Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 25 February 2021
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २५ फेब्रुवारी २०२१ सायंकाळी ६.१०
****
** ग्रामीण भागात सुमारे बत्तीसशे चौरस फुटांपर्यंतच्या भुखंडावरच्या
बांधकामांना नगर रचनाकाराच्या परवानगीची गरज नाही- ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांची
घोषणा
** औरंगाबादमध्ये कोरोना विषाणू संसर्गाचे १६ नवे रुग्ण, तीन रुग्णांचा
मृत्यू
** समाज माध्यम कंपन्यांनी अनुपालन अधिकारी, मुख्य तक्रार अधिकारी
आणि निवासी तक्रार अधिकाऱ्यांची तात्काळ नेमणूक करण्याचे सरकारचे आदेश
आणि
** तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा डाव १४५ धावांवर बाद
झाल्यानंतर इंग्लंडचा डावही गडगडला
****
राज्यातल्या ग्रामीण भागात सुमारे बत्तीसशे चौरस फुटापर्यंतच्या
भुखंडावरील बांधकामांना आता नगर रचनाकाराच्या परवानगीची गरज लागणार नसल्याची घोषणा
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज मुंबईत केली. सुमारे सोळाशे चौरस फुटापर्यंतच्या
भुखंडावरील बांधकामासाठी ग्रामस्थाला मालकी कागदपत्र, तसंच अन्य संबंधित महत्त्वाची
कागदपत्रं ग्रामपंचायतीला फक्त सादर करावी लागणार असून आवश्यक विकास शुल्क भरावं लागेल.
ही पुर्तता केल्यानंतर ग्रामस्थाला थेट बांधकाम सुरु करता येईल. ग्रामपंचायत पातळीवर
अडवणूक होऊ नये यासाठी या पातळीवरची प्रक्रियाही खूप सोपी करण्यात आली असल्याचं त्यांनी
म्हटलं आहे. या निर्णयामुळे नगररचनाकाराच्या मंजुरीअभावी रखडलेल्या ग्रामीण भागातील
बांधकामातील अडचणी दूर होणार असून त्यास चालना मिळेल. ग्रामस्थांना तळमजला अधिक दोन
मजल्यापर्यंत बांधकाम करता येणार आहे, असंही त्यांनी सांगितले.
****
मुंबईत बिर्ला क्रीडा केंद्राचा पुनर्विकास करून मराठी रंगमंच कलादालनाची
निर्मिती केली जात आहे, यातून मराठीरंगभूमीचा गौरवशाली इतिहास, वैशिष्ट्यं आणि वैभवशाली
वाटचाल दृष्टिपथात यावी, या पद्धतीनं या रंगमंच कला दालनाचं काम व्हावं, अशा सूचना
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. त्यांनी काल मराठी रंगमंच कला दालनाच्या
कामाचा आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. या संदर्भात स्थापन समितीमध्ये आदेश बांदेकर,
विजय केंकरे, सुबोध भावे आदींचा समावेश आहे. कला दालनाच्या कामासाठी पहिल्या टप्प्यात
१० कोटी रुपयांचा निधीही दिला जाणार आहे.
****
देशात काल १६ हजार ७३८ नव्या कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद
झाली, तर १३८ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. देशातली एकूण कोविड बाधितांची संख्या
एक कोटी दहा लाख ४६ हजार ९१४ झाली असून, या संसर्गानं आतापर्यंत एक लाख ५६ हजार ७०५
रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर काल ११ हजार ७९९ रुग्ण बरे झाले. देशात आतापर्यंत एक
कोटी सात लाख ३८ हजार ५०१ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या एक लाख ५१ हजार
७०८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. दरम्यान, देशात आतापर्यंत एक कोटी २६ लाख ७१ हजार १६३
नागरीकांना कोविड लसीकरण करण्यात आल्याचं, आरोग्य मंत्रालयानं सांगितलं.
****
औरंगाबाद इथं आज १६ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले आहेत.
दरम्यान, आज तीन कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.जिल्ह्यातल्या
शासकीय रुग्णालयात सद्यस्थितीत १८४ कोरोना विषाणू बाधित रुग्ण उपचार घेत असुन त्यापैकी
६५ रुग्णांची स्थिती गंभीर असल्याचं प्रशासनानं कळवलं आहे.
****
समाज माध्यम कंपन्यांनी अनुपालन अधिकारी, मुख्य तक्रार अधिकारी
आणि निवासी तक्रार अधिकारी यांची तात्काळ नेमणूक करावी, असे दिशा निर्देश केंद्र सरकारनं
दिले आहेत. केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी आज नवी दिल्ली
इथं वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. केंद्र सरकारनं `ओटीटी`, `ऑनलाईन` माध्यमांसाठी
नवीन नियमावली जारी केली असुन त्यानुसार या माध्यमांवर मजकूर प्रसारित करणाऱ्य़ांची
माहिती देणं, माध्यमांच्या अधिकाऱ्यांना बंधनकारक राहील. त्यामुळे समाज माध्यमांचा
दुरुपयोग करणाऱ्यांना धाक बसेल, असा विश्वास प्रसाद यांनी व्यक्त केला. यावेळी माहिती
आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर हे देखील उपस्थित होते.
****
राज्यात कोरोना विषाणू संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता
सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. या निवडणुका
सध्या ज्या टप्प्यावर असतील त्या टप्प्यावर त्या थांबवून ३१ मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात
आल्या आहेत. सहकारी संस्थांच्या निवडणुकांना परवानगी देणारा यापूर्वीचा आदेश रद्द करण्यात
आला आहे.
****
वाशिम जिल्ह्यातल्या पोहरादेवी देवस्थानचे महंत कबिरदास महाराज
यांच्यासह एकोणविस जणांना कोरोना विषाणुची लागण झाल्याचं आढळून आलं आहे. यामध्ये महंत
कबिरदास यांच्या कुटुंबातल्या तिघांचा समावेश आहे. दोन दिवसांपूर्वी वनमंत्री संजय
राठोड यांच्या तिथल्या दौऱ्यावेळी समर्थकांनी मंदिरात मोठी गर्दी केली होती. त्यातून
संसर्गाच्या संक्रमणाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी २८ फेब्रुवारीला आकाशवाणीवरच्या
`मन की बात` या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ७४वा
भाग असेल.
****
इंग्लंडनं भारताविरुद्धच्या तिसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात आज
अहमदाबाद इथं दुसऱ्या दिवशी दुसऱ्या डावात सहा बाद ५६ धावा केल्या आहेत. अक्षर पटेल
यानं पुन्हा भेदक मारा करताना चार गडी बाद केले आहेत. तत्पूर्वी, तीन बाद ९९ धावांवरुन
पुढं खेळायला सुरुवात केलेल्या भारतीय संघाचा पहिला डाव १४५ धावांमध्ये बाद झाल्यानं
संघाला ३३ धावांची आघाडी मिळाली. रोहित शर्मानं सर्वाधिक ६६ धावा केल्या. इंग्लंडचा
कर्णधार जो रूट यानं केवळ आठ धावांमध्ये पाच गडी बाद केले तर जॅक लीचनं ५४ धावांत चार
गडी बाद केले.
****
औरंगाबादमध्ये सिडकोतल्या नियोजित बाळासाहेब ठाकरे स्मृतीवनासाठी
प्रस्तावित प्रियदर्शिनी उद्यान सहा महिन्यानंतर शहराचं प्राणवायू उद्यान म्हणून ओळखलं
जाईल, असं महापालिका प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी म्हटलं आहे. त्यांच्या प्रमुख
उपस्थितीमध्ये शहरातल्या पर्यावरण प्रेमीं नागरिकांच्या हस्ते या उद्यानात आज साडे
तिनशे झाडांची लागवड करण्यात आली, त्या वेळी ते बोलत होते. प्रियदर्शिनी उद्यानात एकही
झाड न कापता हे उद्यान विकसित करण्यात येईल, अशी ग्वाही प्रशासक पांडेय यांनी यावेळी
दिली.
****
वस्तू आणि सेवा कर कायद्यातल्या कथित जाचक अटी आणि तरतुदी तसंच
थेट परदेशी गुंतवणूक आणि औरंगाबाद महापालिकेच्या अस्थापना कराविरुद्ध जिल्हा व्यापारी
महासंघानं उद्या बंदचा इशारा दिला आहे. औद्योगिक पुरवठादारांची संघटना, पेंट व्यावसायिकांच्या
संघटनेनं एका निवेदनाद्वारे या बंदमध्ये सहभागी होणार असल्याचं कळवलं आहे.
****
होंडा कार्स या कंपनीच्या गाडीमध्ये त्रुटी आढळल्यानं ग्राहकाला
आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागल्यामुळे ग्राहकाला जुनी गाडी परत घेत नवी गाडी
देण्याचा आदेश लातुर जिल्ह्या ग्राहक मंचानं दिला आहे. गाडी प्रतिलिटर १९ किलोमीटर
धावते या कंपनीच्या दाव्याविरोधात ग्राहकानं वितरकाकडे तक्रार केली होती. त्याला कुठलाही
प्रतिलाद न मिळाल्यावर या ग्राहकानं लातूर जिल्हा ग्राहक मंचांकडे दाद मागितली होती.
****
नांदेड जिल्ह्यातल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात
पर्यवेक्षक म्हणून कार्यरत असलेला लोकसेवक आनंद हंबर्डे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं
काल अटक केली. त्यांनं कंत्राटी सफाई कामगार म्हणुन कामावरून काढून न टाकण्यासाठी एकोणीसशे
रुपयांची लाच घेतल्या प्रकरणी ही अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
****
राज्याच्या ग्रामीण आणि दुर्गम भागातील पशुधनाला विविध साथीच्या
आजारातून संरक्षण मिळावं आणि पशुपालकांना त्यांच्या पशुसाठी त्या-त्या गावातच वैद्यकीय
सुविधा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशानं मुख्यमंत्री पशु स्वास्थ योजना शासनातर्फे सुरु
करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यासाठी तीन फिरती पशू चिकित्सा वाहनं
मिळाली असून त्यांचं लोकर्पण नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते
उद्या केलं जाणार आहे.
****
लातूर जिल्ह्यातल्या उदगीर इथं दिवंगत बाळासाहेब दीक्षित व्यासपीठ
नामकरण समारंभ आणि ज्ञानसाधना केंद्राची स्थापना विवेकानंद रुग्णालयाचे संस्थापक सदस्य
डॉ. अशोक कुकडे यांच्या हस्ते आज करण्यात आली.
//********//
No comments:
Post a Comment