजावणी
करण्याचे केंद्रीय मंत्रिमंडळ सचिवाचे राज्यांना निर्देश.
· जेष्ठ तसंच अन्य रोग असलेल्या ४५ वर्षांहून अधिक वयाच्या व्यक्तिंसाठी उद्यापासून
लसीकरण नोंदणी.
· हिंगोली जिल्ह्यात उद्यापासून ७ मार्चपर्यंत संपूर्ण संचारबंदी, परभणी जिल्ह्यात
सर्व धार्मिकस्थळे सात मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश, लातूर जिल्ह्यातील जनता संचारबंदीला
उत्स्फूर्त प्रतिसाद.
· महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ऑनलाईन किंवा ऑफलाईन पध्दतीनं परीक्षा देण्याचा
पर्याय उपलब्ध.
· राज्यात आठ हजार ६२३ तर मराठवाड्यात ८५८ नव्या कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद.
· प्रत्येक जिल्ह्यात पुस्तकाचं एक गाव तयार करण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची
घोषणा.
आणि
· पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी
भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाचं राज्यभरात आंदोलन.
****
देशात कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत असलेल्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर
राज्य तसंच केंद्रशासित प्रदेशांनी कोविड-19 नियंत्रणासाठीच्या नियमावलीची कडक अंमलबजावणी
करण्याचे निर्देश केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव राजीव गौबा यांनी दिले आहेत. कोविड संदर्भात
झालेल्या एका आढावा बैठकीत ते काल बोलत होते.
महाराष्ट्र, पंजाब, गुजरात, मध्य प्रदेश छत्तीसगढ़, पश्चिम बंगाल, तेलंगणा
आणि जम्मु-काश्मीर या राज्यांमध्ये रुग्णसंख्या वेगानं वाढत आहे, गौबा यांनी या राज्यांच्या
मुख्य सचिवांसमवेत काल चर्चा केली.
दरम्यान, उद्यापासून सुरु होणाऱ्या लसीकरण कार्यक्रमात ६० वर्षांहून अधिक वयाच्या
तसंच अन्य रोग असलेल्या ४५ वर्षांहून अधिक वयाच्या व्यक्तींना लसीकरण केंद्रात नोंदणी
करता येईल असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं आहे. देशभरातल्या १० हजार शासकीय
रुग्णालयात मोफत लसीकरण केलं जाणार असून खाजगी रुग्णालय लसीकरणासाठी २५० रुपये शुल्क
आकारु शकतात असंही मंत्रालयानं सांगितलं आहे. औरंगाबाद जिल्ह्यात सात मार्चपासून ही
लसीकरण मोहीम सुरु होणार आहे.
****
हिंगोली जिल्ह्यात उद्या १ ते ७ मार्च दरम्यान पूर्णपणे संचारबंदी लागू करण्यात
आली आहे. जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी काल याबाबतचे आदेश जारी केले. १ मार्च रोजी
सकाळी ७ वाजेपासून ते ७ मार्चच्या रात्री बारा वाजेपर्यंत ही संचारबंदी लागू राहणार
आहे. सदर कालावधीत सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत दूध विक्रेते तसंच दूध केंद्रांना
व्यवसायाची मुभा देण्यात आली आहे. जिल्ह्यातली सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयं आणि
बँका फक्त शासकीय कामकाजासाठी सुरू राहतील. संचारबंदी काळात जिल्ह्यातली सर्व धार्मिकस्थळं,
प्रार्थनास्थळं, सर्व शाळा, महाविद्यालयं, सर्व मंगल कार्यालयं बंद राहतील. या काळात
औषधी दुकानं चालू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. संचारबंदी काळात सर्व नियमांची कडक
अंमलबजावणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.
****
परभणी जिल्ह्यातली सर्व धार्मिकस्थळे येत्या सात मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश
जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिले आहेत. जिल्ह्यात कोविड बाधितांच्या संख्येत मोठी
वाढ होत असल्याने, नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने काही निर्बंध आवश्यक आहेत. धार्मिक
स्थळांमध्ये होणारी गर्दी पाहता, काही कालावधीकरता धार्मिक स्थळं बंद करणं आवश्यक असल्याचं,
या आदेशात म्हटलं आहे.
जिल्ह्यातली वरिष्ठ महाविद्यालयं तसंच शिकवणी वर्ग उद्या एक मार्च ते चार मार्च
दरम्यान बंद ठेवण्याचे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. प्राध्यापकांनी ऑनलाईन
पध्दतीने अध्यापनाचे काम करावं, या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही माध्यमिक
तसंच प्रथमिक शिक्षणाधिकारी आणि महापालिकेचे आयुक्त यांच्यावर राहील, असेही आदेशात
नमूद केलं आहे.
****
लातूर जिल्हावासियांनी संपूर्ण जिल्ह्यात काल जनता संचारबंदीला उत्स्फूर्त प्रतिसाद
दिला. अत्यावश्यक कामाशिवाय लोक घराबाहेर पडलेले दिसले नाहीत. व्यापारी वर्गानेही स्वतःहून
आपली दुकानं-आस्थापना बंद ठेवून सहकार्य केलं. नागरिकांनी आजही जनता संचारबंदी पाळून
कोविड प्रतिबंधासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.
पी. यांनी केलं आहे. जिल्हा प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत लातूरकरांनी घरातच
थांबून जनता संचारबंदीचं पालन केलं, याबद्दल महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी लातूरकर
जनतेचे आभार व्यक्त केले. दरम्यान, जनता संचारबंदी असल्यामुळे कुठेही पोलीस किंवा प्रशासकीय
अधिकारी कोणाला अडवणूक करीत नसल्यामुळे काही नागरिक फिरताना दिसून येत होते, असं आमच्या
वार्ताहरानं कळवलं आहे.
****
औरंगाबाद शहरात कोरोना विषाणूच्या रुग्णांमध्ये झपाट्यानं वाढ होत असल्यामुळे दहावी
आणि बारावी वगळता अन्य वर्गांच्या शाळा तसंच कोचिंग क्लासेस येत्या १५ मार्चपर्यंत
बंद ठेवण्याचे आदेश महापालिका प्रशासक अस्तिककुमार पांडेय यांनी जारी केले आहेत. याआधी
२८ फेब्रुवारीपर्यंत ही बंदी घालण्यात आली होती मात्र, वाढता संसर्ग लक्षात घेता या
बंदीत वाढ करण्यात आली आहे.
****
राज्यात कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या प्रमाणाच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयीन
विद्यार्थी ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही पध्दतीने
परीक्षा देऊ शकतील अशी घोषणा उच्च आणि
तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी काल केली. ऑफलाईन पद्धतीनं परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना
कोरोना विषाणू संसर्गा संदर्भातल्या सर्व नियमांचं पालन करुन परीक्षा देता येईल असं
सामंत यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, अभियांत्रिकी आणि तंत्र शिक्षणाच्या विद्यार्थ्यांच्या
परीक्षा मात्र पूर्णपणे ऑनलाईनच होणार असल्याचं सामंत यांनी सांगितलं.
****
राज्यात कोविड रुग्णांचं प्रमाण दररोज वाढत असून, त्या तुलनेत रुग्ण कोविडमुक्त
होण्याचं प्रमाण कमी आहे, यामुळे राज्याच्या कोविड मुक्तीच्या दरात सतत घट होत आहे,
सध्या राज्याचा कोविड मुक्तीचा दर ९४ पूर्णांक १४ शतांश टक्के इतका झाला आहे. काल आठ
हजार ६२३ नव्या कोविड रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे राज्यभरातल्या कोविडबाधितांची
एकूण संख्या २१ लाख ४६ हजार ७७७ झाली आहे. तर काल तीन हजार ६४८ रुग्ण या संसर्गातून
मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत २० लाख २० हजार ९५१ रुग्ण, कोरोना विषाणू मुक्त झाले
आहेत. काल ५१ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात या संसर्गानं दगावलेल्या
रुग्णांची एकूण संख्या ५२ हजार ९२ झाली असून, मृत्यूदर दोन पूर्णांक ४३ शतांश टक्के
झाला आहे. सध्या राज्यभरात ७२ हजार ५३० रुग्णांवर उपचार सुरु आहेत
****
मराठवाड्यात काल नव्या ८५८ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर सहा रुग्णांचा
मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातल्या प्रत्येकी दोन, लातूर, नांदेड
जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा समावेश आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात २९७ रुग्ण आढळले. जालना जिल्ह्यात १७८, नांदेड ८०, लातूर ८२,
बीड ७७, परभणी ७०, हिंगोली ४६, तर उस्मानाबाद जिल्ह्यात २८ नवे रुग्ण आढळून आले.
****
पुढच्या मराठी दिनापर्यंत राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात एक पुस्तकाचं गाव तयार
करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. ते काल मराठी भाषा गौरव दिनानिमित्त
राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागाच्या पुरस्कार प्रदान कार्यक्रमात दूरदृश्य संवाद
यंत्रणेच्या माध्यमातून बोलत होते. मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यावेळी उपस्थित होते.
शासकीय कार्यालयांमधून वापरल्या जाणाऱ्या मराठी भाषेचं सुलभीकरण करण्याची गरज मुख्यमंत्र्यांनी
व्यक्त केली. आपण आपल्या मातृभाषेबद्दलचा न्यूनगंड न बाळगता, सर्व क्षेत्रात मराठी
बोलण्याचा प्रयत्न करावा, अनेक देशातले उच्चपदस्थ लोकही इंग्रजी न बोलता, मातृभाषेतून
बोलतात, याकडे मुख्यमंत्र्यांनी यावेळी लक्ष वेधलं.
****
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी सर्व महाराष्ट्राने आपल्या मुलांना
प्राथमिक शिक्षण मराठीतून देण्याचा संकल्प केला पाहिजे, असं आवाहन राज्यपाल भगतसिंह
कोश्यारी यांनी केलं आहे. मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून काल साहित्य, संस्कृती
तसंच समाजसेवा क्षेत्रातल्या मान्यवरांना राज्यपालांच्या हस्ते मुंबईत राजभवन इथं
‘वाग्धारा सन्मान’ देऊन गौरवण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते.
****
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त काल सर्वत्र कोविड प्रतिबंधात्मक नियमांचं पालन करून
विविध कार्यक्रम घेण्यात आले. औरंगाबाद इथं कवीसंमेलन, व्याख्यानं, ऑनलाईन व्याख्यानं
झाली. उस्मानाबाद इथं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं शहरातल्या साहित्यिकांचा
यानिमित्तानं सत्कार करण्यात आला.
लातूर इथं श्री केशवराज विद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त घेण्यात
आलेल्या शिक्षक तसंच विद्यार्थ्यांसाठीच्या विविध स्पर्धेतल्या विजेत्यांना प्रसिद्ध
साहित्यिक कवयित्री शैलजा कारंडे यांच्या हस्ते पारितोषिकं प्रदान करण्यात आली. शहरातल्या
दयानंद कला महाविद्यालयात मराठी विषयाच्या प्राध्यापकांचा गौरव करण्यात आला.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रविवारी आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून
देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रम मालिकेचा हा ७४ वा भाग असेल. आकाशवाणी
आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.
****
बीड जिल्ह्यातल्या पूजा चव्हाण या तरुणीच्या मृत्यूप्रकरणी चौकशी करून वनमंत्री
संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी करत, भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या
वतीनं काल राज्यभरात आंदोलन करण्यात आलं.
औरंगाबाद इथल्या जालना रस्त्यावर भाजप महिला पदाधिकाऱ्यांनी चक्काजाम आंदोलन करत,
संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी केली. महिला कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका
घेत राज्य सरकारविरोधात हल्लाबोल केला. पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना यावेळी ताब्यात
घेतलं.
उस्मानाबाद इथं जिल्हाधिकारी कार्यालय तसंच जिल्हा पोलीस निरीक्षक कार्यालय इथं
या घटनेचा तीव्र निषेध करत, वन मंत्री संजय राठोड यांनी राजीनामा द्यावा अशा मागणीचं
निवेदन मुख्यमंत्री तसंच गृहमंत्र्याकडे सादर करण्यात आलं.
हिंगोलीत भाजप महिला आघाडीच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. कोविडचे
नियम पाळत फक्त पाच महिला पदाधिकाऱ्यांनी हे आंदोलन केलं. यावेळी महिला मोर्चाच्या
पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन देऊन पूजा चव्हाणच्या
मृत्यूची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली.
परभणी इथं आमदार मेघना बोर्डीकर यांच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन करण्यात
आलं. यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. वसमत रस्त्यावरील दोन्ही
बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
राज्यात नवी मुंबई, मुलंड, नाशिक, धुळे, भंडारा इथंही करत भाजप महिला मोर्चाच्या
वतीनं आंदोलन करण्यात आलं.
****
हिंगोली इथं जवळा-पळशी रस्त्यावरच्या स्वप्नस्फूर्ती मंगल कार्यालयाच्या व्यवस्थापनाला
पन्नास हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. या मंगल कार्यालयाला जिल्हा प्रशासनाच्या
अधिकाऱ्यांनी भेट दिली असता, तिथे ५० पेक्षा जास्त लोक विवाह समारंभासाठी उपस्थित असल्याचं
दिसून आलं, अनेकांनी मास्क देखील घातले नव्हते, त्यामुळे ही कारवाई करण्यात आली.
****
औरंगाबाद इथं हिमायतबाग चौकात चहा विक्रेते आणि खाद्यविक्रेत्यांवर कोविड प्रतिबंधात्मक
नियमभंग केल्याप्रकरणी काल कारवाई करण्यात आली. या भागातील तीन लोखंडी टपऱ्या आणि पाच
शेड, महापालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाने जमीनदोस्त केले. मास्क न लावलेल्या नागरिकांवरही
या ठिकाणी कारवाई करण्यात आली. मनपा प्रशासक अस्तिककुमार पांडेय यांनी या नियमभंगाचा
स्वत: अनुभव घेतल्यानंतर याप्रकरणी कारवाईचे आदेश दिले.
****
औरंगाबाद इथं बँक ऑफ महाराष्ट्रच्या वतीनं काल पंतप्रधान स्वनिधी योजने अंतर्गत
कर्जवाटप करण्यात आलं, शंभर अर्जदारांना यावेळी सुमारे दहा लाखावर कर्जाचं वाटप करण्यात
आलं.
****
No comments:
Post a Comment