Wednesday, 23 June 2021

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 23 June 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 23 June 2021

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २३ जून २०२१ सायंकाळी ६.१०

****

देशात १८ वर्षावरील सर्वांना कोविड- १९ प्रतिबंधक लस मोफत देण्याची मोहीम राबवली जात आहे. सर्व तरुण श्रोत्यांना आमचा सल्ला आहे की, त्यांनी ही लस अवश्य घ्यावी. कोविड १९शी संबंधित निर्बंध शिथिल जरी झाले आले असले तरी कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप संपलेला नाही. त्यामुळे सर्वांनी संपूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे. महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं, असं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. सुरक्षित राहण्यासाठी नाका-तोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा तसंच लसीकरण करून घ्यावं. कोविड - १९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदतवाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

** राज्यातील ‘आशा’ स्वयंसेविकांना  येत्या १ जुलै  पासून १५०० रुपयांची तर गट प्रवर्तकांना एक हजार ७०० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय, आशा आणि गटप्रवर्तकांची संप मागे घेण्याची घोषणा

** कर्ज बुडवे विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांची १८ हजार १७० कोटी दोन लाख रूपयांची मालमत्ता जप्त

** पंतप्रधान गरिब कल्याण योजनेअंतर्गत पुढील पाच महिन्याच्या मोफत आगाऊ अन्नधान्य कोट्याला केंद्रीय मंत्रीमंडळाची मंजुरी

आणि

** जल जीवन अभियानाअंतर्गत मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांना ठरवून दिलेलं उद्दिष्ट विहित कालावधित पूर्ण करण्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

****

राज्यातील ‘आशा’ स्वयंसेविकांना  येत्या १ जुलै  पासून एक हजार रुपये निश्चित मानधन वाढ आणि ५०० रुपये कोविड भत्ता असे एकूण १५०० रुपयांची वाढ तर गट प्रवर्तकांना एक हजार २०० रुपये निश्चित मानधन वाढ आणि ५०० रुपये कोविड भत्ता असे एकूण एक हजार ७०० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केला. मुंबईत आज कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय जाहीर केला. त्यानंतर सध्या राज्यभर चालू असलेला आशा आणि गटप्रवर्तकांचा संप मागे घेत असल्याची घोषणा कृती समितीचे अध्यक्ष एम.के. पाटील यांनी केली. उद्यापासून राज्यातील आशा स्वयंसेविका कामावर हजर होतील, असं त्यांनी यावेळी सांगितलं. ‘आशां’ना विशेष भेट म्हणून स्मार्ट फोनही देण्यात येणार असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. या निर्णयाचा राज्यातील ६८ हजार २९७ आशा सेविका आणि तीन हजार ५७० गट प्रवर्तकांना लाभ होणार आहे.

पुढच्या वर्षी जुलैमध्ये आशांना ५०० रुपयांची वाढ देण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे. आशां वर्कर्सचं काम आणि त्यांना मिळणारं मानधन या सर्व बाबींचा अभ्यास करण्यासाठी ‘यशदा’ मार्फत समिती स्थापन करण्यात येईल. लसीकरणासाठी गर्दीचं व्यवस्थापन करण्याकरिता २०० रुपये अतिरिक्त भत्ता देण्याचाही निर्णय घेण्यात आला असल्याचं टोपे यांनी सांगितलं.

****

अंमलबजावणी संचालनालय - ईडीनं कर्ज बुडवे विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांची संपत्ती निवारण अधिनियम २००२ कायद्यातंर्गत १८ हजार १७० कोटी दोन लाख रूपयांची मालमत्ता जप्त केली आहे. बँकांच्या एकूण नुकसानीच्या ८० पूर्णांक ४५ शतांश टक्के एवढी ही मालमत्ता आहे. ईडीनं एका ट्वीटच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. एकूण जप्त मालमत्तेपैकी ९ हजार ३७१ कोटी १७ लाख रूपये कर्ज दिलेल्या सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि केंद्र सरकारकडे हस्तांतरित करण्यात आल्याचं ईडीनं ट्विट संदेशात म्हटलं आहे.

****

केंद्रीय मंत्रिमंडळानं आज पंतप्रधान गरिब कल्याण योजनेअंतर्गत पुढील पाच महिन्याच्या मोफत आगाऊ अन्नधान्य कोट्याला मंजुरी दिली आहे. या अंतर्गत येत्या जुलै ते नोव्हेंबर या पाच महिन्यात हे धान्य प्रत्येक व्यक्तीला पाच किलो प्रमाणं मोफत दिलं जाणार आहे. या योजनेचा एकूण ८१ कोटी ३५ लाख व्यक्तींना लाभ मिळणार आहे. केंद्र सरकारनं ६४ हजार करोड ३१ लाख रुपयांचं अनुदान या योजनेला दिलं आहे.

****

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक शुल्कासंदर्भात विद्यार्थी आणि पालक संघटनाकडून  शासनास प्राप्त  झालेल्या  निवेदनावर अभ्यास करून  विद्यार्थी हिताचा निर्णय घ्यावा अशा सूचना उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज दिल्या. मुंबईत आज महाराष्ट्र विना अनुदानीत खाजगी व्यवसायिक शैक्षणिक संस्था अधिनियम -२०१५ नुसार गठीत केलेल्या समितीची पहिली बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेत आणि विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये, ही काळजी घेण्याच्या सुचनाही त्यांनी दिल्या.            

****

ऑलिम्पिक दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑलिम्पिकपटूंचे कौतुक आणि अभिनंदन केलं आहे. गेली अनेक वर्षे ऑलिम्पिक स्पर्धांमधून भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या क्रीडापटूंविषयी देशाला अभिमानाची भावना असल्याचं त्यांना आपल्या ट्वीट संदेशात म्हटलं आहे. आगामी ऑलिम्पिक स्पर्धे पूर्वी माय गोव्ह ही प्रश्नमंजुषा आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये सर्वांनी विशेष करून युवा मित्रांनी सहभागी होण्याचं आवाहन यावेळी पंतप्रधानांनी केलं.

****

जळगाव जिल्ह्यात डेल्टा प्लस कोविड विषाणूची लक्षणं असलेले सात रुग्ण आढळून आले आहेत. हे सातही रुग्ण ठणठणीत असून त्यांची प्रकृती उत्तम आहे, असं जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सांगितलं. जिल्हावासियांनी घाबरुन न जाता खबरदारीचा उपाय म्हणून नियमांचं पालन करावं, असं आवाहन त्यांनी केलं आहे.

****

जल जीवन अभियानाअंतर्गत मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांनी ठरवून दिलेलं उद्दिष्ट विहित कालावधित पूर्ण करण्याचे निर्देश पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले आहेत. मुंबईत आज मराठवाड्यातील सर्व पाणीपुरवठा योजनांचा आढावा घेण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. रखडलेल्या आणि लहान पाणीपुरवठा योजनांच्या कामांना गती द्यावी तसंच नवीन योजनांचं सर्वेक्षण करून सविस्तर प्रकल्प अहवाल सप्टेंबरपर्यंत तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील ७६ तालुक्यांमध्ये यावर्षी जवळपास ७ लाख २४ हजार ९०४ कुटुंबांना नळजोडण्या देण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे.

****

इतर मागास प्रवर्ग - ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मागणी संदर्भात भारतीय जनता पक्षाच्या वतीनं येत्या २६ जून रोजी राज्यभर चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे. औरंगाबाद शहरात आकाशवाणी चौकात सकाळी १० वाजता हे आंदोलन होणार असल्याची माहिती जिल्हाशहरअध्यक्ष संजय केनेकर यांनी दिली आहे. ते आज औरंगाबाद इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. जिल्ह्यात सर्व तालुक्यात हे चक्का जाम आंदोलन होणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

औरंगाबाद महानगरपालिकेची आगामी निवडणूक एमआयएम पक्ष स्वबळावर लढवणार असल्याची माहिती खासदार इम्तियाज जलील यांनी दिली आहे. ते आज औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. यंदा जास्तीत जास्त वार्डांमध्ये उमेदवार उभे करणार असल्याचं ते म्हणाले. औरंगाबाद विमानतळासमोर होणारा नियोजित उड्डाणपूल रद्द करुन आकाशवाणी किंवा दुध डेअरी इथं तो उभारण्यात यावा, किंवा सिडको बसस्थानकाजवळील जालना मार्गावरील उड्डाणपूलाचं विस्तारीकरण करुन तो सरळ केंब्रीज पर्यंत करावा अशी मागणी केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

****

औरंगाबाद मधील वडगाव कोल्हाटी इथं आज १८ वर्षांवरील दिव्यांग बांधवांसाठी कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात आलं. वडगाव कोल्हाटी इथल्या जिल्हापरिषदेच्या शाळेत जवळपास ४० दिव्यांगाना लसीची पहिली मात्रा देण्यात आली. शासनानं दिव्यांगांसाठी लसीकरणाची ही सुविधा उपलब्ध करुन दिल्याबद्दल लाभार्थी दत्ता वाकडे यांनी आभार मानले. ते म्हणाले….. 

शासनाने जे दिव्यांगासाठी महाराष्ट्रामध्ये घरपोच लस देण्याचं जे उद्दिष्ट ठेवलं. यात डॉ बामणे यांच्या मदतीने बजाजनगर वडगाव कोल्हाटी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये ४० दिव्यांगाना जवळपास आज लस देण्यात आली. आणि लस घेण्यासाठी बजाजनगर परिसरात दिव्यांग त्रस्त होते. लॉकडाऊनमुळे एवढे वर्ष ते घरीच होते. कारण त्यांना लस घेण्यासाठी बाहेर केंद्रावर जात येत नव्हत किंवा कुठ रजीस्ट्रेशन करा हे काम खुप सोप्या पद्धतीने आम्हाला करुन घेतलं. या सर्व टिमचं आणि शासनाला आम्ही मनापासून धन्यवाद देतो.

****

परभणी जिल्ह्यात गंगाखेड शहरातील घरकुल लाभधारकांचे प्रलंबित हप्ते तत्काळ वाटप करावेत अशी मागणी एमआयएमच्या वतीनं आज एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. पावसाळा सुरु झाला असुन गंगाखेड शहरातील घरकुल लाभार्थी किरायाने राहत आहेत. घरकुल लाभार्थ्यांना उर्वरित हप्ते मिळाले तर बांधकाम करून राहण्याची व्यवस्था होईल आणि आर्थिक कुचंबणाही थांबेल असं या निवेदनात म्हटलं आहे.

//*******//

 

No comments: