Tuesday, 29 June 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 29.06.2021 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 29 June 2021

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २९ जून २०२ सकाळी ७.१० मि.

****

देशात १८ वर्षांवरील सर्वांना कोविड-19 प्रतिबंधक लस मोफत देण्यात येत आहे. सर्वांना आमचा सल्ला आहे की, त्यांनी ही लस अवश्य घ्यावी. कोविड-19शी संबंधित निर्बंध शिथिल जरी झाले असले, तरी कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप संपलेला नाही. त्यामुळे सर्वांनी संपूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे. महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं, असं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. सुरक्षित राहण्यासाठी नाका-तोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा. कोविड-19 शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदतवाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

·      आत्मनिर्भर भारत योजनेला, ३१ मार्च २०२२ पर्यंत मुदतवाढ; आरोग्यासह विविध आठ क्षेत्रांसाठी एक लाख दहा हजार कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर.

·      इतर मागासवर्गीय समाजाचं राजकीय आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल.

·      राज्यात सहा हजार ७२७ नवे कोविड रुग्ण; मराठवाड्यात आठ जणांचा मृत्यू तर ३१२ बाधित.

·      शासकीय निधीचा अपहार केल्याप्रकरणी नांदेड जिल्हा परिषदेचा उपमुख्य कार्यकारी अधिकारी उत्तम आनंदा कोमवाड याला, सात वर्ष सक्तमजुरी आणि १८ लाख ८० हजार रुपयांचा दंड.

·      औरंगाबाद शहरातील गुंठेवारी भागातील नियमावली लवकरच जाहीर करणार - पालकमंत्री सुभाष देसाई.

आणि

·      कृषी विभागाच्या रब्बी हंगाम पीक स्पर्धेत, उस्मानाबाद जिल्ह्यातील आर्सोलीचे शेतकरी सोमनाथ मुंडेकर ज्वारी उत्पादनात राज्यात दुसऱ्या क्रमांकावर.

****

देशात उद्भवलेल्या कोविड पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं आत्मनिर्भर भारत योजनेला, ३१ मार्च २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. आरोग्यासह विविध आठ क्षेत्रांसाठी एक लाख दहा हजार कोटी रुपयांचं पॅकेज, सीतारामन यांनी जाहीर केलं. आरोग्य क्षेत्रासाठी ५० हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, त्यातून पायाभूत वैद्यकीय सुविधांचं आधुनिकीकरण केलं जाणार आहे. २५ लाख छोट्या व्यावसायिकांसाठी अर्थमंत्र्यांनी कर्ज हमी योजना जाहीर केली, या योजनेअंतर्गत छोट्या पतसंस्थांकडून व्यावसायिकांना सव्वा लाख रुपयापर्यंत कर्ज घेता येईल.

शेतकऱ्यांना खतांवर अनुदानापोटी, १४ हजार ७७५ कोटी रुपयांची अतिरिक्त तरतूद करण्यात आली आहे. सार्वजनिक आरोग्य क्षेत्रासाठी २३ हजार २२० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, उद्योग, बालपोषण, डिजीटल इंडिया, पर्यटन, या सह इतरही विविध क्षेत्रांसाठी, अर्थमंत्र्यांनी योजना जाहीर केल्या. कर्मचारी संख्या १००च्या आत असलेल्या कंपन्या, आणि दरमहा १५ हजार रुपयापर्यंत पगार असलेल्या कर्मचाऱ्यांचा, भविष्य निर्वाह निधीचा दोन्हीचा मिळून २४ टक्के वाटा, येत्या ३१ मार्च २०२२ पर्यंत सरकारकडून भरला जाईल, असं अर्थमंत्र्यांनी सांगितलं.

****

राज्य शासनाची दररोज १५ लाख कोविड मात्रांच्या लसीकरणाची तयारी असल्याचं, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. मुंबईत मालाड इथं समर्पित कोविड रुग्णालयाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल मुंबई महानगरपालिकेला हस्तांतरण करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. तिसऱ्या संभाव्य लाटेची शक्यता असल्यानं, अधिक सावध राहिलं पाहिजे, सध्या रुग्ण संख्या घटत असली तरी, दुसरी लाट परत उलटू नये म्हणून गर्दी टाळणं, मास्क घालणं हे नियम कटाक्षाने पाळावे लागतील, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी नमूद केलं.

 

दरम्यान, नागरी तसंच औद्योगिक क्षेत्रात सांडपाणी प्रक्रिया आणि घनकचरा व्यवस्थापनाबाबत, दीर्घकालीन नियोजन करण्याचे निर्देश, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. राज्यातल्या नागरी तसंच औद्योगिक क्षेत्रातल्या सांडपाणी प्रक्रिया तसंच घनकचरा व्यवस्थापनाबाबतच्या आढावा बैठकीत, ते काल बोलत होते. सांडपाणी प्रक्रियेतून मिळणाऱ्या शुद्ध पाण्याचा कसा वापर होणार, त्यासाठीच्या जलवाहिन्यांचे जाळे, अशा गोष्टींबाबतही नागरी भागासाठी नियोजन करावं, विदेशात उंच इमारतीमधील पाण्याच्या पुनर्वापराबाबत निश्चित धोरण आहे, अशा धोरणांचा अभ्यास करून त्यांचा अवलंब करण्यासाठी प्रोत्साहन द्यावं लागेल, असं मुख्यमंत्री म्हणाले.

आगामी काळात कोविडसारखं संकट आल्यास किंवा अन्य आपत्कालीन स्थितीत, उद्योगांकडे निश्चित असे पर्याय असावेत. औद्योगिक क्षेत्रातच मनुष्यबळाच्या निवासाची व्यवस्था करता येईल, अशा टाऊनशिपचा विचार व्हावा, जेणेकरून उद्योगांतील उत्पादन थांबणार नाही, असंही मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत सांगितलं.

****

इतर मागासवर्गीय - ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. राज्य निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या सहा जिल्हा परिषद आणि ४४ पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुका पुढे ढकलण्याची विनंती या याचिकेत करण्यात आली आहे.

****

पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळ - बालभारतीनं, विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी एक अॅप तयार केलं आहे. ई-बालभारती अॅप आणि वेबसाइटच्या माध्यमातून, विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम उपलब्ध करुन देण्यात आला आहे. नोंदणी करताना एकदाच ५० रुपये शुल्क आणि कराची रक्कम दिल्यावर, वर्षभरासाठी याचा वापर करता येईल. कुटुंबातले कुठल्याही इयत्तेतले, कितीही विद्यार्थी नोंदणीच्या आधारे याचा लाभ घेऊ शकतील. सध्या पहिली ते पाचवीसाठी मराठी माध्यम, आणि दहावीच्या मराठी, इंग्रजी आणि उर्दू माध्यमाचा अभ्यासक्रम, यावर उपलब्ध आहे. इतर इयत्तांचा अभ्यासक्रमही लवकरच यावर उपलब्ध करुन दिला जाणार असल्याची माहिती, बालभारतीचे संचालक दिनकर पाटील यांनी दिली. 

****

राज्यात काल सहा हजार ७२७ नवे कोविड रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ६० लाख ४३ हजार ५४८ झाली आहे. काल १०१ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख २१ हजार ५७३ झाली असून, मृत्यूदर दोन पूर्णांक एक दशांश टक्के झाला आहे. काल दहा हजार ८१२ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत ५८ लाख ९२५ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९५ पूर्णांक ९९ शतांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात एक लाख १७ हजार ८७४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

मराठवाड्यात काल ३१२ कोविड बाधितांची नोंद झाली, तर आठ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या पाच, तर परभणी, हिंगोली आणि बीड जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

बीड जिल्ह्यात १२९ रुग्ण आढळले. उस्मानाबाद ६७, औरंगाबाद ४५, परभणी ३३, लातूर १६, जालना १३, नांदेड सहा, तर हिंगोली जिल्ह्यात तीन नवे रुग्ण आढळून आले.

****

कोविड प्रतिबंधात्मक लसींच्या तुटवड्यामुळे, औरंगाबाद शहरात आज फक्त प्रोझोन मॉल इथल्या ड्राईव्ह - इन लसीकरण केंद्र, आणि कोव्हॅक्सीन लसीची तीन लसीकरण केंद्रं सुरु राहणार आहेत. महानगरपालिकेच्या आरोग्य विभागानं ही माहिती दिली.

दरम्यान, काल वाळूज इथल्या एका लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. या ठिकाणी काही नागरिकांची चेंगराचेंगरी आणि धक्काबुक्की झाली. वाळूज पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी गर्दीवर नियंत्रण मिळवलं.

****

परभणी महानगरपालिकेच्या आठ नागरी आरोग्य केंद्रासह सहा खाजगी केंद्रांवर, आज लसीकरण होणार आहे. कोवॅक्सिन लसीची फक्त दुसरी, तर कोविशील्ड लसीची पहिली तसंच दुसरी मात्रा दिली जाणार असल्याची माहिती, महापालिका आयुक्त देविदास पवार यांनी दिली.

****

शासकीय निधीचा अपहार केल्याप्रकरणी नांदेड जिल्हा परिषदेचा उपमुख्य कार्यकारी अधिकारी उत्तम आनंदा कोमवाड याला, न्यायालयानं सात वर्ष सक्तमजुरी आणि १८ लाख ८० हजार रुपये दंड ठोठावला आहे. २०१६ मध्ये घडलेल्या या अपहार प्रकरणी नांदेडचे मुख्य न्याय दंडाधिकारी सचिन पाटील यांनी ही शिक्षा सुनावली. दंडाच्या रकमेपैकी १८ लाख रुपये रक्कम जिल्हा परिषदेला देण्याचे आदेश न्याय दंडाधिकाऱ्यांनी दिले आहेत. ग्रामविकासासाठी आलेल्या निधीतून कोमवाड याने, एक कोटी १८ लाख ८२ हजार रुपये रक्कम वळती करून घेतल्याचं, ऑगस्ट २०१६ मध्ये निदर्शनास आलं होतं, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल काळभोर यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर, कोमवाड याला पोलिसांनी अटक केली होती.

****

औरंगाबाद इथं शनिवार - रविवार बाजारपेठ उघडण्याबाबत विचार करता येईल, असं सूचक वक्तव्य पालकमंत्री सुभाष देसाई यांनी केलं आहे. औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघातर्फे विविध मागण्यांचं निवेदन, काल पालकमंत्री देसाई यांना सादर करण्यात आलं. या निवेदनात बाजारपेठांच्या वेळात बदल आणि शनिवार-रविवार संपूर्ण बाजारपेठ उघडी ठेवण्याबाबत मागणी करण्यात आली. यावर पालकमंत्र्यांनी, दुकानांच्या वेळा बदलता येणार नाहीत, मात्र, शनिवार - रविवार बाजारपेठ उघडण्याबाबत विचार करता येईल, असं सांगितलं. नव्यानं लावण्यात येणाऱ्या आस्थापना कराविषयी मनपा प्रशासक यांच्याशी चर्चा करून लवकरच यावर सकारात्मक निर्णय घेण्याची तयारी पालकमंत्र्यांनी दर्शवल्याचं, संघटनेकडून सांगण्यात आलं.

 

दरम्यान, औरंगाबाद शहरातील गुंठेवारी भागातील नियमावली लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचं, पालकमंत्री देसाई यांनी सांगितलं आहे. औरंगाबाद शहरातल्या शहागंज इथं माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या निधीतून, लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण देसाई यांच्या हस्ते काल झालं, त्यावेळी ते बोलत होते. शासनानं वेळोवेळी दिलेल्या सूचनांचं काटेकोरपणे शहरातल्या नागरिकांनी पालन केलं, त्यामुळेच आपण कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आणू शकलो, याबद्दल त्यांनी शहरवासियांचे आभार मानले.

औरंगाबाद महानगरपालिकेच्या प्रगती पेट्रोल पंपाचं उद्घाटन, तसंच औरंगाबाद शहर पोलिसांसाठी डायल-११२ या योजनेअंतर्गत, ७४ दुचाकी वाहनांचं, पालकमंत्र्यांच्या हस्ते काल लोकार्पण करण्यात आलं. महानगरपालिकेच्या वतीनं शहरात एकूण पाच पेट्रोल पंप सुरू करण्यात येणार असल्याचं, महानगरपालिका प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी यावेळी सांगितलं

पालकमंत्र्यांनी महापालिकेच्या विविध विकास कामांचा, एका बैठकीत आढावा घेतला. औरंगाबाद शहर विकासाची प्रक्रिया गतिमान करण्याच्या दृष्टीने मनपाने आपल्या स्तरावर पदभरती प्रक्रिया राबवण्याचे निर्देश, पालकमंत्री देसाई यांनी दिले.

****

नांदेड जिल्ह्यातल्या मुदखेड शहराची वाढती लोकसंख्या पाहता, राज्य सरकारने ४१ कोटी रुपये खर्चाची पाणीपुरवठा योजना मंजूर केली आहे. या योजनेच्या कामाचं भूमिपूजन, राज्याचे सार्वजनिक बांधकाम तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते, काल मुदखेड इथं करण्यात आलं.

****

लातूर जिल्ह्याच्या विकासात सर्व यंत्रणांनी परिणामकारक योगदान द्यावं, आणि योजनांची अंमलबजावणी यशस्वीपणे करावी, असं जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी म्हटलं आहे. लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात काल झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. मुरुड ग्रामीण रुग्णालयात मंजूर झालेलं ट्रामा केअर सेंटर त्वरित सुरू करुन, रुग्णांना सुविधा उपलब्ध करून देण्याची सूचना, त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांना केली आहे.

****

परभणी जिल्ह्याच्या पालम तालुक्यात चाटोरी इथं विद्युत महावितरणच्या ३३ के.व्ही. उपकेंद्र उभारणीचं भूमिपूजन, आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते काल झालं. हे उपकेंद्र उभारल्याने चाटोरीसह परिसरातल्या अनेक गावांच्या विजेचा प्रश्न कायमचा सुटणार असल्यानं, नागरिकांकडून समाधान व्यक्त केलं जात आहे.

****

जालना शहरासह तालुक्यातल्या अनेक भागात काल दुपारनंतर पाऊस झाला. मानेगाव आणि मोतीगव्हाण दरम्यान रस्त्यावरच्या पुलाचं पावसाच्या पाण्यामुळे नुकसान झालं. अंबड तालुक्यातल्या मठपिंपळगाव, दुधपुरी, शेवगा, आलमगाव, आदी भागातही पावसाने समाधानकारक हजेरी लावली. दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे नांदेड, परभणी जिल्ह्यातही शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.

****

कृषी विभागाने जाहीर केलेल्या गेल्या रब्बी हंगाम पीक स्पर्धेत, उस्मानाबाद जिल्ह्याच्या भूम तालुक्यातल्या आर्सोली इथले सोमनाथ बापूराव मुंडेकर, यांनी हेक्टरी ९४ पूर्णांक ३० क्विंटल ज्वारीचं उत्पादन घेऊन, राज्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे. उस्मानाबाद तालुक्यातल्या चिखली इथले राजेंद्र ज्ञानदेव चव्हाण यांनी हेक्टरी ७३ क्विंटल ज्वारीचं उत्पादन घेऊन, लातूर विभागात पहिला क्रमांक पटकावला. भूम तालुक्यातल्या आनंदवाडी इथले निलेश यादव खामकर यांनी, हेक्टरी ६५ पूर्णांक ५० क्विंटल ज्वारीचं उत्पादन घेऊन, उस्मानाबाद जिल्ह्यात प्रथम, तर भूम तालुक्यातल्या आरसोली इथले बाळासाहेब आप्पाराव मुंडेकर यांनी हरभरा पिकाचे हेक्टरी ४७ पूर्णांक ३० क्विंटल उत्पन्न घेऊन, जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

****

औरंगाबाद इथं एका बेरोजगार युवकाला सरकारी नोकरी लावून देतो, म्हणून सात लाख रुपयांची फसवूणक करणाऱ्या भामट्याला अटक करण्यात आली आहे. मधुकर गायकवाड असं या भामट्याचं नाव असून, तो पैठण तालुक्यातल्या आडूळ इथला रहिवासी आहे. बुलडाणा जिल्ह्याच्या चिखली तालुक्यातल्या कव्हळ इथला बीपीएड झालेल्या रामेश्वर खरात याला, शासकीय नोकरी लावून देण्याचं आश्वासन गायकवाड दिलं होतं. खरात यानं शेती विकून पैशाची जमवाजमव करुन गायकवाड याला सात लाख रुपये दिले होते.

****

राज्यात येत्या दोन दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. या भगात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

****

No comments: