Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 28 February
2021
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २८ फेब्रुवारी २०२१ दुपारी १.०० वा.
****
आत्मनिर्भर
भारत हे फक्त आर्थिक अभियान नसून भविष्यात ते एक राष्ट्रीय चैतन्य बनेल, आत्मनिर्भर
भारताचा हा मंत्र, देशातल्या गावागावांमध्ये पोहोचत असल्याबद्दल, पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. आकाशवाणीवरील ’मन की बात’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून
पंतप्रधानांनी आज देशवासियांशी संवाद साधला. या कार्यक्रमाचा आजचा ७४वा भाग होता. कार्यक्रमाच्या
प्रारंभी पंतप्रधानांनी देशवासियांना माघ पौर्णिमेच्या शुभेच्छा देत या दिवसाचं महत्व
विशद केलं. उन्हाळ्यात पाणी टंचाई जाणवू नये यासाठी माघ महिन्यापासूनच आपल्या परिसरातल्या
जलस्त्रोतांची स्वच्छता करुन, पावसाच्या पाण्याचा संचय करण्यासाठी, आपण सर्वजण आत्तापासूनच
१००दिवसांचं एखादं अभियान सुरू करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. लवकरच जलशक्ती मंत्रालयाच्यावतीनं
जल शक्ती अभियान म्हणजेच ‘कॅच द रेन’ सुरू करण्यात येणार आहे. ‘जेव्हा अणि जिथं पावसाचं
पाणी पडेल, ते साठवा’ हा या मोहिमेचा मूलमंत्र आहे असं सांगून पाणी बचत आणि नियोजनाची
माहिती पंतप्रधांनांनी दिली. आजच्या राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त पंतप्रधानांनी वैज्ञानिक
डॉ. सी. व्ही. रमण यांच्या कार्याचं स्मरण केलं. आजचा दिवस रमण यांनी शोधून काढलेल्या
‘रमण इफेक्ट’ला समर्पित असल्याचं पंतप्रधान म्हणाले. या शोधामुळे विज्ञानाची दिशाच
बदलली हे सांगतांना पंतप्रधानांनी नाशिकच्या स्नेहल यांच्या संदेशाचा आपल्या भाषणात
उल्लेख केला. पंतप्रधानांनी देशात शेतीसह अन्य क्षेत्रात विज्ञानाच्या सहाय्यानं विविध
प्रयोग करणाऱ्या व्यक्तींच्या कामांचा उल्लेख करत त्यांचं अभिनंदन केलं. मार्च महिन्यापासून
परीक्षांचा हंगाम सुरु होतो, या काळात विद्यार्थ्यांनी तणावरहित असावं असं सांगून पंतप्रधानांनी
विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या, त्याचबरोबर परीक्षा पर चर्चा या कार्यक्रमात पालक,
विद्यार्थी आणि शिक्षकांनीही सहभागी व्हावं असं ते म्हणाले. कोरोना विषाणू संसर्गाकडे
दुर्लक्ष करून चालणार नाही. तुम्ही सर्व निरोगी असाल, आनंदी असाल, कर्तव्याच्या मार्गावर
ठाम राहाल तेव्हाच देश वेगाने पुढे मार्गक्रमण करत राहील असं पंतप्रधान आपल्या भाषणाच्या
समारोपात म्हणाले.
****
राष्ट्रीय
विज्ञान दिन आज सर्वत्र साजरा होत आहे. यंदाचा विषय ‘विज्ञान, तंत्रज्ञान आणि नाविन्यता
यांचा शिक्षण, कौशल्य आणि कार्यपद्धतीवर होणारा प्रभाव!’ असा आहे. उपराष्ट्रपती एम.
व्यंकय्या नायडू यांनी या दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. नायडू यांनी विज्ञानाचा
उपयोग विश्वाच्या विकासासाठी आणि लोकांच्या सुख समृद्धीसाठी करण्याचा संकल्प सर्वांनी
करावा असं आपल्या संदेशात म्हटलं आहे.
****
देशातल्या
खेळणी उद्योगाला सरकारचा पूर्णपणे पाठिंबा असून हवं ते सहकार्य करण्याचं आश्वासन केंद्रीय
वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियुष गोयल यांनी दिलं आहे. भारतीय खेळणी मेळावा २०२१मध्ये
ते काल बोलत होते. जिथे जिथे टॉय क्लस्टर उभारले जाणार आहेत, त्या ठिकाणी उत्पादनांच्या
गुणवत्ता परीक्षणासाठी, भारतीय मानक ब्युरो प्रयोगशाळा स्थापित करेल अशी घोषणा गोयल
यांनी यावेळी केली.
****
मराठा
आरक्षणाविषयी चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय न्याय आणि विधी मंत्री
रविशंकर प्रसाद, ॲटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांच्यासोबत आज दुपारी ४ वाजता मंबईत
सह्याद्री अतिथिगृहामध्ये बैठक घेणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते
देवेंद्र फडणवीस, खासदार उदयनराजे भोसले, मराठा आरक्षण उपसमितीचे सदस्य तसंच सरकारचे
कायदेविषयक सल्लागार आणि तज्ञ याबैठकीत सहभागी होणार आहेत.
****
नांदेड
शहरात मास्क न वापरणाऱ्या लोकांना दंड आकारण्यात येत असून आज आठव्या दिवशी पोलीस, महसूल
आणि महानगर पालिका कर्मचाऱ्यांच्या संयुक्त मोहिमेत ५७ हजार ७०० रूपये वसूल करण्यात
आले आहेत. शहरातील मंगल कार्यालयं, कोचिंग क्लासेस, हॉटेल्सला अचानक भेटी देऊन १००
निमंत्रितांपेक्षा अधिक लोक आढळून आल्यास दंड आकारण्यात येत असल्याचं आमच्या वार्ताहरानं
कळवलं आहे.
****
कोरोना
विषाणू बाधित रुग्णांची वाढती संख्या पाहता, वाशिम जिल्ह्यात काल संध्याकाळी ५ वाजल्यापासून
संपूर्ण संचारबंदी सुरु झाली असून ती उद्या सकाळी ८ वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. यातून
अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत.
****
आज
सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासात देशभरात कोरोना विषाणू बाधित १६ हजार ७५२ नवे
रुग्ण आढळून आले आहेत, तर ११३ जण मरण पावले. दरम्यान, देशात आतापर्यंत १ कोटी ४३ लाखांहून
अधिक लोकांना लस देण्यात आल्याचं आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे सांगण्यात
आलं आहे.
****
No comments:
Post a Comment