Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 28 February 2021
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २८ फेब्रुवारी २०२१ सायंकाळी ६.१०
****
** वनमंत्री संजय राठोड यांचा राजिनामा मुख्यमंत्र्यांकडे
सादर
** राज्य अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून
** औरंगाबादमध्ये कोरोना विषाणू संसर्गाचे नवे २५ रुग्ण
आणि
**`परिक्षा पे चर्चा`मध्ये सहभागी होण्याचं पंतप्रधानांचं
आवाहन
****
बीड जिल्ह्यातल्या पूजा चव्हाण या तरुणीच्या मृत्यू प्रकरणी
भारतीय जनता पक्षानं केलेले गंभीर आरोप आणि राज्यव्यापी आंदोलनाच्या पार्श्र्वभूमीवर
वनमंत्री, शिवसेनेचे आमदार संजय राठोड यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजिनामा मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे यांना आज सादर केला. राठोड यांनी प्रसिद्धी माध्यमांना या संबंधी माहिती
दिली. पूजा चव्हाण सोबतची त्यांची छायाचित्रं तसंच या प्रकरणासंबंधी ध्वनीफीत सामाजिक संपर्क माध्यमांमध्ये प्रसारित झाल्यापासून
भारतीय जनता पक्षानं त्यांच्या राजिनाम्याची मागणी लावून धरली होती. मंत्रीपदापासून
दूर राहुन या संदर्भातल्या चौकशीला सहकार्य करणार असल्याचं ते यावेळी म्हणाले. चौकशीपूर्वीच
विरोधी पक्षातर्फे आपली बदनामी करण्यात आली. पोलिस तपास करत आहेत, तपासातून सत्य बाहेर
यावं ही आपली भूमिका असल्याचंही राठोड म्हणाले.
त्यांचा राजिनामा मुख्यमंत्र्यांनी स्वीकारला आहे की नाही किंवा ते तो स्वीकारणार
आहेत की नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही, असं विधानसभेतले विरोधी पक्ष नेते देवेंद्र
फडणवीस यांनी म्हटलं आहे. त्यांनी पहिल्याच दिवशी राजिनामा दिला पाहिजे होता. या प्रकरणी
प्रथम माहिती अहवाल नोंदवला जावा, अशी आपली मागणी असल्याचंही फडणवीस म्हणाले.
****
राज्य विधी मंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्या सुरू होत आहे. महाविकास
आघाडी सरकार या अधिवेशनांतर्गत आपला दुसरा अर्थसंकल्प
येत्या ८ मार्चला सादर करणार आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा अधिवेशनाचा कालावधी दहा दिवसांचा ठेवण्यात आला आहे. सभागृहात
आमदारांसाठी विशिष्ट आंतर राखत बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. राज्याची आर्थिक घडी विस्कटली असून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्नही बिकट
झाला असल्याची टीका
विधानसभेतले विरोधी
पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. उद्या सुरु होणाऱ्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईत भारतीय जनता पक्षाच्या विधिमंडळ सदस्यांच्या बैठकीनंतर
आयोजित वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. वाळू चोरी, पोलिसांच्या बदल्या, कोरोना विषाणू संसर्गाच्या परिस्थीतीमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार होत असून हे विषय अधिवेशनात मांडणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं.
****
भारताचं PSLV-C ५१ हे उपग्रह प्रक्षेपक अंतराळ यान आज
सकाळी श्रीहरीकोटा इथल्या उपग्रह प्रक्षेपण केंद्रावरून भारत, ब्राझील आणि अमेरिकेच्या
१९ उपग्रहांना घेऊन अंतराळात झेपावलं. ‘न्यू स्पेस इंडिया लिमिटेडची’ ही पहिलीच व्यावसायिक
मोहीम आहे. ब्राझीलचा ऍमेझोनिया १ हा उपग्रह सर्वात प्रथम PSLV-C ५१ या अंतराळ यानापासून
चार टप्प्यांमध्ये वेगळा होऊन पृथ्वीच्या कक्षेत स्थिरावला. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ
स्पेस रिसर्च या संस्थेच्या या उपग्रहाच्या मदतीनं अमेझॉनच्या जंगलातल्या जंगलतोडीवर
लक्ष ठेवता येईल, तसंच अमेझॉन खोऱ्यातल्या कृषी विविधतेबाबतची माहिती उपलब्ध होईल.
****
औरंगाबाद शासकीय
वैद्यकीय रुग्णालयात आज २५ नवे कोविड बाधित रुग्ण दाखल झाले. जिल्ह्यातल्या एकूण रुग्णांची
संख्या आता ५० हजार १३५ झाली आहे. जिल्ह्यातल्या
दोन पुरुष कोविड बाधितांचा आज उपचारांदरम्यान मृत्यू झाला.
त्यामुळे एकूण मृतांची संख्या एक हजार २६८ झाली असून ४६ हजार ९२७ रुग्ण बरे झाले आहेत.
दरम्यान, औरंगाबाद
शहरात विना मास्क फिरणाऱ्या लोकांकडून महापालिकेचं पथक दंड वसूल करत आहे. आज ९१ व्यक्तींकडून
५०० रुपयांप्रमाणे ४५ हजार
५०० रुपये दंड आकारण्यात आला असल्याचं प्रशासनानं कळवलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचे नवे ९० रुग्ण
आज आढळले आहेत. जिल्ह्यातली एकूण रुग्ण संख्या २३ हजार ६५४ झाली असून या पैकी २२ हजार
२७५ रुग्ण संसर्ग मुक्त झाले आहेत. जिल्ह्यातले ५० रुग्ण आज संसर्गावर उपचार घेऊन बरे
झाल्यानंतर घरी परतल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे.
****
लातूर जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्र्वभूमीवर पुकारण्यात आलेल्या जनता संचारबंदीला
आज प्रतिसाद मिळाला नाही. जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी संसर्ग प्रादुर्भाव
रोखण्यासाठी काल आणि आज जनता संचारबंदी पाळण्याचं आवाहन केलं होतं. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी
कोरोना विषाणू संसर्गाचे रुग्ण आढळलेल्या एका हॉटेलला आज टाळं ठोकलं.
****
परभणी जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधात्मक
उपाय योजनांची नागरिकांनी कठोरपणे अंमलबजावणी करावी अन्यथा प्रशासनाला टाळेबंदी सारखा
निर्णय घ्यावा लागेल असा इशारा जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी आज दिला. जिल्ह्यात
या संसर्गाच्या रुग्ण संख्येत वाढ होत आहे. पुढल्या काळात नागरिकांनी मास्क लावणं,
आस्थापना, व्यापारी दुकानं या ठिकाणी निर्जंतुकीकरण तसंच सामाजिक अंतराचं पालन यासाठी
सहकार्य करावं, असं आवाहन त्यांनी एका निवेदनाद्वारे केलं आहे.
****
राज्यात काल ३ हजार ६४८ रुग्ण कोरोना विषाणू
संसर्गातून मुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत २० लाख २० हजार ९५१ रुग्ण संसर्गमुक्त
झाले आहेत. राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर ९४ पूर्णांक १४ शतांश टक्के इतका झाला आहे.
काल आठ हजार ६२३ नव्या रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे
राज्यातल्या रुग्णांची एकूण संख्या २१ लाख
४६ हजार ७७७ झाली आहे. सध्या राज्यात ७२ हजार ५३० रुग्णांवर उपचार सुरु आहेत. काल ५१
रुग्णांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची
एकूण संख्या ५२ हजार ९२ झाली आहे. राज्याचा मृत्यूदर २ पूर्णांक ४३ शतांश टक्के झाला
आहे.
****
परीक्षांचा काळ येत
असून लवकरचं ‘परीक्षा पे चर्चा करु’ त्यासाठी सूचना पाठवा, चर्चेत सहभागी व्हा, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या आकाशवाणीवरच्या `मन की बात` या कार्यक्रमाद्वारे आज केलं आहे. या मालिकेचा हा चौऱ्याहत्तरावा भाग होता. डॉ.सी.व्ही
रमण यांच्या संशोधनकार्याच्या गौरवार्थ आज साजऱ्या होत असलेल्या राष्ट्रीय विज्ञान
दिनानिमित्त नाशिकच्या स्नेहिल यांच्या `रमण इफेक्ट` संदर्भातील
संदेशाचा उल्लेख करुन देशाचा वैज्ञानिक इतिहास
जाणून घेण्याचं आवाहनही पंतप्रधानांनी यावेळी केलं. देशभरातल्या वैज्ञानिक प्रयोगांचे दाखले देत प्रत्येकानं
अशीच विज्ञानाची कास धरली तर विकासाच्या वाटा खुल्या होतील आणि देश आत्मनिर्भर बनेल
असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. जून
मध्ये पावसाळ्याच्या अनुषंगानं जलशक्ती मंत्रालयाच्यावतीनं जल शक्ती अभियान सुरू
करण्यात येणार आहे. ‘जेव्हा
अणि जिथं पावसाचं पाणी पडेल, ते साठवा’
हा या मोहिमेचा मूलमंत्र आहे असं सांगून पाणी बचत आणि नियोजनाची
माहितीही पंतप्रधांनांनी दिली. आत्मनिर्भर भारत
हे फक्त आर्थिक अभियान नसून भविष्यात ते एक राष्ट्रीय चैतन्य बनेल असं नमुद करत आत्मनिर्भर भारताचा हा मंत्र, देशातल्या गावा- गावांमध्ये पोहोचत असल्याबद्दल, पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला. उन्हाळ्यात पाणी टंचाई जाणवू नये यासाठी माघ
महिन्यापासूनच आपल्या परिसरातल्या जलस्त्रोतांची स्वच्छता करुन, पावसाच्या पाण्याचा संचय करण्यासाठी, आपण सर्वांनी
आत्तापासूनच १००दिवसांचं अभियान सुरू करण्याची गरज पंतप्रधानांनी व्यक्त केली.
****
राज्याचे पोलिस महासंचालक हेमंत
नगराळे यांनी आज सकाळी गडचिरोली जिल्ह्यातल्या अहेरी तालुक्यात देचलीपेठा आणि भामरागड
तालुक्यात धोडराज या अतिदुर्गम आणि नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशिल पोलिस ठाण्यांना भेट
देऊन सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली. नक्षल्यांचा बीमोड करण्यासाठी शासन पोलिसांना
सुरक्षाविषयक सर्व सुविधा पुरवणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. अहेरी इथं
पोलिस मुख्यालयात आढावा बैठक घेऊन शूर जवानांचा पोलिस महासंचालक नगराळे यांनी यावेळी
सत्कारही केला.
****
केंद्रसरकारनं केलेल्या गॅस,
पेट्रोल आणि डिझेल दरवाढीबाबत आज राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीनं
पेट्रोलपंपावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फलकांखाली 'चूल मांडा' आंदोलन
केलं. प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनामध्ये
फेब्रुवारी महिन्यात तिसऱ्यांदा गॅस दरवाढीचा निषेध करण्यात आला. एका महिन्यात करण्यात
आलेली १०० रूपयांची गॅसदरवाढ सर्वसामान्य नागरिकांचं जीवन उद्ध्वस्त करणारी असल्याची
टीका चाकणकर यांनी यावेळी केली.
****
सार्वजनिक आरोग्य
विभागांतर्गत गट-क सरळसेवा भरतीसाठी आज राज्यभर परीक्षा घेण्यात आली. परिक्षेची प्रश्र्न पत्रिका एक तास उशिरा आल्यानं औरंगाबाद शहरातल्या
काही परीक्षा केंद्रावर परिक्षार्थींनी गोंधळ घातला.
//*************//
No comments:
Post a Comment