Monday, 28 June 2021

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 28 June 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 28 June 2021

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २८ जून २०२१ सायंकाळी ६.१०

****

राज्यात कोविड १९शी संबंधित निर्बंध शिथिल जरी झाले आले असले तरी कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप कायम आहे. त्यामुळे सर्वांनी संपूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे. महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं, असं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. सुरक्षित राहण्यासाठी नाका-तोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा तसंच लसीकरण करून घ्यावं. कोविड - १९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदतवाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

** आत्मनिर्भर भारत योजनेला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ; आरोग्य क्षेत्रासाठी ५० हजार कोटी रुपये तर इतर आठ क्षेत्रांसाठी ६० हजार कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर

** राज्याची दररोज १५ लाख कोविड मात्रांच्या लसीकरणाची तयारी - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

** औरंगाबाद शहरातील गुंठेवारी नियमावली लवकरच जाहीर करण्यात येणार -पालकमंत्री सुभाष देसाई यांची घोषणा 

आणि

** शासकीय निधीच्या अपहारप्रकरणी नांदेड जिल्हा परिषदेचा उपमुख्य कार्यकारी अधिकारी उत्तम कोमवाड याला ७ वर्ष सक्तमजुरी आणि १८ लाख ८० हजार रुपये दंड

****

देशात उद्भवलेल्या कोविड पार्श्वभूमीवर आत्मनिर्भर भारत योजनेला ३१ मार्च २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. आरोग्य क्षेत्रासाठी ५० हजार कोटी रुपये तर इतर आठ क्षेत्रांसाठी ६० हजार कोटी रुपयांचं पॅकेज सीतारामन यांनी जाहीर केलं. पंतप्रधानांनी नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिलेल्या प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेसाठी एकूण दोन लाख २७ हजार ८००कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे तर शेतकऱ्यांना खतांवर अनुदानापोटी १४ हजार ७७५ कोटी रुपयांची अतिरिक्त तरतूद करण्यात आली आहे. सार्वजनिक आरोग्य क्षेत्रासाठी २३ हजार २२० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, उद्योग, बालपोषण, डिजीटल इंडिया, पर्यटन, या सह इतरही विविध क्षेत्रांसाठी अर्थमंत्र्यांनी योजना जाहीर केल्या. कर्मचारी संख्या १००च्या आत असलेल्या कंपन्या आणि दरमहा १५ हजार रुपयापर्यंत पगार असलेल्या कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधीचा दोन्हीचा मिळून २४ टक्के वाटा येत्या ३१ मार्च २०२२ पर्यंत सरकारकडून भरला जाईल, असं अर्थमंत्र्यांनी सांगितलं.

****

राज्य शासनाची दररोज १५ लाख कोविड मात्रांच्या लसीकरणाची तयारी असल्याचं, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. मुंबईत मालाड इथं समर्पित कोविड रुग्णालयाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज मुंबई महानगरपालिकेला हस्तांतरण करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. तिसऱ्या संभाव्य लाटेची शक्यता असल्यानं, अधिक सावध राहिलं पाहिजे, सध्या रुग्ण संख्या घटत असली तरी, दुसरी लाट परत उलटू नये म्हणून गर्दी टाळणं, मास्क घालणं हे नियम कटाक्षाने पाळावे लागतील, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी नमूद केलं.

****

औरंगाबाद शहरातील गुंठेवारी भागातील नियमावली लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचं पालकमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितलं आहे. औरंगाबाद शहरातल्या शहागंज इथं माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या निधीतून लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण देसाई यांच्या हस्ते आज झालं. त्यावेळी ते बोलत होते. शासनानं वेळोवेळी दिलेल्या सूचनांचं काटेकोरपणे शहरातील नागरिकांनी पालन केलं. त्यामुळेच आपण कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आणू शकलो, याबद्दल त्यांनी शहरवासियांचे यावेळी आभार मानले. तसंच यापुढेही मास्क, सॅनिटायझरचा वापर आणि सामाजिक अंतर या त्रिसूत्री चा अवलंब करून आपण तिसऱ्या लाटेला पूर्ण थांबवू शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यासाठी प्रशासनाने केलेल्या उपयोजनांचं त्यांनी कौतुक केलं. दरम्यान, औरंगाबाद शहर पोलिसांसाठी डायल-112 या योजनेअंतर्गत ७४ दुचाकी वाहनांचं पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात आलं.

****

पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळ - बालभारतीने विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी एक अॅप तयार केलं आहे. ई-बालभारती अॅप आणि वेबसाइटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम उपलब्ध करुन देण्यात आला आहे. नोंदणी करताना एकदाच ५० रुपये शुल्क आणि कराची रक्कम दिल्यावर वर्षभरासाठी याचा वापर करता येईल. कुटुंबातले कुठल्याही इयत्तेतले, कितीही विद्यार्थी नोंदणीच्या आधारे याचा लाभ घेऊ शकतील. सध्या पहिली ते पाचवीसाठी मराठी माध्यम आणि दहावीच्या मराठी, इंग्रजी आणि उर्दू माध्यमाचा अभ्यासक्रम यावर उपलब्ध आहे. इतर इयत्तांचा अभ्यासक्रमही लवकरच यावर उपलब्ध करुन दिला जाणार असल्याची माहिती बालभारतीचे संचालक दिनकर पाटील यांनी दिली. ते म्हणाले..

एखाद्या फॅमिलीमध्ये समजा वेगळ्या वेगळ्या वर्गात जरी मुलं असली आणि एक रजिस्ट्रेशन जरी केल तरी ते रजिस्ट्रेशन त्यांना पुरेस होऊ शकत, त्याच्या आधारे ते दोन, तीन मुलं असतील तर त्यांना ते उपयुक्त असं ठरु शकत. आणि त्याच्यामध्ये व्हिडीओ आहेत. ॲनीमेशन आहे. काही प्रेझेन्टेशन पण आहेत आणि याच्या आधारे ते मुलांना उपलब्ध होऊ शकत.

****

अहमदनगर जिल्ह्यातल्या निळवंडे धरणाच्या कालव्यांसाठीचा बोगदा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते आज खुला करण्यात आला. थोरात यांनी या कालव्याची पाहणी केली. उजवा तसंच डावा कालवा जलद गतीने पूर्ण करून २०२२ पर्यंत सर्वांना पाणी मिळेल यासाठी काम करण्याच्या सूचना केल्या.

****

नांदेड जिल्ह्यातल्या मुदखेड शहराची वाढती लोकसंख्या पाहता राज्य सरकारने ४१ कोटी रुपये खर्चाची पाणीपुरवठा योजना मंजूर केली आहे. या योजनेच्या कामाचं भूमिपूजन राज्याचे सार्वजनिक बांधकाम तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते आज मुदखेड इथं करण्यात आलं.

****

शासकीय निधीचा अपहार केल्याप्रकरणी नांदेड जिल्हा परिषदेचा उपमुख्य कार्यकारी अधिकारी उत्तम आनंदा कोमवाड याला न्यायालयानं ७ वर्ष सक्तमजुरी आणि १८ लाख ८० हजार रुपये दंड ठोठावला आहे. २०१६ मध्ये घडलेल्या या अपहार प्रकरणी नांदेडचे मुख्य न्याय दंडाधिकारी सचिन पाटील यांनी ही शिक्षा सुनावली. दंडाच्या रकमेपैकी १८ लाख रुपये रक्कम जिल्हा परिषदेला देण्याचे आदेश न्याय दंडाधिकाऱ्यांनी दिले आहेत. ग्रामविकासासाठी आलेल्या निधीतून कोमवाड याने एक कोटी १८ लाख ८२ हजार रुपये रक्कम वळती करून घेतल्याचं ऑगस्ट २०१६ मध्ये निदर्शनास आलं होतं, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल काळभोर यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर कोमवाड याला पोलिसांनी अटक केली होती.

****

औरंगाबाद महानगरपालिकेच्या प्रगती पेट्रोल पंपाचं उद्घाटन पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते आज झालं. देसाई यांनी कोनशिलेचं अनावरण करून तसंच वाहनात पेट्रोल भरून पेट्रोल पंपाचं उद्घाटन केलं. पालकमंत्र्यांच्या हस्ते यावेळी वृक्षारोपणही करण्यात आलं. महानगरपालिकेच्या वतीनं शहरात एकूण पाच पेट्रोल पंप सुरू करण्यात येणार असून, त्यासंदर्भात प्रक्रिया सुरू झाली असल्याचं, महानगरपालिका प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी यावेळी सांगितलं.

****

धुळे महापालिकेच्या उपमहापौर पदी सत्ताधारी भाजपाचे भगवान गवळी यांचा बहुमताने विजय झाला. त्यांना ५० मतं मिळाली. धुळे महापलिकेच्या महापौर आणि उपमहापौरांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ ३० जूनला पूर्ण होत आहे. परंतू महापौरपदाच्या आरक्षणाचा विषय न्यायप्रविष्ट असल्याने, आज फक्त उपमहापौर पदासाठी कोविड प्रतिबंधक नियमांनुसार ऑनलाईन पध्दतीने झालेल्या सभेत मतदान घेण्यात आलं. शहरातल्या १९ प्रभागातले ७३ नगरसेवक या निवडणूक प्रकियेत आपापल्या घरून सहभागी झाले. भगवान गवळी यांना ५०, कॉंग्रेसचे खान सदिन हुसेन यांना १९ तर एमआयएमच्या शेख मेहरुन्नीसा जाकीर यांना ४ मतं मिळाली.

****

परभणी जिल्ह्यात गंगाखेड शहरातून सर्रासपणे राख वाहतूक करणाऱ्या २० वाहनांवर पोलीस निरिक्षक वसुंधरा बोरगांवकर यांच्या पथकाने आज कारवाई केली. या वाहनांवर ६ लाख रुपये दंड आकारत ही वाहनं ताब्यात घेण्यात आली. क्षमतेपेक्षा अधिक तसंच व्यवस्थित न झाकलेल्या वाहनांवर कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

****

लातूर जिल्ह्याच्या विकासात सर्व यंत्रणांनी परिणामकारक योगदान द्यावं, आणि योजनांची अंमलबजावणी यशस्वीपणे करावी, असं जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी म्हटलं आहे. लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. मुरुड ग्रामीण रुग्णालयात मंजूर झालेलं ट्रामा केअर सेंटर त्वरित सुरू करुन रुग्णांना सुविधा उपलब्ध करून देण्याची सूचना त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांना केली.

//*********//

 

No comments: