Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 26 February 2021
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक
२६ फेब्रुवारी
२०२१ सकाळी ७.१० मि.
****
** सामाजिक माध्यमं आणि ओटीटी वर टाकण्यात येणाऱ्या मजकुराबाबत केंद्र
सरकारच्या मार्गदर्शक सूचना जारी
** येत्या एक ते दहा
मार्च दरम्यान राज्य विधीमंडळाचं अधिवेशन, आठ मार्चला राज्याचा अर्थसंकल्प मांडला जाणार
** ग्रामीण भागात तीन
हजार २०० चौरस फुटापर्यंतच्या बांधकामाला परवानगीची गरज नाही- ग्रामविकास मंत्री हसन
मुश्रीफ
** कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा
विचार करुन गरज भासल्यास एक मार्च पासून शाळा बंद ठेवण्याचा निर्णय स्थानिक पातळीवर
घेण्याच्या शिक्षण मंत्र्यांच्या सूचना
**
राज्यात आठ हजार ७०२ तर
मराठवाड्यात ६५४ नव्या कोरोना विषाणू बाधित
रुग्णांची नोंद
आणि
** इंग्लंडविरुद्धच्या
तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा दुसऱ्याच दिवशी दहा गडी राखून विजय
****
सामाजिक माध्यम - सोशल मिडिया आणि ओव्हर द टॉप - ओटीटी वर टाकण्यात येणाऱ्या मजकुराबाबत
नवीन मार्गदर्शक सूचना केंद्र सरकारनं काल जारी केल्या.
यात फेसबूक, ट्विटर आदी सोशल मिडिया कंपन्या आणि
नेटफ्लिक्स, ॲमेझॉन प्राईम, हॉटस्टार आणि
ओटीटी कंपन्यांना नवे नियम पाळणं बंधनकारक असल्याचं माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर
प्रसाद यांनी सांगितलं. तक्रारींचं निवारण करण्यासाठी सोशल मिडियाला
वेगळी प्रणाली बंधनाकरक, नियमानुसार २४ तासात तक्रार नोंदवणं
आणि १५ दिवसात तिचं निराकरण करणं, तक्रार निवारणाची जबाबदारी
असलेल्या अधिकाराचं नाव जाहीर करणं बंधनकारक, अश्लिलतेबाबतचा
विशेषत: महिलांबाबतचा मजकूर, चित्रे,
व्हिडिओ आदी सामग्री २४ तासात हटवणं, कोणतीही अफवा,
चुकीचा मजकूर संबंधित सोशल मिडियावर पहिल्यांदा कोणी टाकला याची माहिती
सरकारला देणं बंधनकारक, सर्व प्लॅटफॉर्मवर पॅरेंटल लॉकची सुविधा
असणं बंधनकारक करण्यात आलं आहे. ओटीटी आणि डिजिटल माध्यमांचं
नियमन माहिती प्रसारण खात्याकडे, तर मध्यस्थ माध्यमांचं संचालन
माहिती तंत्रज्ञान खात्याकडे राहील, असं सरकारनं सांगितलं आहे.
****
राज्याचं
अर्थसंकल्पीय अधिवेशन एक ते दहा मार्च दरम्यान होणार असल्याची माहिती, संसदीय कार्य
मंत्री अनिल परब यांनी दिली. अधिवेशनाचा कालावधी ठरवण्यासाठी काल विधानभवनात कामकाज
सल्लागार समितीची बैठक झाली. एक मार्चला राज्यपालांच्या अभिभाषणानं अधिवेशनाच्या कामकाजाला
सुरूवात होणार असून, आठ मार्चला राज्याचा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. पहिल्याच दिवशी
पुरवणी मागण्या सादर केल्या जातील, आणि दोन मार्चला अभिभाषणावर चर्चा होईल. तीन आणि
चार तारखेला पुरवणी मागण्यांवर चर्चा पूर्ण होईल. पाच तारखेला विरोधी पक्षाचा प्रस्ताव
आणि विधेयकं मांडली जातील, त्याचप्रमाणे अशासकीय कामकाजही याच दिवशी होईल. आठ तारखेला
राज्याचा अर्थसंकल्प मांडल्यानंतर, नऊ आणि दहा तारखेला अर्थसंकल्पावर चर्चा होऊन वित्त
विधेयकं मंजूर केलं जाईल, असंही परब यांनी सांगितलं.
दरम्यान,
चर्चेपासून पळ काढण्यासाठी सरकारनं अधिवेशनाचा कालावधी कमी केला असल्याचा आरोप, विरोधी
पक्षांनी केला आहे.
****
राज्यातल्या
ग्रामीण भागात सुमारे तीन हजार २०० स्क्वेअर फुटापर्यंतच्या भुखंडावरील बांधकामांना
आता नगर रचनाकाराच्या परवानगीची गरज लागणार नाही. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी
काल मुंबईत ही घोषणा केली. सुमारे एक हजार ६०० चौरस फुटापर्यंतच्या भुखंडावरील बांधकामासाठी
ग्रामस्थाला मालकी कागदपत्र, आराखडा नियोजन, मोजणी नकाशा, इमारत आराखडा आणि हे सर्व
नियोजन ठरलेल्या नियमानुसार असल्याचं परवानाधारक अभियंत्याचं प्रमाणपत्र, आदी कागदपत्रं
ग्रामपंचायतीला सादर करावी लागणार असून, आवश्यक विकास शुल्क भरावं लागेल. ही पुर्तता
केल्यानंतर थेट बांधकाम सुरु करता येईल. या मर्यादेतील बांधकामाला, ग्रामपंचायतीच्या
बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्राची आवश्यकता लागणार नाही. तर ३०० चौरस मीटरपर्यंतच्या भुखंडावरील
बांधकामासाठी अर्ज केल्यानंतर, ग्रामपंचायत संबंधित ग्रामस्थाला किती विकास शुल्क भरायचं
याची माहिती दहा दिवसात कळवेल. ग्रामस्थानं ते शुल्क भरल्यानंतर ग्रामपंचायत दहा दिवसात
कोणत्याही छाननीशिवाय बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र देईल. ग्रामपंचायत पातळीवर त्याची
अडवणूक होऊ नये, यासाठी या पातळीवरील प्रक्रियाही खूप सोपी करण्यात आली असल्याचं मंत्री
हसन मुश्रीफ यांनी सांगितलं.
****
वस्तु आणि सेवा कर - जीएसटी कायद्यातल्या जाचक तरतुदी रद्द करण्याच्या मागणीसाठी
कॉन्फेडरेशन ऑफ ऑल ट्रेडर्स - कॅट या सात कोटी व्यापाऱ्यांची शिखर संस्था असलेल्या
संस्थेनं आज देशव्यापी बंद पुकारला आहे. फूड सेफ्टी ऍक्ट मधल्या चुकीच्या तरतुदी आणि
केंद्रीकृत अधिकार असलेली व्यवस्था रद्द करावी, तसंच टीसीएसच्या तरतुदी व्यापाऱ्यांना
लागू करू नये, आदी मागण्याही व्यापाऱ्यांनी केल्या आहेत. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स
इंडस्ट्रीज, औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघ, औद्योगिक पुरवठादारांची संघटना, पेंट
व्यावसायिक, औरंगाबाद कापड व्यापारी संघानं या बंदमध्ये सहभागी होणार असल्याचं कळवलं
आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी
येत्या रविवारी आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार
आहेत. या कार्यक्रम मालिकेचा हा ७४ वा भाग असेल.
****
राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असून,
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विचार करुन गरज भासल्यास एक मार्च पासून शाळा बंद ठेवण्याचा
निर्णय स्थानिक पातळीवर घ्यावा, अशी सूचना शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी
स्थानिक जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. त्या काल मुंबईत यासंदर्भातल्या बैठकीत बोलत
होत्या. जिल्ह्यातली कोविड परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत स्थानिक प्रशासनानं पाचवी
ते आठवी, तसंच नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना शाळेत बोलावण्याचा निर्णय घ्यावा,
तसंच ज्या शाळांमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आढळून आला आहे, त्या शाळेत निर्जंतुकीकरण
करण्याबाबतही गायकवाड यांनी निर्देश दिले.
****
राज्यात काल आठ हजार ७०२ नव्या कोविड रुग्णांची नोंद झाली,
त्यामुळे राज्यभरातल्या कोविडबाधितांची एकूण संख्या २१ लाख २९ हजार ८२१ झाली आहे. काल ५६
रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यापैकी २२ जणांचे मृत्यू हे गेल्या आठवड्यात
झालेले आहेत. राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण
संख्या ५१ हजार ९९३ झाली असून, मृत्यूदर
दोन पूर्णांक ४४ शतांश टक्के झाला आहे. काल तीन हजार ७४ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात
आतापर्यंत २० लाख १२ हजार ३६७ रुग्ण,
कोरोना विषाणू मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा
दर ९४ पूर्णांक ४९ टक्के इतका झाला आहे. सध्या राज्यभरात ६४ हजार २६० रुग्णांवर उपचार सुरु आहेत
****
मराठवाड्यात काल नव्या ६५४ कोरोना विषाणू बाधित
रुग्णांची नोंद झाली, तर नऊ रुग्णांचा
मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या चार, जालना दोन, परभणी, लातूर आणि हिंगोली जिल्ह्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात २७५ रुग्ण आढळले. जालना जिल्ह्यात ८५, लातूर ८०, बीड ५३, नांदेड ७०,
परभणी ४१, हिंगोली २४, तर
उस्मानाबाद जिल्ह्यात २६ नवे रुग्ण आढळून आले.
****
वाशीम
जिल्ह्यातील पोहरादेवी येथे तीन दिवसांपूर्वी वनमंत्री संजय राठोड यांच्या आगमनाच्या
वेळी उसळलेली गर्दी पाहता तेथे प्रशासनानं कोरोना विषाणू संसर्ग चाचणी घेण्यास सुरुवात
केली असून या चाचणीमध्ये तिथल्या पुजाऱ्यांसह आठ जण बाधित आढळल्यानं पोहरादेवी आणि
परिसरात खळबळ उडाली आहे. वनमंत्री राठोड यांच्या पोहरादेवी भेटीवेळी त्यांचे हजारो
समर्थक जमले होते. त्यामुळे जिल्हा प्रशासनानं आसपासच्या गावात सुद्धा कोरोना विषाणू
संसर्ग चाचणी घेण्यास सुरुवात केली आहे.
****
दक्षिण
सोलापूर तालुक्यातील अंत्रोळी इथल्या जिव्हाळा मतीमंद निवासी शाळेच्या संस्थेत एकूण
४६ बाधीत रुग्ण आढळून आले आहेत. यात दहा ते वीस वयोगटातील तीन विद्यार्थी असून ३४ मतीमंद
प्रौढ रुग्ण असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. शितलकुमार जाधव यांनी
काल दिली. या सर्वांना कंदलगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात गृह विलगीकरणात ठेवण्यात आल्याची
माहिती जाधव यांनी दिली.
****
उस्मानाबाद
जिल्ह्यात राष्ट्रीय जंतनाशक मोहिम येत्या एक ते आठ मार्च दरम्यान राबवण्यात येणार
आहे. या मोहिमे अंतर्गत आपल्या एक ते १९ वर्षे वयोगटातील मुला-मुलींना जंतनाशक गोळी
देऊन त्यांचा कुपोषण, रक्त क्षयापासून बचाव करा तसंच त्यांच्या सुदृढ आरोग्यासाठी सजग
पालक व्हा, असं आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड यांनी
केलं आहे.
****
राज्याच्या
ग्रामीण आणि दुर्गम भागातील पशुधनाला विविध साथीच्या आजारातून संरक्षण मिळावं आणि पशुपालकांना
त्यांच्या पशुसाठी त्या-त्या गावातच वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशानं
मुख्यमंत्री पशु स्वास्थ योजना शासनातर्फे सुरु करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत नांदेड
जिल्ह्यासाठी तीन फिरती पशु चिकित्सा वाहनं मिळाली असून त्यांचं लोकार्पण नांदेड जिल्ह्याचे
पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते आज केलं जाणार आहे.
****
लातूर
जिल्ह्यातल्या उदगीर इथं दिवंगत बाळासाहेब दीक्षित व्यासपीठ नामकरण समारंभ आणि ज्ञानसाधना
केंद्राची स्थापना विवेकानंद रुग्णालयाचे संस्थापक सदस्य डॉ. अशोक कुकडे यांच्या हस्ते
काल करण्यात आली. सरदार वल्लभभाई पटेल प्राथमिक विद्यालयात आयोजित या कार्यक्रमाला
वनवासी कल्याण आश्रमाच्या प्रांत अध्यक्षा ठमाताई पवार प्रमुख उपस्थित होत्या.
****
सांगली
कृषी उत्पन्न बाजार समितीत काल २४ हजार १०० रुपये प्रति क्विंटल असा उच्चांकी दर हळदीला
मिळाला असून शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त हळद विक्रीला आणावी असं आवाहन समितीचे सभापती
तसंच सचिवांनी केलं आहे. सांगली बाजार समितीत नवीन वर्षातले हळदीचे सौदे होऊ लागले
आहेत. यानुसार गेल्या काही दिवसांपासून हळदीचे दर वाढत असल्याचं दिसत आहे.
****
औरंगाबादमध्ये
सिडकोतल्या नियोजित बाळासाहेब ठाकरे स्मृतीवनासाठी प्रस्तावित प्रियदर्शिनी उद्यान
सहा महिन्यानंतर शहराचं प्राणवायू उद्यान म्हणून ओळखलं जाईल, असं महापालिका प्रशासक
आस्तिककुमार पाण्डेय यांनी म्हटलं आहे. त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शहरातल्या पर्यावरण
प्रेमीं नागरिकांच्या हस्ते या उद्यानात काल साडे तिनशे झाडांची लागवड करण्यात आली,
त्या वेळी ते बोलत होते. प्रियदर्शिनी उद्यानात एकही झाड न कापता हे उद्यान विकसित
करण्यात येईल, अशी ग्वाही प्रशासक पांडेय यांनी यावेळी दिली.
****
औरंगाबादच्या डॉक्टर बाबासाहेब
आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात काल माजी कुलगुरु भुजंगराव
कुलकर्णी यांना शोकसभा घेऊन आदरांजली वाहण्यात आली. यावेळी प्रकुलगुरु डॉ.शाम
शिरसाठ, कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी यांच्यासह अधिकारी,
कर्मचारी उपस्थित होते.
****
अहमदाबाद
इथं झालेल्या तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं इंग्लंडवर काल दुसऱ्याच दिवशी
दहा गडी राखून विजय मिळवण्याची किमया साधली. दिवसरात्र गुलाबी चेंडुनं खेळवण्यात आलेल्या
या सामन्यात काल एकाच दिवसात सतरा खेळाडू बाद झाले. फिरकीला साथ मिळालेल्या या खेळपट्टीवर
पहिल्या डावात सहा गडी बाद करणारा डावखुरा फिरकी गोलंदाज अक्षर पटेल, यानं दुसऱ्या
डावातही पाच गडी बाद केले. तो सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. त्याच्या आणि चार
गडी बाद करणाऱ्या आर. अश्र्विनच्या फिरकीपुढे इंग्लंडचा दुसरा डाव केवळ ८१ धावांमध्ये
संपुष्टात आला. त्या आधी भारताचा पहिला डाव १४५ धावांवर संपला. पहिल्या डावात ३३ धावांची
आघाडी घेतलेल्या भारतीय संघानं विजयासाठीचं ४९ धावाचं आव्हान एकही फलंदाज न गमावता
साध्य केलं. चार कसोटी सामन्यांच्या या मालिकेत भारतानं आता दोन - एक अशी आघाडी मिळवली
आहे. मालिकेतला अखेरचा सामना याच मैदानावर येत्या चार ते आठ मार्च दरम्यान होणार आहे.
****
साप्ताहिक सकाळचे माजी संपादक सदा डुंबरे यांचं काल पुण्यात कोरोना विषाणू संसर्गानं
निधन झालं, ते ७२ वर्षांचे होते. डुंबरे हे १९७३ ते २००९ अशी ३६ वर्ष सकाळ वृत्तसमुहात
कार्यरत होते.
//****************//
No comments:
Post a Comment