Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 22 February 2021
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २२ फेब्रुवारी २०२१ सायंकाळी ६.१०
****
** तरुणांनी आत्मनिर्भरतेचे
ध्येय डोळ्यासमोर ठेवून नवनवीन संशोधन करावं-
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं आवाहन
** वाढीव विज बिलाच्या विरोधात भाजपचं नियोजित जेलभरो
आंदोलन स्थगित
** अहमदनगर औरंगाबाद रस्त्यावर भीषण अपघातात जालना जिल्ह्यातले
पाच तरूण ठार
** औरंगाबाद इथं एका
कोविडग्रस्ताचा मृत्यू
आणि
** हिंगोली तसंच परभणी
इथं विनामास्क फिरणाऱ्यांवर प्रशासनाची कारवाई
****
तरुणांनी आत्मनिर्भरतेचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून नवनवीन संशोधन करण्याचा प्रयत्न करावा, असं आवाहन राज्यपाल
भगतसिंह कोश्यारी यांनी केलं आहे. सोलापूर इथल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचा
सोळावा दीक्षांत समारंभ आज झाला. या समारंभात राज्यपाल कोश्यारी ऑनलाईन पद्धतीने मार्गदर्शन
करत होते. पदवीधर तरुण पिढीने निश्चित ध्येय डोळ्यासमोर ठेवून सदाचाराने आत्मनिर्भरतेकडे
वाटचाल केली तर नवा भारत निर्माण होईल, त्यातून विद्यापीठाचं आणि देशाचं नाव उज्ज्वल
करण्याचं आवाहनही राज्यपालांनी यावेळी केलं. यावेळी चार गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांना
सुवर्ण पदकं, तर ४ स्नातकांना विद्यावाचस्पती पीएच.डी पदवी प्रदान करण्यात आली.
विद्यापीठ स्तरावर विविध पुरस्कारही प्रदान करण्यात आले.
*****
वाढीव विज बिलाच्या विरोधात भारतीय जनता पक्षाने परवा बुधवारपासून राज्यभरात नियोजित
जेलभरो आंदोलन स्थगित केलं आहे. भाजप नेते आणि माजी ऊर्जामंत्री चद्रशेखर बावनकुळे
यांनी आज नागपुरात पत्रकार परिषदेत माहिती दिली. राज्यात ५६० ठिकाणी जेलभरो आंदोलन
करून, ५० हजार कार्यकर्ते अटक करून घेतील, असं या आंदोलनाचं नियोजन केलं होतं, असं
बावनकुळे यांनी सांगितलं. मात्र कोविडचा वाढता प्रादुर्भावा पाहता, मुख्यमंत्री उद्धव
ठाकरे यांनी राजकीय पक्ष, संघटनांना आंदोलनं करू नये, असं आवाहन केलं, या आवाहनाला
प्रतिसाद म्हणून परवाचं नियोजित आंदोलन स्थगित केल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं. आता
मुख्यमंत्र्यांनीही सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांच्या विज जोडणी तोडण्याच्या कारवाईला
स्थगिती द्यावी अशी मागणीही बावनकुळे यांनी केली. पेट्रोलच्या वाढत्या दराबाबत विचारलं
असता, राज्य सरकार पेट्रोलवर ३८ रुपये कर घेते तो रद्द करावा, केंद्राकडे बोट दाखवलं
जात असेल, तर राज्य सरकार आहे तरी कशाला? असा प्रश्नही बावनकुळे यांनी विचारला.
****
मध्यप्रदेशातल्या एका काँग्रेस आमदाराचा सोलापूर इथला तेल कारखाना आणि मालमत्तेवर
आयकर विभागाने छापा घातला आहे. निलेश डागा असं या काँग्रेस आमदाराचे नाव असून चिंचोळी
औद्योगिक वसाहतीत बैतुल ऑइलमिल या नावाने हा कारखाना सुरू आहे. रविवारी मध्यरात्रीपासून
सुरू झालेल्या या कारवाईत आतापर्यंत साडे सात कोटी रुपये रोखड जप्त करण्यात आली आहे.
कारवाई अद्याप सुरू असल्याने अधिकाऱ्यांकडून माहिती देण्यास टाळाटाळ केली जात आहे.
****
अहमदनगर औरंगाबाद रस्त्यावर आज पहाटे झालेल्या अपघातात जालना जिल्ह्यातल्या मंठा
इथले पाच तरूण ठार झाले. देवगड फाट्याजवळ हा अपघात झाला. शिर्डीहून औरंगाबादकडे येणारी
भरधाव कार, दुभाजक ओलांडून विरुद्ध बाजुने येणाऱ्या खासगी प्रवासी बसवर धडकली, या भीषण
अपघातात शंतनु काकडे, कैलास नेवरे, रमेश घुगे, विष्णू चव्हाण आणि दिगंबर वरकड यांचा
जागीच मृत्यू झाला. बसमधल्या कोणालाही दुखापत झाली नसल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं
आहे.
****
पाणीपुरवठा आणि स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी
आज दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक गजानन माल्या यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी
रेल्वेच्या विविध विषयांवर माल्या यांच्यासोबत चर्चा केली. विकाराबाद - लातूर रोड
- परळी वैजनाथ मार्गे तिरुपती, शिर्डी आणि मुंबईसाठी नियमित एक्सप्रेस रेल्वे सोडाव्यात,
पुणे - हैद्राबाद, मुंबई-बीदर, यशवंतपूर - लातूर , सिंकदराबाद-शिर्डी, या रेल्वेगाड्यांच्या
फेऱ्या वाढवण्यात याव्या, मच्छलीपट्टणम - बीदर गाडीचा परळी वैजनाथ पर्यंत तसंच बीदर
- कलबुर्गी डेमू गाडीचा लातूर पर्यंत विस्तार करण्याची मागणी त्यांनी केली.
****
माघी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर इथलं विठ्ठल रुख्मिणी मंदीर आज आणि उद्या
भाविकांना दर्शनासाठी मंदिर बंद आहे. त्यामुळे दिंड्या, पालख्यांसह भाविकांनी पंढरपुरला
येवू नये, असं आवाहन प्रशासनाच्यावतीनं करण्यात आलं आहे. कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर
जिल्हा प्रशासनाने संचारबंदी लागू केली आहे. पंढरपुरात पंधराशे पोलीस अधिकारी - कर्मचारी
तैनात असल्याचं उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी सांगितलं.
पैठण इथंही नाथमंदीर उद्या बंद राहणार असून, भाविकांना मर्यादित संख्येत बाहेरुनच
दर्शन घेता येणार असल्याचं, प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.
****
राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांना
कोविडची लागण झाली आहे. याबाबत त्यांनी ट्विट करून माहिती दिली.
आपली प्रकृती उत्तम असून काळजी करण्याचे
कारण नाही, असं सांगतानाच, गेल्या
दोन तीन दिवसात संपर्कात अलेल्या सर्वांनी कोविड टेस्ट करून घ्यावी, असं
आवाहन भुजबळ यांनी केलं आहे. भुजबळ
यांनी काल नाशिक इथं खासदार शरद पवार
यांच्या उपस्थितीत आमदार सरोज आहेर यांच्या विवाह सोहळ्याला उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या होत्या. भुजबळ यांनी काल अखिल भारतीय मराठी साहित्य
संमेलनासंदर्भातली बैठक तसंच नाशिक
जिल्हा कोविड आढावा बैठक घेऊन माध्यमांशी
संवादही साधला होता.
****
ठाणे शहराचे माजी महापौर, माजी आमदार आणि कोळी समाजाचे
नेते अनंत तरे यांचं आज निधन झालं, ते ६६ वर्षांचे होते. गेल्या दोन महिन्यांपासून
त्यांच्यावर ठाण्यात खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. ठाण्याचे महापौर पद ३ वेळा
भुषवलेले तरे यांनी, विधान परिषदेचे सदस्य म्हणूनही काम पाहिलं. कार्ला इथल्या एकविरा
देवस्थान मंडळाचे अध्यक्ष तसंच अखिल भारतीय कोळी समाज संघटनेचे अध्यक्ष म्हणून ते कार्यरत
होते
****
औरंगाबाद शहरातल्या एका ६८ वर्षीय कोरोना विषाणू बाधित
महिलेचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यातल्या एकूण रुग्णांची संख्या ४८ हजार
४३७ झाली असून एक हजार २५२ जण दगावले आहेत. आजपर्यंत ४६ हजार ३९९ रुग्णांनी या विषाणू
संसर्गावर मात केली आहे.
****
औरंगाबाद महापालिका हद्दीत, प्रतिबंधीत क्षेत्राबाहेरील
सार्वजनिक, खाजगी समारंभ तसंच लग्नकार्यात २०० व्यक्तींऐवजी आता ५० व्यक्तींनाच परवानगी
देण्यात येणार आहे. यासंबंधी प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी आज परिपत्रक जारी केले
आहे. कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गाच्या अनुषंगानं महापालिकेनं हा निर्णय घेतला
आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती संस्था यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई
करण्यात येणार असल्याचं या पत्रात नमूद करण्यात आलं आहे.
****
हिंगोली इथं विनामास्क फिरणाऱ्या नागरिकावर आज नगरपालिका आणि पोलीस प्रशासनाच्या
वतीने दंडात्मक कारवाई करण्यात आली. दुपारपर्यंत या पथकाने प्रत्येकी दोनशे रुपये याप्रमाणे
तब्बल ५० हजार रुपये दंड वसूल केला. दरम्यान, शहरातील शास्त्रीनगर भागात कोविड रुग्ण
आढळल्यामुळे बॅरिकेट लावून हा भाग प्रतिबंधित करण्यात आला आहे. या भागातल्या नागरिकांची
तसंच संपर्कात आलेल्यांची तपासणी करण्यात येत आहे.
****
परभणी इथंही उपविभागीय अधिकारी डॉ. संजय कुंडेटकर यांनी आज बाजारपेठेत विनामास्क
वापरणाऱ्या व्यक्ती तसंच व्यापाऱ्यांविरूध्द दंडात्मक कारवाई केली. ९० जणांना दंड ठोठावण्यात
आल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
लातूर जिल्ह्यामध्ये कोविड प्रादुर्भाव नियंत्रणात आहे. जिल्ह्यामध्ये टाळेबंदी
घोषीत करण्यासारखी परिस्थिती आज तरी नाही, असं लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.
पी. आणि पालकमंत्री अमित देशमुख यांनी आज पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं. कोरोना दुसऱ्यांदा
सक्रिय होऊ नये यासाठी प्रशासन तसंच नागरिकांनी दक्ष राहण्याची गरज असल्याचं पालकमंत्री
देशमुख यांनी सांगितलं. प्रत्येक नागरिकाने मास्कचा वापर करावा, गर्दी करू नये. सॅनिटायझरचा
वापर करावा, असं आवाहन देशमुख यांनी केलं. जिल्ह्यातल्या शाळा, महाविद्यालयं, खासगी
शिकवणीचे वर्ग बंद ठेवावेत, अशीही परिस्थिती सध्या नसल्याचं देशमुख म्हणाले. प्रशासनानं
कोविड संदर्भात जनजागृती करण्यासाठी नाविन्यपूर्ण योजना राबवाव्यात अशी सूचनाही पालकमंत्र्यांनी
केली.
****
परभणी जिल्ह्याच्या सोनपेठ तालुक्यात पोहंडुळ रेती घाटातून नियमबाह्यपणे वाळू उपसा
सुरू असल्यानं, शेतकरी आक्रमक झाले आहेत.अवैध रेती उत्खनन तत्काळ थांबवण्याच्या मागणीसाठी
या शेतकऱ्यांनी आजपासून पाण्यात उतरुन आंदोलन सुरू केलं आहे. या संदर्भात शेतकऱ्यांनी
आपल्या मागण्यांचं निवेदन सोनपेठच्या तहसीलदारांकडे सादर केलं आहे.
****
औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या समिती सदस्य
निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या वतीनं आमदार अंबादास दानवे यांनी आज उमेदवारी अर्ज
दाखल केला. यावेळी कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष कल्याण काळे, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष कैलास
पाटील,यांच्या सह कार्यकर्ते उपस्थित होते.
//**********//
No comments:
Post a Comment