आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२५ फेब्रुवारी २०२०
सकाळी ११.०० वाजता
****
औरंगाबाद
शहरात सरकारी कार्यालयांत विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना अॅन्टिजेन चाचणी केल्यानंतरच
प्रवेश देण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे. त्यासाठी प्रत्येक कार्यालयात पथकं तैनात
करण्यात आली आहेत.
****
कल्याण-विशाखापट्टणम
या राष्ट्रीय महामार्गावर बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यातल्या मातोरी-तिंतरवणी जवळ
झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये भाजपचे जेष्ठ नेते
सुधीर मुनगंटीवार यांची चुलत बहीण ममता तगडपल्लेवार आणि मेव्हणे विलास तगडपल्लेवार
असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. काल सायंकाळी याठिकाणी असलेल्या पुलावरुन
गाडी खाली पडून हा अपघात झाला.
****
उस्मानाबाद
इथं जिल्हास्तरीय बँकर्स समन्वय समितीच्या बैठकीत राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान
अंतर्गत महिला स्वयंसहाय्यता समुहांची प्रलंबित कर्ज प्रकरणं तसंच खाते उघडणीसाठी प्रलंबित
प्रकरणांचा बँकनिहाय आढावा घेण्यात आला. सर्व बँकांनी महिला स्वयंसहाय्यता समूहांची
प्रलंबित कर्जप्रकरणे तात्काळ निकाली काढावीत, असं या बैठकीत सांगण्यात आलं.
****
महिला
आर्थिक विकास महामंडळ आणि परभणी जिल्ह्याच्या सोनपेठ इथल्या सर्वोदय लोकसंचलित साधन
केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानं, सोनपेठ तालुक्यातल्या शेतकरी महिलांना खते आणि कीड
व्यवस्थापन, कीटकनाशकांचा वापर, याविषयी मार्गदर्शन करण्यात आलं. जर्मनी इथल्या जीआयझेड
बायर कंपनीच्या सहकार्यानं मोफत बियाणे, खते आणि कीटकनाशकांचं वाटप करण्यात आलं.
****
औरंगाबाद
जिल्ह्यात कन्नड तालुक्यातल्या करंजखेडा गावात घरगुती तसंच व्यावसायिक वापराचे गॅस
सिलिंडर आणि सार्वजनिक वितरण व्यवस्थेतल्या तांदळाचा काळाबाजार करणाऱ्या चौघांना पोलिसांनी
अटक केली आहे. त्यांच्याकडून ११५ गॅस सिलिंडर आणि नऊ हजार १५० किलो तांदूळ असा एकूण
५ लाख ६१ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
****
परभणी
जिल्ह्यात पाथरी इथं पोलिसांनी एक अवैध पिस्तुल जप्त केलं. याप्रकरणी सय्यद चाऊस मोहम्मद
चाऊस याच्यासह अन्य एका व्यक्तीविरूध्द पाथरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला
आहे.
****
No comments:
Post a Comment