आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२९ जून
२०२१ सकाळी ११.०० वाजता
****
कोरोना
प्रतिबंधक लसीकरणात जगातील अन्य देशांना मागे टाकत सर्वाधिक लसीकरण करणारा भारत पहिला
देश ठरला आहे. देशात काल लसीचे एकूण १७ लाख २१ हजार २६८ डोस देण्यात आले आहेत. यानंतर
एकूण लसीकरणाचा आकडा ३२ कोटी ३६ लाख २९७ हजारांवर पोहोचला आहे.
****
मनसुख
हिरेन हत्या प्रकरणी माजी पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा याची मुंबईतल्या विशेष एनआयए
न्यायालयानं १२ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेनं
शर्मा याला १७ जून रोजी चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. दरम्यान, शर्माचे दोन साथीदार
सतीश मोठकरी आणि मनीष सोनी यांना एक जुलैपर्यंत एनआयए कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात
आले.
****
भारतीय
जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांच्या नेतृत्वाखाली काल बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर
विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला. राज्य शासनाने मराठा आरक्षण, पिक विमा, ऊसतोड
मजुर, मुकादम यांच्यासाठी कायदा, तसचं ६६ टक्के भाववाढ, कोविडच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांपैकी
पात्र कर्मचाऱ्यांना आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभागात थेट नियुक्ती द्यावी, आदी
मागण्या यावेळी करण्यात आल्या.
****
धुळे
महापालिकेच्या उपमहापौर पदी सत्ताधारी भाजपाचे भगवान गवळी यांचा बहुमतानं विजय झाला,
त्यांना ५० मतं मिळाली. धुळे महापलिकेच्या महापौर आणि उपमहापौरांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ
३० जूनला पूर्ण होत आहे, परंतू महापौरपदाच्या आरक्षणाचा विषय न्यायप्रविष्ट असल्यानं,
काल फक्त उपमहापौर पदासाठी, कोविड प्रतिबंधक नियमांनुसार ऑनलाईन पध्दतीने झालेल्या
सभेत मतदान घेण्यात आलं.
****
आंतरराष्ट्रीय
नेमबाजी क्रीडा महामंडळाच्या क्रोएशिया इथंल्या जागतिक नेमबाजी स्पर्धेत काल भारताच्या
राही सरनोबत हिनं २५ मीटर पिस्टल प्रकारात सुवर्णपदक मिळवलं. राहीनं ५० पैकी ३९ वेळा
अचूक नेम साधत सुवर्णपदक जिंकलं. मनु भाकेरला मात्र सातव्या स्थानावर समाधान मानावं
लागलं.
दरम्यान,
या स्पर्धेत विविध प्रकारात तीन सुवर्ण पदक मिळवलेल्या तिरंदाज दीपिकाकुमारीनं महिला
तिरंदाजांच्या जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर झेप घेतली आहे.
****
No comments:
Post a Comment