Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 27 February 2021
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक
२७ फेब्रुवारी
२०२१ सकाळी ७.१० मि.
****
**
केंद्रीय गृहमंत्रालयाकडून कोविड प्रतिबंधाबाबत मार्गदर्शक सूचनांना ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ
**
राज्यात आठ हजार ३३३ नवे
कोविडग्रस्त; मराठवाड्यात काल ११ मृत्यू तर नव्या ६८७ रुग्णांची
नोंद
**
मातृभाषेचा गौरव जपणं हे प्रत्येकाचे कर्तव्य-
मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन; आज मराठी भाषा गौरव दिन
** शेअर्समध्ये गुंतवणुकीचं आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची
फसवणूक करणारी टोळी मुंबई पोलिसांकडून जेरबंद
** जीएसटीतल्या जाचक अटी रद्द करण्याच्या मागणीसाठी पुकारलेल्या
बंदला मराठवाड्यात संमिश्र प्रतिसाद
** कोविडचा वाढता धोका
पाहता, नागरिकांनी जबाबदारीने नियम पालनाची आवश्यकता औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई
यांच्याकडून व्यक्त
आणि
** कळमनुरी तालुक्यात ५ हजार ८२० विद्यार्थ्यांना जात
प्रमाणपत्राचं घरपोच वाटप
****
केंद्रीय गृहमंत्रालयानं कोविड प्रतिबंध आणि सावधगिरीबाबत जारी मार्गदर्शक सूचनांना येत्या ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे. कोविड
प्रादुर्भाव पूर्णपणे आटोक्यात येईपर्यंत या सूचना पाळणं आवश्यक
असल्याचं, गृहमंत्रालयानं म्हटलं आहे. कोविड संसर्गाची
साखळी तोडण्यासाठी लसीकरणाला गती द्यावी, असा
सल्ला मंत्रालयानं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना दिला आहे.
****
यवतमाळ जिल्ह्यात आज शनिवार सायंकाळी
पाच वाजेपासून परवा सोमवारी सकाळी ९ वाजेपर्यंत जिल्ह्यात संपूर्ण संचारबंदी लावण्यात
येत आहे. जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह यांनी हे आदेश जारी केले. संचारबंदीच्या काळात
जिल्ह्यातले सर्व दवाखाने, औषधी दुकानं, पेट्रोलपंप, गॅस वितरण, दुध तसंच दुग्धजन्य
पदार्थ विक्री इत्यादी अत्यावश्यक सेवा सुरु राहणार आहेत.
****
लातूर जिल्ह्यात आज आणि उद्या जनता
संचारबंदीचं आवाहन करण्यात आलं आहे. नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू
नये, असं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. जीवनावश्यक वस्तू व्यवहारांना
मात्र या संचारबंदीतून सूट देण्यात आली आहे.
****
हिंगोली जिल्ह्यात टाळेबंदी लावण्याचा निर्णय घेतलेला नाही, असं जिल्हाधिकारी रुचेश
जयवंशी यांनी सांगितलं आहे. मात्र कोविडचा वाढता संसर्ग थोपवण्यासाठी गरजेनुसार कठोर
उपाययोजना करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं, ते म्हणाले...
लोकल स्तरावर सामन्य जनजीवनमध्ये कमीत कमी अडथळा निर्माण
करुन कंट्रोल करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहे.रात्रीचं आम्ही संचारबंदीचे जे काही आदेश
काढले आहेत.पोलीस आणि प्रशासन खुप प्रभावीपणे अंमलबजावणी कशी करता आहेत. आणि लोकांचं
सुद्धा सहकार्य मिळत आहे.याच्या पुढे जसं जसं आम्हाला वाटलं की आणखी सक्तीची गरज आहे
आणखी टाईट करण्याची गरज आहे. त्याप्रमाणे आम्ही मागच्या वर्षीपासून ज्या स्टेपस घेतल्या
आहेत त्या आम्ही घेवू. आमच्याकडे सगळी यंत्रणा सज्ज आहे.जशी जशी आवश्यकता पडेल तसं
तसं आम्ही त्यांना ॲक्टीवेट करु..
****
राज्यात काल आठ हजार ३३३ नव्या कोविड रुग्णांची नोंद झाली,
त्यामुळे राज्यभरातल्या कोविडबाधितांची एकूण संख्या २१ लाख ३८ हजार १५४ झाली आहे. काल ४८
रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची
एकूण संख्या ५२ हजार ४१ झाली असून,
मृत्यूदर दोन पूर्णांक ४३ शतांश टक्के झाला
आहे. काल चार हजार ९३६ रुग्ण या
संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत २० लाख १७ हजार ३०३ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९४ पूर्णांक ३५ शतांश टक्के इतका झाला आहे. सध्या राज्यभरात ६७ हजार ६०८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत
****
मराठवाड्यात काल नव्या ६८७ कोरोना विषाणू बाधित
रुग्णांची नोंद झाली, तर ११ रुग्णांचा
मृत्यू झाला. मृतांमध्ये जालना जिल्ह्यातल्या चार, नांदेड, बीड तसंच औरंगाबाद
जिल्ह्यातल्या प्रत्येकी २ तर परभणी जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा
समावेश आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात काल २४७
रुग्ण आढळले. जालना जिल्ह्यात १७१, नांदेड ७५,
लातूर ६२, बीड ५१, परभणी
३३, हिंगोली ३२, तर उस्मानाबाद
जिल्ह्यात १६ नवे रुग्ण आढळून आले.
****
मातृभाषा हा अभिमानाचा गौरवाचा विषय
असून हा गौरव जपणं प्रत्येकाचे कर्तव्य असल्याचं प्रतिपादन, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
यांनी केलं आहे. विधानमंडळातील वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्र आणि मराठी भाषा विभाग
यांच्या विशेष परिसंवादाचं दूरदृष्य प्रणालीद्वारे मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते
काल उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते. पुढच्या मराठी भाषा गौरव दिनापर्यंत मराठी
भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याच्या एका ध्येयाने एक होऊन पुढे जाऊ या, असं आवाहन
मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. मुख्यमंत्र्यांनी यावेळी कुसुमाग्रजांची “मराठी माती”
ही कविता वाचून दाखवली.
****
मराठी भाषा गौरव दिन आज साजरा होत आहे.
मराठीचा प्रसार, प्रचार वृद्धिंगत करण्यासाठी प्रत्येकाने मराठीचा आग्रहपूर्वक
वापर करण्याचं आवाहन मराठी भाषा मंत्री
सुभाष देसाई यांनी केलं आहे. ते काल औरंगाबाद
इथं मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा देतांना बोलत होते. यंदा कोविड पार्श्वभूमीवर ऑनलाईन पद्धतीनं विविध कार्यक्रमांचं
आयोजन करण्यात आलं आहे. औरंगाबाद इथल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या
वतीनं आज सायंकाळी प्रसिद्ध लेखक प्रसाद कुमठेकर यांचं प्रसार माध्यमातील मराठी भाषा
या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आलं आहे. सायंकाळी सहा वाजता विद्यापीठाच्या फेसबुक
पेजवरून या व्याख्यानाचा लाभ घेता येईल.
****
राज्यात अभियांत्रिकी तसंच तंत्रनिकेतनचा
अभ्यासक्रम इंग्रजी भाषेबरोबर मराठी भाषेतही उपलब्ध करून देण्याचा निर्णय उच्च व तंत्र
शिक्षण विभागाने घेतला आहे. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ही माहिती
दिली. ग्रंथालय संचालनालयाच्या प्रबोधन पाक्षिक शताब्दी वर्ष तसंच मराठी भाषा गौरव
दिन कार्यक्रमाचं सामंत यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून करण्यात आलं,
त्यावेळी ते बोलत होते. मराठी भाषेच्या प्रसार आणि प्रचाराचं कार्य फक्त मराठी भाषा
गौरव दिनापुरते मर्यादित न ठेवता ते वर्षभर चालू ठेवावं, असं आवाहन सामंत यांनी केलं.
****
शेअर मार्केटिंग मध्ये पैसे गुंतवणुकीचं
आमिष दाखवून अनेक लोकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या तिघांना मुंबई पोलिसांनी
मध्यप्रदेशातल्या इंदूर इथून अटक केली आहे. नागपूर इथल्या एका फिर्यादीने १७ लाख ८५
हजार रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार केल्यानंतर या प्रकरणी तपास केला असता, इंदूर
इथून संपर्णू देशभरात ही टोळी शेअर गुंतवणूकदार म्हणून लोकांची फसवणूक करत असल्याचं
समोर आलं. मुंबईतल्या गिरगाव परिमंडळाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक संध्याराणी भोसले,
पोलिस निरीक्षक अशोक उगले यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलिस ठाण्याचे सहायक
पोलिस निरीक्षक नवनाथ चौधरी आणि पथकानं ही कारवाई केली.
****
वस्तू आणि सेवा कर - जीएसटीमधल्या जाचक
अटी रद्द करण्याच्या मागणीसाठी कॉन्फेडरेशन ऑफ ऑल ट्रेडर्स
- कॅट या संस्थेनं पुकारलेल्या बंदला काल मराठवाड्यात
संमिश्र प्रतिसाद मिळाला. औरंगाबाद जिल्हा व्यापारी
महासंघाअंतर्गत ७२ संघटना या बंदमध्ये सहभागी झाल्या. जालना इथं नवीन मोंढ्यातल्या सर्व व्यापाऱ्यांनी तसंच कपडा व्यावसायिकांनी
व्यवहार बंद ठेवले. बीड शहर - जिल्हा व्यापारी महासंघ, शहर कापड संघ, तसंच आदर्श मार्केट
असोसिएशनच्या च्या वतीनंही बंद पाळण्यात आला. हिंगोली इथं जिल्हा व्यापारी महासंघासह
जिल्हा कर सल्लागार संघटनेनंही बंद पाळला. परभणी जिल्ह्यात काही ठिकाणी कडकडीत बंद
तर काही ठिकाणी सर्व व्यवहार सुरळीत असल्याचे दिसून आलं. नांदेड जिल्ह्यातही बंदला
संमिश्र प्रतिसाद मिळाला.
लातूर जिल्हा व्यापारी महासंघाने पाठिंबा
दिला मात्र, आज आणि उद्या जनता संचारबंदी असल्यामुळे व्यापाऱ्यांनी काल व्यवहार सुरु
ठेवले होते. उस्मानाबाद शहरासह उमरगा, भूम, परंडा, वाशी, कळंब आणि लोहारा शहरात कालच्या
बंदला मोठा प्रतिसाद मिळाला.
सर्वच ठिकाणी व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळानं
जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधानांना निवेदन पाठवून, व्यापाऱ्यांना जीएसटी विवरणपत्र
सुलभतेने भरता येईल असा बदल कायद्यात करण्याची विनंती केली आहे.
****
दहावी आणि बारावी लेखी परीक्षेचं अंतिम
वेळापत्रक जाहीर झालं आहे. त्यानुसार बारावीची परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे दरम्यान,
आणि दहावीची परीक्षा २९ एप्रिल ते २० मे दरम्यान होणार आहे.
*****
राज्याच्या वस्त्रोद्योग धोरणांतर्गत
यंत्रमाग घटकांना वीजदर सवलतीसाठी २८ फेब्रुवारी ही अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे.
यंत्रमागधारकांनी लवकरात लवकर वस्त्रोद्योग आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज
करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी उद्या रविवारी आकाशवाणीवरच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून देशवासियांशी
संवाद साधणार आहेत. या कार्यक्रम मालिकेचा हा ७४ वा भाग असेल.
****
खेळ अर्थव्यवस्थेत महत्वाची भुमिका बजावू शकतात, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
म्हटलं आहे. दुसऱ्या खेलो इंडिया राष्ट्रीय
हिवाळी खेळांचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून
झालं, त्यावेळी ते बोलत होते. २७ राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांनी या स्पर्धेत सहभाग
घेतला आहे.
देशातल्या पहिल्याच राष्ट्रीय खेळणी प्रदर्शन महोत्सवाला आजपासून दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सुरुवात होईल. येत्या २
मार्चपर्यंत हा महोत्सव चालणार आहे.
****
कोविडचा
वाढता धोका लक्षात घेता, नागरिकांनी अधिक जबाबदारीने नियम पालनाची आवश्यकता पालकमंत्री
सुभाष देसाई यांनी व्यक्त केली आहे. ते काल औरंगाबाद इथं कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या
आढावा बैठकीत बोलत होते. नागरिकांमध्ये मास्कचा वापर आणि गर्दी टाळण्यासह इतर नियमांची
प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याचे सूचित केलं. पालकमंत्र्यांच्या
हस्ते काल पोलिस आयुक्त कार्यालयात पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोना योद्धा म्हणून
प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं.
दरम्यान,
पालकमंत्री देसाई यांनी काल शहरात उभारल्या
जात असलेल्या बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यानाची पाहणी करून या जागेची वैशिष्ट्यं जपण्याच्या
सूचना प्रशासनाला केल्या. देसाई यांच्याहस्ते याठिकाणी वृक्षारोपणही करण्यात आले.
****
केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या प्रादेशिक
लोकसंपर्क ब्यूरोच्यावतीने कोव्हिड -19 लसीकरण तसंच आत्मनिर्भर भारत जनजागृती अभियानाला
परभणी जिल्ह्यात कालपासून प्रारंभ झाला. या बहुमाध्यम चित्ररथामध्ये शाहीर विजय सातोरे
आणि संचाद्वारे गीत तसंच नाट्य सादरीकरणाच्या माध्यमातून कोविड लसीकरण, तसंच आत्मनिर्भर
भारत, या योजना आणि विविध उपक्रमांबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.
****
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या
पुण्यतिथीनिमीत्त काल लातूर इथं केशवराज विद्यालयात सावरकरांना
अभिवादन करण्यात आलं. कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांनी सावरकरांचा
तुरुंगवास आणि इतर कार्यावर
उजाळा दिला.
*****
हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यात शेवाळा इथं काल एकाच
दिवशी, एकाच वेळी तब्बल ५ हजार ८२० विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्राचे घरपोहोच वाटप
करण्यात आलं. जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शाळेत महाराजस्व अभियानांतर्गत झालेल्या या
कार्यक्रमात जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी उपस्थित होते. कळमनुरी उपविभागाने 'प्रशासन
आपल्या दारी ' हे ब्रीद सत्यात उतरवले, या शब्दांत जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी
विभागाचा गौरव केला.
****
औस्याचे आमदार अभिमन्यू पवार यांच्या
शेत आणि पाणंद रस्ते अभियानाच्या दुसऱ्या टप्यात निलंगा तालुक्यातल्या कासार सिरसी
मंडळातल्या २५ गावांतील ३१३ किमी लांबीच्या ११७ शेत तसंच पाणंद रस्त्यांचे भूमिपूजन
झालं. मातीकाम पूर्ण झाल्यानंतर या सर्व रस्त्यांचं मनरेगा अंतर्गत खडीकरण आणि मजबुतीकरण
करण्यासाठी प्रस्ताव दखल करण्यात येणार आहेत.
****
परभणी इथं वीज वितरण कंपनीच्या सक्तीच्या
वीज बिल वसुलीच्या निषेधार्थ शेतकरी संघटनेचे गणेश पाटील यांनी रोहित्रासमोर बसून काल
आत्मक्लेष आंदोलन केलं. शेतकऱ्यांनी या आंदोलनास मोठा पाठिंबा देत, आपापल्या परिसरातल्या
रोहित्रासमोर बसून आंदोलन केलं.
****
नांदेड जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्याला
पुरेशा साधन सामुग्रीसह एक पशु चिकित्सा वाहन उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न केला जाईल,
असं सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटलं
आहे.जिल्हा परिषदेला मिळालेल्या तीन पशु चिकित्सा आणि उपचार वाहनाचे लोकार्पण काल चव्हाण
यांच्या हस्ते करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते.
****
निवृत्त सनदी अधिकारी दिवंगत भुजंगराव
कुलकर्णी यांना काल औरंगाबाद इथं स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थेत श्रद्धांजली
अर्पण करण्यात आली. संस्थेचे माजी अध्यक्ष असलेल्या भुजंगराव यांनी संस्थेच्या जडणघडणीत
दिलेल्या योगदानाला यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ एस बी वराडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी
उजाळा दिला.
****
माजी केंद्रीय गृहमंत्री शंकरराव चव्हाण
यांच्या पुण्यतिथी निमित्त काल त्यांना अभिवादन करण्यात आलं. नांदेड इथं पालकमंत्री
अशोक चव्हाण यांनी पुष्पहार अर्पण करून, शंकरराव चव्हाण यांना आदरांजली वाहिली.
****
उस्मानाबाद जिल्हयात
आरोग्य सेवेसाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्यावर अधिक भर द्यावा,असे निर्देश जिल्हा
परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजयकुमार फड यांनी दिले आहेत. जिल्हा एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण संस्थेची बैठक काल झाली, त्यावेळी ते बोलत होते.
//************//
No comments:
Post a Comment