Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 23 February 2021
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक
२३ फेब्रुवारी
२०२१ सकाळी ७.१० मि.
****
**
कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर
मंत्र्यांचे नियोजित कार्यक्रम, आंदोलनं रद्द; बुलडाणा जिल्ह्यात पाच तालुक्यात एक मार्च पर्यंत कडक टाळेबंदी
**
राज्यात पाच हजार २१० नवे कोविड
रुग्ण, मराठवाड्यात पाच रुग्णांचा मृत्यू तर ३०७ नव्या रुग्णांची नोंद
**
माघी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरचं विठ्ठल रुख्मिणी
तसंच पैठणचं नाथमंदीर भाविकांसाठी आज बंद राहणार
**
औरंगाबाद शहरात सार्वजनिक, खाजगी समारंभ तसंच लग्नकार्यासाठी
आता केवळ ५० व्यक्तींनाच परवानगी
**
औरंगाबाद, परभणी आणि बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या
संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठीच्या उमेदवारी अर्जांची आज छाननी
आणि
**
अहमदनगर - औरंगाबाद रस्त्यावर झालेल्या अपघातात जालना जिल्ह्यातल्या
मंठ्याचे पाच तरूण ठार
****
राज्यात कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे यांच्या आवाहनानंतर, नियोजित कार्यक्रम, आंदोलनं रद्द करण्याचा निर्णय
संबंधित घेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित
पवार यांच्यासह अनेक मंत्र्यांनी नियोजित दौरे रद्द अथवा स्थगित केले आहेत. तर भारतीय
जनता पक्षानं आपलं वाढीव विज बिलाच्या विरोधातलं उद्यापासूनचं राज्यभरातलं नियोजित
जेलभरो आंदोलन स्थगित केलं आहे. भाजप नेते आणि माजी ऊर्जामंत्री चद्रशेखर बावनकुळे
यांनी काल नागपुरात पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. राज्यात ५६० ठिकाणी जेलभरो आंदोलन
करून, ५० हजार कार्यकर्ते अटक करून घेतील, असं या आंदोलनाचं नियोजन केलं होतं, असं
बावनकुळे यांनी सांगितलं.
कोरोनाचा प्रादुर्भाव आणि राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री
छगन भुजबळ यांनाही कोविडची लागण झाली आहे. याबाबत त्यांनी ट्विट करून माहिती दिली.
आपली प्रकृती उत्तम असून काळजी करण्याचे कारण नाही, असं सांगतानाच, गेल्या दोन तीन
दिवसात संपर्कात अलेल्या सर्वांनी कोविड टेस्ट करून घ्यावी, असं आवाहन भुजबळ यांनी
केलं आहे. औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलिल यांनाही कोरोना विषाणूची लागण झाली आहे.
त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
दरम्यान, कोरोनाचे रुग्ण वाढत असले, तरी दहावी - बारावीच्या परिक्षा ऑनलाईन घेणं
शक्य नसल्याचं, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे. परिक्षांसंदर्भात
काल मुंबईत झालेल्या बैठकीत त्या बोलत होत्या. विद्यार्थ्यांची संख्या मोठी असल्यानं,
परिक्षा ऑफलाईन म्हणजेच परिक्षा केंद्रांवरच होतील, असं गायकवाड यांनी स्पष्ट केल.
मंत्रालयातल्या ३५ कर्मचारीही विषाणू बाधित असल्याचं स्पष्ट झालं आहे.
****
बुलडाणा जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पाच
तालुक्यात एक मार्च पर्यंत कडक टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. बुलडाणा, चिखली, खामगाव, देऊळगावराजा आणि मलकापूर या पाच
नगर परिषद क्षेत्रांतर्गत ही टाळेबंदी आहे. जीवनावश्यक सोडून इतर सर्व दुकानं बंद
ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनानं काढले असून,
किराणा, औषधी, भाजीपाला आणि पीठ गिरण्या सकाळी
आठ ते दुपारी तीन वाजेपर्यंत सुरु राहतील.
जळगाव जिल्ह्यातही रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली
आहे.
****
दरम्यान, राज्यात पुन्हा एकदा कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असून, पुन्हा टाळेबंदी
परवडणार नाही, नागरीकांनी नियम पाळावे असं आवाहन, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केलं
आहे. त्यांनी काल राज्यातल्या जनतेला लिहिलेल्या पत्रात, पुन्हा एकदा सामुहिक लढाई
लढावी लागणार असल्याचं म्हटलं आहे.
****
राज्यात काल पाच हजार २१० नव्या कोविड रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे
राज्यभरातल्या कोविडबाधितांची एकूण संख्या २१ लाख ६ हजार ९४ झाली आहे. काल १८
रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात या संसर्गानं
दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या ५१ हजार ८०६ झाली असून, मृत्यूदर दोन पूर्णांक ४६ शतांश टक्के झाला आहे. काल पाच हजार ३५ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत १९ लाख ९९ हजार ९८२ रुग्ण, कोरोना
विषाणू मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९४ पूर्णांक ९६ टक्के इतका झाला आहे. सध्या राज्यभरात
५३ हजार ११३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
मराठवाड्यात काल नव्या ३०७ कोरोना विषाणू
बाधित रुग्णांची नोंद झाली, तर पाच रुग्णांचा मृत्यू
झाला. मृतांमध्ये लातूर जिल्ह्यातल्या तीन, तर औरंगाबाद आणि
नांदेड जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात १३२ नवे रुग्ण आढळले. जालना जिल्ह्यात १३७, नांदेड
५९, बीड ३९, लातूर ३५, परभणी २२, उस्मानाबाद ११ तर हिंगोली जिल्ह्यात
काल नवे नऊ रुग्ण आढळले.
****
औरंगाबाद महापालिका हद्दीत, प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील सार्वजनिक, खाजगी समारंभ
तसंच लग्नकार्यात २०० व्यक्तींऐवजी आता ५० व्यक्तींनाच परवानगी देण्यात येणार आहे.
यासंबंधी प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी काल परिपत्रक जारी केलं आहे. कोरोना विषाणूच्या
वाढत्या संसर्गाच्या अनुषंगानं महापालिकेनं हा निर्णय घेतला आहे. या आदेशाचे उल्लंघन
करणाऱ्या व्यक्ती संस्था यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचं या
पत्रात नमूद करण्यात आलं आहे.
****
माघी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर इथलं विठ्ठल रुख्मिणी मंदीर आज भाविकांसाठी
बंद आहे. त्यामुळे दिंड्या, पालख्यांसह भाविकांनी पंढरपुरला येवू नये, असं आवाहन प्रशासनाच्यावतीनं
करण्यात आलं आहे. कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने संचारबंदी
लागू केली आहे. पंढरपुरात पंधराशे पोलीस अधिकारी - कर्मचारी तैनात असल्याचं उपविभागीय
पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी सांगितलं. मात्र पंढरपूरमध्ये प्रतिनिधीक स्वरूपात माघ वारी जया एकादशी साजरी होत असून
मंदिर समिती कडून परंपरा जपली जात आहे. त्यानिमित्तानं विठ्ठल रुक्मिणीचा गाभारा आणि मंदीर विविध फुलांनी
सजवण्यात आला आहे.
****
पैठण इथंही नाथमंदीर आज बंद राहणार असून, भाविकांना मर्यादित संख्येत बाहेरुनच
दर्शन घेता येणार असल्याचं, प्रशासनाकडून सांगण्यात आलं.
नांदेड जिल्ह्यातल्या माहूरगड इथलं दत्तात्रय मंदिर पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात
आलं आहे. देवस्थान समितीनं यासंदर्भातलं पत्रक काल जारी केलं.
****
कोरोनाच्या नव्या संकटाकडे गांभिर्याने बघण्याची आवश्यकता असून, टाळेबंदीसारखा
कठोर निर्णय टाळायचा असेल तर नागरिकांनी नियमांचे काटेकोर पालन करण्याचं आवाहन सार्वजनिक
बांधकाम मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केलं आहे. ते काल समाज माध्यमांवरून
नागरिकांशी संवाद साधत होते. नागरिकांनी मास्क, सॅनिटायझेशन आणि सुरक्षित सामाजिक अंतर
ही त्रिसुत्री स्वीकारण्याची गरज आहे, हे नियम न पाळणऱ्या लोकांविरुद्ध जिल्हा प्रशासनानं
दंडात्मक कारवाई करावी, अशा सूचना चव्हाण यांनी दिल्या.
****
लातूर जिल्ह्यामध्ये कोविड प्रादुर्भाव नियंत्रणात आहे. जिल्ह्यामध्ये टाळेबंदी
घोषीत करण्यासारखी परिस्थिती आज तरी नाही, असं लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.
पी. आणि पालकमंत्री अमित देशमुख यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केलं. कोविड प्रादुर्भाव
पुन्हा होऊ नये यासाठी प्रशासन तसंच नागरिकांनी दक्ष राहण्याची गरज असल्याचं पालकमंत्री
देशमुख यांनी सांगितलं. प्रत्येक नागरिकानं मास्कचा वापर करावा, गर्दी करू नये, सॅनिटायझरचा
वापर करावा, असं आवाहन त्यांनी केलं. जिल्ह्यातल्या शाळा, महाविद्यालयं, खासगी शिकवणीचे
वर्ग बंद ठेवावेत, अशीही परिस्थिती सध्या नसल्याचं देशमुख म्हणाले. प्रशासनानं कोविड
संदर्भात जनजागृती करण्यासाठी नाविन्यपूर्ण योजना राबवाव्यात अशी सूचनाही पालकमंत्र्यांनी
केली आहे.
****
हिंगोली इथं विनामास्क फिरणाऱ्या नागरिकावर काल नगरपालिका आणि पोलीस प्रशासनाच्या
वतीनं दंडात्मक कारवाई करण्यात आली. दुपारपर्यंत या पथकानं प्रत्येकी दोनशे रुपये याप्रमाणे
तब्बल ५० हजार रुपये दंड वसूल केला. दरम्यान, शहरातल्या शास्त्रीनगर भागात कोविड रुग्ण
आढळल्यामुळे बॅरिकेट लावून हा भाग प्रतिबंधित करण्यात आला आहे. या भागातल्या नागरिकांची
तसंच संपर्कात आलेल्यांची तपासणी करण्यात येत आहे.
****
परभणी इथंही उपविभागीय अधिकारी डॉ. संजय कुंडेटकर यांनी काल बाजारपेठेत विनामास्क
फिरणाऱ्या व्यक्ती तसंच व्यापाऱ्यांविरूध्द दंडात्मक कारवाई केली. या कारवाईत ९० जणांना
दंड ठोठावण्यात आल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
औरंगाबाद, परभणी आणि बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी
उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत काल संपली. या अर्जांची आज छाननी होणार आहे. औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती
सहकारी बॅंकेच्या समिती सदस्य निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या वतीनं आमदार अंबादास
दानवे यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष कल्याण काळे,
राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष कैलास पाटील,यांच्या सह कार्यकर्ते उपस्थित होते.
परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या २१ जागांसाठी काल अखेरच्या
दिवसापर्यंत १५४ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी
ही माहिती दिली.
बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक मंडळ निवडणुकीत सोमवारी उमेदवारी अर्ज
भरण्याच्या शेवटच्या दिवशी तीस पेक्षा जास्त उमेदवारांचे एकूण ८७ अर्ज दाखल झाले.
****
परभणी जिल्ह्यातील ज्येष्ठ विधीज्ञ आणि मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे माजी अध्यक्ष
प्रतापराव बांगर यांचं आज पहाटे साडे तीन वाजता निधन झालं. ते ६८ वर्षांचे होते. त्यांनी
१९९१ – ९२ मध्ये लोकसभेची निवडणूक लढवली होती. त्यानंतर शिवसेनेच्या माध्यमातून युती
सरकारच्या काळात ते मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष झाले होते. त्यांच्या पार्थिवावर
आज दुपारी एक वाजता परभणीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
****
हिंगोली जिल्ह्याच्या कळमनुरी तालुक्याचे उप विभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर यांनी
महाराजस्व अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी विशेष मोहीम आखली आहे. याविषयी
अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर ..........
कळमनुरी तालुक्याच्या ७९ कनिष्ठ शाळा महाविद्यालयाच्या
८ वी ते १२ वी वर्गात शिकणाऱ्या ५८२० विद्यार्थ्यांना एकाच वेळी त्याच्याच शाळेत जात
प्रमाणपत्राचे वितरण करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी पोलीस अधीक्षक राकेश
कलासागर यांच्या हस्ते शेवळा जिल्हा परिषद प्रशालेत प्रातिनिधीक स्वरुपात वितरण होणार
आहे. एकाच वेळी एव्हढ्या मोठ्या प्रमाणावर जात प्रमाणपत्राचे वितरण करुन उपविभागीय
अधिकारी प्रशांत खेडेकर यांनी विद्यार्थी व पालकांची सरकारी कचेरीतील पायपीट थांबवून
महाराजस्व अभियानाचा उद्देश प्रत्यक्षात उतरवला आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी रमेश कदम
हिंगोली..
****
अहमदनगर - औरंगाबाद रस्त्यावर काल पहाटे झालेल्या अपघातात जालना जिल्ह्यातल्या
मंठा इथले पाच तरूण ठार झाले. देवगड फाट्याजवळ हा अपघात झाला. भरधाव कार, दुभाजक ओलांडून
विरुद्ध बाजूने येणाऱ्या खासगी प्रवासी बसवर धडकली, या भीषण अपघातात शंतनु काकडे, कैलास
नेवरे, रमेश घुगे, विष्णू चव्हाण आणि दिगंबर वरकड यांचा जागीच मृत्यू झाला. बसमधल्या
कोणालाही दुखापत झाली नसल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
पाणीपुरवठा आणि स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी काल दक्षिण मध्य रेल्वेचे
महाव्यवस्थापक गजानन माल्या यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी रेल्वेच्या विविध विषयांवर
माल्या यांच्यासोबत चर्चा केली. विकाराबाद - लातूर रोड - परळी वैजनाथ मार्गे तिरुपती,
शिर्डी आणि मुंबईसाठी नियमित एक्सप्रेस रेल्वे सोडाव्यात, पुणे - हैद्राबाद, मुंबई-बीदर,
यशवंतपूर - लातूर, सिंकदराबाद-शिर्डी, या रेल्वेगाड्यांच्या फेऱ्या वाढवण्यात याव्या,
मच्छलीपट्टणम - बीदर गाडीचा परळी वैजनाथ पर्यंत तसंच बीदर - कलबुर्गी डेमू गाडीचा लातूर
पर्यंत विस्तार करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.
****
परभणी जिल्ह्याच्या सोनपेठ तालुक्यात पोहंडुळ रेती घाटातून नियमबाह्यपणे वाळू उपसा
सुरू असल्यानं, शेतकरी आक्रमक झाले आहेत. अवैध रेती उत्खनन तत्काळ थांबवण्याच्या मागणीसाठी
या शेतकऱ्यांनी कालपासून पाण्यात उतरुन आंदोलन सुरू केलं आहे. या संदर्भात शेतकऱ्यांनी
आपल्या मागण्यांचं निवेदन सोनपेठच्या तहसीलदारांकडे सादर केलं आहे.
****
औरंगाबाद इथं थकीत मालमत्ता कर तसंच पाणीपट्टी वसुलीसाठी महापालिकेचे प्रशासक आस्तिक
कुमार पांडेय यांनी विशेष वसुली कृतीदलाची स्थापना केली आहे. अपर्णा थेटे यांच्या नेतृत्वात
या कृतीदलाने काल शहराच्या विविध भागात वसुली मोहीम राबवत, तीन लाख ६० हजारावर थकीत
कर वसूल केला.
****
माझा गाव सुंदर गाव उपक्रमांतर्गत परभणी जिल्ह्याच्या मानवत तालुक्यातल्या ताडबोरगाव
ग्रामपंचायतीमध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. नाल्यांची स्वच्छता करून शोषखड्डे
तयार करण्यात आले, तसंच काटेरी बाभळी काढण्यात आल्या. स्वच्छ भारत मिशन कक्षातले अधिकारी,
आशाताई, अंगणवाडी ताई यांच्यासह ग्रामस्थ या मोहिमेत उत्स्फुर्तपणे सहभागी झाले होते.
****
उस्मानाबाद तालुक्यात ढोकी इथला तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना सुरू करावा या
मागणीसाठी, तेरणा बचाव संघर्ष समितीच्यावतीनं काल कारखाना स्थळावर मोर्चा काढण्यात
आला. हजारोंच्या संख्येने शेतकरी पायी, बैलगाडी तसंच ट्रॅक्टर घेऊन या मोर्चात सहभागी
झाले. मोर्चेकऱ्यांनी तोंडाला मास्क बांधून कोविड नियमांचं पालन केल्याचं आमच्या वार्ताहरानं
कळवलं आहे. गेल्या १३ वर्षापासून हा कारखाना बंद आहे. या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी
ढोकी गावातले संपूर्ण व्यवहार काल बंद ठेवण्यात आले होते.
****
परभणी इथं महानगर पालिका, कामगार कर्मचारी संघटनेनं महापालिका कार्यालयासमोर कालपासून
धरणे आंदोलन सुरू केलं आहे. सातवा वेतन आयोग तत्काळ लागू करावा, तसंच कालबध्द पदोन्नती
द्यावी, आकृतिबंधानुसार शैक्षणिक पात्रता असणाऱ्या कर्मचाऱ्यांना तत्काळ पदोन्नती द्यावी,
या मागणीसाठी आंदोलन केलं जात असल्याचं संघटनेकडून सांगण्यात आलं. यापूर्वी १३ जानेवारी
रोजी दिलेल्या तपशीलवार निवेदनाची दखल घेतली नसल्याबद्दल संघटनेनं असंतोष व्यक्त केला
आहे.
****
तुळजापूर इथं तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी
मंदिर परिसरात दिवसभर औषध फवारणी तसंच स्वच्छता केली जात आहे. भाविकांच्या संख्येवरही
मर्यादा आणण्यात आली असून, तहसीलदार सौदागर तांदळे आणि जनसंपर्क अधिकारी नागेश शितोळे
यांच्या माध्यमातून दिवसभर मंदिर परिसरात देखरेख ठेवली जात आहे.
//************//
No comments:
Post a Comment