Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 30 June 2021
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३० जून २०२१
दुपारी १.०० वा.
****
कोविडमुळे निधन झालेल्या
रुग्णांच्या कुटुंबाला देण्यात येणारी आर्थिक मदत सर्व प्रकारचे पैलू लक्षात घेऊन निश्चित
करावी, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिले आहेत. अशा कुटुंबियांना
किमान दराची सवलत मिळावी यासाठी सहा आठवड्यात मार्गदर्शक सूचना जारी करण्याचे आदेश
न्यायालयानं राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाला दिले आहेत.
****
वस्तू आणि सेवा कर - जीएसटीच्या
अंमलबजावणीला उद्या चार वर्ष पूर्ण होत आहेत. जीएसटीमुळे जटिल अप्रत्यक्ष कर संरचनेची
जागा एका साध्या, पारदर्शक आणि तंत्रज्ञानस्नेही करप्रणालीने घेतली असून, भारताला एकाच
सामान्य बाजारामध्ये एकत्रित केलं आहे. प्रत्येक राज्यात व्यवसाय करू पाहणाऱ्या कंपनीला
तब्बल ४९५ वेगवेगळे अर्ज सादर करावे लागत होते. जीएसटी अंतर्गत, ही संख्या घटून अवघ्या
१२ वर आली आहे. जीएसटी अंतर्गत, एक कोटी तीन लाखाहून अधिक करदात्यांची नोंदणी करण्यात
आली असून, अनुपालन सातत्यानं सुधारत आहे. जीएसटीमुळे लोकांना भराव्या लागणाऱ्या कराचा
दर कमी झाला आहे. आरएनआर समितीने शिफारस केल्याप्रमाणे महसूल तटस्थ दर १५ पूर्णांक
तीन होता, त्या तुलनेत रिझर्व्ह बँकेच्या मते, जीएसटी दर सध्या केवळ ११ पूर्णांक सहा
टक्के इतका असल्याचं, केंद्रीय अर्थ मंत्रालयानं ट्विटरच्या माध्यमातून सांगितलं.
****
नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी
भारतीय रिझर्व्ह बँकेने मुंबईच्या सारस्वत सहकारी बँक, एसव्हीसी सहकारी बँकं, हैदराबादमधील
आंध्र प्रदेश महेश को-ऑपरेटिव्ह अर्बन बँक आणि अहमदाबाद मर्केंटाईल को-ऑपरेटिव्ह बँकेवर
दंडात्मक कारवाई केली आहे. नो युवर कस्टमर या संदर्भातील निर्देशांचं पालन न करणं,
ठेवीवरील व्याज दरावरील मास्टर निर्देशात असलेल्या निकषांचं उल्लंघन करणं, ठेवीवरील
व्याज दर आणि फसवणुकीचे निरीक्षण आणि अहवाल न ठेवणं, आदी कारणांमुळे ही कारवाई करण्यात
आली.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या
सकाळी ११ वाजता ‘डिजिटल इंडिया’च्या लाभार्थ्यांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून
संवाद साधणार आहेत. एक जुलै २०१५ रोजी पंतप्रधानांनी सुरू केलेल्या ‘डिजिटल इंडिया’ला
सहा वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या
वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
****
घरोघरी जाऊन कोविड-19 प्रतिबंधक
लसीकरण करण्यासाठी तयार असल्याचं राज्य सरकारनं आज मुंबई उच्च न्यायालयात सांगितलं.
७५ वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या आणि दिव्यांग नागरीकांना घरी जाऊन लसीकरण करण्यासंदर्भात
दाखल याचिकेच्या सुनावणीदरम्यान राज्य सरकारनं यासंदर्भातलं प्रतिज्ञापत्र न्यायालयात
सादर केलं. हा प्रस्ताव मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठवण्यात येणार आहे.
****
देशातली बेरोजगारी आणि पर्यायाने
गरिबी दूर करण्यासाठी तरुणांमध्ये उद्यमशीलता येणं आवश्यक आहे, आणि त्यासाठी वेगवेगळं
प्रशिक्षण देणाऱ्या, उद्योजक निर्माण करणाऱ्या संस्था निर्माण करणं आवश्यक असल्याचं,
केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. चेंबर
ऑफ इंडियन एमएसएमईनं आयोजित केलेल्या एका वेबिनारमध्ये ते बोलत होते. सूक्ष्म, लघु
आणि मध्यम उद्योगांसाठी मानांकन प्रणाली आणि त्या संबंधित योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी
डॅशबोर्ड तयार करण्याचं आवाहन, गडकरी यांनी यावेळी केलं.
****
इंधनाच्या वाढत्या दराच्या
निषेधार्थ राज्यभरातील वाहतूकदार संघटनांनी एल्गार पुकारला आहे. कोरोनाविषयक निर्बंधांमुळे
वाहतूकदार अडचणीत आले आले असून, मालवाहक गाड्यांचे थकीत हप्ते भरण्यासाठी मुदतवाढ मिळावी
आणि इंधन दरवाढ रोखावी अशी आग्रही मागणी वाहतूकदार संघटनेनं केली आहे. या प्रश्नावर
वाहतूकदारांनी काल पुण्यात निदर्शनं केली. परिस्थितीत सुधारणा झाली नाही तर देशव्यापी
चक्का जाम आंदोलन करण्याचा इशाराही संघटनेनं दिला आहे.
****
कोविड संसर्गाने आई-वडील
यापैकी एक किंवा दोन्ही पालक गमावलेल्या पाल्यांना, शासन निर्देशानुसार आवश्यक सहाय्य
उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश, औरंगाबादचे जिल्हाधिकारी
सुनील चव्हाण यांनी दिले आहेत. महिला आणि बाल विकासांअंतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्ष,
जिल्हा कृती दलाची बैठक काल झाली. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बाल कल्याण समितीची
बैठक घेऊन या पाल्यांना बालसंगोपन किंवा बालगृहामध्ये ठेवण्याच्या अनुषंगाने प्रक्रिया
पूर्ण करण्याचे निर्देश, जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
****
भारत आणि इंग्लंडच्या महिला
क्रिकेट संघांमध्ये सुरू असलेल्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना आज
इंग्लंडमधल्या टाउंटन इथं खेळला जाणार आहे. हा सामना दिवस रात्र खेळला जाणार असून,
भारतीय प्रमाण वेळेनुसार संध्याकाळी साडे सहा वाजता सामना सुरू होईल. तीन सामन्यांच्या
या मालिकेत यजमान इंग्लंडचा संघ एक-शून्यनं आघाडीवर आहे.
****
No comments:
Post a Comment