Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 25 June 2021
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २५ जून २०२१ सायंकाळी ६.१०
****
कोविड १९शी संबंधित निर्बंध शिथिल जरी झाले आले असले तरी कोरोना विषाणू
संसर्गाचा धोका अद्याप कायम आहे. त्यामुळे सर्वांनी संपूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे.
महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं, असं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. सुरक्षित
राहण्यासाठी नाका-तोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात आणि
चेहरा स्वच्छ ठेवावा तसंच लसीकरण करून घ्यावं. कोविड - १९ शी संबंधित अधिक माहिती आणि
मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदतवाहिनीशी किंवा ०२०- २६ १२
७३ ९४ या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
** राज्यात कोरोना विषाणू संसर्गाचं वाढतं प्रमाण आणि काही जिल्ह्यात
डेल्टा प्लस विषाणू आढळल्याच्या पार्श्वभूमीवर निर्बंध शिथिल करण्याच्या नियमात बदल,
आता संपूर्ण राज्य तिसऱ्या गटात ठेवण्याचा निर्णय
** कोविड १९ प्रतिबंधक लसीकरणात राज्यानं केला ३ कोटीचा टप्पा
पार
** माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपूरमधील
निवासस्थांनावर अंमलबजावणी संचालनालयाचे छापे
आणि
** उच्च आणि व्यावसायिक शिक्षण मातृभाषेतून देण्याचा निर्णय
देशाच्या प्रगतीसाठी क्रांतीकारक ठरेल- शिक्षणतज्ज्ञ डॉक्टर अनिल सहस्त्रबुध्दे यांना
विश्वास
****
राज्यात कोरोना विषाणू संसर्गाचं वाढतं प्रमाण आणि काही जिल्ह्यात
डेल्टा प्लस विषाणू आढळल्याच्या पार्श्वभूमीवर आज राज्य सरकारनं निर्बंध शिथिल करण्याच्या
नियमात बदल केले आहेत. याबाबत जारी नियमावलीनुसार सर्व जिल्हे आणि महानगरपालिकांचा
समावेश तिसऱ्या गटात ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी ४ जून रोजी जारी केलेल्या
नियमावलीनुसार पाच गटांमध्ये जिल्हे आणि महानगरपालिकांची विभागणी करण्यात आली होती.
यामध्ये प्रत्येक जिल्ह्यातील बाधितांचा दर आणि ऑक्सिजन खाटाच्या प्रमाणानुसार त्या
जिल्ह्यांचा गट निश्चित केला जात होता. आज जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार पात्र नागरिकांपैकी
७० टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्यावर भर द्यावा, कामाच्या ठिकाणीच लसीकरणासाठी
प्रोत्साहन द्यावं, चाचणी, शोध आणि उपचार या पद्धतीचा अवलंब करावा अशा सूचना देण्यात
आल्या आहेत. याचबरोबर हवेमधून पसरू शकणाऱ्या विषाणूंच्या प्रकारांना टाळण्यासाठी आस्थापनांना
कामाच्या ठिकाणी सुरक्षित आणि हवेशीर वातावरण ठेवण्याची सक्ती करावी, मोठ्या प्रमाणावर
आरटीपीसीआर चाचण्या कराव्यात, नियम न पाळणाऱ्यांवर प्रभावीपणे दंड आकारावा, गर्दी करणारे
किंवा होऊ शकणारे सर्व कार्यक्रम- घटना टाळाव्यात, प्रतिबंधक क्षेत्र तयार करताना काळजीपूर्वक
आढावा घ्यावा, अशा सूचना दिल्या आहेत. निर्बंध कमी करण्याबाबत किंवा वाढवण्याबाबत फक्त
आरटीपीसीआर चाचण्यांमधून समोर आलेल्या निष्कर्षांनाच आधारभूत मानण्याचे निर्देशही या
नियमावलीत देण्यात आले आहेत.
****
कोविड १९ प्रतिबंधक लसीकरणात राज्यानं आज ३ कोटीचा टप्पा पार
केला आहे. कोविन पोर्टलवर उपलब्ध झालेल्या आज दुपारपर्यंतच्या माहितीनुसार, राज्यात
आजच्या दिवसात २ लाख ५६ हजार ९२४ नागरिकांना लस दिली गेली. याबरोबरच कोविड प्रतिबंधक
लस घेतलेल्या राज्यातल्या नागरिकांची एकूण संख्या ३ कोटी २७ हजार २१७ झाली आहे. दरम्यान
राज्यात काल ४ लाख २० हजार ९६० नागरिकांना कोविड१९ प्रतिबंधक लस दिली गेली. देशात सर्वाधिक
लसीकरण करण्यात महाराष्ट्रानं आपलं अग्रस्थान कायम राखलं असल्याचं राज्याच्या आरोग्य
विभागानं कळवलं आहे.
****
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपूरमधील निवासस्थांनावर अंमलबजावणी संचालनालयानं आज सकाळी एकाच वेळी छापे
टाकले. सकाळपासून त्यांच्या घरात झाडाझडती घेण्यात आली. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त
परमबीर सिंह यांनी केलेल्या १०० कोटी रुपयांच्या कथित वसुलीप्रकरणात देशमुख यांना राज्याच्या
गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर आज त्यांच्या नागपूर आणि मुंबईतील
शासकीय निवासस्थान असलेल्या ज्ञानेश्वरी बंगला तसंच वरळी परिसरातील सुखदा या इमारतीमधील
घराची झडती घेण्यात आली. या कारवाईबाबत अतिशय गुप्तता बाळगण्यात आली आहे. यापूर्वीही
काही दिवसांपूर्वी देशमुख यांच्या घरावर ईडीनं छापे टाकले होते.
दरम्यान, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी
मुंबई उच्च न्यायालयानं केंद्रीय संस्थांना करायला सांगितलेल्या तपासाचा हा भाग असल्याचं
सांगितलं.
शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी ईडीच्या या कृतीवर
टीका केली आहे.
केंद्रीय यंत्रणांना आलेल्या नैराश्यातून ही कारवाई सुरू असून
आम्हाला त्याची चिंता वाटत नसल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद
पवार यांनी व्यक्त केली आहे.
****
राज्यातील आघाडी सरकारचा कारभार आणीबाणीची आठवण करून देणारा
असल्याची टिका भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आज केली. भाजपा
प्रदेश कार्यालयात आज झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आणीबाणीला पाठिंबा देणारी
शिवसेना काँग्रेसच्या सहकार्यानं राज्यातील जनतेला आणीबाणीचा अनुभव देत असून राज्य
सरकारविरोधात बोलणाऱ्या, लिहिणाऱ्या आणि आंदोलन करणाऱ्यांचा आवाज दडपला जात असल्याचंही
ते यावेळी म्हणाले.
****
राज्यातील दुध उत्पादकांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी दुग्ध
विकास मंत्री सुनील केदार यांनी आज मंत्रालयात किसान सभा, शेतकरी संघटना आणि दूध संघांच्या
प्रतिनिधींची महत्वपूर्ण बैठक घेतली. टाळेबंदीपूर्वी मिळत असलेले दर पुन्हा पूर्ववत
करण्यात येतील आणि पुन्हा असं संकट शेतकऱ्यांवर
कोसळू नये यासाठी उसाप्रमाणे दुधालाही एफ.आर.पी. लागू करणारा कायदा केला जाईल
आणि तो सहकारी तसंच खाजगी दूध संघ आणि कंपन्यांनाही लागू होईल असा तोडगा यावेळी बैठकीत
काढण्यात आला.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी २७ जून रोजी आकाशवाणीवरच्या
'मन की बात' या कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा
हा ७८ वा भाग आहे. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा
कार्यक्रम प्रसारित होईल.
****
केंद्राच्या नवीन शैक्षणिक धोरणात उच्च आणि तंत्रशिक्षण तसंच
वैद्यकीय आणि व्यावसायिक अभ्यासक्रमाचं शिक्षण मातृभाषेतून देण्याचा निर्णय देशाच्या
प्रगतीसाठी क्रांतीकारक ठरेल, असा विश्वास अखिल भारतीय तंत्रशिक्षण परीषद- एआयसीटीईचे
अध्यक्ष शिक्षणतज्ज्ञ डॉक्टर अनिल सहस्त्रबुध्दे यांनी व्यक्त केला आहे. डॉक्टर बाबासाहेब
आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ आज कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्या
अध्यक्षतेखाली आँनलाईन पध्दतीनं पार पडला, त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
देशात पाच प्रादेशिक भाषेत १४ तंत्रशिक्षण संस्थामध्ये यंदापासून हा प्रयोग राबवण्यात
येत असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. यावेळी बोलतांना कुलपती भगतसिंह कोश्यारी
यांनी, युवकांनी केवळ नोकऱ्यांच्या मागे न लागता पुस्तकी ज्ञानाला व्यावहारिक ज्ञानाची
जोड द्यावी असं आवाहन केलं आहे. या दीक्षांत समारंभात ८१ हजार ७३६ पदव्यांचं वितरण करण्यात आलं.
****
सध्याच्या स्पर्धेच्या युगात पोलिसांच्या पाल्यांना अभ्यासाला
अनुकूल असं शांत आणि चांगलं वातावरण मिळावं म्हणून औरंगाबाद ग्रामिणच्या पोलिस अधिक्षक
मोक्षदा पाटील यांच्या संकल्पनेतून ग्रामीण पोलिस मुख्यालयात सुसज्ज अशी “स्वयंभू अभ्यासिका”
कार्यान्वित करण्यात आली आहे. पोलिसांच्या कुटुंबातील स्पर्धा परिक्षेची तयारी करणारी
मुलं आणि शैक्षणिक परिक्षांना सामोरे जाणाऱ्या विद्यार्थांना याचा उपयोग होणार आहे.
****
नांदेड जिल्ह्यात माहूर, हिमायतनगर, मुदखेड आणि ऊमरी या भागात
कालरात्री मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. या पावसामुळे ऊगवलेल्या पिकांना थोडा आधार मिळाला
आहे. जिल्ह्यात खरीपाच्या आतापर्यंत ५० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या असून, पावसाने दडी
दिल्यामुळे काही भागात पेरण्या खोळंबल्या आहेत. पेरणी झालेल्या पिकांना पावसाची गरज
निर्माण झाली आहे.
****
जालना जिल्ह्यातल्या आठही तालुक्यात हवेतून ऑक्सिजन शोषूण
घेणाऱ्या आणि त्यावर प्रकिया करुन शुद्ध ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या पीएसए प्रकल्पाची उभारणी
करण्यात येणार असल्याचं प्रतिपादन आरोग्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश
टोपे यांनी केलं आहे. जिल्हा रुग्णालयाच्या आवारात उभारण्यात आलेल्या पीएसए ऑक्सिजननिर्मिती प्रकल्पाचा शुभारंभ आज आरोग्यमंत्री टोपे
यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत हेाते.
****
ईतर मागासवर्गीय-ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाचा तिढा सुटेपर्यंत
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती मिळावी या मागणीसाठी राज्य सरकारनं
सर्वोच्च न्यायालयात तातडीनं याचिका दाखल करावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश
सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज केली. मुंबईत भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या
पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
//*********//
No comments:
Post a Comment