Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 25 February
2021
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २५ फेब्रुवारी २०२१ दुपारी १.०० वा.
****
केंद्र
सरकारनं खासगी क्षेत्रातल्या बँकांवरचे सरकारशी संबंधित व्यवहारांवरचे निर्बंध हटवले
आहेत. कर आणि इतर महसूल देयक सुविधा, निवृत्तवेतन देयक आणि लघू बचत योजनांचा यामध्ये
समावेश आहे. या निर्णयामुळे खासगी बँकांच्या ग्राहकांना फायदा होईल, बँकांमधली स्पर्धा
वाढेल आणि ग्राहक सेवांचा दर्जा वाढण्यास मदत होईल. या निर्णयानंतर रिझर्व्ह बँक खासगी
क्षेत्रातल्या बँकांना सरकारी कामकाजाचे अधिकार बहाल करु शकते.
****
घरगुती
गॅस सिलेंडरच्या किंमतीत तेल कंपन्यांनी २५ रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे दिल्लीत
विनाअनुदानित एलपीजी गॅस सिलेंडर आता ७९४ रुपयांना मिळणार आहे. हे दर आजपासून लागू
होत असून, यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर आर्थिक ताण वाढणार आहे. फेब्रुवारी महिन्यात
तीन वेळा एलपीजी गॅस सिलेंडरचे दर वाढले आहेत.
****
देशात
काल १६ हजार ७३८ नव्या कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर १३८ रुग्णांचा
उपचारादरम्यान मृत्यू झाला. देशातली एकूण कोविड बाधितांची संख्या एक कोटी दहा लाख ४६
हजार ९१४ झाली असून, या संसर्गानं आतापर्यंत एक लाख ५६ हजार ७०५ रुग्णांचा मृत्यू झाला
आहे. तर काल ११ हजार ७९९ रुग्ण बरे झाले. देशात आतापर्यंत एक कोटी सात लाख ३८ हजार
५०१ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या एक लाख ५१ हजार ७०८ रुग्णांवर उपचार
सुरु आहेत.
दरम्यान,
देशात आतापर्यंत एक कोटी २६ लाख ७१ हजार १६३ नागरिकांना कोविड लसीकरण करण्यात आल्याचं,
आरोग्य मंत्रालयानं सांगितलं.
****
येत्या
जागतिक महिला दिनी आठ मार्चपासून राज्यात महासमृद्धी महिला सक्षमीकरण अभियान राबवण्यात
येणार आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी ही माहिती दिली. याअंतर्गत शेतीच्या
सातबारा उताऱ्यावर पती पत्नीचं नाव लावण्याबरोबरच मालमत्तेवरही पती पत्नीचं नाव लावण्याची
मोहिम राबवण्यात येणार असल्याचं, त्यांनी सांगितलं. जिल्हा, तालुका आणि ग्रामपंचायत
पातळीवरही महिला मेळावे, प्रदर्शनं आदींचं आयोजन करुन, या अभियानाचा प्रारंभ करण्यात
येईल. अभियानात उत्कृष्ट कामगिरी करणारे जिल्हे, तालुके आदी विविध घटकांना, पुरस्कार
देऊन गौरवण्यात येणार असल्याचं मुश्रीफ यांनी सांगितलं.
****
लातूर
जिल्हा दक्षता आणि नियंत्रण समितीच्या सदस्यांनी जिल्ह्यातल्या संवेदनशील गावात प्रत्यक्ष
भेट द्यावी आणि तिथल्या पिडीतांना दिल्या जाणाऱ्या सोयी सुविधांची चौकशी करुन अडचणी
सोडवण्याचा प्रयत्न करावा अशा, सूचना जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी दिल्या
आहेत. जिल्हा दक्षता आणि संनियंत्रण समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी पोलीस अधीक्षक
निखील पिंगळे यांनी, जिल्ह्यातल्या प्रलंबित असलेल्या प्रकरणाची माहिती दिली.
****
उस्मानाबाद
जिल्ह्यातल्या नैसर्गिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना २० कोटी ५८ लाख रुपयांची नुकसान
भरपाई मंजूर झाली आहे. एक फेब्रुवारी २०२० ते ३१ मार्च २०२० या कालावधीत वादळी वारा,
पाऊस आणि गारपीट यामुळे जिल्ह्यातल्या शेतीपिकांचं नुकसान झालं होतं. कळंब तालुक्यात
नुकसानीचा आकडा अधिक असल्यानं या तालुक्यासाठी १९ कोटी २७ लाख रुपयांची नुकसान भरपाई
मंजूर करण्यात आली आहे. ही मदतीची रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करणार
असल्याचं जिल्हा प्रशासनानं सांगितलं.
****
औरंगाबाद
शहरात महापालिकेच्या नागरी मित्र पथकांनी प्लास्टिक वापरणाऱ्या विक्रेत्यांकडून ३६
हजार रुपयांचा दंड वसूल केला. तर कोचिंग क्लासेसमध्ये कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक
नियमांचं पालन न करणं, शहरात विनामास्क फिरणं आणि रस्त्यांवर कचरा टाकणाऱ्यांवरही कारवाई
करत, सव्वा लाख रूपयांचा दंड वसूल केला. पालिका प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांच्या
निर्देशानुसार नागरी मित्र पथकांकडून ही कारवाई केली जात आहे.
****
दक्षिण
सोलापूर तालुक्यात अंत्रोळी इथल्या मतिमंद निवासी विद्यालयातल्या ४६ मुलांना कोरोना
विषाणूची लागण झाली आहे. निवासी विद्यालयात इतक्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना
कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याची ही पहिलीच घटना आहे. जिल्हा आरोग्य विभागानं याची
गंभीर दखल घेतली असून, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव हे आरोग्य पथकासह
अंत्रोळीला रवाना झाले आहेत. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बुधवारी सोलापूर जिल्ह्यातल्या
सर्व शाळा सात मार्च पर्यंत बंद करण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे.
****
गडचिरोली
जिल्ह्यात एटापल्ली उपविभागाअंतर्गत मौजा कोकोटी परिसरात नक्षलवादी कॅम्प उधळून लावण्यात
पोलिसांना यश आलं आहे. यावेळी पोलिसांनी घातपाती साहित्य जप्त केलं. नक्षलवाद्यांच्या
कॅम्पसंदर्भात पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर विशेष अभियान पथक आणि विशेष कृती दलाच्या
जवानांनी ही कारवाई केली. या परिसरातले सर्व नक्षलवादी पळून गेल्याचं पोलिसांनी सांगितलं.
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी येत्या रविवारी २८ फेब्रुवारीला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून
देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ७४वा भाग असेल.
****
No comments:
Post a Comment