Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 26 February 2021
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २६ फेब्रुवारी २०२१ सायंकाळी ६.१०
****
** मातृभाषेचा
गौरव जपणं हे प्रत्येकाचे कर्तव्य - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं प्रतिपादन
** अभियांत्रिकी
तसंच तंत्रनिकेतनचा अभ्यासक्रम पुढच्या वर्षीपासून मराठी भाषेतही उपलब्ध
** शेअर्समध्ये
गुंतवणुकीचं आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणारी टोळी मुंबई पोलिसांकडून जेरबंद
** जीएसटीतल्या
जाचक अटी रद्द करण्याच्या मागणीसाठी पुकारलेल्या बंदला मराठवाड्यात उत्स्फुर्त प्रतिसाद
आणि
** कळमनुरी तालुक्यात
५ हजार ८२० विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्राचं घरपोच वाटप
****
मातृभाषा हा अभिमानाचा गौरवाचा विषय असून हा गौरव जपणं प्रत्येकाचे कर्तव्य असल्याचं
प्रतिपादन, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. विधानमंडळातील वि.स.पागे संसदीय
प्रशिक्षण केंद्र आणि मराठी भाषा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा गौरव
दिनानिमित्ताने विशेष परिसंवाद घेण्यात येत आहे, या परिसंवादाचं दूरदृष्य प्रणालीद्वारे
मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते. मराठी भाषेला
अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी गेली कित्येक वर्षे आपण प्रयत्न करत आहोत. केंद्रीय
समितीपुढे हा विषय मान्यतेसाठी प्रलंबित आहे. पुढच्या मराठी भाषा गौरव दिनापर्यंत मराठी
भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याच्या एका ध्येयाने एक होऊन पुढे जाऊ या, असं आवाहन
मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं.
शिवाजी महाराजांनी मराठी भाषेत राजव्यवहार कोष तयार केला, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी
अनेक इंग्रजी शब्दांना मराठीत प्रती शब्द दिले. असा प्रयत्न आजही व्हावा, त्यासाठी
बोली भाषेची स्पर्धा घेण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. मुख्यमंत्र्यांनी यावेळी
कुसुमाग्रजांची “मराठी माती” ही कविता वाचून दाखवली.
या परिसंवादात पहिल्या सत्रात “मराठी भाषेला अभिजात दर्जा” या विषयावर तर दुसऱ्या
सत्रात “आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून
मराठी साहित्य प्रसार आणि प्रचार” या विषयावर चर्चा होणार आहे.
****
राज्यातील अभियांत्रिकी तसंच तंत्रनिकेतनचा अभ्यासक्रम इंग्रजी भाषेबरोबर मराठी
भाषेतही उपलब्ध करून देण्याचा निर्णय उच्च व तंत्र शिक्षण विभागाने घेतला आहे. उच्च
आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली. ग्रंथालय संचालनालयाच्या
प्रबोधन पाक्षिक शताब्दी वर्ष तसंच मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमाचं सामंत यांच्या
हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते.
पुढील शैक्षणिक वर्षापासून या निर्णयाची अंमलबजावणी होईल. या निर्णयामुळे राज्यातील
विद्यार्थ्यांना मातृभाषेत तंत्र शिक्षण घेण्यास मदत आणि त्या विषयाची समज अधिक स्पष्ट होण्यास, मदत
होईल असं मतही सामंत यांनी व्यक्त केलं. केंद्रीय लोकसेवा आयोगाची तयारी करणाऱ्या मराठी
विद्यार्थ्यांसाठी दिल्लीत राहण्याची व्यवस्था करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं सामंत
यांनी सांगितलं. मराठी भाषेच्या प्रसार आणि प्रचाराचे कार्य फक्त मराठी भाषा गौरव दिनापुरते
मर्यादित न ठेवता ते वर्षभर चालू ठेवावं, असं आवाहन सामंत यांनी केलं.
****
औरंगाबाद इथं उभारल्या जात असलेल्या बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यानातल्या प्रत्येक
वृक्षाचे संवर्धन, जतन करण्यासाठी प्रशासनाने सर्वोतोपरी उपाययोजना करण्याची सूचना
पालकमंत्री सुभाष देसाई यांनी केली आहे. पालकमंत्र्यांनी आज या उद्यानाची पाहणी करून
या जागेची वैशिष्ट्यं जपण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या. आमदार अंबादास दानवे, मनपा
प्रशासक अस्तिककुमार पांडेय, यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. या उद्यानात
अधिकाधिक देशी वृक्ष लागवडीला प्राधान्य देण्यात येत असल्याबद्दल पालकमंत्र्यांनी समाधान
समाधान व्यक्त केलं. देसाई यांच्याहस्ते याठिकाणी वृक्षारोपणही करण्यात आले.
****
चंद्रपूर जिल्ह्यात चीचपल्ली इथल्या बांबू प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीला लागलेल्या
आगीची तत्काळ चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती राज्याचे मदत आणि पुनर्वसन
मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. ही आग कृत्रीम आहे. कि घातपातचा प्रकार आहे,
हे तपासण्याची नितांत गरज असल्याचं, राज्याचे माजी अर्थ, वनमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार
यांनी म्हटलं आहे, या प्रकरणाचा तपास तातडीने सीआयडीकडे देण्यात यावा, अशी मागणी मुनगंटीवार
यांनी केली. काल या केंद्राला आग लागून दोन इमारती भस्मसात झाल्याचं वृत्त आहे.
****
नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापूर तालुक्यातील बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव अद्यापही आटोक्यात
आलेला नाही. आतापर्यंत तालुक्यातल्या तब्बल २९ कुक्कुट पालन केंद्रांचे अहवाल बर्ड
फ्लू बाधित आले आहेत. तालुक्यात आतापर्यंत सहा लाखांहून अधिक कोंबड्या तर पंचवीस लाखाहून
अधिक अंडी शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट करण्यात आली आहेत.
****
शेअर मार्केटिंग मध्ये पैसे गुंतवणुकीचं आमिष दाखवून अनेक लोकांची कोट्यवधी रुपयांची
फसवणूक करणाऱ्या तिघांना मुंबई पोलिसांनी मध्यप्रदेशातल्या इंदूर इथून अटक केली आहे.
नागपूर इथल्या एका फिर्यादीने १७ लाख ८५ हजार रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार केल्यानंतर
या प्रकरणी तपास केला असता, इंदूर इथून संपर्णू देशभरात ही टोळी शेअर गुंतवणूकदार म्हणून
लोकांची फसवणूक करत असल्याचं समोर आलं. मुंबईतल्या गिरगाव परिमंडळाच्या वरिष्ठ पोलीस
निरीक्षक संध्याराणी भोसले, तपास अधिकारी पोलिस निरीक्षक अशोक उगले यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलिस ठाण्याचे सहायक
पोलिस निरीक्षक नवनाथ चौधरी आणि पथकानं ही कारवाई केली.
****
वस्तू आणि सेवा कर - जीएसटीमधल्या जाचक अटी रद्द करण्याच्या मागणीसाठी पुकारलेल्या
व्यापाऱ्यांच्या बंदला मराठवाड्यात उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. शहरी भागात बहुतांश
दुकानं आज बंद दिसून आली. औरंगाबाद शहरातल्या मुख्य बाजारपेठेतली अनेक दुकानं आणि व्यापारी
आस्थापना दुपारपर्यंत बंद होत्या.
जालना इथं नवीन मोंढ्यातल्या सर्व व्यापाऱ्यांनी दिवसभर व्यवहार बंद ठेवले. कपडा
व्यावसायिकही या बंदमध्ये सहभागी झाले. जिल्हा व्यापारी महासंघाच्या एका शिष्टमंडळानं
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून जीएसटी कायद्यातल्या जाचक अटी रद्द करण्याची मागणी
केली.
बीड शहर - जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीनंही बंद पाळण्यात आला. जिल्हा व्यापारी
संघटना, शहर कापड संघ, तसंच आदर्श मार्केट असोसिएशनच्या वतीनं निवासी उपजिल्हाधिकारी
संतोष राऊत यांना यासंदर्भात निवेदन देण्यात आलं.
हिंगोली इथं जिल्हा व्यापारी महासंघ, हिंगोली जिल्हा कर सल्लागार संघटना तसंच व्यापाऱ्यांच्या
इतर संघटना बंदमध्ये सहभागी झाल्या.या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आलं.
परभणी जिल्ह्यात बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. काही ठिकाणी कडकडीत बंद पाळण्यात
आला तर काही ठिकाणी सर्व व्यवहार नियमीतपणे सुरु असल्याचे दिसून आलं. जीएसटीतल्या अन्यायकारक
तरतुदींचा जिल्हा व्यापारी महासंघाने जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्यामार्फत पंतप्रधानांना
पाठवलेल्या निवेदनाद्वारे निषेध नोंदवला.
लातूर जिल्हा व्यापारी महासंघाने पाठिंबा दिला मात्र, शनिवारी आणि रविवारी जनता
संचारबंदी असल्यामुळे व्यापाऱ्यांनी आज व्यवहार सुरु ठेवले. लातूर व्यापारी महासंघाचे
अध्यक्ष प्रदीप सोलंकी यांनी ही माहिती दिली. लातूर व्यापारी महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी
पृथ्वीराज बी पी यांना निवेदन देण्यात आलं. व्यापाऱ्यांना जीएसटी विवरणपत्र सुलभतेने
भरता येईल असा बदल कायद्यात करण्याची विनंती या निवेदनातून केली आहे.
****
हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी
तालुक्यात शेवाळा इथं आज एकाच दिवशी, एकाच वेळी तब्बल ५ हजार ८२० विद्यार्थ्यांना जात
प्रमाणपत्राचे घरपोच वाटप करण्यात आलं. जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शाळेत महाराजस्व
अभियानांतर्गत झालेल्या या कार्यक्रमात जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी उपस्थित होते. कळमनुरी
उपविभागाने 'प्रशासन आपल्या दारी ' हे ब्रीद सत्यात उतरवले, या शब्दांत जिल्हाधिकारी
रुचेश जयवंशी यांनी विभागाचा गौरव केला. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना
प्रातिनिधिक स्वरूपात जात प्रमाणपत्राचा दाखला वितरित करण्यात आला.
****
बीड जिल्ह्यात आज ५१ नवे कोविडग्रस्त आढळले. यामध्ये सर्वाधिक २२ रुग्ण बीड तालुक्यात
आढळले. त्या खालोखाल अंबाजोगाई तालुक्यात ९, आष्टी ५, केज तसंच माजलगाव प्रत्येकी ४,
शिरुर ३, परळी २ तर गेवराई तसंच पाटोदा तालुक्यात प्रत्येकी एकेक रुग्ण आढळला.
****
केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या प्रादेशिक लोकसंपर्क ब्यूरोच्यावतीने
कोव्हिड -19 लसीकरण तसंच आत्मनिर्भर भारत जनजागृती अभियानाला परभणी जिल्ह्यात आजपासून
प्रारंभ झाला. या अभियानाच्या बहुमाध्यम रथाचं जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी हिरवा
झेंडा दाखवून तसंच फित कापून उद्घाटन केलं. या बहुमाध्यम चित्ररथामध्ये शाहीर विजय
सातोरे आणि संचाद्वारे गीत तसंच नाट्य सादरीकरणाच्या माध्यमातून कोविड लसीकरण, तसंच
आत्मनिर्भर भारत, या योजना आणि विविध उपक्रमांबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.
****
हिंगोली जिल्ह्यात कोविडचे रुग्ण झपाट्याने वाढत असताना जिल्हा रुग्णालयात वयाच्या
प्रमाणपत्रांसाठी ज्येष्ठ नागरिकांनी गर्दी केल्याचं आज दिसून आलं. जिल्हा रुग्णालयाच्या
वतीने वयाचं प्रमाणपत्र देण्यासाठी मंगळवार आणि शुक्रवार हा दिवस ठरवून देण्यात आला
आहे. कोविड प्रतिबंधात्मक नियमांचंही या ठिकाणी पालन झालं नसल्याचं, आमच्या वार्ताहरानं
कळवलं आहे.
****
लातूर जिल्ह्यात अपघाती मृत्यू आलेल्या तीन शाळकरी विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना
जिल्हा परिषदेच्या राजीव गांधी अपघात विमा योजनेतून प्रत्येकी ७५ हजार रुपये आर्थिक
मदत करण्यात आली.
****
निवृत्त सनदी अधिकारी दिवंगत भुजंगराव कुलकर्णी यांना आज औरंगाबाद इथं स्वामी रामानंद
तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थेत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. संस्थेचे माजी अध्यक्ष
असलेल्या भुजंगराव यांनी संस्थेच्या जडणघडणीत दिलेल्या योगदानाला यावेळी उजाळा देण्यात
आला.
//********//
No comments:
Post a Comment